‘रंग नाटकाचे’ या पुस्तकाच्या निमित्ताने लिहिलेलं आणि पुष्पाबाईंच्या नाटय़समीक्षा लेखनप्रवासाला उजळा देणारं हे व्यक्तिगत पत्र; ‘माणूस’ व ‘राजहंस प्रकाशन’चे माजगावकर आणि भावे कुटुंबीय यांचा सहप्रवासही उलगडणारं.. 

४ ऑक्टोबर २०१२, पुणे. 

पुष्पाबाई,

सकारण-अकारण दीर्घकाळ लांबलेलं- मधल्या एका अवस्थेत तर बसकण मारेल की काय अशा अवस्थेतलं तुमचं पुस्तक आज अखेर तयार झालं. पाठवण्यापूर्वी पुस्तकावर एक नजर टाकली, पण कसं कोण जाणे नजरेतून पुस्तक निसटलं आणि तुम्हीच समोर आलात. आजच्या पंचाहत्तरीजवळच्या नाही, दूर तिशीतल्या.

मध्यम उंची, धारदार नाक, माझ्या तुलनेत गोरा -एरवी सावळा रंग, नजरेत धाक-हे सर्व पहिल्या भेटीत जाणवलं. पण बोलायला लागलात, तेव्हा धाकाची जागा आत्मविश्वासानं घेतली.

खरं तर तुमच्याआधी माझी अनंतरावांशी ओळख. तीही एका वेगळ्याच कारणासाठी लक्षात राहिलेली. त्यांनी ‘माणूस’कडे एक अनुवाद पाठवला होता. ‘माँटीज् डबल’ या पुस्तकाचा. संपादकीय कामाचा भाग म्हणून तो माझ्याकडे आला. साप्ताहिकासाठी लेखकांच्या अनाहूत साहित्यांचा इतका मारा असायचा, त्यात हा बिचारा अनुवाद वर्ष-सहा महिने निपचित पडून होता. अधूनमधून वर यायचा आणि ‘नंतर बघू’ म्हणून मागे जायचा. एकदा कुमुद (निर्मला पुरंदरे) म्हणाली, ‘अरे, बघ हा येऊन किती दिवस झालेत. काही कळव त्यांना.’ दोघांच्या एक गोष्ट तेव्हा लक्षात आली की, इतक्या वर्षांत त्या लेखकाचा आठवणीसाठी साधा फोन, पत्र काही नव्हते. मग हा थंडाराम लेखक आहे तरी कोण? त्या वेळी अनंत भावे हे नाव प्रथम लक्ष देऊन वाचलं. हस्तलिखित सुरेख अक्षरात होतं.  केवळ या एका निकषावरसुद्धा प्रथमदर्शी आम्ही लेखनाची जातकुळी ठरवत असू. मनात आलं, आपलं लेखन प्रकाशित व्हावं म्हणून साधं पत्र पाठवायचे कष्ट न घेणारा लेखक कसा आहे हे बघावं; म्हणून मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचं ठरवलं. एम्पायर हॉटेलमध्ये भेट ठरली, पण एकमेकांना ओळखायचं कसं? हा प्रश्न त्यांच्या दाढीनं सोडवला. आम्ही भेटलो. पहिल्याच भेटीत झालेल्या गप्पांत फिरक्या, विनोदाची देवाणघेवाण झाली. गोत्र जुळलं. मत्री जमली. पुढे भेटतच गेलो. अशा एका भेटीत मी घरी आलो. तुम्ही भेटलात. ती भेट मला लख्ख आठवतेय. संध्याकाळ. चारचा सुमार. मी बाहेरच्या हॉलमधल्या कपाटात पुस्तकं बघत होतो. तुम्ही स्वयंपाकघरातून हात पुसत बाहेर आलात. पांढरट रंगाची साडी. अनंतराव म्हणाले, ‘ही पुष्पा. रुईयात मराठीची प्राध्यापक आहे. ही लिहिते. हिला लिहायला आवडेल.’ मला आठवत नव्हतं, पण तुम्ही या पुस्तकात उल्लेख केलात, म्हणून लक्षात आलं की आपण पुस्तक परीक्षणासंबंधी बोललो होतो. पुढे ते मागे पडलं आणि नाटक पुढे आलं आणि ‘माणूस’मध्ये तुमचा नाटय़समीक्षेचा सिलसिला सुरू झाला. दुसऱ्या बाजूनं आपल्या तिघांच्या भेटी, जाणं-येणं, गप्पा इतक्या वाढल्या की भावे कुटुंब ‘माणूस’च्या परिवाराचा भाग बनून गेलं. आपण त्या काळात कितीदा, कुठे कुठे भेटत असू? मी कामानिमित्तानं जवळपास मुंबईकर झालो होतो. तुमच्या घरी येणं हे कामाचा भाग होऊन गेलं. त्या काळातल्या ‘माणूस’च्या अनेक योजनांचा जन्म तुमच्या घरी झालेला. अनंतरावांच्या हस्ताक्षरात त्याची फायनल कॉपी तयार व्हायची.  विशेष अंकाचे, दिवाळी अंकांचे विषय ठरायचे. चर्चा व्हायच्या. दादरच्या शेट्टीकडे किंवा पारशी कॉलनीतल्या एका हॉटेलमध्ये बरेचदा जेवणं व्हायची. त्याच काळात ‘माणूस’ मळेकर वाडय़ात आला. मीही तिथे राहायला आलो. तुम्ही दोघं चार-आठ दिवस तिथं राहायला आला होता. त्यामुळे श्री.ग., निर्मलाबाई, अच्युतराव आपटे  ही मंडळी जवळ आली. आमच्या आईला तुम्ही फार आवडायचात. इतक्या की तुम्ही गेल्यावर तुमच्या कौतुकाचे पाट वाहायला लागायचे. मग मी तिला चिडवायचो, की ‘त्या मांस-मटण खातात बरं का! पुढच्या वेळी मी तेच बाहेरून आणणार आहे.’  ती म्हणायची ‘चल, काहीतरी बोलू नकोस.’

त्या घराची सजावट करायची ठरल्यावर तुम्ही मुंबईतून बफ रंगाचे खादीचे पडदे करून घेऊन आलात. एका अर्थी तो ‘माणूस’चा आणि आपल्या दोन कुटुंबांचा छान मंतरलेला काळ होता. आणि हे सगळं एका बाजूनं सुरू असताना तुमची नाटय़समीक्षा ऐन बहरात आलेली होती.  मराठी रंगभूमीवर खूप काही नवं घडत होतं. रंगायनची आणि भारतीय विद्या भवनवरची प्रयोगशील नाटकं मूळ धरू लागलेली होती. विजयाबाई, तेंडुलकर, वृंदावन (दंडवते), अरिवद-सुलभा (देशपांडे), दामू (केंकरे), नंदकुमार रावते यांनी शोधलेल्या समांतर रंगभूमीच्या वाटेवर त्यांचा आदर्श ठेवून बरेच नवे रंगकर्मी वाटचाल करू लागले होते. काही घडवू पाहत होते, शोधू पाहत होते, स्वतला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. वातावरणात एक उत्साह होता. जोश होता. म्हणूनच अशा वळणावर उत्साहाच्या पलीकडे जाऊन त्या सगळ्या प्रयत्नांची, त्यामागच्या दृष्टीची एक तर्कसंगती लावून त्याला सद्धांतिक बैठक देणाऱ्या समीक्षेची गरज होती. त्या जोडीला इथल्या रंगकर्मीना हिन्दी, कानडी, बंगाली रंगभूमी आणि जागतिक रंगभूमीवरील घडामोडींचे, तिथल्या प्रयोगशीलतेचं भान देणंही गरजेचं होतं. साठच्या दशकात मराठीत नवकथा- नवी कविता आली. गंगाधर गाडगीळ त्यातले बिनीचे लेखक तर खरंच, पण त्याहीपेक्षा या नवकथेमागे सद्धांतिक विचार गाडगीळांनी ठामपणे, सलगपणे मांडला आणि त्या फळीतल्या लेखकांना आपण साहित्यात नवं जे काय करतो आहोत त्याबद्दल एक आत्मविश्वास मिळवून दिला, हे त्यांचं मला फार महत्त्वाचं योगदान वाटतं.

पुष्पाबाई, मराठी समांतर रंगभूमीसंदर्भात तुम्ही नेमकं हेच केलंत. अनेक रंगकर्मीना आपण जे करतो आहोत त्यामागचा विचार समजत नव्हता. त्यात अंधानुकरणाचा, केवळ नव्याचा हव्यास असण्याचाही काही भाग होता. केवळ नवं ते हवं या वेडापायी पूर्वसूरींचं कर्तृत्व नाकारण्याचा प्रकारही होता. तुम्ही ती वैचारिक गुंतागुंत नीट उलगडून दाखवलीत. प्रसंगी हातात छडी घेतलीत. तुमच्या समीक्षेवर एका वर्गाकडून सतत टीका होत असताही तुम्ही हे काम फार निष्ठेनं केलंत. याचं एक कारण, या नव्या रंगभूमीशी तुम्ही आतून जोडलेल्या होतात. ती वीण घट्ट होती. सहसा व्यावसायिक नाटय़निर्मात्यांच्या तंत्राचं सद्धांतिकतेशी वाकडं असतं, तर पुस्तकी समीक्षकांना नाटय़निर्मितीचं भान नसतं.  तुमचा प्रयत्न सतत या दोन टोकांतलं अंतर कमी करण्यावर असायचा. यासंदर्भात तुमची लेखनशैली धारदार होतीच. संहिता, अभिनय, संगीत, वेशभूषा, नेपथ्य या बाबींबर तुम्ही वाचन, विचार केलेला असायचा. ठाम काही म्हणायचात.

माधव वझेंनी लिहिलंय ते खरंच आहे, ‘मी जिंकलो..’, ‘गुरु महाराज’ या नाटकात डॉक्टरांनी, विजयाबाईंनी अभिनयात स्नायूंवर नियंत्रण ठेवलंय याची नोंद तुम्ही आवर्जून घेत होता; कारण युरोपियन रंगभूमीवर यात काय प्रयोग चालू आहेत याचा कानोसाही तुम्ही घेत होता. त्यामुळे तुमच्या समीक्षेनं मंडळी नाराज व्हायची हे खरं असलं, तरी त्यातला विचार त्यांना नजरेआड करणं शक्य नसायचं तरी हेही खरंच की काही प्रसंगी तुम्ही गरजेपेक्षा अधिक आक्रमक होत होता, तुमचा सूर चढा लागायचा. श्री. गं.ना, मला तो अनावश्यक वाटायचा. माणसं दुखावली जायची. राग ‘माणूस’वर निघायचा. पण तुमचे हेतू स्वच्छ होते, याची आम्हाला खात्री होती.

एक आठवण सांगण्यासारखी आहे. बहुधा पूर्वी सांगितली नसावी. तेंडुलकरांची ‘भल्याकाका’ आणि ‘बाईंडर’ ही दोन्ही नाटकं थोडय़ाच अंतरानं रंगमंचावर आली. ‘भल्याकाका’वर लिहिताना तुम्ही बरंच प्रतिकूल लिहिलंत. ते दुखावले. त्यांनी श्री.गं.ना पत्र लिहिलं. तुमच्या नाटय़विषयक ‘समजे’विषयी काही प्रश्न उभे केले. सर्वात आश्चर्य म्हणजे ‘माणूस’ला पुढचं लेखन देताना विचार करावा लागेल असंही लिहिलं.. श्री.गं.नी पत्र मला दिलं आणि म्हणाला, ‘काय करायचं रे बाबा?  एकदा भेटून घे. मुंबईला जाशील तेव्हा.’ मी अडचणीत. विचार केला भेटल्यावर बोलू. शक्यतो भेट लांबणीवर टाकू. तोपर्यंत राग निवळेल. योगायोग म्हणजे काही दिवसांत ‘बाईंडर’वरचं परीक्षण आलं. ते त्यांना फारच आवडलं. त्या सुमारास झालेल्या एका भेटीत तुमची ‘समज’ फार छान आहे, असं म्हणाले. मीच खोडी काढली. म्हणालो, ‘पुष्पाबाईंना नाटक आवडलं नसतं तरी तुमचं हेच मत राहिलं असतं का?’ – त्यांना माझ्या बाणाची दिशा कळली. विषय तिथेच संपला.

असे काही प्रसंग वगळता एकूण तुमची नाटय़समीक्षा त्या काळात फार उंची गाठून गेली.  यात शंकाच नाही. ‘माणूस’बद्दल त्या काळात आणि आजही जे गौरवानं बोललं जातं, ते वास्तविक तुमच्यासारख्यांचं हे जे योगदान आहे, त्याचा तो गौरव असतो. ‘माणूस’च्या पंचविशीनिमित्तानं पुण्यात जो कौतुकसोहळा झाला त्यात, श्री.गं.नी हे जाहीरपणे सांगितलं- मी आज खासगीत सांगतो आहे.

या पुस्तकातले लेख निवडताना पुन्हा त्या काळात गेल्यासारखं वाटलं. असंही वाटून गेलं की, खूप गोष्टी हातातून निसटून गेल्या. तुमच्या दमदार नाटय़समीक्षेइतकीच तुमची काही रंगकर्मीची व्यक्तिचित्रंही फार अभ्यासू आहेत. तुमच्या समीक्षालेखनात अपरिहार्य येणाऱ्या परिभाषेमुळे काही जागी समीक्षा बोजड नाही पण जड होते. तो भाग व्यक्तिचित्रणात कुठेही होत नाही. शांता जोग, दत्ता भट यांच्या व्यक्तिचित्रणांत तुम्ही दोघांच्या अभिनयातल्या बारीकसारीक जागा फार समर्थपणे दाखवल्या आहेत. विशेषत भटांच्या गप्पांच्या बैठकीतून उठताना एकाच वेळी विषण्णतेचा आणि उत्साहाचा अनुभव ते देऊन जातात असं तुम्ही लिहिलं आहे – त्याचा मीही अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच तुमच्याकडून अशी काही व्यक्तिचित्रं पुढच्या काळात मी लिहून घ्यायला हवी होती. ते माझ्याकडून झालं नाही. ते केवळ डॉक्युमेंटेशन झालं नसतं, तर तुमच्या नजरेतून त्यांच्या अभिनय-दिग्दर्शन या योगदानावरचं ‘अ‍ॅक्टर्स टॉक अबाउट देअर अ‍ॅक्टिंग’सारखं पुढच्या पिढीच्या नाटय़कर्मीना सतत मार्गदर्शन करणारं बायबल झालं असतं.

जाऊ दे.  विचाराच्या या जंगलात शिरण्यापेक्षा उशिरा का होईना, तुमचं समीक्षेवरचं पुस्तक माझ्या हातून झालं हे समाधान मानतो. उद्या चित्रगुप्ताच्या दरबारात हातून काय काय कामं करायची राहिली यांच्या पट्टय़ा हातावर बसतीलच, त्यात या पुस्तकामुळे निदान एक पट्टी कमी खावी लागेल.

कळावे,

दिलीप माजगावकर

(पुष्पाबाई आणि ‘राजहंस प्रकाशन’चे संबंध सुमारे पाच दशकांचे. ‘माणूस’ या नियतकालिकात पुष्पाबाईंनी लिहिलेल्या नाटय़समीक्षेचे ‘रंग नाटकाचे’  हे पुस्तक प्रसिद्ध झाले; त्या वेळी लिहिलेले हे अप्रकाशित पत्र.)