विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने भाजपच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयावरही भाजपचा झेंडा फडकावण्याची नरेंद्र मोदींची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी संघ कार्यकर्ते बाहेर पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीच्या विजयात संघ कार्यकर्त्यांच्या योजनाबद्ध प्रचार यंत्रणेचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप स्वबळावर लढत असल्यामुळे या निवडणुकीचे परिमाणच बदलले आहे. त्यातही, सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच निवडणूक प्रचार सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपवर ठपका ठेवल्याने भाजपची पारंपरिक हिंदुत्ववादी मते सेनेकडे जातील, अशी भीती भाजपच्या गोटात व्यक्त होऊ लागली. हिंदुत्ववादी मतपेढी भाजपकडेच राखण्यासाठी संघ कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरून सहकार्य करावे म्हणून संघाच्या स्थानिक नेत्यांना साकडे घातले गेले. संघ थेट राजकारणात सक्रियपणे सहभागी होत नसला, तरी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेपेक्षा भाजपशी अधिक जवळीक असल्याने, संघाच्या कार्यकर्त्यांचे वजन भाजपच्या पारडय़ात पडले असून स्थानिक पातळीवरच भाजपसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून हिसकावण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असला तरी मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेपोटी शिवसेनेने युती तोडली, या प्रचारावर भाजपला भर द्यावा लागणार आहे. कारण, युती संपुष्टात आणण्याच्या भाजपच्या निर्णयावर पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी आहे. मात्र, युती तुटल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचणार असल्याने, राज्याती संघ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. अशा नाराज मतदारांना पुन्हा भाजपकडे वळविण्याची जबाबदारी संघ कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. संघाचे पदाधिकारी मात्र निवडणुकीतील संघाच्या थेट सहभागाबद्दल मौन पाळणेच पसंत करतात. लोकसभा निवडणुकीत संघाच्या कार्यकर्त्यांनी आखणीबद्ध यंत्रणा उभी केली होती. मतदार नोंदणीपासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याच्या जबाबदाऱ्याही संघ कार्यकर्त्यांना वाटून देण्यात आल्या होत्या. या वेळी मात्र तशी आखणी केलेली नसून स्थानिक पातळीवरच कार्यकर्त्यांनी प्रचाराची आखणी केली आहे, असे सांगण्यात येते.
मोहनराव भागवत हे संघाचे प्रमुख झाल्यापासून परिवारातील साऱ्या संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला जात असल्याने, परिवाराशी जवळीक असलेल्या भाजपसाठी कार्यकर्ते स्वतहूनच काम करतात, असे एका ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांने सांगितले. अलीकडे भाजपमध्ये आलेला मोठा वर्ग संघासाठी नवखा आहे. मात्र पक्षाचे चिन्ह राज्यभर पोहोचले पाहिजे यासाठी उमेदवार पटला नाही, तरी संघ समर्थकाचे मत ‘कमळा’लाच जावे यासाठी संघ कार्यकर्ते काम करणार, असे हा कार्यकर्ता म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘संघा’चा सहभाग नाही, कार्यकर्ते भाजपसाठी सक्रिय!
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने भाजपच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आहे.

First published on: 30-09-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangh not involved but workers active for bjp in maharashtra assembly poll