संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कार्यकर्त्यांनी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे राजेंद्र यादव यांनी स्पष्ट केले असून, ते निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनाच पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा कराडमधील राजकीय वर्तुळात आहे.
कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष असलेले राजेंद्र यादव यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात लढण्यासाठी उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसचे नेते विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. उंडाळकर यांना तिकीट नाकारून कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या उंडाळकर यांनी याच मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. उंडाळकर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी तिथे त्यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी तशी कोणतीच घोषणा न करता राष्ट्रवादीने राजेंद्र यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. आता राजेंद्र यादव यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणीच अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसेल.
या मतदारसंघामध्ये आता पृथ्वीराज चव्हाण (कॉंग्रेस), विलासकाका उंडाळकर (अपक्ष), अतुल भोसले (भाजप) आणि अजिंक्य पाटील (शिवसेना) यांच्यामध्येच टक्कर होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
पृथ्वीराज चव्हाणांविरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

First published on: 01-10-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp candidate withdraws nomination from karad south