वडील काँग्रेसमध्ये, एक मुलगा भाजपत, तर दुसरा राष्ट्रवादीकडून रिंगणात. विदर्भाच्या राजकारणावर गेली अनेक वष्रे वर्चस्व ठेवून असणाऱ्या देशमुख घराण्याला या वेळी असे सर्वपक्षीय स्वरूप आले आहे.
राज्यमंत्री, मंत्री म्हणून अनेक वष्रे काम केलेले रणजीतबाबू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. आता वय झाले असले तरी देशमुख पक्षात अधूनमधून सक्रिय होत असतात. त्यांच्या दोन्ही मुलांनी मात्र काँग्रेसला बाजूला सारून इतर पक्षांची कास धरली आहे. देशमुखांचा थोरला मुलगा डॉ. आशीष या वेळी भाजपकडून काटोल मतदारसंघातून रिंगणात आहे. डॉ. आशीष गेल्या पाच वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी सावनेर मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील केदारांविरुद्ध निवडणूक लढवली. त्यात थोडय़ा मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या वेळी सावनेरमधूनच उमेदवारी मिळेल, या आशेवर असलेल्या आशीष देशमुखांना अखेरच्या क्षणी काटोलची उमेदवारी देण्यात आली. तेथे त्यांची लढत त्यांचेच काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याशी आहे. रणजीत देशमुख व अनिल देशमुख चुलत बंधू आहेत.
रणजीत देशमुखांचे दुसरे पुत्र अमोल यांनी या वेळी रामटेकमधून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. स्वत: रणजीत देशमुखांनी अमोलसाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला होता. मात्र पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारली. काँग्रेसने रामटेकमधून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना रिंगणात उतरवले आहे. आता अमोल देशमुखांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातावर बांधले आहे. विशेष म्हणजे, रणजीत देशमुख यांचा सावनेर हा परंपरागत मतदारसंघ आहे. स्वत: रणजीत देशमुख यांनी आतापर्यंत तीनदा काँग्रेसचा त्याग केला आहे. गेल्याच वर्षी ते स्वगृही परतले होते. राजकारणातील बदल काहीही असले तरी या वेळी काटोलमधून निश्चित विजयी होऊ, असा दावा डॉ. आशीष देशमुख यांनी केला आहे.