Sanjay Raut on Shinde-Ajit Pawar: “दोन अनौरस बापांच्या ताकदीवर…”,राऊतांची शिंदे-अजित पवारांवर टीका
शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता, या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले, “आमचा पक्ष आहे म्हणून उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. नेते गेले असले तरी आमचे कार्यकर्ते, शिवसैनिक जागेवर आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा होता. पण तुमचा पक्ष कुठे आहे? हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा. चोरलेल्या पक्षावर डींग मारू नका. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा. कुणी काकाचा पक्ष चोरतो, कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय. तेही दिल्लीतील दोन अनौरस बापाच्या ताकदीवर आणि निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा ताब्यात घेऊन, पक्ष चोरले जात आहेत.” अशा शब्दात संजय राऊत यांनी आक्रमक टीका केली.