पारंपरिक घरं या सर्व हवामानाचा, भूगर्भाचा, जैवविविधतेचा आणि विरोधाभासाचा अभ्यास करून अनेक वर्षांच्या प्रयोगशीलतेतून निर्माण झाली आहे, आजही कालानुसार बदलत आहेत. इथे जागा आणि मध्ये घर या सर्वसाधारण आराखडय़ाला बाजूला करून संपूर्ण भूखंडाचंच विशिष्टय़पूर्ण घरकुलात रूपांतर केलं आहे. संपूर्ण जागेला सर्व बाजूंनी उंच दगडी ‘तटबंदी’, जणू काही किल्लाच.
गेल्या वैशाख अमावास्येला उपराळकर देवचाराला दिलेल्या आश्वासनानुसार वास्तुपुरुषाची नवनिर्मिती संकल्पनेसंबंधी विचारधारा चालू होती. त्याला आधार म्हणून भूकंपग्रस्त परिसराच्या तथाकथित पुनर्वसनाची पहाणी आणि गावकऱ्यांशी चर्चा सुरू होतीच. उजाड, रखरखीत परिसरांत ग्रीष्माची काहिली जमीन भाजून काढत होती आणि तेवढय़ातच गेल्या आठवडय़ात थोडासा पावसाचा शिडकावा झाला, गडगडाट आणि विद्युल्लतेचं नर्तनही काही काळ झालं. हवेत थोडा गारवा आला. मृग नक्षत्रही नुकतंच लागलं. शेतकरी खरिपाच्या तयारीत आहेतच. शेतात बराच वावरही वाढला आहे. काळी माती आसुसली आहे. पावसाच्या सरींबरोबर मृद्गंध परिसराला भूल घालत आहे. वास्तुपुरुष एका ओढय़ाच्या किनाऱ्याने निघाला होता. ओढय़ात अधूनमधून तुरळक गढूळ पाण्याची डबकी दिसायला लागली होती, ओढय़ातल्या जमिनीत ओलावा दिसत होता. काही ठिकाणी नवी हिरवळ उगवायला सुरुवात झाली होती. वास्तुपुरुषाच्या कानी जवळूनच कुठून तरी येणारा धीरगंभीर खर्जातला सूर गुंजायला लागला. मन प्रफुल्लित झालं. पिवळ्या धमक बेडकांची प्रियाराधना सुरू झाली होती. एका डबक्याच्या कडेला नव चैतन्याची, नवनिर्मितीची सुरुवातच! बेडकांच्या सुरात रंगलेल्या वास्तुपुरुषाची समाधी बाजूच्याच शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याने भंग केली. ‘‘काय राव, कुठे ध्यान लागलं आहे?’’
‘‘अहो, मृग नक्षत्र लागलं नव्हे का? बेडकावरून आलं आहे या वर्षांला. खूप पाऊस व्हायचाय सगळीकडे. आपल्या इथं काय होणार ते या बेडकांनाच माहीत!’’
वास्तुपुरुष हसला, ‘‘राम राम दादा! तुमच्या गावची शिवारं बघतो आहे. पोटा-पाण्याचा आधार आहे ना? भूकंपानंतरच्या वीस वर्षांत परिस्थिती सुधारलेली दिसत नाही. काय म्हणते आहे शेतीवाडी?’’
गावकरी खिन्नपणे हसला, ‘‘काय राव, गरिबाची चेष्टा करताय. धरतीमाता आहे, तिची मशागत करायचं आमचं कर्तव्य. हातात काय पडणार, कशी गुजराण होणार हे त्या बेडूक महाराजालाच माहीत! सगळा भरवसा आहे त्या आकाशातल्या कृष्णमेघांवर!’’ एका पिवळ्या धमक, टरटरीत मंडूकराजाने काहीशा जोरातच ‘डरकावून’ आणि दोन चार उडय़ा मारून वास्तुपुरुषाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. देवचाराच्या निसर्गदूताची ओळख पटली आणि वास्तुपुरुषाने आपली वाटचाल उपराळकर देवराईच्या दिशेला वळवली. मनातला सगळा हलकल्लोळ देवचाराकडे व्यक्त करायचा होता, त्यातूनच आदर्श नवनिर्मितीचा आराखडा मांडायचा होता. ज्येष्ठ पौर्णिमा जवळच आली होती. ही आहे वटपौर्णिमा. पण वाटेत जाताना अनेक नुकतीच कत्तल झालेले वटवृक्ष दीनवाणे उभे असलेले दिसत होते. हा शहरी मनोवृत्तीचा शाप. वडाची पूजा तर करायची, पण आणा फांद्या बाजारातून घरी आणि करा सोज्ज्वळ पूजा! खरं तर वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर वड, पिंपळ, उंबरादी अश्वस्थ कुळातील झाडांची लागवड करूनच निसर्गपूजा व्हायला पाहिजे. करू या अशीच सुरुवात आपल्या नवनिर्मितीच्या संकल्पनेतून. वास्तुपुरुष झपाटय़ाने निघाला, वाटेतला मार्गदर्शक बेडूक निसर्गदूतांकडून दिशावेध घेत.
वाटेने जाता जाता त्याचं लक्ष होतं वेगवेगळ्या घरांकडे; गावातल्या आणि शहरातल्याही. विरोधाभास तर दिसतच होता, पण परिसरानुसार बदलणाऱ्या रचनाही वैविध्याचा सुखद अनुभव देत होत्या. मराठवाडा, देश, मावळ आणि कोकण परिसर वैविध्य, हवामान वैविध्य, जैवविविधता, समाज वैविध्य आणि या सर्वाना सुसंगत असं तुरळक वास्तुवैविध्य.
वास्तुपुरुष मराठवाडा परिसरातल्या घरांच्या रचनेच्या विचारात रंगला होता. तिथल्या पारंपरिक घरांच्या रचना त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या रहात होत्या. बहुतेक गावं दाट वस्तीची, एकमेकांना लगडून असलेल्या घरांची वस्ती. पण घर तरी कसं? बांधकाम आणि मोकळी जागा एकमेकांत मिसळून तयार झालेला घरोबा! कुठं घर संपतं आणि अंगण सुरू होतं याचा पत्ताच लागत नाही. त्यातच मिसळून गेलेला गाई-गुरांचा निवारा, कोंबडय़ांची खुराडी, सावलीत बसलेल्या शेळ्या, शेत-अवजारांचं गोदाम, नहाणी आणि चुलाण, त्यातल्या सांडपाण्यावर तरारलेला तुरळक भाजीपाला, मोकळ्या जागेतलं वाळवण, विखुरलेल्या खाटा. घराची सीमा मात्र व्यवस्थित, चारी बाजूंनी दगडी तटबंदीने आखलेली आणि त्या तटबंदीतच सामावलेलं, लपलेलं घरकुल.
वास्तुपुरुष वाघेरीच्या पायथ्याशी पोचला आणि मुसळधार पावसाच्या सरींनी त्याला चांगलंच चिंबवलं. निसर्गदूत बेडकांच्या खर्जातल्या लयीत रममाण होत तो उपराळात शिरलासुद्धा. आज प्रथमच तो दिवसा उजेडी देवराई अनुभवत होता, पावलांना हळुवार कुरवाळणाऱ्या ताज्यातव्याना हिरवळीतून वाटचाल करत होता. शीळकस्तुराच्या संगीतावर डुलत होता, मृद्गंध आणि पावसाळी वनस्पतींचे उच्छ्वास शरीरात आणि मनात साठवत होता. उंबर निर्झर हळुवार लयकारीत वहात होता. प्रसन्न वातावरणात शिरता शिरताच देवचाराने स्वागत केलं, ‘‘काय मग, मराठवाडय़ाच्या काहिलीतून येताना आमच्या कोकणातील मृगवर्षांवातला प्रवेश कसा काय वाटतो आहे? मी तर खूप उत्सुक आहे त्या उष्ण प्रदेशातील मानवी जीवन समजून घ्यायला. चला सुरू करू या वास्तुपुराण!’’ वास्तुपुरुष नतमस्तक झाला.
‘‘नमस्कार देवा महाराजा! खरंच मराठवाडय़ातील माणसांचं कौतुक करायला हवं. त्या असह्य़, खडतर परिसरात आणि विषम हवामानातही ते सुसह्य़ वास्तुरचना करून, समर्पक शेती, उद्योग करून समाधानात जीवन जगताहेत. खूप शिकता आलं या गावकऱ्यांकडून.’’
उपराळकर देवचार अधीरतेने उद्गारला, ‘‘चल मग सुरुवात कर त्यांच्या घरांपासून आणि शेवट कर त्यांच्या जीवनशैलीने.’’
‘‘देवा महाराजा, हा मराठवाडय़ाचा परिसर वेगळाच आहे. सह्यद्रीच्या पर्जन्य छायेतलं दख्खनचं पठार आहे. अग्नीजन्य कातळ आणि त्यातून तयार झालेली काळीभोर माती, काही ठिकाणी मात्र रखरखीत करडा मुरूम, चुनखडीची माती. सगळीकडे सपाटीच, चुकूनमाकून एखादी टेकडी किंवा सखल प्रदेश, एखादा ओढा आणि पाणवठा. हवामान विषम, उष्ण आणि शुष्क. दिवसा अंगाची काहिली तर रात्री शिरशिरी. दिवसा सूर्याची आगपाखड, तडकलेल्या मरुताने उधळलेली धूळ वादळं, तर रात्री टिपूर चांदणं. एका बाजूला काटेरी झाडं- झुडूप, निवडुंग तर ओढय़ाकिनारी सदाहरित शिशम, कडुलिंब, चंदन आणि करंज. सगळा विरोधाभासच. पारंपरिक घरं या सर्व हवामानाचा, भूगर्भाचा, जैवविविधतेचा आणि विरोधाभासाचा अभ्यास करून अनेक वर्षांच्या प्रयोगशीलतेतून निर्माण झाली आहे, आजही कालानुसार बदलत आहेत. इथे जागा आणि मध्ये घर या सर्वसाधारण आराखडय़ाला बाजूला करून संपूर्ण भूखंडाचंच विशिष्टय़पूर्ण घरकुलात रूपांतर केलं आहे. संपूर्ण जागेला सर्व बाजूंनी उंच दगडी ‘तटबंदी’, जणू काही किल्लाच. शत्रू ,वन्यजीव आणि वावटळींना आत मज्जाव! मालकाच्या संपन्नतेनुसार कमानदार प्रवेशद्वाराची आखणी. राजवाडय़ाप्रमाणे, मंदिराप्रमाणे किंवा साधा पण शोभिवंत, प्रेमाने स्वागत करणारा, तरीही सुरक्षा जपणारा दरवाजा. आल्या आल्या उन्हातान्हातून थकूनभागून आलेल्या पाहुण्यांना बसायला प्रवेशद्वारातच थंडगार ओसरी. प्रवेश खुल्या अंगणात, चहू बाजूंनी वेढलेल्या घराच्या वेगवेगळ्या रुपडय़ांनी. घर परिसरातला पाठमोरं आणि मधल्या अंगणात सामोरं जाणारं, त्यामुळे बाहेरील भयाण उष्ण वाऱ्यापासून, धुळीपासून, उन्हाच्या तडकण्यापासून सुरक्षित. महत्त्वाच्या वास्तव्याच्या खोल्या सहसा उत्तरेला तटबंदीच्या कुशीत थंडावा देणाऱ्या. गाई गुरांचा निवारा, गोदाम सहसा दक्षिणेच्या तटबंदीलगत ऊबदार. प्रवेशद्वार आणि लगतच्या विविध वापराच्या खोल्या पूर्वेच्या तटबंदीचा भाग- समशितोष्ण आणि स्वागतमय. पश्चिमेला स्वयंपाकघर, नहाणी आणि भाजीपाला बागायत, तेजोमय आणि प्रेमळ. प्रत्येक खोलीची आखणी आणि दिशेनुसार जागा, वापराच्या गरजेनुसार, सूर्यमार्गाला समर्पक. सहसा तळमजल्याचंच घर, पण उंची अशी की मधल्या अंगणाचा सुमारे ५०% भाग सतत छायेत. त्यातही अंगणात एखादा वृक्ष, सहसा पानगळीचा. उन्हाळ्यात शीतल छाया देणारा तर हिवाळ्यात ऊबदार सूर्यकिरणांचं अंगणात स्वागत करणारा. या घरकुलाचं अंत:करण हिवाळ्यात ऊबदार तर उन्हाळ्यात शीतल. घरात शिरलं तर डोळे अंधारून जातात, पुन्हा एकदा विरोधाभास बाहेरच्या प्रखर परिसराविरुद्ध. बाहेरच्या तटबंदीच्या बाजूला खिडक्या नाहीतच, फारतर छोटे झरोके, मंद वायूवीजनासाठी! अंतरंगातील बाजूने मात्र खिडक्या- दरवाज्यांची पखरण, पण तीही पडवीच्या आसऱ्याने थंडाई देणारी. परिसरातील उष्ण हवा प्रथम अंतरंगातल्या अंगणात प्रवेश करून शीतलता स्वीकारते आणि मग घरात प्रवेश करते. मंद वहनाने रहिवाश्यांची मनं प्रफुल्लित ठेवते. भिंती दगडी किंवा मातीच्या जाड असल्याने अंतर्भाग उन्हाळ्यात शीतल, तर हिवाळ्यात ऊबदार. वरचं छप्पर धाब्याचं- सपाट, लाकडी वाश्यांवर जाडजूड मातीच्या थरांचं, ज्वारीच्या कडब्याचं, कडूनिंबाच्या काटक्यांचं मिश्रण केलेलं. सपाट छप्पर दिवसा वाळवणासाठी आणि रात्री शीतल शयनगृह. अंगणही तसंच, संध्याकाळी ते सकाळ प्रमुख वावराचं ठिकाण आणि आकाशगंगेचं दर्शन देणारं शयनगृह. काही खोल्या मात्र बिनभिंतींच्या, बांबू किंवा इतर काटक्यांच्या तट्टय़ांच्या. नहाणीला छप्पर नभांगणाचं! एक महत्त्वाची उणीव म्हणजे शौचालय. पारंपरिक पद्धतीने शेतातच हे सर्व उरकलं जातं. या हवामानात त्याचं शेताला खत होतं हे खरं असलं तरी आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आणि महिलांसाठी फारच गैरसोयीचं. आता मात्र यात फरक पडतो आहे. आणखी एक उणीव भासते ती म्हणजे वास्तुसौंदर्याची. इथल्या खडतर जीवनात मानवी संस्कृतीचं हे एक महत्त्वाचं अंग दुर्लक्षित राहिलं आहे. इथले रहिवासी मात्र सुखी-समाधानी आहेत. रात्री रंगलेल्या भजनातून, टाळ-मृदुंगांच्या लयींतून ते व्यक्त होत असतं.
उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाला रोखलं. ‘‘वास्तुपुरुषा, हे सर्व पारंपरिक वास्तुज्ञान खरोखरच कौतुकास्पद आहे. पण मग त्या ३० सप्टेंबर १९९३ च्या एका धरणीकंपाने हे सर्व उद्ध्वस्त का झालं? आणि आता पुनर्वसनात किंवा नवनिर्मितीत काय सुधारणा केल्या आहेत? मला तर हे कोडंच वाटतं आहे.’’
‘‘खरं आहे देवचारा, एक चूक प्रचंड नुकसान करून गेली. निसर्गाचा कोप भयानक असू शकतो, पण अनेकदा तो मानवाने केलेल्या पर्यावरण विध्वंसाचा दुष्परिणाम असतो. अनेक ठिकाणी आढळून आलं आहे की मानवाने विकासाच्या नावाखाली चालवलेली निसर्गाची हानी, डोंगर-दऱ्यांतलं अनाहूत उत्खनन, नदी-नाल्यांमधले अडथळे, खनिजांच्या हव्यासापोटी होणारी भूगर्भाची हानी, मातीची अनियंत्रित धूप, वृक्षतोड आणि निसर्ग परिसर विध्वंस, अनियंत्रित आणि असंवेदनशील औद्योगिक विकास, त्यातून होणारं जमीन, पाणी आणि हवेचं प्रदूषण या सर्वाच्या एकत्रित आघाताने परिसर उद्ध्वस्त होत आहेत. पूर, त्सुनामी, वावटळी, भूकंप इत्यादी निसर्गकोपांतून होणारी प्रचंड हानी ही मानवाला मिळणारी एक प्रकारची शिक्षाच आहे. मानव यातून सुज्ञ व्हावा ही अपेक्षा. या लातूर परिसरातील इमारती ढासळण्याचं प्रमुख कारण चुकीच्या बांधकाम तंत्रात आहे. इथली उद्ध्वस्त झालेली बहुतेक घरं ही दगड- गोटय़ांनी बांधलेली होती. त्यात जोडणीसाठी मातीचा किंवा चुनखडी पुडीचा उपयोग केला होता. इथपर्यंत ठीक होतं, त्यामुळे ही घरं सर्वसाधारण प्रसंगात टिकली होती, थोडय़ाशा डागडुजीने सावरली गेली होती. परंतु अशा बांधकामात भिंतीच्या स्थिरतेसाठी प्रमुख आवश्यकता असते- टप्प्या टप्प्यातलं बांधकाम आणि सांधेतोड. हे प्रमुख तंत्र या भागात दुर्लक्षित केलं गेलं होतं आणि दुर्दैवाने भूकंपाच्या एका धक्क्याने ही घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, दगड माती- लाकडांच्या प्रचंड भाराखाली अनके जीव चिरडले गेले. त्यात भर म्हणजे या परिसरातील भूगर्भरचनेत पसरत जाणाऱ्या भेगाही आहेत. पुनर्वसनात आणि नवनिर्मितीत ही काळजी घेतली नाही तर पुन्हा अशा दुर्घटनेला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकेल. याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन, की या परिसराला समर्पक असं सर्वागीण आणि संतुलित ग्रामविकासाचं, नवनिर्मितीचं सूत्र अंगीकारायला हवं. माझी विचारधारा आता त्या दिशेने चालली आहे. देवा महाराजा, तुझ्या कृपेने पुढच्या अवसेला येतो आदर्श नवनिर्मितीचा आराखडा घेऊन. शिवाय हा आराखडा अशाच इतर परिसरांनाही लागू पडेल अशी मला खात्री आहे. बघू आपण गुजरातमधील कच्छ आणि राजस्थानमधील मरूभूमी प्रदेशसुद्धा. आशीर्वाद दे रे महाराजा.’’
उपराळकर देवचार सद्गदित झाला. भारावलेल्या अवस्थेत त्याने वास्तुपुरुषाला शुभेच्छा दिल्या. कृष्णमेघ विरळ होऊन हलकेच संध्याकाळचे सूर्यकिरण देवराईत शिरत होते. निसर्गदूत बेडकांनी पुन्हा एकदा काहीसा वेगळाच सूर धरला. त्या मार्गाने देवराईतून बाहेर पडता पडता वास्तुपुरुषाचं मनही जबाबदारीच्या जाणिवेने गंभीर झालं होतं. वाघेरीच्या पूर्व उतारावर पाय टाकताच गर्द निळ्या नभांगणाने इशारा केला. पूर्व क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनूचं तोरण उभारलं गेलं होतं. निसर्ग नवनिर्मितीच्या शुभेच्छा वास्तुपुरुषाला देत होता. वास्तुपुरुषाची वाटचाल पुन्हा एकदा त्या इंद्रधनूच्या दिशेने, पूर्वेकडील दख्खनच्या पठाराकडे प्रफुल्ल मनाने सुरू झाली. आता सुरुवात एका निर्धाराने करायची. वटपौर्णिमेला आपल्या कार्यक्षेत्रात वड, पिंपळ, उंबर इत्यादी अश्वत्थ कुलातील वृक्षांच्या वनीकरणाला सुरुवात करून आदर्श नवनिर्मितीचा मुहूर्त करायचा.
उल्हास राणे – ulhasrane@gmail.com