अॅड. तन्मय केतकर
मृत्युपत्राला समवयस्क साक्षीदारां ऐवजी, तुलनेने वयाने तरुण, वयाने कमी असलेले साक्षीदार नेमण्याचा प्रयत्न करावा. आपल्यापेक्षा वयाने तरुण साक्षीदार, अपघाती किंवा अचानक होणारे निधन वगळता, आपल्या नंतर हयात असण्याची शक्यता अधिक असते. जे साक्षीदारांच्या बाबतीत तेच डॉक्टरच्या बाबतीतसुद्धा लागू असल्याने मृत्युपत्राकरता वैद्यकीय दाखला घेतानासुद्धा शक्यतोवर वयाने तरुण डॉक्टरचा वैद्यकीय दाखला घ्यावा.
मृत्यू जेवढा निश्चित, तेवढीच मृत्यूची वेळ अनिश्चित हे लक्षात घेता, वेळच्यावेळी मृत्युपत्र करून ठेवणे हे नेहमीच श्रेयस्कर ठरते. या बाबतीतली जागरूकता वाढत असल्याने पूर्वीपेक्षा अधिक संख्येने लोक आता मृत्युपत्र करून ठेवत आहेत.
कायदेशीर दृष्टिकोनातून वैध ठरणारे मृत्युपत्र करण्याकरता मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीचा वैद्यकीय दाखला आणि मृत्युपत्रास किमान दोन साक्षीदार या अटींची पूर्तता होणे बंधनकारक आहे.
मृत्युपत्राला साक्षीदार का लागतात? त्यांचे महत्त्व काय आहे? हे लक्षात न घेता बहुतांश प्रकरणात सर्वसाधारणत: समवयस्क नातलग किंवा मित्रमंडळींना मृत्युपत्राचे साक्षीदार म्हणून नेमण्यात येते.
मृत्युपत्र केलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर जेव्हा मृत्युपत्राच्या संबंधाने न्यायालयीन कारवाई किंवा न्यायालयीन वाद होतात, तेव्हा त्यामध्ये मृत्युपत्र सिद्ध होण्याकरता वैद्यकीय दाखला देणारे डॉक्टर आणि साक्षीदारांची साक्ष या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. साहजिकच भविष्यात आपल्या निधनानंतर जेव्हा केव्हा आपल्या मृत्युपत्राच्या अनुषंगाने न्यायालयीन कारवाई किंवा वाद उद्भवतील, तेव्हा
वैद्यकीय दाखला देणारे डॉक्टर आणि साक्षीदार साक्ष द्यायला हयात असणे गरजेचे आहे हे ध्यानात ठेवूनच आपण साक्षीदारांची नेमणूक करावी.
कोणाच्याही मृत्यूचे भाकीत करता येणे शक्य नसले, तरीसुद्धा सर्वसाधारणत: आयुर्मानाचा विचार करता, आपण समवयस्क साक्षीदार नेमल्यास, आपल्याच आगे-मागे त्यांचे देखील निधन होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत: आपल्या मृत्युनंतर, मात्र मृत्युपत्राच्या न्यायालयीन कारवाईच्या वेळेआधीच त्यांचे निधन झाले तर त्याबाबतीत आपले वारस आणि मृत्युपत्रातील लाभार्थी यांच्यापुढे कायदेशीर पेच उभा राहण्याची शक्यता असते.
हे टाळण्याकरता आपल्या मृत्युपत्राला समवयस्क साक्षीदारां ऐवजी, तुलनेने वयाने तरुण, वयाने कमी असलेले साक्षीदार नेमण्याचा प्रयत्न करावा. आपल्यापेक्षा वयाने तरुण साक्षीदार, अपघाती किंवा अचानक होणारे निधन वगळता, आपल्या नंतर हयात असण्याची शक्यता अधिक असते. जे साक्षीदारांच्या बाबतीत तेच डॉक्टरच्या बाबतीतसुद्धा लागू असल्याने मृत्युपत्राकरता वैद्यकीय दाखला घेतानासुद्धा शक्यतोवर वयाने तरुण डॉक्टरचा वैद्यकीय दाखला घ्यावा.
आपल्या मृत्युपत्राच्या अनुषंगाने न्यायालयीन कारवाई किंवा न्यायालयीन वाद यामध्ये आपले वारस आणि मृत्युपत्रातील लाभार्थ्यांना या डॉक्टर आणि साक्षीदारांच्या साक्षीचा चांगल्यापैकी फायदा होऊन, अंतिमत: आपल्याच मृत्युपत्राची अंमलबजावणी होणे सुकर होते. म्हणूनच वयाने तरुण साक्षीदार नेमणे ही वास्तविक गरज आहे, त्यायोगे वयाने प्रौढ लोकांचा अपमान होतो असा गैरसमज कोणीच बाळगू नये.
tanmayketkar@gmail.com