22 January 2021

News Flash

‘स्वरानंद’ची पन्नाशी..

‘आपली आवड’चा रौप्यमहोत्सव पं. भीमसेन जोशी आणि संगीतकार राम फाटक यांच्या उपस्थितीत साजरा झाला.

‘स्वरानंद’च्या ‘आपली आवड’ या कार्यक्रमातील हे क्षणचित्र ७ नोव्हेंबर १९७० रोजीचे.

‘आपली आवड’, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ आदी कार्यक्रमांतून मराठी रसिकांना निखळ श्रवणानंद देणारी आणि ‘मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम करणारी आद्य संस्था’ म्हणून लौकिक असलेल्या ‘स्वरानंद-पुणे’ या संस्थेला ७ नोव्हेंबर रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘स्वरानंद’चे एक संस्थापक सदस्य अरुण नूलकर यांनी या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा घेतलेला आढावा..

७ नोव्हेंबर १९७०, रात्री ९॥ वा. स्थळ : लक्ष्मी क्रीडा मंदिर पुणे. ‘स्वरानंद’निर्मित मराठी सुगम संगीताचा सुरेल संगम- ‘आपली आवड’! आणि हा अभिनव कार्यक्रम सुरू झाला, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे..’ या स्वा. सावरकरांच्या अजरामर गीताने!

आम्ही तेव्हाचे कॉलेजमधले विद्यार्थी. काही गाणारे-बजावणारे मित्र आमच्या एका संगीतवेडय़ा मित्राकडे (जे नंतर न्यायमूर्ती झाले, श्रीकांत साठे) आमच्यातल्याच मित्रमंडळींची गाणी-बजावणी करण्यासाठी भेटायचो. त्यात विश्वनाथ ओक, हरीश देसाई हे आघाडीवर असायचे. नंतर १९६९ मध्ये पुणे विद्यापीठाकडून युवक महोत्सवासाठी आम्ही आपापल्या महाविद्यालयातर्फे धुळ्याला एकत्र आलो होतो. थंडीचे दिवस होते, म्हणून एका रात्री विश्वनाथ ओकने पुणेकर कलाकारांचा शेकोटी कार्यक्रम ठरवला. त्यात शोभा जोशी, मीना हसबनीस, शैला सरदेसाई, सुधीर दातार, रमाकांत परांजपे, मी अशा मंडळींसह सुंदर कार्यक्रम केला. पुण्यात परत आल्यावर विश्वनाथ ओकच्या कल्पक डोक्यात चक्र सुरू झाले. त्यातूनच ‘स्वरानंद’ संस्थेने आकार घेतला अन् ‘आपली आवड’ या मराठी गाण्यांचा रंगमंचीय आविष्कार रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत सादर करण्यात आला. पाच व्हायोलिन्स, बासरी, हार्मोनियम, सतार, अ‍ॅकॉर्डियन, गिटार, तबला, ढोलकी अशा सुसज्ज वाद्यवृंदासह मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर होण्याची ती पहिलीच वेळ होती! म्हणूनच ‘मराठीतला आद्य वाद्यवृंद’ हे बिरूद ‘स्वरानंद’ नेहमीच मिरवत असते!

‘आपली आवड’च्या त्या पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ७ नोव्हेंबर १९७० ही तारीख ठरली. विश्वनाथ ओक, हरीश देसाई हे संयोजक होते. तालमीचा शुभारंभ मनोहर सरदेसाई (मनोहर संगीत विद्यालय) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. संपूर्ण कार्यक्रम बसवून घेण्याची जबाबदारी विश्वनाथ ओक यांनी घेतली. या कार्यक्रमाचे एक हँडबिल काढले होते. शिवाय वर्तमानपत्रात जाहिरात होतीच; ‘सुगम संगीताचा सुरेल संगम-आपली आवड’ असा मथळा जाहिरातीत होता. तिकिटाचे दर (खरोखरच) फक्त रु. पाच, तीन, दोन असे होते!

या संचातील गायक-वादक मंडळी शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि परंपरा लाभलेली अशीच होती. गायक-गायिकांमध्ये मीना हसबनीस (सरस्वती राणे यांची शिष्या), शोभा जोशी (दत्तोपंत आगाशे बुवांची शिष्या), शैला सरदेसाई (मनोहर आणि लीला सरदेसाईंची कन्या), सुधीर दातार (गायनाचार्य देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांचा नातू आणि पं. राम मराठे यांचे शिष्य), याशिवाय गिरीश जोशी, शरद जोशी, एच. एन. (हरीश) देसाई हे होते. तर वादकांमध्ये विश्वनाथ ओक (हार्मोनियम), रमाकांत परांजपे, रत्नाकर भोसले, सुधीर अवचट, सुभाष दातार, अशोक खरे (व्हायोलिन्स), रामकृष्ण वझे (सतार- रामकृष्ण बुवा वझे यांचे नातू), श्यामकांत परांजपे (गिटार, अ‍ॅकॉर्डियन), अरुण नूलकर (तबला), सुरेश करंदीकर (ढोलकी), अजित सोमण (बासरी) असा सुसज्ज वाद्यवृंद आणि निवेदक होते- सुहास तांबे!

‘मार्मिक’ व्यंगचित्रकार, संगीतकार आणि व्हायोलिनवादक श्रीकांत ठाकरे आणि आकाशवाणीवरील संगीत नियोजक अरविंद गजेंद्रगडकर हे प्रमुख पाहुणे होते. या दोघांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि आगामी काळात ‘स्वरानंद’ने स्वतंत्र निर्मिती करावी, असा महत्त्वपूर्ण सल्लाही दिला.

त्या काळात हिंदी गाण्यांचे वाद्यवृंदासहित कार्यक्रम होत होते; पण मराठीत या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे रसिकांनी आणि वृत्तपत्रांनी भरभरून स्वागत केले. नंतरच्या काळात नावारूपाला आलेले हे कलाकार तेव्हा नवखे होते, पण त्यांनी रसिकांना निखळ स्वरानंद दिला!

या पहिल्या कार्यक्रमापासूनच ‘स्वरानंद’चे अत्यावश्यक कलाकार असलेले ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे सांगत होते, ‘‘मी तेव्हा एनडीएच्या शाळेत शिक्षक होतो. मला राजस्थानला सहलीबरोबर जायचे होते, पण ते जमले नाही म्हणून मी कार्यक्रमात आलो. तेव्हा ‘सुरस’ नावाचा माझा छोटा ग्रूप होता, त्यातलेच वादक इकडे आणले.’’ योगायोग म्हणजे, रमाकांत परांजपेंच्या तीन पिढय़ा, बंधू ‘स्वरानंद’मध्ये आहेत! गाण्यांचे म्युझिक पीसेस, नोटेशन काढणे आणि कार्यक्रमात ते अतिशय अचूक वाजवणे हे परांजपेंचे वैशिष्टय़. एका कार्यक्रमाला आनंद मोडक (तेव्हा ते संगीतकार व्हायचे होते) आले होते. त्यांनी भरभरून दाद दिली आणि त्यातही रमाकांतच्या म्युझिक पीसेसना, विशेषत: ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी..’, ‘सागरा प्राण तळमळला..’ या गाण्यांवेळी तर ते विलक्षण भारावले होते!

‘स्वरानंद’ म्हणजे एक कुटुंबच होते. अगदी पहिल्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेत खुच्र्यावर क्रमांक टाकण्याचे काम केल्याची आठवण गिरीश जोशी दाम्पत्याने सांगितली. ते असेही म्हणाले, ‘‘विश्वनाथ ओक यांना कुणी तरी चॅलेंज केले की तुम्ही मराठीवाले फक्त पेटीतबल्यावर गाणार, संपूर्ण ऑर्केस्ट्रा तुम्हाला जमणारच नाही!’’ ते आव्हान स्वीकारून ओक यांनी ‘आपली आवड’ हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी करून दाखवला. रसिकांची आवड लक्षात घेऊन गाण्यांची निवड करणे, नेमक्या गायक-गायिकेला ते देणे, सर्वाच्या चोख तालमी घेणे, तसेच निवेदकाकडून गाण्यांविषयी नेटकी माहिती दिली जाण्यावरही ओकांचे लक्ष असे. त्यामुळेच ‘अशी पाखरे येती..’, ‘भातुकलीच्या खेळामधली..’, ‘हे श्यामसुंदर राजसा..’, ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी..’, ‘श्रावणात घननीळा बरसला..’, ‘जय शंकरा..’, ‘या भवनातील गीतपुराणे..’ अशी श्रवणीय गाणी ‘वन्समोअर’ मिळवत असत. शिवाय सुरुवात ‘जयोस्तुते..’ने आणि सांगता ‘सागरा प्राण तळमळला..’ने, म्हणजे परिपूर्णच!

इथपासून सुरू झालेली संस्थेची वाटचाल अधिकाधिक परिपक्व होत गेली. सुरुवातीच्या मर्यादांमध्ये बरेचसे कार्यक्रम उद्यान-प्रासादमध्ये केले. संस्थेचा पहिला वर्धापन दिन बालगंधर्व कलादालनात पु. ल. देशपांडे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. कलाकारांचे कौतुक करताना त्यांनी काही मौलिक सूचनाही केल्या. पुलं म्हणाले होते, ‘‘हातात वही घेऊन गाणं म्हणणं आपल्याला पसंत नाही. आम्ही तीन तासांची नाटकं पाठ करतो, तेव्हा तीन मिनिटांची छोटी गाणी तोंडपाठ असायला हरकत नाही! तसा प्रयत्न करावा. नाही तर हे म्हणजे, प्रेयसीकडे जायचं आणि प्रत्यक्ष बोलण्याऐवजी प्रेमपत्रातला मजकूर वाचून दाखवायचा. ते जसं हास्यास्पद होईल, तसंच इथं होईल.’’

‘आपली आवड’चा रौप्यमहोत्सव पं. भीमसेन जोशी आणि संगीतकार राम फाटक यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळेपर्यंत आमच्यातील गायक सुधीर दातार आणि गायिका शैला सरदेसाई यांचा शुभविवाह झाला होता! ते बरोबर लक्षात घेऊन, कलाकारांचे कौतुक केल्यावर पं. भीमसेन जोशी मार्मिकपणे म्हणाले, ‘‘यांच्यात लग्नंही होतात!’’

तीन वर्षांत २५ प्रयोग ही संख्या आजच्या काळात अत्यल्प वाटली तरी, तेव्हा मराठी भावसंगीताचे कार्यक्रम आणि तेही दर्जेदार रीतीने सादर करून रसिकांची अभिरुची संपन्न करणाऱ्या ‘स्वरानंद’साठी ही संख्या महत्त्वाची होती. तेव्हा गणेशोत्सवात पुण्यात व बाहेरही ‘आपली आवड’चे प्रयोग झाले आणि पुढच्या वर्षभरात- म्हणजे ४ डिसेंबर १९७४ रोजी ‘आपली आवड’चा सुवर्ण महोत्सवी प्रयोग प्रतिभावान गायक-संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या उपस्थितीत साजरा झाला.

दरम्यान, १९७१ मध्ये सुधीर मोघे यांचे संस्थेत आगमन झाले, तेही निवेदक म्हणून! निवेदनाची स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली, त्यामुळे ‘आपली आवड’च्या वैशिष्टय़ांमध्ये सुरेल गायन, सुसज्ज वाद्यवृंद याबरोबरच शैलीदार निवेदन या वैशिष्टय़ाचीही महत्त्वपूर्ण भर पडली. दोन गीतांना जोडणाऱ्या त्यांच्या काव्यात्मक निवेदनाचे रसिकांना आकर्षण वाटे. ‘स्वरानंद’च्या वाटचालीत सुधीर मोघे यांचे मोलाचे योगदान आहे. १९७२ साली भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने १८५७ ते १९४७ या कालखंडातील निवडक प्रभावी व्यक्तिमत्त्वे आणि ज्वलंत घटनांचा ‘स्वतंत्रते भगवती’ हा गीतबद्ध कार्यक्रम सुधीर मोघेंनी लिहिला, विश्वनाथ ओक यांनी तो स्वरबद्ध केला. ‘स्वरानंद’ची ती अभिजात आणि संपूर्ण स्वतंत्र निर्मिती होती. १५ ऑगस्ट १९७२ रोजी एस. एम. जोशी यांच्या उपस्थितीत तो सादर झाला. मुंबई दूरदर्शनचे पुणे सहप्रक्षेपण केंद्र सुरू झाले तेव्हा (१९७३ मध्ये) हाच कार्यक्रम दाखविण्यात आला. त्यात प्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे होते, त्याचप्रमाणे या कार्यक्रमातूनच रंजना (पेठे) जोगळेकर या ‘स्वरानंद’च्या गायिका झाल्या.

‘स्वरानंद’ला ओळख मिळवून देणारा कार्यक्रम म्हणजे १७ डिसेंबर १९७५ रोजी झालेला ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ हा कार्यक्रम! याची संपूर्ण संकल्पना, मांडणी सुधीर मोघे यांचीच आणि तितकेच प्रवाही निवेदनही ते करायचे! महत्त्वाचे म्हणजे याच्या पहिल्या प्रयोगात मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे मानकरी ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके, राजा परांजपे हे उपस्थित होते (वरील उजवीकडचे छायाचित्र पाहा)! कार्यक्रमानंतर बाबूजींनी एका अनौपचारिक मैफिलीत रंगमंचावरच त्यांच्या आगामी चित्रपटातली गाणी ऐकवली! ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ला अभूतपूर्व यश मिळाले. सुधीर मोघेंच्या शब्दांत सांगायचे तर, एका सिद्धहस्त कवीला आणि त्याच्या प्रतिभेला केलेला तो मानाचा मुजरा होता!

वाढत्या कार्यबाहुल्यामुळे मोघे मुंबईला गेले आणि ‘चैत्रबन’चे निवेदक म्हणून सुधीर गाडगीळ आले! सहजसुंदर, मोकळे आणि खेळकर निवेदन, लोकांना बोलते करण्याची हातोटी या वैशिष्टय़ांमुळे सुधीर गाडगीळ हे नाव अल्पावधीतच रसिकप्रिय झाले. पण त्याची सुरुवात ‘स्वरानंद’मध्ये झाली!

‘स्वरानंद’च्या वाटचालीत १९७२ साली सामील झालेले आणि व्यवस्थापक म्हणून विविध कामे करणारे प्रा. प्रकाश भोंडे. ‘स्वरानंद’च्या सर्व कार्यक्रमांची निर्मितीव्यवस्था ते करतात. संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यावर भोंडे यांच्याच सूचनेवरून संस्था अधिक समाजाभिमुख करण्याच्या दृष्टीने ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ करण्याचे ठरले. सुधीर मोघे या प्रतिष्ठानचे पहिले अध्यक्ष होते, तर प्रकाश भोंडे यांची तहहयात कार्यकारी विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली. संस्थेवरील भोंडे यांची निष्ठा, त्यांची कार्यकुशलता याचा हा गौरवच ठरला.

‘आपली आवड’, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’मुळे संस्थेची जडणघडण झाली, स्थैर्य आले. ‘मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम करणारी आद्य संस्था’ ही तिची ओळख रसिकमान्य झाली. अर्थात, कलेला असणारा शाप ‘स्वरानंद’लाही भोगावा लागला, पण हे सावट फार काळ टिकले नाही. पुन्हा एकोपा होऊन संस्थेचे कार्यक्रम सुरू झाले. १९८३ साली स्वा. सावरकरांच्या जीवनावर आधारित ‘नमन मृत्युंजयवीरा’ हा स्वतंत्र कार्यक्रम (गीते : जयंत भिडे, संगीत : गिरीश जोशी) केला आणि तो अंदमानमध्येही झाला. सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले होते, तिथे आमच्या कलाकारांनी ‘जयोस्तुते’ गायले!

आज नावारूपाला आलेले अनेक गायक, वादक, निवेदक असे अनेक कलाकार ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या विविध कार्यक्रमांत सहभागी होते, याचा संस्थेला अभिमान आहे. अशा कलाकारांची यादी प्रचंड आहे! तसेच ‘स्वरानंद प्रतिष्ठान’तर्फे संगीत क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना (गायक, संगीतकार, वादक, ध्वनिसंयोजक) पुरस्कार दिले जातात.

सांस्कृतिक क्षेत्रातल्या दिग्गजांच्या कामगिरीवर आधारित वैविध्यपूर्ण कार्यक्रम ‘स्वरानंद’ने केले आहेत. त्यात गजाननराव वाटवे, सुधीर फडके, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे, पं. जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर जोग, दशरथ पुजारी, पं. हृदयनाथ मंगेशकर, शंकर वैद्य, वसंत बापट, शांता शेळके, सुधीर मोघे, पु. ल. देशपांडे, यशवंत देव, सुमन कल्याणपूर, ग. दि. माडगूळकर, दत्ता डावजेकर, राम फाटक, अशोक पत्की अशा अनेक मान्यवरांवरील कार्यक्रमांतून त्यांच्या सुगम संगीतातील योगदानाविषयी, गाण्यातल्या शब्दांविषयी, चालींविषयी नेमकेपणाने सांगून ती सादर करून रसिकांना संपूर्ण आनंद देणे, आपली भावसंगीत परंपरा किती समृद्ध आहे हे दाखवणे हीच उद्दिष्टे ‘स्वरानंद’ची असतात. म्हणूनच अगदी सुरुवातीच्या काळात आमचे मानद अध्यक्ष, भावगीताचे जनक गजाननराव वाटवे यांनी ‘स्वरानंद’ला उद्देशून लिहिले होते : ‘यांचा कार्यक्रम बघून खात्री पटली की, भावगीताला चांगलेच दिवस आहेत, ती पताका अशीच उंच राहणार आहे, फक्त ती धरणारे हात बदलले आहेत!’

‘स्वरानंद’ला ५० वर्षे पूर्ण होत असताना सुधीर मोघे, अजित सोमण हे हयात नाहीत, हे फार जड जाते आहे. मोघे यांच्या संकल्पनेतला महत्त्वाकांक्षी ‘भावगीतकोश’ आणि त्यावर मान्यवरांचे लेख हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. रविमुकुल व आदिती कुलकर्णी त्यासाठी अथक परिश्रम घेताहेत. या महत्त्वाच्या टप्प्यावर अर्थातच रसिकांची दाद, त्यांचा उदंड प्रतिसाद, आश्रय, तसेच संस्थेचे देणगीदार हे तर सर्वात महत्त्वाचे. या साऱ्यांबरोबरच ‘स्वरानंद’ पुढची वाटचाल करेल असा विश्वास वाटतो.

arun.nulkar@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 12:40 am

Web Title: arun nulkar swaranand organisation pune swaranand pune zws 70
Next Stories
1 थायलंडचे अस्वस्थ वर्तमान..
2 कर्तव्यनिष्ठ सहृदयी
3 बचत वाढेल, तूट घटेल! 
Just Now!
X