प्रतिष्ठित व वजनदार उमेदवारांमधील तुल्यबळ लढतींमुळे गाजत असलेली कराड दक्षिणची निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमुळे आणखी टोकदार होऊ पहात आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडच्या कर्मभूमीत नरेंद्र मोदी काय बोलणार? नेमकी काय टीका होईल? गर्दीचा आकडा काय राहील? सभेची फलश्रुती काय राहील? अशा चर्चाबरोबरच एकंदरच मोदींच्या दौऱ्याबाबतची उत्कंठता येथे दिसून येत आहे. प्रचाराच्या सांगतादिनी मोदींची सभा येत्या सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजता कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार आहे. सभेच्या पाश्र्वभूमीवर प्रशासन व पोलीस सतर्क झाल्याचे चित्र आहे.