आज गृहलक्ष्मीला स्वयंपाक रांधण्यासाठी इंधनपुरुष खूपच सोईचा झाला आहे. बाथरूमच्या पाण्याचा नळासारखीच एक तोटी फिरविली आणि तेथे लायटरमधून स्पार्क केला की स्वयंपाकासाठी भगभगून ज्योत तय्यार! तेसुद्धा घरात सिलेंडरसारखा कोठलाही साठा न ठेवता. बहुतांश मध्यमवर्गीय घरात आता महानगर गॅस कंपनीकडून पीएन्जी म्हणजे पाइप नॅचरल गॅसचा अखंड पुरवठा केला जातो आहे. ज्यांच्याकडे पीएन्जी उपलब्ध नसेल त्यांच्या स्वयंपाकघरात शेगडीसाठी सिलिंडरमध्ये भरलेला गॅस तरी असतोच असतो. फक्त त्या पुरवठय़ात सातत्य नसते.
परंतु सुमारे सात दशकांपूर्वी, स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी उच्चवर्गीय गृहिणींनी इंधन मिळविण्यासाठी खूप हाल सोसले आहेत. एवढेच नाही तर डोळ्यांतून टिपेही गाळली आहेत. १९४२-४३ च्या दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ. केरोसिन वा रॉकेलवर चालणारे स्टोव्ह स्वयंपाक घरात आले होते. कोळशाच्या शेगडय़ांची हकालपट्टी झाली होती. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात स्टोव्हमध्ये भरण्यासाठी रॉकेलच उपलब्ध नव्हते. आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या म्हणजे ब्रिटिशांचा शत्रू पूर्वेकडून भारताच्या दारात येऊन ठेपला होता. ब्रिटिश- अमेरिकन सैनिक मोठय़ा संख्येने भारताच्या बचावासाठी येथे उतरला होता आणि येथे उपलब्ध असलेली पेट्रोल- रॉकेलसारखी इंधने त्यांना सैनिक म्हणून दिली जात होती. सामान्य गृहिणीला गॅलनभर रॉकेल महिन्याला शिधापत्रिकेवर (रेशन) मिळत होते. त्यासाठी लांबलांब रांगा लागलेल्या असत. तो पुरवठाही बऱ्याच वेळा खंडित होत असे. रोज घरातील चूल तर पेटायला हवीच. मग त्यासाठी एका सुपीक डोक्यातून एक कल्पना पुढे आली. सुतारकामातून वा लाकडाच्या वखारीतून फेकला जाणारा भुसा इंधन म्हणून वापरण्याची टूम निघाली. त्यासाठी पत्र्याच्या वेगळ्या शेगडय़ा बनविण्यात आल्या. पत्र्याच्या एका गोलाकार असलेल्या डब्याला आतून जाळ येण्यापूरती मध्ये जागा ठेवून; त्याभोवतीची जागा या प्राचीन इंधनाला मोकळी असायची. सिलेंडर आकाराच्या या डब्याला बेसला तीन इंचाचा एक झरोखा असे. गृहिणी जवळच्या वखारीतून पोतंभर लाकडाचा भुस्सा आणि मोठा गोल दांडा आणून ठेवत असे. हा लाकडी दांडा डब्यामध्ये उभा धरून ठेवल्यानंतर उर्वरित मोकळ्या जागेत तो भुस्सा रेटून भरला जायचा. खालच्या झरोक्यातून रॉकेलमध्ये भिजविलेल्या काकडय़ाने तो पेटविला जात असे. भुस्स्याने पेट घेतला की वरच्या मोकळ्या जागेतून ज्योत बाहेर येत असे. त्यानंतर स्वयंपाकासाठी आवश्यक भांडे ठेवले की त्या धूरयुक्त जाळाने मोठय़ा विलंबाने तो रांधला जायचा.
रोजच्या सायंकाळी ही भुस्स्याची शेगडी वापरयोग्य करण्यासाठी गृहिणीला तासभर झगडावे लागत असे. तेव्हा यायच्या घामांच्या धारा तर शेगडीने पेट घेतला की काळ्याकुट्ट धुरामुळे अश्रुधारा. अशा हालअपेष्टात रोजचे जेवण रांधायचे म्हणजे गृहिणीला ब्रह्मांड आठवे. शेजारी रॉकेलने भरलेले गॅलन असले तरी त्याचा वापराचा विचार करणेही अशक्य. ते राखून ठेवलेले असे चहा करण्यास आणि अंघोळीचे पाणी तापवण्यास. आज ‘पाइप गॅस’ आणि ‘गिझर’ या सुखसोई’ असताना युद्धकाळातील गृहिणीचे हाल ऐकूनच अंगावर काटा येतो.
अखेर हिरोशिमावर अणुबॉम्ब पडला. जपानने शरणागती पत्करली, युद्धविराम झाला आणि काही महिन्यातच मुबलक रॉकेल उपलब्ध झाले आणि स्टोव्ह पेटू लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाले. इंधनाचे नवनवीन प्रकार उपलब्ध झाले. बर्शेन गॅस (सिलिंडर गॅस याच नावाने उल्लेख होत असे) आला. तो पेटविण्यासाठी काडय़ापेटीही आवश्यक झाली. त्या जागी लायटर आला. अलीकडेच रिफायनरीतून जाळून टाकला जाणारा गॅस, पाइपमधून घरोघरी पोहोचला आणि गृहिणीच्या चेहऱ्यावर हसू विलसले. तरीही त्या काळातील भुस्सा शेगडी ही कटू स्मृती आज जेष्ठ असलेल्या गृहिणीने जपून ठेवली आहे.
मधुसूदन फाटक vasturang@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2016 रोजी प्रकाशित
भुस्सा शेगडी
स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी उच्चवर्गीय गृहिणींनी इंधन मिळविण्यासाठी खूप हाल सोसले आहेत.
Written by मधुसूदन फाटक

First published on: 30-07-2016 at 00:26 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old cooking equipment