News Flash

सावधान! कुणी तरी आहे तिथे..

समाजमाध्यम हे सर्जनशील आणि विघातक अशा दोन्ही बाजू असलेले एक दुधारी अस्त्र आहे

अमृतांशु नेरुरकर

समाजमाध्यमांवर आपण सतत कोणाच्यातरी नजरेखाली आहोत, ही भावना वापरकर्त्यांच्या अभिव्यक्तीवरही बंधने आणणारी..

समाजमाध्यमांवरील विदासुरक्षेशी निगडित दोन प्रमुख धोक्यांचा ऊहापोह आपण मागील लेखात केला. प्राध्यापक व्रूडो हर्टझॉग आणि ख्रिस्टो विल्सन यांनी आणखी तीन प्रकारच्या धोक्यांची त्यांच्या शोधनिबंधात जाणीव करून दिली आहे. ते तीन धोके पुढीलप्रमाणे..

(१) आपण डिजिटल व्यासपीठांवर प्रसृत करत असलेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या माहितीची दृश्यमानता वाढवण्याचे, तसेच तिला अधिक शोधण्यायोग्य व परिपूर्ण बनवण्याचे उद्योग समाजमाध्यमी कंपन्यांकडून चाललेले असतात. आपली खासगी माहिती अशा प्रकारे अधिकाधिक लोकांना विनाकारण उपलब्ध होणे आणि या माहितीचा- ती केवळ सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे- अनेकांकडून आपल्या फायद्यासाठी (गैर)वापर होत राहणे, हा समाजमाध्यमांवरील अलीकडच्या काळातील एक प्रमुख धोका आहे, ज्याला ‘ओव्हरएक्स्पोजर’ असेही म्हटले जाते.

आपल्यापैकी अनेकजण असे असतील की, ज्यांनी कोणत्याही समाजमाध्यमी संस्थळावर नावनोंदणी करताना किंवा त्यानंतरही आपल्या माहितीच्या गोपनीयतेचे नियंत्रण करणाऱ्या ‘प्रायव्हसी सेटिंग्स’ना कधीच डोळ्याखालून घातले नसेल. बऱ्याचदा आपण त्यांना त्यांच्या मूळ ‘डिफॉल्ट’ स्वरूपातच ठेवून देतो. या कंपन्या आपली गोपनीयतेसंदर्भातील धोरणे वारंवार बदलत असल्यामुळे त्यांच्या ‘प्रायव्हसी सेटिंग्स’मध्येही आपल्या नकळत बदल होत असतात. वरवर पाहता सूक्ष्म वाटणारे हे बदल आपल्या खासगी माहितीला चव्हाटय़ावर आणायला हातभार लाऊ शकतात.

मागे उल्लेखल्याप्रमाणे, हा आपल्या माहितीच्या मदतीने केला जाणारा एक ‘सव्‍‌र्हेलन्स’चाच प्रकार आहे आणि अशा सतत निरीक्षणाखाली राहण्याचे माणसांच्या वर्तणुकीवर नकारात्मक परिणाम होतात. समाजमाध्यमांवर आपण सतत कोणाच्यातरी नजरेखाली आहोत ही भावना जेव्हा वापरकर्त्यांच्या मनात वाढीला लागते, तेव्हा त्याच्या या व्यासपीठावरील अभिव्यक्तीवर आपसूक बंधने येऊ लागतात. अशा गोठलेल्या निष्क्रिय अभिव्यक्तीचे मानसशास्त्रज्ञांनी ‘चिलिंग इफेक्ट’ असे नामकरण केलेय.

समाजमाध्यमांवरील ‘सव्‍‌र्हेलन्स’ आणि त्याचे वापरकर्त्यांच्या अभिव्यक्तीवर होणारे परिणाम हे ख्यातनाम ब्रिटिश तत्त्वज्ञ जेरेमी बेंथमने अठराव्या शतकात मांडलेल्या ‘पॅन-ऑप्टिकॉन’च्या संकल्पनेशी बरेचसे मिळतेजुळते आहेत. त्या काळी ब्रिटनमधल्या तुरुंगांचे व्यवस्थापन हा प्रशासनासाठी एक जिकिरीचा प्रश्न बनला होता. कैद्यांची वाढलेली संख्या आणि त्या तुलनेत कमी पडत असलेले अधिकाऱ्यांचे संख्याबळ यामुळे कैद्यांवरती वचक निर्माण करण्याला तुरुंग प्रशासनाला म्हणावे तितके यश मिळत नव्हते आणि एकंदरीतच तुरुंगांमध्ये पुष्कळ अनागोंदी माजली होती.

तुरुंगांमधील अनुशासन पर्व जर परत आणायचे असेल तर प्रशासनाला प्रत्येक कैद्यावर नजर ठेवणे जरुरीचे होते, जे अपुऱ्या मनुष्यबळामुळे शक्य नव्हते. मानसशास्त्राचा गाढा अभ्यासक असलेल्या बेंथमच्या हे लक्षात आले की, कैद्यांवर जरब बसविण्यासाठी त्यांच्यावर प्रत्यक्षात नजर ठेवण्याची तितकीशी गरज नाही. आपण तुरुंग प्रशासनातील कोणा अज्ञात अधिकाऱ्याच्या सतत पाळतीखाली आहोत ही भावना जरी तुरुंगाधिकारी प्रत्येक कैद्याच्या गळी उतरवण्यात यशस्वी झाला तरी कैद्यांच्या वर्तणुकीत बरीच सुधारणा होऊ शकते. यासाठीच मग बेंथमने ‘पॅन-ऑप्टिकॉन’ची संकल्पना मांडली.

‘पॅन-ऑप्टिकॉन’ हे बेंथमच्या मतानुसार एका आदर्श तुरुंगाचे प्रारूप आहे (चित्र पाहा). ज्यामध्ये तुरुंगातील कैद्यांच्या सर्व खोल्या वर्तुळाकार पद्धतीने एका मध्यवर्ती मनोऱ्या समोर उभारलेल्या असतात. मनोऱ्याची रचना साधारणत: एका टेहळणी बुरुजासारखी केलेली असते, ज्यायोगे आतील व्यक्तीला बाहेरील सर्व नीट दिसू शकेल आणि बाहेरील व्यक्तीस मनोऱ्याच्या आत कोण आहे की नाही याचा जराही सुगावा लागणार नाही. तुरुंगाची संरचना अशा विशिष्ट पद्धतीने करण्याचे दोन फायदे होतात. एक तर, सर्व कैद्यांवर एकाच वेळी लक्ष ठेवणे सोपे होते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, आपण दिवसाचे २४ तास कोणाच्यातरी नजरेखाली आहोत ही भावना कैद्यांच्या मनात तयार होऊ लागते- भलेही मनोऱ्यातून त्यांच्यावर प्रत्यक्षपणे कोणी नजर ठेवून असो अथवा नसो, ज्याचा फायदा कैद्यांवर वचक बसून तुरुंग व्यवस्थापन सुधारण्यात नक्कीच होऊ शकतो.

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये जे निरीक्षण केले जाते, त्यावेळेला आपल्यावर कोणाचे लक्ष असू शकेल (पोलीस, सुरक्षा कर्मचारी आदी) याचा एक अंदाज बांधता येतो. ‘पॅन-ऑप्टिकॉन’प्रमाणेच समाजमाध्यमांवर मात्र आपल्या माहितीचे निरीक्षण कोण खरोखरच करतेय का आणि करत असेल तर कोण करत असेल, याचा कसलाही अंदाज बांधता येत नाही- मग ती एक व्यक्ती किंवा गट असू शकतो, आपण नोकरी करत असलेली कंपनी असू शकते किंवा अगदी सर्वशक्तिमान सरकारही असू शकते. पण एक अज्ञात ‘बिग ब्रदर’ आपल्यावर पाळत ठेवून आहे, ही भावनाच प्रचंड अस्वस्थ करणारी आणि आपल्या अभिव्यक्तीचे आकुंचन करणारी आहे यात शंका नाही.

(२) समाजमाध्यमांवर मी प्रसृत केलेली वैयक्तिक स्वरूपाची विदा एखाद्या व्यक्तीच्या हाती लागण्यासाठी ती व्यक्ती माझ्या परिचितांच्या यादीत असलीच पाहिजे असे काही नाही. माझ्याशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या व्यक्तीलादेखील ही माहिती उपलब्ध होऊ शकते, कारण ती व्यक्ती अप्रत्यक्षपणे माझ्याशी जोडली गेलेली असू शकते. नेटवर्किंगच्या नियमाप्रमाणे, एखाद्या नेटवर्कमध्ये जितके जास्त ‘नोड्स’ असतील, तितक्या प्रत्येक नोडच्या उर्वरित नोड्सशी जोडल्या जाण्याच्या शक्यता वाढतात. समाजमाध्यमांवर असे करोडो नोड्स (म्हणजेच वापरकर्ते) असल्याने प्रत्येक वापरकर्ता दुसऱ्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेलाच असतो.

अशा वेळेला मी अगदी माझ्या जवळच्या व्यक्तींशी समाजमाध्यमांवर ‘शेअर’ केलेली ‘गुपिते’, त्या व्यक्तींनी त्यांना कितीही गुप्त राखण्याचा प्रयत्न केला असला तरीही, गुपिते म्हणूनच राहतील का? दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. हे म्हणजे गावात एखादी ‘सनसनीखेज’ बातमी किंवा अफवा पसरण्यासारखे आहे. एकदा ती एका माणसाकडून दोन किंवा अधिक लोकांना माहीत झाली की ती संपूर्ण गावभर पसरायला फारसा वेळ लागत नाही. म्हणूनच समाजमाध्यमांवर कोणतीही गोष्ट ‘पोस्ट’ करताना आपल्याला पूर्णपणे अपरिचित आणि ज्यांच्यावर आपण जराही विश्वास टाकू शकत नाही अशा व्यक्तींपासून सावध राहावे लागते. प्रा. हर्टझॉग आणि प्रा. विल्सन यांनी या प्रकारच्या धोक्याचे ‘फेथलेस फ्रेण्ड्स’ असे नामकरण केलेय.

गेल्या काही वर्षांत तर आपली मते, वर्तणूक किंवा अगदी निर्णयप्रक्रियेवरही प्रभाव टाकू शकणारे ‘इन्फ्लुएन्सर्स’, एखाद्या विषयावर आपण केलेल्या टीकाटिप्पणीवर किंवा अजाणतेपणी केलेल्या भाष्यावर त्याचे संदर्भ वगैरे तपासण्याची तसदी न घेता तुटून पडणारे जल्पक (ट्रोल्स), अशांच्या वाढत्या संख्येमुळे या प्रकारच्या धोक्याला जराही दुर्लक्षून चालणारे नाही.

(३) डिजिटल व्यासपीठांवर समाजातील काही विशिष्ट व्यक्ती किंवा गटांच्या होणाऱ्या छळवणुकीचा, म्हणजेच ‘ऑनलाइन हॅरॅसमेंट’चा धोका हा विशेष करून गेल्या दशकभरात पुष्कळ पटींनी वाढला आहे. अर्थात, हा धोका केवळ समाजमाध्यमांशीच निगडित नाहीये हे खरे असले तरीही, या मंचांच्या उदयानंतरच या धोक्याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. पौगंडावस्थेतील मुले, स्त्रिया, भिन्न लैंगिक जाणिवा असणाऱ्या व्यक्ती (‘एलजीबीटीक्यू’ समूदाय) किंवा धर्म, वंश, जात आदी बाबतींत अल्पसंख्याक असणाऱ्या व्यक्ती, या सामान्यपणे अशा प्रकारच्या छळवणुकीला बळी पडतात.

अपमानास्पद वागणूक, दादागिरी, शारीरिक किंवा मानसिक अत्याचार, लैंगिक हिंसाचार या सामान्यत: आढळणाऱ्या प्रकारांबरोबरच ऑनलाइन छळवणुकीच्याही नवनवीन पद्धती गेल्या काही वर्षांत उदयास आल्या आहेत. ‘स्टॉकिंग’ – एखाद्या व्यक्तीच्या डिजिटल दिनचर्येवर किंवा ई-व्यवहारांवर उघड उघड अथवा गुप्तपणे पाळत ठेवणे; ‘डॉक्सिंग’ – द्वेषयुक्त भावनेने एखाद्या व्यक्तीची खासगी व संवेदनशील माहिती चव्हाटय़ावर आणणे; ‘रिव्हेंज पॉर्न’ – प्रेमभंग किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचा (विशेषत: स्त्रीचा) बदला घेण्यासाठी तिची स्वत:जवळ असलेली अश्लील छायाचित्रे वा दृक्मुद्रणे, अर्थात त्या व्यक्तीच्या पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक व्यासपीठांवर खुली करणे, अशा ऑनलाइन छळवणुकीच्या नव्या पद्धती प्रचलित होत आहेत आणि येत्या काळात त्यात भर पडतच जाणार आहे.

समाजमाध्यम हे सर्जनशील आणि विघातक अशा दोन्ही बाजू असलेले एक दुधारी अस्त्र आहे. त्यावरील विघातक शक्तींना बळी न पडण्यासाठी आपण सर्वानी काही पथ्ये पाळण्याची पुष्कळ जरुरी आहे, ज्याचा ऊहापोह आपण लेखमालेत पुढे करणार आहोत.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 3:44 am

Web Title: restricting on expression of users on social media zws 70
Next Stories
1 विदासुरक्षेपुढे समाजमाध्यमी धोके
2 समाजमाध्यमे आणि गोपनीयता
3 डिजिटल ‘युद्धा’ची सुरुवात..
Just Now!
X