ज्युलिओ रिबेरो

सचिन वाझे पोलीस दलात तसे अलीकडेच आले, त्यापूर्वी मुंबईत ‘चकमकबाज’ किंवा ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अधिकाऱ्यांचे पीकच आलेले होते. काहीही करून गुन्हे आटोक्यात ठेवायचेच, या लक्ष्याने पछाडलेल्या काही आयुक्तांमुळे हे पीक वाढले होते; पण त्याचे गंभीर परिणाम दिसायचे होते. मीरान बोरवणकर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी आलेल्या पहिल्या महिला ‘आयपीएस’ अधिकारी. त्यांना असे लक्षात आले की, हे ‘स्पेशालिस्ट’ जेव्हा असतात, तेव्हाच खंडणीखोरीच्या तक्रारींत वाढ होते. मग बोरवणकर यांनी या चकमकबाजांची परतपाठवणी पोलीस ठाण्यांत केली, तेव्हा खंडणीचे प्रकार कमी होऊ लागले आणि गुन्हे शाखेवरील कामाचा ताण, तर बिल्डर, चित्रपट-निर्माते आदींचा मानसिक ताण कमी झाला.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

सचिन वाझे हे यानंतर आलेले ‘चकमकबाज’. असे म्हणतात की, त्यापूर्वीचे चकमकबाज अधिकारी -आणि शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढवणारे पराभूत उमेदवार- प्रदीप शर्मा यांचे वाझे हे चेले. या वाझे यांच्याकडून १९९७ ते २००४ या काळात ६३ जण मारले गेले. मात्र घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीच्या २००२ मधील मृत्युप्रकरणी २००४ मध्ये, वाझे आणि त्या वेळी त्या आरोपीस कोठडीबाहेर नेणारे १४ अन्य पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. वाझे यांनी नोकरीत परतण्यासाठी २००७ मध्ये अर्ज केला, तो फेटाळला गेला. मग २००८ मध्ये त्यांनी पोलीस दलास राजीनामा पाठवून राजकीय पक्षात -शिवसेनेत- प्रवेश केला.

शिवसेनेचा वापर वाझे यांनी अन्य कारणांसाठी केला. काही खासगी तपास-संस्था त्यांनी स्थापन केल्या. या अशा खासगी संस्था वाहनकर्जे देणाऱ्या कंपन्या अथवा बँकांना, वसुलीच्या कामासाठी हव्याच असतात. वाझे यांना ‘एनआयए’ने गेल्या शनिवारी ताब्यात घेतले, त्यानंतर भाजपच्या एका नेत्याने पत्रकारांना अशी माहिती दिली आहे की, तीन नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळांवर वाझे यांचे नाव होते!

सचिन वाझे यांचा महाराष्ट्र पोलीस दलातील प्रवेश १९९०चा. १९९२ मध्ये त्यांची नेमणूक ठाण्यात झाली, त्याआधी थोडा काळ त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह््यात काम केले होते आणि ते करताना, चकमकींबाबत त्यांचा उत्साह दिसून आला होता. अशा प्रकारचा उत्साह दाखवणारे पोलीस कर्मचारी अनेकदा हवेच असतात. पण ही एक प्रकारे, पोलिसांतील नेतृत्वाची -वरिष्ठ अधिकाऱ्यांची- शोकांतिका ठरते. या अशा ‘उत्साही’ पोलीस कर्मचाऱ्यांना काबूत ठेवले नाही, तर ते अगदी लवकरच हाताबाहेर जातात. तीसएक वर्षांपूर्वी लंडनमध्ये, स्कॉटलंड यार्डचे पोलीस आयुक्त सर पीटर इम्बर्ट यांच्याशी पोलिसी नेतृत्वाच्या पैलूंविषयी मी चर्चा केली होती, ती येथे आठवते. तेथील ‘विशेष शाखे’मधील कर्मचारी कसे काबूत ठेवायचे, ही समस्या तेथेही होती. यंत्रणेला अशा कर्मचाऱ्यांचा काहीएक उपयोग असतो हे खरे पण हे कर्मचारी अधिकार स्वत:हाती असल्यासारखे वागतात, ही खरी समस्या.

अनेकदा या अशा कर्मचारी वा कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे बेहिशेबी पैशाचा ओघच सुरू होतो आणि तरीदेखील, हे सारे जण मध्यमवर्गाला फार प्रिय असतात. या चकमकबाजांची लोकप्रियता इतकी की, त्यांची कथित यशोगाथा दाखवणारे चित्रपट वगैरे निघतात. माझ्या आठवणीप्रमाणे मराठीतील ‘रेगे’ या चित्रपटात सचिन वाझेसदृश पात्र होते. ती भूमिका मराठीतील लोकप्रिय अभिनेत्याने केली होती.

पोलीस दलामध्येही या चकमकबाजांचा हेवाच काही अन्य सहकाऱ्यांना वाटावा, अशी परिस्थिती अनेकदा असते. बहुतेकदा त्यामुळे चकमकबाजांचे काहीही नुकसान होत नाही. सचिन वाझे तुलनेने कमी अनुभवी असतानाही त्यांची नेमणूक मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागात होणे हे याचेच उदाहरण. राज्याच्या गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांचा समावेश असलेल्या समितीने २०२० मध्ये केलेल्या शिफारसीनुसार वाझे यांचा पुनप्र्रवेश पोलीस दलात झाला. १३ वर्षांनंतरच्या या पुनस्र्थापनेसाठी, ‘कोविड ड्युटी’ हे मोघम कारण देण्यात आले.

अलीकडे जी माहिती प्रसारमाध्यमांतून आली ती अशी की, सचिन वाझे हे ठाण्यात मोटारगाड्यांच्या अंतर्गत सजावटीचा व्यवसाय चालविणारे मनसुख हिरेन यांचे मित्र किंवा निकटचे परिचित होते आणि हिरेन यांच्या ‘कार डेकॉर’मध्ये वाझे यांची मोटारही सजली होती. त्यामुळे मुंबईतील अल्टामाउंट मार्गावर मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानानजीक  उभी केलेल्या एका ‘स्कॉर्पिओ’ गाडीत स्फोटक जिलेटिन कांड्या आणि गाडीच्या पुढल्या आसनावरच कुणालाही दिसेल अशा प्रकारे ठेवलेली एक चिठ्ठी सापडणे, त्या चिठ्ठीत वरील उद्योजक दाम्पत्याकडे काही रकमेची – तीही कूटचलन स्वरूपात विशिष्ट बँकखात्यात भरण्याची- मागणी केलेली असणे, हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा संशयाचा काटा वाझे यांच्याकडेच वळला. शिवाय हिरेन यांच्या पत्नीचे म्हणणे असे की, ही स्कॉर्पिओ गाडी काही काळ वाझेच वापरत होते.

या कथानकाने मध्यंतरीच्या काळात आणखी नाट्यमय वळण घेतले. त्या रहस्यमय गाडीचा तपास गुन्हे गुप्तवार्ता शाखेचे प्रमुख म्हणून वाझे यांच्याकडेच- अर्थात पोलीस प्रमुखांनी- सोपवलेला असताना ही स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचे उघड झाले आणि त्या मनसुख हिरेन यांनी, ही गाडी आपल्या ताब्यातून १७ फेब्रुवारी रोजीच चोरीस गेली असल्याची तक्रार आपण विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंदवली असल्याचे सांगितले. हीच गाडी अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ (हे उद्योजक दाम्पत्य मुंबईत नसताना) २५ फेब्रुवारी रोजी आढळली होती.

अशा परिस्थितीत, मनसुख हिरेन हे आपले परिचित असल्यामुळे हा तपास आपणाकडे नसणे उचित होईल, असे वाझे यांनी सांगणे सयुक्तिक ठरले असते. मात्र ही अपेक्षा वाझे यांनी पूर्ण केलेली नाही.

दुसरीकडे, मनसुख हिरेन यांचाच मृतदेह पाच मार्च रोजी ठाण्यानजीक मुंब्रा खाडीत आढळून आला आणि लगोलग हिरेन यांच्या पत्नीने, वाझे यांनीच आपल्या पतीला मारले असा आरोपही केला.

हा तपास आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एनआयए) गेला आहे. याआधी स्फोटके असलेल्या गाडीचा तपास राज्य सरकारच्या दहशतवादविरोधी पथकाकडे होता. एनआयएकडे आता मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या (किंवा आता, हत्येच्या) तपासाचीही जबाबदारी आहे. जी ‘एनआयएकडील माहिती’ प्रसारमाध्यमांपर्यंत जाऊ देण्यात आली ती अशी की, गाडी चोरीला गेल्याची तक्रार झालेली असली तरीही हा मनसुख यांनीही मित्रासाठी रचलेला एक बनाव असू शकतो, कारण अंबानींच्या निवासस्थानाजवळ सापडण्यापूर्वी आठवडाभर ही गाडी वाझे राहात असलेल्या इमारतीच्या आवारात उभी होती. शिवाय, प्रसारमाध्यमांतून उघड झालेले एनआयएचे कथित म्हणणे असेही आहे की, याविषयी आवारातील ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यां’च्या नोंदी आणि अन्य प्रकारचा पुरावा नष्ट करण्यासाठी वाझे यांनीच प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

हे जर खरे असेल, तर वाझे यांची खैर नाही हे निश्चित. अशा वेळी आता, वाझे यांनीच या नाट्यात आपली भूमिका नेमकी काय होती, याचा स्पष्ट खुलासा करणे, हा मार्ग योग्य. वाझे यांनी जे जे काही सत्य असेल, ते ते सारे सांगावे; कारण आजघडीला तरी, हे सारे त्यांच्याचवर शेकते आहे अशी परिस्थिती दिसून येते. ती गाडी- आणि तिच्या दर्शनी भागातील ती चिठ्ठीसुद्धा- अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ उभी ठेवण्यामागील नेमका हेतू काय, हा प्रश्न आज साऱ्यांनाच पडला असेल, तो वाझे यांच्या स्पष्ट खुलाशातून सुटूही शकतो.

मुळात ‘एनआयए’कडे तपास सोपवण्याचे कारण हे दहशतवाद्यांचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो, या प्रकारचे होते. परंतु दिल्लीच्या तिहार तुरुंगामधील ‘अतिसुरक्षा विभागा’मधूनच एक दहशतवादी गट कार्यरत असल्याची माहिती ‘इंडियन मुजाहिदीन’चा म्होरक्या यासीन भटकल याचा उजवा हात म्हणवणाऱ्या एका तिहार-कैद्याने हल्ली दिल्याचे सांगितले जाते आहे आणि, याच कारणामुळे तपास राज्यातील यंत्रणांऐवजी ‘एनआयए’कडे हवा, असे म्हटले जाते आहे.

या साऱ्याचीच कसून छाननी होणे, हे केंद्रीय गृह खात्याच्या विश्वासार्हतेसाठी उपकारक ठरेल. अर्थात शिवसेनेवर भाजपचा असलेला राजकीय राग पाहाता हे प्रकरण तापणे ही वचपा काढण्याची संधी म्हणूनही वापरली जाऊ शकेल. पण तो येथील चर्चेचा विषय नाही.

चर्चा करावी असे प्रश्न म्हणजे, या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तपासाच्या कक्षेत येणार का? मुळात वाझे यांची पुनस्र्थापना कशी व का झाली? इतके  संवेदनशील पद त्यांना कसे काय मिळाले? जर ‘कोविड कर्तव्य’ हे कारण त्यांच्या फेरप्रवेशासाठी देण्यात आले होते, तर तेच काम त्यांना का नाही देण्यात आले? हे लाखमोलाचे – किंवा ६४ डॉलर मोलाचे म्हणू- प्रश्न अनुत्तरित राहणे योग्य नव्हे. त्यांची उत्तरे विनाविलंब मिळोत. तोवर, या साऱ्यातून आता जो बोध घ्यायचा तो अगदी स्पष्ट आहे. पोलिसांतील वरिष्ठ वा नेतृत्वपदी असलेल्यांनी चकमकबाजांना त्यांची जागा दाखवून द्यावी, कारण ते समाजास धोकादायक ठरू शकतात… ते मूलत: ‘वर्दीधारी गुंड’च असतात.

लेखक मुंबईचे भूतपूर्व पोलीस आयुक्त आहेत.