शिवसेना आणि भाजपची २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर एकेकाळचे जिवलग मित्र आता कट्टर वैरी झाल्याचे चित्र सोशल मिडीयावर पहायला मिळत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आडमुठी भूमिका आणि त्यांच्याकडून नरेंद्र मोदींवर करण्यात आलेली टीका यांमुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. शिवसेना- भाजप युती तुटण्यासाठी उद्धव यांची मोदींवरील टीका हा घटकदेखील कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. मात्र, आता शिवसेनेने युती संपुष्टात आल्यानंतर नरेंद्र मोदींवर आणखी आक्रमकपणे टीका करण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेच्या नावे असलेल्या फेसबूक पेजवरून एक व्यंगचित्र शेअर करण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. फडणवीसांच्या मनात विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव असून, सेनेने त्यांना पाठीत खंजीर खुपसणाऱ्याची उपमा दिली आहे. तर दुसरीकडे याच व्यंगचित्रात नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंसमोर झुकलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. या माध्यमातून गुजरात दंगलीच्यावेळी मोदींवर चौफेर टीका केली जात असताना , मातोश्रीवरच त्यांना आधार मिळाला असल्याची आठवण करून देण्यात आली आहे.