एखादी कलाकृती सादर करण्यासाठी एक सशक्त टीम एकत्र येते- ज्यात चॅनलची क्रिएटिव्ह टीम दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, कलाकार या सगळ्यांचे कष्ट असतात. आणि हे कष्ट एकत्रित पडद्यावर उमटायला लागतात तेव्हा ‘होणार सून मी या घरची’सारख्या मालिकेची निर्मिती होते. आमच्या या मालिकेत आम्हा कलाकारांव्यतिरिक्त प्रत्येक सीनमध्ये शाश्वत असं आणखी एक पात्र तुम्हाला नेहमी दिसत आलंय, ते म्हणजे आमची लोकेशन्स. सीरियलचा सच्चेपणा या ‘रिअल लोकेशन्स’मधून आधी डोकावतो.
आमची सहस्रबुद्धेंची वास्तू आठवत्ये? अत्यंत खरं, टोपीवाला चाळीतलं एक जणू राहतं घर. ज्याचं असणं कलाकार म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही आमच्यात जिरवून घेतलं; आणि ज्याने बरेचदा सीनच्या सुरुवातीला, आम्ही व्यक्त होण्याआधीच तुमच्यापर्यंत गोष्टीतल्या भावना पोहोचवल्यात. या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याशी माझ्या आठवणी जोडल्या गेल्यात. दारासमोरचं ‘तुळशी वृंदावन’ हे बहुधा प्रत्येक हिरॉइनचं श्रद्धास्थान असतंच, पण जान्हवी साकारताना पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर त्या तुळशीपुढे नतमस्तक झाले तेव्हापासूनच तेजश्रीच्याही ते मनातला विश्वास बनलं. आणि मग त्यावरच्या मंजिऱ्या या सीरियलच्या प्रत्येक फुलत जाणाऱ्या क्षणागणिक तुमच्या आणि माझ्याही मनात ‘होणार सून..’ मोहरवत गेल्या. आमच्या अख्ख्या टीमने शेवटच्या क्षणापर्यंत हे ‘तुळशी वृंदावन’ जगवलं. दिवस पुढे जात होते तशी ‘होणार सून..’च्या यशाची एखादी छोटीशी झुळूक मी आमच्या वऱ्हांडय़ातल्या झोपाळ्यात बसून अनुभवायचे, पण त्याचीही उंची आमच्या ‘आर्ट डिपार्टमेंट’ने इतकीच ठेवली की, झुलताना पायांनी कधी जमीन सोडली नाही.
अनेकदा सीरियलमध्ये कधीच न दिसणारं लोकेशन या घरात मात्र जान्हवीच्या प्रत्येक सोसण्याचं साक्षीदार बनलं, ते म्हणजे किचनलगतची ‘मोरी.’ आईने दिवसभराचं साठवून ठेवलेलं काम जान्हवी तिथेच बसून पूर्ण करू लागली आणि दिग्दर्शक (मंदार देवस्थळी याच्या विश्वासानेच अत्यंत साध्या गाऊनमध्ये, केस वरती बांधून, स्वत:चं हिरॉइनपणा बाजूला सारून फतकल मारून भांडी घासायला बसलेली जान्हवी तुमच्या नजरेत सुंदर ठरली. जान्हवीला सकाळपासूनच चहा-नाष्टा, स्वयंपाक करायला लावणारी तिची सावत्र आई कला म्हणजेच आशा शेलार मात्र या अडीच वर्षांच्या काळात कॅमेऱ्यामागे प्रेमळ आई बनूनच राहिल्या.
माहेरच्या घरातली आणखी एक लक्षवेधी जागा म्हणजे या घराचा माळा. अत्यंत मोहक असा छोटासा जिना किचनच्या वाटेने माळ्यापर्यंत पोहोचवायचा. या माळ्यावरच तायडा आणि पिंटय़ाचं नातं खुलत गेलं. सीरियलच्या प्रत्येक भागात तायडाच्या आधाराने चालणारा हा लहान भाऊ अर्थात रोहन गुजर शूटिंगव्यतिरिक्त मात्र कायम माझा सगळ्यात छान मित्र बनून माझ्या प्रत्येक गरजेला माझा आधार बनलाय.
प्रत्येक घरात एक अडगळीची जागा असते. तशी या घरातही तुम्हाला फारशी न दिसलेली एक खोली होती अडगळीची. ज्यात जान्हवीच्या आईचा फोटो होता. या फोटोशी संवाद साधणारे तिचे बाबा तुम्ही पाहिलेत. तिथेच या दोघांच्या सहवासात जान्हवीने संस्कारांचे धडे गिरवले, म्हणूनच असेल कदाचित पोपडे पडलेल्या भिंतीच्या घरातून सासरी ‘गोकुळा’त गेल्यावरही तिचं वागणं कधी बदललं नाही. ती समजूतदारपणेच वागली. भिंतीवरचा आईचा फोटो आणि भिंतीवरचे देव यांनी जान्हवीतही भक्कमपणा निर्माण केला. आज मनोज कोल्हटकरांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि रोहन इंडस्ट्रीमधल्या संस्कारांचे धडे गिरवतो.
तुम्हाला सीरियलमध्ये कधीच न दिसलेलं एक लोकेशन आमच्या मात्र दैनंदिन जीवनाचा भाग होतं, ते म्हणजे या चाळीचा लांब सुळक्यासारखा शूटिंगच्या घरापर्यंत पोहोचवणारा ‘जिना.’ या सगळ्या प्रवासात सिन्ससाठी या जिन्याने जसं वर-खाली करायचो ना, तसेच आम्ही तुमच्या मनातही कलाकार म्हणून कधी वर चढलो तर कधी टीकेला पात्र झालो. पण प्रयत्न मात्र कायम निष्ठेने वर चढण्याचाच करीत आलो आणि यापुढेही तुमच्या मनाचा कौल घेत-घेत वरच चढत राहू.
तेजश्री प्रधान – tej.pradhan88@gmail.com