28 January 2021

News Flash

करोनामुळे सुकली फुलशेती!

करोनाने शेतीलाही मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे.

|| दयानंद लिपारे

करोनाने शेतीलाही मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. यातील फुलशेतीचा सुगंध तर या महामारीने हरपून गेला आहे. ठप्प झालेले जनजीवन, सण, यात्रा, उत्सव, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे राज्यातील फुलशेती सुकून गेली आहे.

करोना महामारीच्या संकटाने फुलशेतीचा सुगंध हरपला आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत फु लशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अधूनमधून कधीतरी तेजीचा सुगंध बहरतो, पण उर्वरित काळात मंदी, पडलेले दर यामुळे फूल शेतीचे अर्थकारण उजाड होत चालले आहे. सतत नुकसान होत असल्याने आता फुलशेती कसणेही जिकिरीचे बनले आहे. पुन्हा फुलशेतीला कधी बहर येणार याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.

भारतीय आणि फूल यांचे नाते अतूट आहे. भारतीयांचा कोणताही सण, परंपरा, उत्सव हा फुलांशिवाय साजरा होत नाही. जन्मापासून अंतापर्यंत फूल ही गरज बनलेली आहे. तद्वत, अन्नधान्याच्या शेतीबरोबरच फुलशेती हीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. फुलशेतीची परंपरा खूप प्राचीन आहे. हल्ली या फुलशेतीला आधुनिकतेचा आयाम मिळालेला आहे. वेगवेगळ्या सण—उत्सव समारंभात फुलांची मागणी वाढत चालल्याने पारंपरिक फुलांबरोबरच शोभिवंत पाश्चात्त्य फुलांची शेती ही आजच्या काळाची गरज बनली आहे. उघडय़ावर शेती करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरितगृहामध्ये बंदिस्त फुलशेती करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. महाराष्ट्रातही या फुल शेतीने चांगलेच मूळ धरले आहे. करोना संकटात फुलशेतीची भलतीच पडझड झाली. हल्ली करोना संसर्ग कमी होत चालला असला तरी फुलशेतीचे दुर्दैवाचे दशावतार मात्र संपलेले नाहीत. फुलांची मागणी घटली आहे. अस्मानी—सुलतानी संकटामुळे फुलशेती अडचणीत आली आहे. दरांच्या चढ—उतारामुळे फुलशेती करणारे शेतकरी भलतेच त्रस्त झाले आहेत.

फुलांना जगभर वर्षभर मागणी असते. देशातही फुलांचा वापर या ना त्या कारण्यासाठी बारमाही केला जातो. यातून महाराष्ट्रामध्ये फळ-फूल शेती वाढावी असे धोरण राज्य शासनाने स्वीकारले. त्यासाठी हरितगृहातील आधुनिक फुलशेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याकरिता भरीव अनुदान देण्यात आल्याने राज्याच्या विविध भागांमध्ये फुलशेती चांगलीच बहरली. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे चांगल्या फुलबागांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, टय़ुलिप, गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस, झेंडू, गलांडा,केवडा, मोगरा, शेवंता यांसारख्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. आज व्यावसायिक दृष्टय़ा फुलशेतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नेट् शेड आणि ‘पॉलीहाऊस’चा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाधारित फुलशेती केली जाते. ‘मिल्चिंग पेपर’वर बेड तयार करुन विशिष्ट अंतरावर लागवड केली जाते. भारतात तमिळनाडू हे राज्य फूल उत्पादनात अग्रस्थानी आहे. पाठोपाठ क्रमांक आहे तो कर्नाटक राज्याचा. महाराष्ट्रातही फुलशेती बहरलेली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद अशा भागांमध्ये फुल शेती अधिक प्रमाणात केली जाते. हरितगृहातील शेतीमध्ये नानाविध फुलांची लागवड केली जाते. व्यापारी दृष्टिकोन ठेवून ही शेती केली जाते. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून फुलशेतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र या सौंदर्याला करोना काळापासून उतरती कळा लागली आहे.

हिरमुसलेले दिवस

मागील वर्षीचा गुलाब फुलशेतीचा हंगाम सुरू झाला तो फेब्रुवारी महिन्यात. त्याला बहर आला तेव्हा याच काळात देशातील गुलाब विदेशात निर्यात होऊ लागला होता. मात्र २३ मार्चपासून टाळेबंदी सुरू झाल्याने निर्यात ठप्प झाली. युरोपीय आणि अन्य देशांमध्येही टाळेबंदी असल्यामुळे तेथून मागणी घटली. यामुळे फुल शेतीचे उत्पादन घेणे अडचणीचे झाले. अशातच कामगार तुटवडा, वाहतूक ठप्प, खते —औषधांची उपलब्धता होण्यात अडचणी यामुळे निर्यात केला जाणारा गुलाब शेतातच सडून गेला. यामध्ये कोटय़वधी रुपयांची झळ उघडय़ावर आणि हरितगृहात शेती करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या चालकांना सोसावी लागली. विदेशात निर्यात केलेल्या मालाचा पैसे येणे बंद झाल्याने त्यांच्या समोरील आर्थिक अडचणी अधिकच गडद झाल्या. ‘फुललेले रे क्षण माझे’, असे गुणगुणारे फुलशेती उत्पादक पुरते हिरमुसले. या कटू परिस्थितीतून सावरत असताना एप्रिल महिन्यात वादळामुळे हरितगृहांची पुरती वाताहत झाली. अतिवृष्टी— वादळ अशी संकटे एकाच वेळी आल्याने हरितगृहातील रमणीय शेती उजाड झाली.उभे पीक आणि फुललेला फुलोरा पाहता पाहता नष्ट झाला. यात अपरिमित आर्थिक झळ पत्करावी लागली. पावसाळा संपताना श्रावणात फुलांना काहिशी मागणी वाढली. गणेश उत्सवातही फुलांची मागणी चांगली होती.नवरात्रीत मागणीत सुधारणा झाली. तर, ऐन दिवाळीमध्ये अडचण निर्माण झाली. दिवाळीत मोठय़ा प्रमाणात झेंडू विकला जाणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू आणि संकरित झेंडूमोठय़ा प्रमाणात बाजारात आणला. दिवाळी दिवशी ८० ते १२० रुपये किलो असणारा झेंडू दुपारनंतर ५० ते ६० रुपये दराने विकावा लागला. काही ठिकाणी आवक वाढल्याने दर इतके कोसळले की फूल विक्रेत्या शेतकऱ्यांना फुलांचा साठा जागीच टाकून रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे दरातील तेजीमंदीच्या चक्राने शेतकरी चांगलाच खचला.

राज्यभरात कटू अनुभव

झेंडू फुलांचे उत्पन्न प्रामुख्याने घेणारा शिरोळ तालुक्यामध्ये ‘श्री शेतकरी फूल व भाजीपाला संघ’ आहे. या संघात सुमारे दोनशे शेतकरी जोडले गेले आहेत. ते परिसरातील गावे तसेच कर्नाटकातील काही गावातून फुले गोळा करून मुंबईला पाठवितात. बारा किलोच्या कॅरेट मधून झेंडू फुले दादर बाजारात पाठवली जातात. कालपर्यंत झेंडूची ही फुलशेती फायदेशीर होती. हल्ली मात्र त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दर कोसळल्याने आर्थिक झळ बसली आहे. या भागांमध्ये ‘कलकत्ता गोंडा’ हे केशरी रंगाचे झेंडूचे पीक घेतले जाते. करोना काळामध्ये या शेतकऱ्यांना सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले, असे या संघाचे संस्थापक भरतेश खवाटे (कोथळी) यांनी सांगितले. आता झेंडूला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये इतका दर मिळत आहे. किमान ४० ते ५० रुपये दर मिळाला तर उत्पादन खर्च तरी किमान निघू शकतो, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोठय़ा हरितगृहातील शेतकऱ्यांना करोना महामारीत मोठे नुकसान सहन करावे लागले. शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावांमध्ये दिवंगत आमदार सा.रे. पाटील यांनी सर्वप्रथम अत्याधुनिक तंत्रद्यानाचा वापर करीत ‘श्रीवर्धन बायोटेक’ची स्थापना तीन दशकापूर्वी केली. एकशे पाच एकरमध्ये हरितगृहातील फुलशेती पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी, जिज्ञासू येत असतात. करोना संकटामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, असे व्यवस्थापक रमेश पाटील सांगतात. अशातच वित्तीय संस्थांनी कर्जवसुलीकडे लक्ष पुरवले. शासनाने दिलासा म्हणून कर्जमर्यादा कालावधी वाढवला. मात्र ही रक्कम भरणे आता हरितगृहातील शेतकऱ्यांना बंधनकारक झाले आहे. या पैशाची सोय करताना शेतकरी घायकुतीला आला आहे. ही रक्कम कशी आणि कोठून उभी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सांगितले,की फुल शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासन घेते. मात्र विचारांची सुस्पष्ट दिशा दिसत नाही. फुल शेती टिकण्यासाठी शासनाने नुकसानीचा आढावा घेऊन मदत केली पाहिजे. याबाबत नाबार्ड, राज्यशासन यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. राज्याच्या कृषी सचिवांनी उध्वस्त फुलशेतीची पाहणी केली आहे. आता शासनाकडून मदत मिळण्यावर बरेच अवलंबून आहे.’ फुलशेतीचा तोटा वाढत चालल्याने अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी करण्यावर भर दिला आहे. गुलाब शेतीचे आगर म्हणून पुणे जिल्ह्यकडे पाहिले जाते. या भागात सुमारे बाराशे एकर जमिनीवर गुलाब शेती घेतली जाते. सातशेहून अधिक शेतकरी फुल शेती मध्ये गुंतले आहेत.राज्याच्या एकूण फूलशेतीच्या ६० टक्कय़ांहून अधिक उत्पादन याच भागात घेतले जाते, असे पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव भेगडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. करोनाच्या संकटाने फुलशेतीला अपूर्व झळ बसली. त्यातून फुलशेतीधारक अद्यापही सावरलेला नाही. गुलाबांना आता मिळणारा दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरा आहे. मधल्या लग्नसराईच्या काळामध्ये गुलाबाचा दर प्रति गुलाब १० ते १२ रुपये पर्यंत गेला होता. हा दरबहर पाहता आर्थिक अडचणी दूर होतील असे वाटत होते.मात्र ही तेजी काही दिवसच चालली. पुन्हा दर घसरले आहेत. आता सहा ते सात रुपये या दराने मागणी होत आहे. अशातच निर्यात बंद झाल्याने आणखी समस्या उद्भवल्या आहेत. फुलशेतीला उभारी द्यायचे असेल तर शासनाने फुलशेतीला मदत करण्याची घोषणा न करता कृतिशील पावले टाकली पाहिजेत. तरच ही शेती टिकाव धरू शकेल,’ असे गुलाब पिकवणारे शेतकरी काकुळतीला येऊन सांगतात. एकंदरीत राज्यातील फुलशेतीचे सांप्रत काळाचे चित्र पाहता त्याची रया निघून गेली आहे. देश— विदेशातील मागणी घटली आहे. आता करोना आटोक्यात आला आहे. जनजीवन पूर्ववत होत आहे. सभारंभ जोमाने होत आहेत. लग्नसराई धुमधडाक्यात होत आहे. पण प्रतिकूल आर्थिक परिस्थितीने गांजलेला फूल उत्पादक शेतकरी अजूनही निराशेच्या गर्तेत आहे.
वादळ-अतिवृष्टी यामुळे झालेल्या सर्वच शेतीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई दिली जात आहे. उघडय़ावरील फुलशेतीला नुकसान भरपाई दिली आहे. हरितगृहातील फुलशेतीच्या नुकसान भरपाईचे आदेश नाहीत. फुलशेतीबाबत शासनाचे धोरण सकारात्मक आहे.

– ज्ञानदेव वाकुरे, कृषी अधीक्षक, कोल्हापूर
dayanand.lipare@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:59 am

Web Title: flower farming in maharashtra mppg 94
Next Stories
1 क्रीडाक्रांतीची पाऊलवाट..
2 देश आणि राष्ट्र
3 शुल्बसूत्रांतील गणित
Just Now!
X