शिवसेनेकडून अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने आता ‘स्वाभिमानी पॅटर्न’ राबविण्यास सुरुवात केली असून घटकपक्षांना हाताशी धरून व्यूहरचना केली आहे. अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या काही नेत्यांना महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पाठवून त्यांना शिवसेनेच्या कोटय़ातून उमेदवारी मिळवून देण्याची ही व्यवस्था असल्याची चर्चा सुरू आहे.
भाजप व शिवसेनेकडून चारही घटकपक्षांना अजूनही सुमारे ३२ ते ३५ जागांची अपेक्षा आहे. त्या पक्षांकडे या जागांवर सबळ उमेदवार नाहीत. भाजपसाठी अधिक जागा सोडण्याची शिवसेनेची तयारी नाही, मात्र घटकपक्षांना जागा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे जे नेते भाजपमध्ये येऊ इच्छितात, त्यापैकी काहींना घटकपक्षांमार्फत शिवसेनेच्या कोटय़ातील मतदारसंघांतून उमेदवारी मिळवून देण्याची व्यूहरचना भाजप करीत आहे. भाजप प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या प्रवेश सोहळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील नेते व माजी मंत्री सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रवेश केला. त्यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. परिचारक हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भारत भालके हे अपक्ष आमदार निवडून आले. ही जागा आपली असल्याचा आणि या क्षेत्रात आपला पक्ष प्रभावी असल्याचा स्वाभिमानीचा दावा आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढविण्याची तयारी केली आहे. हा तिढा सोडविण्यासाठी परिचारक यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याऐवजी स्वाभिमानी पक्षात पाठविण्यात आले. त्यामुळे ज्या जागा भाजपला हव्या आहेत किंवा अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येण्याच्या तयारीत असलेल्या ज्या नेत्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांच्यासाठी घटकपक्षांचा मार्ग तयार करण्यात आला आहे. चारही घटकपक्षांची शिवसेनेपेक्षा भाजपशी अधिक सलगी आहे. त्यामुळे ही व्यूहरचना अधिकाधिक भाजपच्या फायद्याची कशी होईल, याच्या राजकीय चाली खेळण्यात येत आहेत. घटकपक्षांची जागांची मागणी त्यांच्या क्षमतेपेक्षा किंवा त्यांच्याकडे असलेल्या प्रबळ उमेदवारांपेक्षा अधिक आहे. भाजपच्या संपर्कात असलेल्या नेत्यांसाठी ही सोय करण्याची राजकीय खेळी आहे.