26 September 2020

News Flash

माढय़ात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंज

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिष्ठेचा मजबूत गड म्हणून ओळखला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राखला खरा; परंतु आता विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठा राखणे राष्ट्रवादीला

| September 20, 2014 03:17 am

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिष्ठेचा मजबूत गड म्हणून ओळखला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राखला खरा; परंतु आता विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठा राखणे राष्ट्रवादीला अधिक जिकिरीचे ठरले आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्तांतर होणार असल्याचा अंदाज हेरून आघाडीतून अनेक नेते आमदारकीसाठी महायुतीमध्ये दाखल झाल्यामुळे त्याठिकाणीही अडचणी वाढल्या आहेत.
राज्यात नकारात्मक परिस्थितीमुळे पुन्हा मोदी लाट येईल आणि आपणास तारून नेईल, या विश्वासाने माढा भागात राजकीय उलथापालथ होत आहे. परंतु जागांचा तिढा सोडविताना योग्य उमेदवारांची निवड करणे आणि बंडाळी रोखणे ही दोन मोठी आव्हाने महायुतीला पेलावी लागणार आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बेदिली माजण्याची व त्यातून गड उद्ध्वस्त होण्याची भीती राष्ट्रवादीला वाटत आहे.  सोलापूर जिल्ह्य़ात मागील पाच वर्षांत पक्षांतर्गत साठमारीच्या राजकारणात अडगळीत गेलेले मोहिते-पाटील हे पुन्हा निर्णय प्रक्रियेत आले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील हे ‘मोकळे’ राहून अवमानाचा बदला घेणार का, याकडे सर्वाच्या नजरा वळल्या आहेत. माढय़ात राष्ट्रवादीचे चार, शेकाप आणि काँग्रेसपुरस्कृत अपक्ष प्रत्येकी एक असे आमदारांचे बलाबल असून प्रत्येक जण पक्षाची ताकद गौण मानत स्वत:च्या हिमतीवर अस्तित्वासाठीताकद पणाला लावताना दिसतो आहे.
माढा
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे चौथ्यांदा रिंगणात उतरत आहेत.  सातशे कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून विकास कामे केल्याचा ते दावा करत आहेत. ते आणि त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी पवार काका-पुतण्याच्या विश्वासाच्या बळावर संपूर्ण जिल्ह्य़ावर वर्चस्व मिळविले आहे. परंतु आता विधानसभेसाठी त्यांना मोहिते-पाटील यांची मदत घेणे भाग पडणार आहे. राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजी सावंत व काँग्रेसचे कल्याणराव काळे हे साखर सम्राट शिवसेनेत जाऊन आमदार शिंदे यांना आव्हान देत आहेत. हे दोघेही मोहिते-पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून आहेत.
करमाळा
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४ हजारांच्या मतांची हानी झालेल्या करमाळा मतदारसंघाला शेजारच्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावे जोडली असून यात ८२ हजार मतदारांचा समावेश आहे. याच बळावर माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे करमाळ्यावर स्वारी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आमदार श्यामल बागल यांची अडचण झाली आहे. पवारनिष्ठेपोटी शिंदे बंधूंना साथ देणाऱ्या बागल यांना आता मोहिते-पाटील यांच्याकडे धावा करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे नारायण पाटील हे आमदारकीसाठी शिवसेनेत गेले, तर काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप हेदेखील निवडणूक आखाडय़ात उतरण्याच्या तयारीत आहेत.
माळशिरस
मोहिते-पाटील गटाची पकड असलेल्या माळशिरस राखीव मतदारसंघाने लोकसभेवेळी मोहिते-पाटील यांना ३९ हजार मताधिक्याची साथ दिली असली तरी तीच स्थिती विधानसभेत कायम राहण्याची शाश्वती नाही. इतर विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांच्याकडून जुने हिशेब चुकते होऊ नयेत म्हणून पक्षांतर्गत विरोधकांनी मोहिते-पाटील यांना माळशिरसमध्येच जखडून ठेवण्याचा प्रयत्न चालविला असून पंचायत समितीतील सत्ताबदल हे त्याचेच द्योतक समजले जाते. राष्ट्रवादीचे आमदार हणमंत डोळस यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार की दुसऱ्यालाच संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. संजय शिंदे यांची ‘रसद’ मिळविणारे उत्तम जानकर यांनी ‘स्वाभिमानी’च्या रूपाने मोहिते-पाटील यांना कडवे आव्हान दिले आहे.
सांगोला
दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोल्यातून शेकापचे नेते गणपतराव देशमुख (८७) हे विधानसभेतील ५० वर्षांचा विक्रमी टप्पा पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी तयार झाले आहेत. इथे नेहमीप्रमाणे पन्नास वर्षांनंतरही पाण्याचा आणि सुप्तपणे जातीचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. धनगर समाजाच्या गणपतराव देशमुख यांना पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील (मराठा) यांनी महायुतीत जाऊन शिवसेनेमार्फत आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते सदाशिव खोत यांना मोदी लाटेत १४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. श्रीकांत देशमुख हे देखील रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.
फलटण
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही फलटण (राखीव) मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला जेमतेम १६५२ मतांची आघाडी मिळाली होती. माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांचा प्रभाव मोडीत काढण्यासाठी आघाडीअंतर्गत विरोधक चिमणराव कदम, हिंदूराव नाईक-निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील ही मंडळी प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविली जाते. आमदार दीपक चव्हाण हे रामराजेंच्या मर्जीतील आहेत. आघाडीतील दिगंबर आगवणे हे शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी पटकावण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राखण्यासाठी या मतदारसंघातील उत्तर कोरेगाव भागातून जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे व माजी खासदार लक्ष्मण पाटील यांची साथ निर्णायक ठरणार आहे.
माण-खटाव
नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले अपक्ष आमदार जयकुमार गोरे हे माण-खटावमधून पुन्हा एकदा निवडणूक तयारी करीत असताना त्यांच्या विरोधात त्यांचेच बंधू शेखर गोरे यांच्यासह अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघात परंपरागत पाणीप्रश्न यंदाही तेवढाच आक्रमक आहे. देशमुख ही जागा लढविण्याच्या हेतूने भाजपमध्ये गेले आहेत. तर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर हे राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. विरोधकांच्या मत विभागणीचा लाभ जयकुमार गोरे यांना मिळणार का, हा इथला औत्सुक्याचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ला या मतदारसंघातून १६५२ मतांची आघाडी मिळाली होती. ही स्थिती कायम राहणार की आघाडीचेच वर्चस्व शाबूत राहणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 3:17 am

Web Title: ncp struggles for prestige in mhada ls constituency in assembly election
टॅग Mhada,Ncp,Sharad Pawar
Next Stories
1 प्रतीक्षा घटस्थापनेची!
2 पुढे चालवू हा आम्ही ‘वारसा’
3 आधी जागांचं बोला, मग आघाडीचं!
Just Now!
X