निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणीही कामांचा धडाका लावतो. त्यातूनच निवडणुकीपूर्वी विविध निर्णय घेतले. कोणत्याही बिल्डरांच्या फायली हातावेगळ्या केलेल्या नाहीत. सिंचन खात्यात शिस्त आणल्यामुळे नाराज झालेल्या अजित पवार यांनी आपल्यावर खोटेनाटे आरोप करण्यास सुरुवात केल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दीड महिन्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी बिल्डरांच्या फायली हातावेगळ्या केल्या होत्या, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी उत्तर दिले. ‘नगरविकास खातेही आपल्याकडे होते व त्यातूनच फायली आपल्याकडे येत. फक्त बिल्डरांच्या फायली मंजूर केल्या हा आरोपच मुळात चुकीचा आहे,’ असे चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. चटईक्षेत्र     (पान ११वर)
निर्देशांक, सामूहिक विकास योजना (क्लस्टर), उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आदींसाठी धोरण ठरविणे निश्चित होते. कायदेशीर बाबींप्रमाणेच या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घ्यावी लागतात. ही सारी प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी गेला. हे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यातून फक्त बिल्डरांचे हित कसे साधले जाणार, असा उलट सवालही चव्हाण यांनी केला.
‘आघाडी होऊ नये, अशी अजित पवार यांचीच भूमिका होती. कारण राज्यभर दौरे करताना लोकसभेतील पराभवाचे खापर ते काँग्रेसवर फोडत होते,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आघाडी तुटण्याला अजित पवारच जबाबदार असल्याचे सूचित केले.
भूसंपादन झाले नसतानाही राज्यात अनेक ठिकाणी सिंचनाची कामे सुरू करण्यात आली होती. यातून ८० हजार कोटींची कामे रखडली आहेत. प्रकल्प व्यवहार्य असल्याशिवाय नव्या प्रकल्पांची कामे हाती घेऊ नयेत, असे सक्त आदेश मी दिले होते. यामुळे  अजित पवार हे माझ्यावर आरोप करत आहेत.
– पृथ्वीराज चव्हाण