नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. युती आणि आघाडीचे राजकारण मोडीत काढत सर्व प्रमुख पक्ष वेगवेगळे लढल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी ठरली. परंतु, शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अनुक्रमे युती आणि आघाडी कायम ठेवली असती, तर त्याचा फायदा युतीला नक्कीच झाला असता हे मतदारसंघनिहाय विश्लेषणावरून सिध्द होते. अशा परिस्थितीत शिवसेना-भाजपला २०३ जागांवर विजय प्राप्त झाला असता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले असून, त्यांनी विजय प्राप्त केलेल्या जागांची बेरीज १८५ इतकी येते. तर, या निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयी जागांची एकत्रित बेरीज ८३ होते, तो आकडा घसरून ७४ वर आला असता. युती अथवा आघाडी टिकली किंवा तुटली असती अथवा अन्य काही समिकरणे निर्माण झाली असती, तर अनेक लक्षवेधी शक्यता निर्माण झाल्या असत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे आणि शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले असते, तर आघाडीला १२० जागांवर विजय मिळाला असता आणि त्यात ३७ जागांची भर पडली असती. त्याचप्रमाणे, शिवसेना-भाजप एकत्र आणि काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले असते, तर युतीला २२७ जागा मिळाल्या असत्या.

येथे देण्यात आलेल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून याचा अंदाज बांधण्यास मदत होईल.

सध्याची स्थिती

जर युती आणि आघाडी तुटली नसती तर…

मनसेची एकुलती एक जागादेखील निवडून आली नसती आणि ‘एमआयएम’लादेखील औरंगाबदपर्यंतच सिमीत राहावे लागले असते.

आता अन्य पाच समिकरणे ग्राफिक्सच्या माध्यमातून पडताळून पाहू.

शिवसेना-मनसे (७९) = जर अन्य कोणी युती अथवा आघाडी केली नसती आणि शिवसेना व मनसे एकत्र लढले असते, तर त्यांना १५ जागांचा फायदा झाला असता. सध्याच्या जागांची बेरीज ६४ इतकी होते.
काँग्रेस-एमआयएम (४७) = जर अन्य कोणी युती अथवा आघाडी केली नसती आणि काँग्रेस व एमआयएम एकत्र लढले असते, तर त्यांना ३ जागांचा फायदा झाला असता. सध्या त्यांच्या एकत्रित जागा ४४ इतक्या आहेत.
राष्ट्रवादी-एमआयएम (४४) = एकत्र लढले असते तर त्यांना २ जागांचा फायदा झाला असता. सध्या त्यांच्या एकत्रित ४२ इतक्या आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी (१२०) = जर अन्य कोणी युती अथवा आघाडी केली नसती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले असते, तर त्यांना ३७ जागांचा फायदा झाला असता. सध्याच्या त्यांची एकत्रित जागांची बेरीज ८३ इतकी आहे.
शिवसेना-भाजप (२२७) = जर अन्य पक्ष एकत्र आले नसते आणि शिवसेना-भाजप एकत्र लढले असते, तर त्यांना ४२ जागांचा फायदा झाला असता. सध्या त्यांची एकत्रित जागांची बेरीज १८५ इतकी आहे.