राजकीयदृष्टय़ा संवेदनशील बनलेल्या कराड दक्षिण मतदारसंघासाठी आजचा दिवस मोठय़ा घडामोडीचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आज अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेत येथील काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, यादव यांनी उमेदवारी मागे घेऊन चव्हाणांना परस्पर पाठिंबा दिल्याने अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील सक्षम उमेदवारास आमचा पाठिंबा राहील, असे सांगण्याची नामुष्की आली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीने ‘कराड दक्षिण’ मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मतदारसंघातील परंपरागत काँग्रेसचे उमेदवार विलासकाका उंडाळकर यांनी येथून बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. तर भाजपकडून डॉ. अतुल भोसले रिंगणात आहेत. या लढतीत राष्ट्रवादीकडून कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती.
या उमेदवारीमागे मुख्यमंत्र्यांच्या मतात घट करण्याचेच गणित होते. दुसरीकडे यादव हे राष्ट्रवादीतील उदयनराजे गटाचे मानले जातात. त्यांना निवडणुकीस उभे करत ‘बळीचा बकरा’ करण्याचाही एका गटाचा डाव असल्याचे बोलले जात होते. पण आज ही सारीच खेळी राष्ट्रवादीच्या अंगलट आली. उंडाळकरांसाठी खेळलेल्या या खेळीचा त्यांनाच अंदाज आला नाही. यामुळे आज नाटय़पूर्ण घडामोडीनंतर यादव यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत थेट मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर केला.
या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी सांगितले, की उमेदवारी मागे घेण्याबाबत आपल्याला कोणतीही सूचना मिळालेली नाही. आपण स्वत:हून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी माघार घेत आहोत, असेही ते म्हणाले.
भाजपची राष्ट्रवादीशी छुपी युती
राज्यात राष्ट्रपती राजवट आणून अप्रत्यक्षपणे भाजपचेच सरकार आणण्याच्या कामी मदत करत भाजपने राष्ट्रवादीशी छुपी युतीच केली असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला. आघाडी तोडण्यासाठी राष्ट्रवादीचेच नेतृत्व कसे कारणीभूत ठरले याचे सविस्तर वर्णन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. प्रत्येक वेळेला नवा मुद्दा, अचानक अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी, निम्मी निम्मी सत्ता, विधानसभा म्हणजे काय नगरपालिका आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. आघाडी तोडण्याची शरद पवारांची इच्छा नसावी, पण ती बहुधा पुतण्याचीच इच्छा असावी. त्यांना काहीही करून मुख्यमंत्री व्हायचे आहे, असेही चव्हाण म्हणाले. फाइल कधी, किती व कशा ‘क्लीअर’ झाल्या हे माहितीच्या अधिकारातून अधिकृत व सुस्पष्टपणे समजेल. मी एकही फाइल नियमबाहय़ पद्धतीने मंजूर केल्याचे दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. सिंचनक्षेत्राच्या कारभारावरची श्वेतपत्रिका यावी, जनतेला माहिती मिळावी ही माझी भूमिका होती. पण काही जणांना हे आवडले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादी उमेदवाराचा पृथ्वीराज यांना परस्पर पाठिंबा
राजकीयदृष्टय़ा संवेदनशील बनलेल्या कराड दक्षिण मतदारसंघासाठी आजचा दिवस मोठय़ा घडामोडीचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आज अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेत येथील काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला.

First published on: 02-10-2014 at 02:38 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp candidate in karad south supports prithviraj chavan