बिगर शेतजमीन असलेल्या विभागात स्थावर मिळकत म्हणजेच जमीनजुमला किंवा मालमत्तेची शासनाच्या भूमापन विभागाच्या दप्तरी असलेली नोंद तसेच कायदेशीर व अधिकृत मालकी व क्षेत्रफळ दर्शविणारा व नगर भूमापन अधिकाऱ्याच्या सही व शिक्कय़ासहित देण्यात येणारा शासकीय दस्तऐवज म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड. याविषयी..
हल्लीच्या काळात स्वत:च्या मालकीची स्थावर मिळकत मग ती जमीनजुमला वा घर, बंगला अथवा इमारतीच्या स्वरूपात असणे लाभदायक व फायद्याचे आहे. दिवसेंदिवस जमिनीचे भाव गगनाला भिडत आहेत. या पाश्र्वभूमीवर आपल्या स्थावर मिळकतीची रीतसर नोंदणी, सर्व कायदेशीर वारसदार व मालकी हक्कदार असलेल्यांची नावे व अचूक क्षेत्रफळ दर्शविणारा वैध शासकीय दस्तऐवज म्हणजेच मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आपल्या ताब्यात सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थावर मिळकतीवरून वा तिच्या वाटणीवरून जवळपास सर्वच कुटुंबांत वाद, हाणामारी व खून होण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. दिवाणी न्यायालयात स्थावर मिळकती संदर्भात दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या लक्षणीय आहे. शहरात किंवा परदेशात स्थिरस्थावर झालेल्या अनेकांना आपले मूळ गाव माहीत नसते. किंवा गावी वडिलोपार्जित अथवा वतन, इनाम वा बक्षीस पद्धतीने मिळालेला जमीनजुमला असल्याचे माहीत नसते. आणि जेव्हा माहित होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण त्याबाबत त्यांनी रीतसर अर्ज, नोंदणी व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून शासकीय वैध दस्तऐवज म्हणजेच मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) / सात-बाराचा (७ ७ १२) उतारा आपल्या नावे करून घेण्याचे कष्ट घेतलेले नसतात. परिणामी, गावातील तथाकथित पुढारी, समाजकंटक व शेजारी-पाजारी राहाणारे लोक गावच्या तलाठीस हाताशी धरून अथवा खोटी कागदपत्रे तयार करून बेवारस जमीन हडप करण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. हे सर्व टाळण्यासाठी व आपल्या वडिलोपार्जित मिळकतीचा लाभ आपल्यासाठी व आपल्या पुढल्या पिढीला उपभोगण्यासाठी सदरहू स्थावर मिळकतीच्या कायदेशीर वारसांच्या नावांची नोंद शासनाच्या दप्तरी होण्यासाठी शासनाच्या विहित पद्धतीची अधिक माहिती घेऊ.
बिगर शेतजमीन असलेल्या विभागात स्थावर मिळकत म्हणजेच जमीनजुमला किंवा मालमत्तेची शासनाच्या भूमापन विभागाच्या दप्तरी असलेली नोंद तसेच कायदेशीर व अधिकृत मालकी व क्षेत्रफळ दर्शविणारा व नगर भूमापन अधिकाऱ्याच्या सही व शिक्कय़ासहित देण्यात येणारा शासकीय दस्तऐवज म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड. तसेच शेतजमीन असलेल्या विभागात तलाठी कार्यालयातून देण्यात येणाऱ्या दस्तऐवजास सात-बाराचा (७ ७ १२) उतारा असे म्हणतात.
जर एखाद्याने बिगर शेतजमीन विभागात मोकळा भूखंड अथवा घर, बंगला, इमारत विकत घेतल्यानंतर त्याबाबत रीतसर खरेदीखत करण्यात येते. त्यावर दोन्ही पक्षकार (विकत देणारी व्यक्ती व विकत घेणारी व्यक्ती) व साक्षीदारांच्या सह्या झाल्यावर खरेदीच्या किमतीवर आधारित व संबंधित विभागातील प्रचलित बाजारमूल्य व रेडी रेकनरच्या आधारे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून संबंधित विभागीय उपनिबंधक कार्यालयात त्याची रीतसर नोंदणी करण्यात येते. त्यानंतर सदरहू स्थावर मिळकतीचा क्षेत्रफळासह संपूर्ण तपशील कायदेशीरपणे शासनाच्या नगर भूमापन कार्यालयाच्या दप्तरी नोंद होण्यासाठी म्हणजेच मिळकत पत्रिकेत नाव दाखल करण्यासाठी त्याचप्रमाणे अन्य प्रकारे मिळालेली मिळकत संबंधित व्यक्तीच्या नावे शासनाच्या नगर भूमापन कार्यालयाच्या दप्तरी नोंद होण्यासाठी व

मिळकत पत्रिकेत नाव दाखल करण्यासाठी प्रचलित शासकीय पद्धत खालीलप्रमाणे:-
परिरक्षण भूमापक दाखल केलेल्या कागदपत्रांचे अत्यंत काळजीपूर्वक परीक्षण करून आपला अहवाल तयार करतो आणि नगर भूमापन रेकॉर्डमध्ये आवश्यक असा शेरा लिहिण्याच्या अनुषंगाने काही हरकती असल्यास विहित नमुना (फॉर्म) नंबर ९ मध्ये अर्जदार व संबंधित पक्षकारांना नोटीस देण्याची व्यवस्था करतो व त्याची एक प्रत नगर भूमापन कार्यालयास पाठवितो. नोटीस दिल्यापासून १५ दिवसांच्या अवधीनंतर अर्जदाराला नगर भूमापन कार्यालयात बोलाविण्यात येते. विशेषत: स्थावर मिळकतीच्या आजूबाजूस राहाणाऱ्या लोकांनी काही हरकती नोंदविल्यास त्याची दखल घेतली जाते.
त्यासंबंधी हरकत/आक्षेप असल्यास पक्षकारांना व संबंधितांना त्यांचे म्हणणे व बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतरच नगर भूमापन अधिकारी त्याबाबत आपला आदेश जारी करतो आणि त्यानंतरच मिळकत पत्रिकेत रीतसर नोंदणी करण्यात येते. अशा प्रकारे शासनाच्या नगर भूमापन कार्यालयातील दप्तरी रीतसर नोंदणी झाल्यावरच अर्जदार लेखी स्वरूपात अर्ज करून त्याच्या नावाने स्थावर मिळकती संबंधात मिळकत पत्रिका म्हणजे प्रॉपर्टी कार्डाची प्रत नगर भूमापन कार्यालयातून प्राप्त करू शकतो. स्थावर मिळकतीचे मोजमाप, हद्द कायम (डिमारकेशन) मधील प्लॉटच्या पोट हिश्श्यातील ( सब-डिव्हिजन ) एरियामधील फरक व प्लॉटचे एकत्रीकरण इत्यादीबाबत तपशीलवार माहिती स्थावर मिळकतदार व्यक्तींना असणे अत्यंत आवश्यक आहे. प्लॉटच्या पोट हिश्श्याच्या (सब-डिव्हिजन) विभागणीबाबतची पद्धत खालीलप्रमाणे :
प्लॉटच्या पोट हिश्श्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रथम महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागतो. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तशी परवानगी दिल्यानंतर त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाकडे देऊन त्याची पोहोचपावती घ्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभाग त्यांच्या दप्तरी असलेल्या नोंदी तपासून नगर भूमापन कार्यालयाला जागा हद्द कायम करण्याकरिता आदेश देतील. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार नगर भूमापन कार्यालय महानगरपालिकेने मंजूर केलेला आराखडा व क्षेत्रफळ याची काळजीपूर्वक तपासणी करील आणि महानगरपालिकेच्या भूमापन खात्याच्या अधिकृत प्रतिनिधींसोबत नगर भूमापन कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी जातीने जागेवर उपस्थित राहून जागेचे मोजमाप व सीमा रेषा (चतु:सीमा) निश्चित करतील. त्यानंतरच नगर भूमापन कार्यालयाच्या दप्तरात आवश्यक ते बदल करण्यात येतात. यालाच मोजणी नकाशा किंवा एम. आर. शीट असे म्हणतात.
येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, नगर भूमापन कार्यालयाचे व महानगरपालिकेचे अधिकृत प्रतिनिधी
आपल्या मोजणी नकाशासह व्यक्तिश: उपस्थित राहून तयार करण्यात आलेल्या जागेचे मोजमाप व सीमा रेषा निश्चित करणाऱ्या कागदपत्रांवर उपस्थित अर्जदार व अन्य पक्षकारांच्या त्याच ठिकाणी सह्या घेतल्या जातात. जमिनीचे मोजमाप व सीमा रेषा दर्शविणारा आराखडा आणि कार्यालयातील सदरहू जागेसंबंधीच्या दप्तरातील नोंदी तपासून मगच दप्तरातील नोंदीत आवश्यक ते फेरफार नगर भूमापन अधिकारी करतो. त्यानंतर सदरहू स्थावर मिळकतीच्या नगर भूमापन क्रमांकांची विभागणी करण्यात येईल. जर यापूर्वी एकत्रित मिळकतीचा भूमापन (सिटी सव्‍‌र्हे) क्रमांक ९ असेल तर विभागणी प्रक्रिया पूर्ण केल्यावर नगर भूमापन (सिटी सव्‍‌र्हे ) क्रमांक ९-अ व ९-ब असा दिला जाईल. त्यानंतर अर्जदाराला सदरहू मिळकतीच्या सुधारित नगर भूमापन क्रमांकांच्या नोंदीची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) नगर भूमापन कार्यालयात रीतसर अर्ज करून प्राप्त करता येईल.
मिळकत पत्रिकेत नाव दाखल करण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
(१) प्रत्येक अर्जास रुपये ५/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा.
(२) पुराव्याची अस्सल कागदपत्रे जोडावीत.
(३) वारसाबाबत मृत्यूचा मूळ दाखला / तहसीलदार / दंडाधिकारी यांच्याकडील योग्य ते प्रतिज्ञापत्र, सर्व वारसांची नावे व पत्ते आदी तपशील सोबत जोडावा.
(अ) खरेदीखताबाबत : उपनिबंधक / दस्तऐवज नोंदणी कार्यालयात नोंदविण्यात आलेली खरेदीखताची (दस्ताची) प्रमाणित नक्कल व सूची क्रमांक २ (इंडेक्स २)ची मूळ प्रमाणित नक्कल सोबत जोडावी.
(ब) बोजाबाबत : उपनिबंधक / दस्तऐवज नोंदणी कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या नोंदणीकृत दस्तऐवजाची प्रमाणित नक्कल सोबत जोडावी.
(क) ट्रस्टबाबत : धर्मादाय आयुक्त यांच्याकडील विश्वस्ताबाबतचा दाखला सोबत जोडावा.
(ड) न्यायालयाकडील आदेश : न्यायालय हुकूमनामा व ताबे पावती.
(ई) हक्क संपादनाची वर्दी : हक्क संपादनाची वर्दी तीन महिन्यांत देणे आवश्यक आहे. ती न दिल्यास दंडास पात्र.
(ख) बक्षीसपत्राने नोंदीबाबत : नोंदणीकृत बक्षीसपत्राची प्रमाणित प्रत, सूची क्रमांक २ सह सर्व संबंधितांची पूर्ण नावे व पत्ते आदी तपशील सोबत जोडावा.
(ग) वारसांनी मिळकतीतील हक्क सोडले असल्यास नोंदणीकृत हक्क सोडपत्र (रिलीज डीड) सोबत जोडावे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे शासनाच्या नगर भूमापन कार्यालयात दाखल करून त्याची रीतसर पोहोचपावती घ्यावी. त्यानंतर ही सर्व कागदपत्रे प्रथम अभिलेखपाल (रेकॉर्ड कारकून) यांच्याकडे पाठविली जातात. त्यानंतर ती कागदपत्रे परिरक्षण भूमापक (मेंटेनन्स सव्‍‌र्हेअर) यांच्याकडे पाठविली जातात. तेथून ती कागदपत्रे परत नगर भूमापन कार्यालयात योग्य तो शेरा नमूद करण्यासाठी पाठविली जातात. या ठिकाणी तेथील अभिलेखपाल खरेदीखतात / अन्य दस्तऐवजात नमूद करण्यात आलेले जागेचे क्षेत्रफळ, त्यांच्या दप्तरी नोंद असलेले क्षेत्रफळ व मिळकत पत्रिकेत नमूद करण्यात आलेले क्षेत्रफळ यांची काटेकोरपणे पडताळणी करतो. त्यानंतर नगर भूमापन कार्यालय सर्व कागदपत्रे परत परिरक्षण भूमापक यांच्याकडे पाठविली जातात. या ठिकाणी पुन्हा स्थावर मिळकतीच्या प्रॉपर्टीच्या टायटल संबंधांत जोडलेली कागदपत्रे व क्षेत्रफळ याची काळजीपूर्वक तपासणी  केली जाते.
vish26rao@yahoo.co.in