02 March 2021

News Flash

शेतातील झाडांचे मोल ते किती?

कृषी जैवविविधतेमध्ये पिकांअंतर्गत असणाऱ्या विविधतेबरोबरच सूक्ष्मजीव, प्राणी, माती आणि आनुषंगिक परिस्थितीकी याचा समावेश होतो

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. सतीश करंडे

शेतीची सुद्धा एक ‘इको सिस्टीम’ असते. यामध्ये मातीतील लाखो जीवजंतू, पिकाबरोबर असणारे सूक्ष्मजीव, मधमाश्या, फुलपाखरे, पक्षी आणि बांधावर असणारी झाडेझुडपे या सर्वाचे परस्परसबंध फार महत्त्वाचे असतात. त्यातील बिघाड हा शेतीतील बिघाड ठरणारा असतो.

आधुनिक शेती म्हणजे जास्त खर्चाची असे एक समीकरण बनले आहे. हे समीकरण एका अर्थाने शेती शास्त्रही नाकारत असते. आपण जमीन सजीव ठेवत नाही. पिकाचे पोषण आणि संख्या संतुलन नीट नसते म्हणून किडीरोगांचेच प्रमाण वाढते. पुन्हा यावरील उपचार म्हणून रासायनिक खतांचे, कीटक नाशकांचे प्रमाण वाढवावे लागते. त्याचे एक दुष्टचक्रच तयार होते.

निसर्गातील झाडे, त्यांचे वेळेवर फुलणे, बहरणे आपण पाहत असतो. बांधावरील फळझाडे किंवा ओढय़ाच्या काठी असणारी बोरे कोणतेही व्यवस्थापन न करता दरवर्षी फळ-फुलांनी लगडून जात असतात कारण त्यांच्या परिस्थितीकीमध्ये (इको सिस्टीम) ढवळाढवळ झालेली नसते.

शेतीची सुद्धा एक ‘इको सिस्टीम’ असते. यामध्ये मातीतील लाखो जीवजंतू, पिकाबरोबर असणारे सूक्ष्मजीव, मधमाश्या, फुलपाखरे, पक्षी आणि बांधावर असणारी झाडेझुडपे या सर्वाचे परस्पर सबंध फार महत्त्वाचे असतात. त्यातील बिघाड हा शेतीतील बिघाड ठरणारा असतो.

मागील वर्षी जागतिक अन्न व कृषी संस्था यांनी शेती क्षेत्रातील पहिले १० शोध व त्याची परिणामकारकता या निकषावर ‘कृषी वनशेती’ (पिकांबरोबर वृक्ष लागवड) या तंत्रज्ञान पद्धतीचा समावेश केला आहे. तसे पाहिले तर ‘कृषी वनशेती’ ही पद्धती फार पूर्वीपासूनच प्रचलित अशी पद्धती आहे. आदिवासी भागात तर ती वेगळ्या स्वरूपामध्ये शेकडो वर्षांपासून अवलंबली जाते. असे असताना व जैवतंत्रज्ञानाचे युग असताना कृषी वनशेतीला पहिल्या दहामध्ये स्थान मिळणे काहीसे आश्चर्यकारक ठरते.

परंतु आपण त्या अनुषंगाने आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला की आपल्या लक्षात येते, की विक्रमी उत्पादन आणि उत्पन्न या अनुषंगाने याचा समावेश झालेलाच नाही. तर तो करताना हवामानबदलाचे पार्श्वभूमीवर सूक्ष्म वातावरण निर्मितीतून हवामान अनुकूल शेती, शेती परिस्थितीकी, नैसर्गिक संसाधनाचा एकात्मिक वापर इ. प्रकाराने कृषी वनशेती हा चांगला उपाय ठरू शकतो, नव्हे त्याची शिफारस करण्यात येत आहे.

वनशास्त्राची कृषी वनशेती ही एक शाखा आहे. त्यामध्ये चार उपशाखा आहेत १) वृक्ष आणि चारापिके २) वृक्ष आणि फळपिके ३) वृक्ष आणि तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला इ. ४) वृक्ष आणि चारापिके, इतरपिके. त्याच बरोबर त्यामध्ये मधुमक्षिका पालन, लाख उत्पादन इ, समावेश करता येतो. थोडक्यात कृषी वनशेती हे शास्त्र इतर शेती शास्त्राप्रमाणेच एक असल्यामुळे त्याचे अर्थशास्त्रही लौकिक अर्थाने फायदातोटा अशा साच्यामध्ये मांडले जाते. निदान भारतामध्ये तरी त्याचा अशा प्रकारे मर्यादित अर्थाने त्यावर अभ्यास झालेला आहे. प्रति माणशी शेतजमीन कमी, अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त, त्या सर्वाचा उदरनिर्वाह होण्यासाठी शेतीला जोडधंदा असावा मग तो कधी पशुपालन, शेळी पालन, भाजीपाला विक्री इ. माध्यमातून साधण्यासाठी कृषी वनशेती हा एक मार्ग असू शकेल.

महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता अशा प्रकारची शेती विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यमध्ये केली जाते. ती करणाऱ्यांमध्ये आदिवासी बांधवांचे प्रमाण जास्त आहे. प्रगतशील शेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इ. जिल्ह्यमध्ये अशा प्रकारे शेती केली जात नाही. त्या ठिकाणी एकच पीक व त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रकारे शेती केली जाते. त्याचा परिणाम म्हणजे अशी अनेक गावे आढळतील, की त्या संपूर्ण गावामध्ये एकूण शेत जमिनीपैकी ७० ते ८० टक्के शेत जमीन केवळ ऊ स, केळी, फळपिके सारख्या एकाच पिकाखाली असते. अशा गावातील आज २५-३० वयोगटातील तरुणांनी जवस, तीळ, हुलगा इ. पिके पाहिलेली सुद्धा नसतात. पूर्वी पाचसहा पिके घेणारे शेतकरी आज केवळ एकच पीक घेतात. त्यामागील अनेक कारणे असतात, त्याची चर्चा करणे हा या लेखाचा उद्देश नसल्यामुळे ती आपल्याला स्वतंत्रपणे करावी लागेल. थोडक्यात आधुनिक शेती, विक्रमी उत्पादन या रेटय़ामध्ये कृषी जैवविविधतेचा प्रचंड मोठा ऱ्हास झालेला आहे.

कृषी जैवविविधतेमध्ये पिकांअंतर्गत असणाऱ्या विविधतेबरोबरच सूक्ष्मजीव, प्राणी, माती आणि आनुषंगिक परिस्थितीकी याचा समावेश होतो. एका अभ्यासानुसार जगामध्ये १३ लाख जीवजंतू म्हणजेच वनस्पती, प्राणी सूक्ष्मजीव आहेत. त्यापैकी आजपर्यंत केवळ १.७५ लाख जीवजंतूची आपल्याला ओळख झाली आहे. एखादे पीक ज्या वेळेस आपण घेत असतो, त्या वेळेस त्या पिकाचे अनुषंगाने त्याची एक अशी परिस्थितीकी असते,त्या परिस्थितीकीच्या क्रियाशीलतेवर त्या पिकाचे उत्पादन अवलंबून असते. जसे की परागीभवनासाठी आवश्यक असणारे कीटक, आवश्यक मूलद्रव्ये मिळण्यासाठी कारणीभूत ठरणारे मातीतील सूक्ष्मजीव, त्या पिकावर येणाऱ्या किडीच्या शत्रूकिडी इत्यादी माध्यमातून, त्या पिकांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत असते.

कृषी जैव विविधता आणि अन्न सुरक्षा या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालामध्ये कृषी जैवविविधता कमी होत असल्या कारणाने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कृषी जैवविविधता कमी होणे, अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षा या दोन्हीचे अनुषंगाने धोक्याचे आहे. असा इशारा या अहवालामध्ये देण्यात आला आहे.

कृषी वनशेती इतर ठिकाणी जरी केली जात नसली, तरी शेती क्षेत्रामध्ये झाडांचे महत्त्व फार पूर्वीपासून आहेच. कधी ते शेती औजारे बनविण्यासाठी असे तर कधी ते पूरक चारा पीक म्हणून असे. अशाप्रकारची जैवविविधता जोपासण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधावर असणाऱ्या झाडांचे खूप मोठे महत्त्व असते. ती झाडे वर्षांनुवर्षे त्या ठिकाणी असल्यामुळे त्याची म्हणून अशी एक परिस्थितीकी तयार होत असते. त्याची मुळे जमिनीतील ओल टिकविण्यासाठी मदत करतात, जमिनीतील जैवविविधता वाढविण्यास मदत करतात, अनेक मित्र किडींचा रहिवास म्हणजे ते झाड असते, अनेक जीवजंतूचा अधिवास त्या झाडाच्या अनुषंगाने बहरत असतो. त्या शेतकऱ्याला त्या झाडाचे अनेक प्रत्यक्ष लाभही मिळत असतात. जसे की फळे, इमारती लाकूड चारा पीक इत्यादी. थोडक्यात, शेती विज्ञानामध्ये आणि व्यवहारामध्ये सुद्धा अशा झाडांचे महत्त्व मोठे आहे. आज सेंद्रिय शेतीचा बोलबाला आहे. त्यामध्ये सुद्धा अनेक आदांनाची निर्मिती ही वृक्षापासून केली जाते. उदाहरण म्हणून कडूनिंब घेता येते. कीटकनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो.

अवर्षण प्रवण भागामध्ये नैसर्गिक रीत्या बाभूळ/काटेरी कुळातील अनेक वनस्पती आढळतात. त्या वनस्पतीची विशेषत: म्हणजे अगदी कमी पाण्यावर त्या येत असत. मोठे वाढलेले बाभळीचे झाड चांगली सावली देते. त्याला येणाऱ्या पिवळ्याधमक फुलांमुळे आणि गर्द हिरव्या पानांमुळे ते चांगले दिसते सुद्धा!  त्याच बरोबर शेती औजारे, इमारतीसाठी त्याचे लाकूड उपयोगी येते. या झाडाचा पाला शेळ्या-मेंढय़ाचे उत्तम खाद्य आहे. बाभळीपासून मिळणारा डिंक औषधी आहे. हे झाड शेंगावर्गीय कुळातील असल्यामुळे मातीची सुपीकता वाढविण्यासही ते उपयोगी ठरते. शेतातील अनेक जीवजंतूचा रहिवास त्या झाडाचे अनुषंगाने वाढत असतो. पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या, शत्रू किडींचा रहिवास या बाभळीच्या झाडाच्या अनुषंगाने तयार होणाऱ्या परिस्थितीकी (इको-सिस्टम) मुळे वाढत असतो. अनेक पक्ष्यांचा वावर वाढत या सर्वाचा परिणाम म्हणजे पिकांवरील कीड—रोगांचे व्यवस्थापन नैसर्गिक रीत्या होण्यास मदत होत असते. बाभळीच्या झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्यातून गोळा केलेला मध म्हणून ही त्याची एक विशेषता आहे. असे सर्व असताना, शेताचे तुकडे झाले, सावली पडते असे कारण देऊ न बाभळीची सर्वत्र बेसुमार तोड झाली. तीनचार हजार लोकवस्तीच्या गावामध्ये पूर्वी शे-दोनशे बाभळीची झाडे असत. आज तिथे पाचपन्नास सुद्धा शिल्लक राहिली नाहीत.

सध्या झाडांचे महत्त्व सर्वानाच पटत असल्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम सर्वत्र सुरू असतात. त्यामध्ये ठरावीक प्रकारचे शोभिवंत आणि सावली देणारे म्हणून दहा-पंधरा प्रकारच्याच वृक्षांची लागवड होते. ती करताना स्थानिक कृषी हवामानाचा फारसा विचार केलेला नसतो. वृक्षारोपणामध्ये बाभळीचे अथवा गावरान बोराची लागवड होते असे कधी दिसत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची वृक्ष लागवड बऱ्याच वेळा जैवविविधता, हवामान इ. अनुषंगाने फारसा विचार न करता केली जाते. त्यामुळे ती शास्त्रीय पद्धतीने होत आहे असेही म्हणता येत नाही. कारण स्थानिक वातावरणाशी जुळवून न घेणारे परंतु सुंदर, सदाहरित वृक्ष लागवड करणे वाढल्यामुळे त्या वृक्षाबरोबर विपरीत जीवजंतू येण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे त्याचा एकंदरीत परिस्थितीकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. तसे अनुभव सध्या येत आहेत. नव्वदच्या दशकामध्ये निलगिरी लागवड केली त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यानंतर त्याची तोड सुरू झाली. मागील दहा-बारा वर्षांमध्ये सप्तपर्णी वृक्षाची लागवड जास्त केली. आज ते आरोग्याला हानीकारक ठरते म्हणून त्याची तोड सुरू आहे.

पर्यावरणरक्षण, त्याच बरोबर शेतीला पूरक म्हणून वृक्षांची लागवड केली पाहिजे. आजच्या हवामानबदलाच्या संकटाचे पार्श्वभूमीवर नैसर्गिक ‘शेती परीस्थितीकी’ मध्ये कमीत कमी हस्तक्षेप आणि शाश्वत शेती उत्पादनाचे दृष्टीने शेती परिस्थितीकीची रचना करणे असे दोन उद्देश ठेवून केलेली वृक्ष लागवड सगळ्याच दृष्टीने फायदेशीर ठरणारी असेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:10 am

Web Title: article on how much do farm trees cost abn 97
Next Stories
1 विश्वाचे वृत्तरंग : ब्रेग्झिट कराराचा पेच
2 भारतीय लोकशाहीचा घटता निर्देशांक!
3 एका गृहप्रवेशाची गोष्ट..
Just Now!
X