शरीराच्या एका भागाने शरीराच्या मध्यवर्ती नियंत्रण संस्थेविरोधात बंड करावे आणि शरीराच्या मध्यवर्ती नियंत्रण संस्थेने तो आपलाच भाग आहे याची तमा न बाळगता त्यावर सर्वशक्तिनिशी हल्ला करावा, तसे इथिओपिया या दक्षिण आफ्रिकेतल्या देशाबाबतीत घडत आहेत. त्या देशाच्या टिग्रे प्रांतात दोन आठवडय़ांपासून पंतप्रधान अबीय अहमद अली यांचे लष्कर आणि टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रण्ट (टीपीएलएफ) या राजकीय पक्षाचे बंडखोर यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे. त्यात शेकडो निरपराधांचा बळी गेला आहे, तर हजारो नागरिक शेजारी देशांमध्ये आश्रयास गेले आहेत. पंतप्रधान अबीय अहमद यांनी बंडखोरांशी चर्चेचे आवाहन धुडकावले आहे. या संघर्षांच्या गांभीर्याकडे युरोप-आफ्रिकेतील माध्यमांनी जगाचे लक्ष वेधले आहे.

हिंसाचार थांबवण्याबाबत इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद बंडखोरांशी चर्चा टाळत आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकी महासंघ, युरोपीय महासंघाने अबीय आणि टीपीएलएफच्या नेत्यांवर दबाव आणावा, अशी सूचना ‘द गार्डियन’ने संपादकीय लेखात केली आहे. इथिओपियाने नाईल नदीवर बांधलेल्या विशाल धरणामुळे संतापाने धुमसणारा इजिप्त या अस्थिरतेचा फायदा उठवू शकतो, असा इशारा देताना हे असे संकट आहे, जे फक्त राजकीय तोडग्यातूनच दूर होऊ  शकते, असेही ‘गार्डियन’ने म्हटले आहे.

‘पॉलिटिको’ या युरोपीय महासंघाच्या समर्थक अमेरिकी नियतकालिकात इथिओपियातील पेचाचा आढावा घेण्याबरोबरच त्या देशात युरोपीय महासंघाचे हितसंबंध कसे गुंतले आहेत, यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान अबीय यांनी सत्तेवर येताच राजकीय कैद्यांची मुक्तता केली, प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य देण्याची, स्वतंत्र निवडणुका घेण्याची घोषणा केली. त्याचबरोबर राजकीय विरोधकांना राजकीय प्रवाहात येण्याची मुभा दिल्यामुळे त्यांच्याकडून युरोपीय महासंघाच्या आर्थिक आशा-आकांक्षा वाढल्या होत्या. त्यामुळेच युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला फॉन देर लायेन यांनी आपल्या पहिल्या भेटीसाठी आफ्रिकी देशांच्या महासंघाचे मुख्यालय असलेल्या इथिओपियाची निवड केली होती, याकडे लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. आफ्रिकेतील देशांशी अधिक प्रगतिशील संबंध विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या युरोपीय महासंघाशी अबीय यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. परंतु आता तेथील यादवीच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाला किमान आपल्या पूर्व-आफ्रिकेबाबतच्या रणनीतीचा पुनर्विचार करावा लागेल, अशी टिप्पणीही ‘पॉलिटिको’ने केली आहे.

अमेरिकेत सर्वाधिक करोना रुग्ण आढळत असताना आणि मृत्युदर अधिक असतानाही तेथे ठरल्यानुसार निवडणूक घेण्यात आली. परंतु करोना साथीचे कारण पुढे करत पंतप्रधान अबीय यांनी निवडणूक पुढे ढकलली आणि तेथेच संघर्षांची पहिली ठिणगी पडली. या संदर्भाचा धागा पकडून ज्येष्ठ पत्रकार ग्वायन डायर यांनी ‘द जेरुसलेम पोस्ट’मधील लेखात अबीय यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. ‘अमेरिकी नागरिकांनी स्वत:चे अभिनंदन केले पाहिजे, कारण त्यांची निवडणूक यंत्रणा इथिओपियाहून निश्चितच चांगली आहे. वास्तविक ती उत्तम प्रकारे काम करीत असल्यामुळे अमेरिकेत दुसऱ्या यादवी युद्धाची शक्यता नाही,’ अशी खोचक टिप्पणी डायर यांनी केली आहे.

टिग्रे संघर्ष सुदान आणि इजिप्त यांच्याबरोबरच्या इथिओपियाच्या संबंधांवर कसा परिणाम करू  शकतो, याचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘द आफ्रिका रिपोर्ट’ या फ्रान्सस्थित नियतकालिकातील लेखात पत्रकार लोझा सेलेशी यांनी केला आहे. ‘इथिओपियाशी संबंधित फश्का सीमावादाच्या निमित्ताने सुदानने युद्धाचा फायदा उचलल्याच्या नोंदी आहेत. ईरिट्रिया आणि इथिओपिया यांची मैत्री पाहता सुदान या संघर्षांत उतरण्याची शक्यता आहे. सुदानने टीपीएलएफ आणि पंतप्रधान अबीय यांच्यात समेटासाठी मध्यस्थीची इच्छा दर्शवली आहे. तर इजिप्तबरोबरचे इथिओपियाचे संबंध संदिग्ध आणि नाजूक आहेत. इथिओपियाने नाईल नदीवर बांधलेल्या धरणामुळे इजिप्त संतप्त आहे. त्यामुळे इजिप्त आणि सुदान एकत्र येऊ शकतात,’ असा अंदाज या लेखात व्यक्त केला आहे.

ईरिट्रियाशी असलेला २२ वर्षांचा सीमासंघर्ष समाप्त केल्याबद्दल पंतप्रधान अबीय यांना गेल्या वर्षी शांततेच्या नोबेलने गौरवण्यात आले होते. म्यानमारच्या नेत्या आँग सान सू की यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनीही नंतर रोहिंग्यांच्या हत्याकांडाचे समर्थन केले. याचा उल्लेख करून ‘द जेरुसलेम पोस्ट’मधील लेखात ‘हेन्री किसिंजर यांना १९७३ मध्ये नोबेल मिळाल्यापासून या पुरस्काराच्या प्रतिष्ठेला उतरती कळा लागली आहे, आता आपल्याला कदाचित मूर्खासाठीच्या एखाद्या नोबेलची आवश्यकता आहे,’ असे टोकदार भाष्य करण्यात आले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)