रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

अनेक मुद्दय़ांवर आयुर्वेदाने केलेले मार्गदर्शन हे आजही उपयुक्त आहे. मात्र अनेक आक्षेपांची उत्तरे जोवर आयुर्वेदाच्या समर्थकांकडून मिळत नाहीत, तोवर एकविसाव्या शतकात आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध होणार नाही. प्रश्न केवळ  पराभूत किंवा पुराणपंथी वैद्यांची उमेद जागवून त्यांना नव्या काळाशी जोडण्याचाही नाही, तर आयुर्वेदाची पुनर्माडणी करून त्यातून नवे अन्वेषण घडविण्याचा आहे.

भारतात वैज्ञानिक परंपरा होती का? असल्यास कोणत्या काळात कोणते विज्ञान-तंत्रज्ञान कशा पद्धतीने विकसित होत गेले? त्याचे दाखले/पुरावे आपल्याला कोठे सापडतात आणि ही परंपरा शिथिल किंवा लुप्त झाली असल्यास त्याची कारणे कोणती? हा खरे तर एका बृहद् प्रकल्पाचा विषय आहे. इतिहास जतन करण्याबद्दलची भारतीयांची उदासीनता पाहता हे काम किती कठीण आहे याची कल्पना आपल्याला करता येईल. (प्राचीन शिलालेख धुण्याचा दगड म्हणून वापरणारे आणि किल्ल्याच्या बुरुजांवर आपली नावे कोरणारे इतिहासप्रेमी आहोत आपण!) या लेखमालेतील दोन-चार लेखांतून आपण या विषयाच्या विविध पलूंना फक्त स्पर्श करू शकू. आपण एवढेच लक्षात ठेवू या की, प्रत्येक सशक्त परंपरा ही परिवर्तनशील असते, तसेच परिवर्तनाची स्वत:ची एक परंपरा असते. परंपरा व परिवर्तनाच्या (अ)द्वैताचे उदाहरण म्हणून आपण आयुर्वेदाचा विचार करू या.

आयुर्वेद पुरस्कर्त्यांच्या दृष्टीने आयुर्वेद म्हणजे परिपूर्ण आरोग्यविज्ञान! केवळ रोगांच्या उपचाराची पद्धतीच नव्हे, तर दीर्घकाळ आरोग्यसंपन्न जीवन जगण्याची ती गुरुकिल्ली! प्रत्येकाच्या प्रकृतिमानानुसार आहारविहार, ऋतुचर्या, दिनचर्या, रोगांवरील उपचार व पथ्ये यांचे हे सर्वागीण शास्त्र. प्राचीन ऋषींच्या प्रज्ञेतून जन्मलेले व हजारो वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेले परिपूर्ण विज्ञान. त्याला कोणत्याही फुटपट्टय़ा लावण्याची किंवा त्यात भर घालण्याची गरज नाही. आधुनिक विज्ञान विभाजन व विश्लेषण करणारे आहे, तर हे एकात्मिक, सकल विज्ञान आहे. आधुनिक विज्ञान केवळ लक्षणे दूर करते, तर आयुर्वेद रोग मुळापासून नष्ट करते. शरीर आणि मन यांचा एकात्मभाव समजून घेऊन उपचार करण्याची ही पद्धत आधुनिक आरोग्य पद्धतीहून अधिक श्रेष्ठ आहे, असे आयुर्वेदप्रेमी मानतात; पण आधुनिक आरोग्य पद्धतीच्या पुरस्कर्त्यांना आयुर्वेदाचे हे गुणवर्णन पूर्णपणे अमान्य आहे. त्यांच्याकडे तर प्रश्न व आक्षेपाची भली मोठी जंत्री तयार आहे –

‘आयुर्वेद जर इतके परिपूर्ण आहे, तर आयुर्वेदाचे बहुसंख्य पदवीधर अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस का करतात? सर्वसामान्य माणसे त्याचा स्वीकार का करीत नाहीत? पहिल्या रांगेतील बुद्धिमान विद्यार्थी आयुर्वेदाऐवजी अ‍ॅलोपॅथीकडे का वळतात? आधुनिक काळात जंगले नष्ट झाल्यावर अस्सल वनौषधी आणणार कोठून आणि बनवलेल्या औषधांच्या गुणवत्तेची हमी कोण घेणार? ज्या शास्त्रात अनेक शतकांत नवा विचार, नवे संशोधन झाले नाही, त्याला जिवंत विज्ञान तरी कसे म्हणायचे? विज्ञान एकच असते – ते म्हणजे आधुनिक विज्ञान. त्याच्या निकषांमध्ये वात-पित्त-कफ आणि पंचमहाभूते कशी बसवणार? ज्या शास्त्राच्या पाठय़पुस्तकात आत्मा, पूर्वकर्म आणि पाप-पुण्यासारख्या अवैज्ञानिक गोष्टी लिहिलेल्या असतात व ज्यात ‘गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात पुंसवन विधी करून स्त्री-गर्भाचे रूपांतर पुरुष-गर्भात करता येते’ अशी माहिती दिलेली असते, त्याला विज्ञान कसे म्हणायचे?’ यावर आयुर्वेदाचे पुरस्कत्रे म्हणतात की, हे आमचे पौर्वात्य विज्ञान आहे, अस्सल भारतीय मातीतून निपजलेले. मेकॉलेच्या कारखान्यातून बाहेर पडलेल्या गुलाम वृत्तीच्या सुशिक्षितांना हे कळणार नाही.

या एकाच उदाहरणातून आपण लेखमालेच्या सुरुवातीला मांडलेले अनेक प्रश्न – सीमांकनाची समस्या (एखादी गोष्ट विज्ञानाच्या कक्षेतील आहे की नाही?), विज्ञान एक आहेत की अनेक? एकाहून अधिक विज्ञान असतील तर त्यांना कोणते निकष लावणार? विभाजनशील (Divisive) व एकात्म/ सकल (Integrated/Holistic) विज्ञान म्हणजे काय व त्यातले कोणते श्रेष्ठ – आपल्यासमोर येतात. या प्रश्नांची सर्वमान्य उत्तरे नाहीत. विज्ञान मानणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील त्याबद्दल मतमतांतरे आढळतील, कारण आपण गणित-भौतिकीसारख्या बिनचूक विज्ञानाकडून जसजसे जैविक-मानसशास्त्रीय-सामाजिक शास्त्रांकडे जातो, तसतसा त्यातील निष्कर्षांचा बिनचूकपणा घटतो आणि मतमतांतरे वाढतात. आपण उभे केलेले हे प्रश्न हे ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ या सामाजिक विज्ञानाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्तरांमध्ये एकवाक्यता असेलच असे नाही.

आरोप-प्रत्यारोपांतून बाहेर पडून आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की, आयुर्वेद हे आधुनिक विज्ञानाला समांतर असे एक वेगळे विज्ञान आहे. अ‍ॅलोपॅथी ही आरोग्यप्रणाली आधुनिक विज्ञानाच्या पायावर उभी आहे. त्यामुळे एखादे आधुनिक औषध नेमके कसे काम करते, हे रेण्वीय जीवशास्त्राच्या पातळीवर समजावून सांगणे आज शक्य झाले आहे. हे विज्ञान अणू-रेणूच्या परिभाषेत बोलते, कारण ते मुळात विभाजन करीत पदार्थाच्या खोलात जाऊन त्याला समजून घेते. याउलट आयुर्वेद हे एकात्म विज्ञान वात-पित्त-कफ हे त्रिदोष आणि पंचमहाभूते यांच्या परिभाषेत बोलते. या दोन्ही स्वतंत्र ‘भाषा’ आहेत; कारण पदार्थाला, वस्तुमात्राला समजावून घेण्याच्या या दोन स्वतंत्र व वेगळ्या पद्धती आहेत. यात तर-तम भाव नाही. प्रत्येक पद्धतीची स्वतंत्र वैशिष्टय़े व मर्यादा आहेत. आधुनिक विज्ञान कोपर्निकस-गॅलिलिओ या पाश्चात्त्य परंपरेतून गेल्या ४-५ शतकांतून सिद्ध झालेले असले, तर पौर्वात्य विज्ञाने त्यापूर्वीच्या काळात विकसित झालेली आहेत. या लेखमालेच्या दुसऱ्या लेखात केलेले ‘वैैज्ञानिक पद्धतीचा पाया इब्न अल् हाझेन या इराकी प्रज्ञावंताने इसवी सनाच्या १०-११ व्या शतकात घातला’ हे विधान आपल्याला स्मरत असेल. पाश्चात्त्य जगाच्या खूप आधी भारत व अरबस्तान या प्रदेशांत स्वतंत्रपणे वैज्ञानिक पद्धती विकसित झाल्या व त्या आधारावर तेथे तंत्रज्ञान उभे राहिले, असे विज्ञानाचा इतिहास सांगतो; पण या इतिहासात मिथके व वास्तव, पूर्वग्रह आणि पुरावे यांची प्रचंड सरमिसळ झालेली आहे.

आपण धन्वंतरी, अश्विनीकुमार, इंद्र इ. पुराणकालीन पात्रे बाजूला ठेवू. सुश्रुताने प्लास्टिक सर्जरीचे तंत्र विकसित केले होते का, हा मुद्दाही ठोस पुराव्याअभावी दूर ठेवू; पण इ.स.पूर्वी पाचव्या शतकापासून (किंवा त्यापूर्वी) सुरू होणाऱ्या आयुर्वेदाच्या इतिहासात वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून निदान, उपचार, प्रतिबंध, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्रांत केलेले प्रयोग, त्यांचे प्रमाणीकरण, त्यावर झडणाऱ्या विद्वतचर्चा या सर्वाचे अनेक पुरावे मिळतात. आधुनिक मेडिकल कॉन्फरन्सच्या धर्तीवर त्या काळात परिषदांचे आयोजन करण्यात येत असे, ज्यात नवे प्रयोग, केस स्टडी अशा विषयांवर चर्चा घेण्यात येई. चर्चा कशी करावी, याचे नियम ठरलेले असत. रुग्ण-वैद्य संवाद, व्यावसायिक नीतिमत्तेला पोषक वैद्यांची आचारसंहिता, ऋतुमान व दिनमान यांच्यानुसार विविध वयांच्या स्त्री-पुरुषांनी आपली दिनचर्या, आहारविहार कसे ठरवावे अशा अनेक मुद्दय़ांवर आयुर्वेदाने केलेले मार्गदर्शन हे आजही उपयुक्त आहे.

असे असले तरी वर उल्लेखलेल्या आक्षेपांची उत्तरे जोवर आयुर्वेदाच्या समर्थकांकडून मिळत नाहीत, तोवर एकविसाव्या शतकात आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध होणार नाही. प्रश्न केवळ साचलेल्या आयुर्वेदाला गतिमान करण्याचा नाही, पराभूत किंवा पुराणपंथी वैद्यांची उमेद जागवून त्यांना नव्या काळाशी जोडण्याचाही नाही, तर आयुर्वेदाची पुनर्माडणी करून त्यातून नवे अन्वेषण घडविण्याचा आहे. अडीच हजार वर्षांच्या संचितातून कालबाह्य़ आणि कालसुसंगत घटक वेगळे करणे, आपल्या शास्त्राचा गाभा न बदलता त्याला आधुनिक विज्ञानाशी संवादी बनविणे, रोजच्या व्यवहाराला संशोधनाची जोड देऊन आपले शास्त्र पुन्हा प्रवाही करणे यासाठी खूप काही करावे लागेल. आयुर्वेदाची शक्ती, मर्यादा व आजच्या काळाचे आव्हान या सर्वाचे भान असणारी टीम सर्वप्रथम उभारावी लागेल. तिच्यात आधुनिक विज्ञान, आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी या तिन्ही क्षेत्रांतील सुसंवादी तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. आंतर्वद्यिाशाखीय संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणावर संसाधने उभारावी लागतील. त्या संशोधनाचे फलित लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल. प्रश्न आयुर्वेदाचे पुनरुज्जीवन करण्याचा नाही, तर त्यातून नवजागरण (रेनेसाँ) घडविण्याचा आहे. या वाटेने पहिली पावले नक्कीच पडली आहेत. त्याविषयी अधिक  पुढील लेखात.

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

ravindrarp@gmail.com