News Flash

गांधी: गैरसमज, पूर्वग्रह

गांधीविचारांचे ज्येष्ठ अनुयायी ठाकुरदास बंग यांचे निधन रविवारी, २७ जानेवारी रोजी झाले. ‘गांधीविचार’ हे ठाकुरदास बंग लिखित पुस्तक १९९१ मध्ये प्रसिद्ध झाले होते, त्यातील

| January 30, 2013 12:02 pm

गांधीविचारांचे ज्येष्ठ अनुयायी ठाकुरदास बंग यांचे निधन रविवारी, २७ जानेवारी रोजी झाले.  ‘गांधीविचार’ हे ठाकुरदास बंग लिखित पुस्तक १९९१ मध्ये प्रसिद्ध झाले होते, त्यातील हा उतारा आज, गांधीजींच्या हत्येस ६५ वर्षे होत असताना मननीय ठरावा..
महात्मा गांधींच्या विचाराबाबत मतभेद व्यक्त करण्याचा कोणालाही पूर्ण अधिकार आहे; पण हे मत चुकीच्या माहितीच्या आधारावर अथवा अज्ञानावर आधारलेले नको असे कोणीही म्हणेल. आज अशी समजूत फैलाविली जात आहे की, गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला, फाळणीचे ते अपराधी होते आणि गोडसेने गांधींची उशिरा हत्या केली. गांधींचे पुतळे काढून त्या जागी गोडसेचे पुतळे लावावेत हे म्हणण्यापर्यंत एका पुढाऱ्याची मजल गेली. काही अन्य क्षेत्रांत असे मानले जात आहे की, गांधी अस्पृश्यांचे हितकर्ते नव्हते आणि म्हणून गांधींच्या पुतळय़ाऐवजी आंबेडकरांचे पुतळे लावले जावेत. आपण इतिहासातील तथ्यांना पाहून पूर्वग्रह सोडून मुक्त मनाने विचार करू या.
प्रथम मुस्लीम अनुनयाचा मुद्दा घेऊ या. टीकाकार म्हणतात की, मुस्लिमांसाठी अलग मतदारसंघामुळे भारताचे दोन तुकडय़ांत विभाजन करण्याची भावना पैदा झाली. विभक्त मतदारसंघांसाठी गांधी जबाबदार होते, असे हे टीकाकार मानतात. इतिहास मात्र चक्क असे सांगतो की, १९०९ मध्ये मोर्ले-मिंटो शासन-सुधारांचा अलग मतदारसंघ एक भाग होता. या वातावरणात १९१७ मध्ये काँग्रेस-लीग करार मुख्यत: लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नांमुळे झाला. १९०९ व १९१७ मध्ये गांधी भारतीय राजकारणात व काँग्रेसमध्ये मुळी नव्हतेच. १९०९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरुद्ध ते सत्याग्रह करीत होते आणि १९१७ मध्ये बिहारच्या कोपऱ्यातील चंपारण जिल्हय़ात ते शेतकऱ्यांवरील निळीच्या अन्यायाविरुद्ध लढत होते. १९१७ मध्येही काँग्रेसमध्ये त्यांना स्थान नव्हते. १९२० मध्येच ते भारतभर चमकले. तत्पूर्वी १९१९ मध्ये माँटफोर्ड शासन-सुधार भारतात इंग्रजांनी लागू केले, ज्यात अलग मतदारसंघ होते. १९३५ मध्ये मुसलमानांकरिता अलग मतदारसंघ कायम ठेवून आणखी काही स्वशासनाचे अधिकार दिले गेले. १९३७ मध्ये गांधींनी व काँग्रेसने या अलग मतदारसंघांचे ना समर्थन केले, ना विरोध केला. काँग्रेस व गांधी याहून वेगळे काय करू शकत होते? कारण १९१७ मध्येच काँग्रेस-लीग करारात विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली गेली होती. गांधींच्या पूर्वी जे मुद्दे राष्ट्रात मान्य झाले होते त्याच्यामागे जाणे गांधींना शक्यही नव्हते आणि राजकारणाच्या दृष्टीने ते इष्टही नव्हते. असे केले असते तर हिंदू-मुसलमानांत असलेली दरी आणखी रुंद झाली असती. १९२० पासून १९४७ पर्यंत पूर्ण २७ वर्षे गांधींनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध एकी ही एकच रणनीती ठेवली.
या नीतीत काँग्रेसला यश मिळाले नाही आणि भारताचे तुकडे झाले. पण याहून भिन्न काय करणे शक्य होते? सत्ता ब्रिटिशांच्या हातात होती आणि भारत नि:शस्त्र होता. सुभाषबाबूंनाही शेवटी जर्मनी व जपानात जाऊन सेना बनवावी लागली हे विसरू नये. काँग्रेससाठी अहिंसा रणनीती होती आणि गांधींकरता ते जीवनमूल्य होते. लढाई हिंसक असो वा अहिंसक, लढणाऱ्यांत एकता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो आणि गांधींनी तो शेवटपर्यंत सांभाळला. ही गोष्ट गांधीजींची देशभक्ती मानली जाईल की देशद्रोह?
एवढेच नाही, इतिहास सांगतो की, २७ वर्षांच्या पूर्ण अवधीत राष्ट्रहिताच्या विरुद्ध जाणारी कोणतीही सवलत कोणत्याही वर्गाला, वर्णाला व धर्माला गांधींनी राजकारणात दिली नाही. १९३१ मध्ये मुसलमानांसारखे अस्पृश्यांना अलग मतदारसंघ देण्याचे ब्रिटनने ठरवले. तेव्हा इंग्रजांच्या कारागृहात असूनही १९३२ मध्ये याविरुद्ध आमरण उपवास सुरू केला. शेवटी गांधींचा उपवास सफल झाला. गांधी उपवास न करते तर ब्रिटिशांची भेदनीती अस्पृश्यांबाबतही सफल झाली असती. या प्रसंगी अन्य राष्ट्रभक्त काय करीत होते, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आता फाळणीचा मुद्दा घ्या. याबाबत गांधींचा विरोध इतका प्रबळ होता की, अखंड भारताचे शासन ब्रिटनने जिनांना सोपवावे, पण भारताचे तुकडे होऊ देऊ नका, असा गंभीर प्रस्ताव गांधींनी मांडला. पण ब्रिटनला व जिनांना हे कसे रुचणार? १९४७ मधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेहरू-पटेलांनी सांगितले की, आम्ही गव्हर्नर जनरल माउंटबॅटनबरोबर पाकिस्तानला स्वीकृती देऊन आलो, त्या वेळी गांधी म्हणाले की, माझ्याशी सल्ला न करता अथवा मला काहीही न सांगता तुम्ही हे स्वीकृत केलेच कसे? नंतर ते म्हणाले की अजूनही तुम्ही गव्हर्नर जनरलला सांगा की, हा म्हातारा ऐकत नाही, आम्ही त्यांच्याविरुद्ध कसे जावे? आणि शेवटी म्हणाले की, हा प्रश्न तुम्ही माझ्यावर सोपवा, मी कोणता ना कोणता मार्ग काढून घेईन. खान अब्दुल गफारखाँ सोडून कोणी काही बोलेना. शेवटी गांधींनी प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहिले, पण सर्व चूप होते. तेव्हा गांधी म्हणाले की, काँग्रेसचे सर्व पुढारी चूप राहिले असताना मी एकटा काय करू?  जयप्रकाश नारायणने ही कहाणी अनेक वेळा सांगितली आहे, कारण त्या बैठकीत ते निमंत्रित होते. तरीही धीर न सोडता महात्म्याने योजना बनविली की, दिल्लीत शांतता प्रस्थापित झाल्यावर फेब्रुवारी १९४८ मध्ये मी पाकिस्तानात जाईन व दोन्ही राष्ट्रांत सांस्कृतिक एकता आणि काही मुद्दय़ांबाबत कॉन्फेडरेशन करण्याचा प्रयत्न करीन. पण नथुरामने ३० जानेवारीला त्यांची हत्या करून या योजनेवर पाणी फिरविले.
हिंदुहिताचे बलिदान करून मुसलमानांना गांधींनी डोक्यावर बसविले ही खोटी गोष्ट फैलाविली जात आहे. पण कुणीही हे सांगत नाही की, कोणत्या हिंदुहितास गांधींनी सोडले? १९४६ मध्ये नोआखाली आणि टिपेरा या दोन जिल्हय़ांत हजारो-लाखो हिंदूंची घरे जाळली गेली, त्यांची लूट झाली, हजारोंचे जबरदस्तीने धर्मातर झाले, हिंदू महिलांवरही अत्याचार चालू होते, हिंदूंची कत्तल तर चालूच होती. त्या वेळी याच गांधींनी नोआखाली जिल्हय़ाची एकाकी पदयात्रा केली, यास तीर्थयात्रा मानून जोडे सोडून ते अनवाणी फिरले आणि शांती स्थापन करून चमत्कार घडविला.
उपास करून ५५ कोटी रुपये भारताकडून पाकिस्तानला गांधीजींनी द्यायला लावले, याचा मोठा बाऊ केला जातो. खरोखरी काय होते व काय घडले? भारत-पाक वाटणीच्या वेळी भारताकडे नगद रक्कम अधिक राहिल्यामुळे मोबदल्यात ५५ कोटी रुपये भारताने पाकिस्तानला द्यावेत, असा भारताचा पाकशी करार झाला होता. पाकिस्तानने त्या रकमेची मागणी केली, भारत टाळू लागला. तेव्हा गांधीजींनी सांगितले की, आपल्या शब्दांचे पालन करण्यासाठी भारताने ही रक्कम देऊन टाकावी. सरकार तसे करेना. अशा परिस्थितीत आपला वचनभंग करणाऱ्या स्वतंत्र भारतात मी जिवंत राहू इच्छित नाही, अशी घोषणा करून त्यांनी उपवास सुरू केला. पाच-सहा दिवसांत सरकारने रक्कम देण्यास संमती दिली व उपवास सुटला. गांधींनी उपवास करून आपला नैतिक प्रभाव प्रशासनावर टाकला नसता तर हा विवाद राष्ट्र संघात व आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला असता व भारतास ५५ कोटी रुपये द्यावे लागले असते. ‘रघुकुल रीति सदा चली आयी, प्राण जाहु पर वचन न जाईं’ असे मानणाऱ्या रामभक्तांनी तर गांधीजींच्या उपवासाचे समर्थन करावयास हवे.
गांधीजी मुस्लिमांचे पक्षपाती होते असे म्हटले जाते याहून मोठा भ्रम तो कोणता? १९४७ च्या ऑक्टोबरात पाकिस्तानने आफ्रिदी जातींना भडकावून काश्मीरवर हल्ला करविला. त्या वेळी गांधीजींनी ताबडतोब नेहरूंना सल्ला दिला की, हे आक्रमण रोखण्यासाठी भारतीय सेना काश्मिरात पाठवा. अहिंसेच्या पुजाऱ्याने पाकिस्तानविरुद्ध सेना पाठविण्यास आशीर्वाद दिला, हे किती भारतीयांना माहीत आहे? घटनेचे ३७० वे कलम गांधींनंतर घटनेला जोडले गेले.
अटलबिहारी वाजपेयींनी एकदा जयप्रकाशजींना सांगितले की, फाळणीच्या मुद्दय़ावर गांधींना आम्ही नीट समजू शकलो नाही, याचा पत्ता आम्हाला १९६० नंतर लागला. म्हणून आजकाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या प्रात:स्मरणात गांधीजींना सामील केले आहे. ‘महामना मालवीयो महात्मा गांधिरेवच.’ अटलजींसारखे पुढारी पूर्वग्रहमुक्त झाले तरी जनतेच्या मनात जो भ्रम पुढाऱ्यांनी पैदा केला तो लवकर निघत नाही.
गांधीजींबाबत दलितांत असा प्रचार केला जात आहे की, गांधी आंबेडकरांच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे ते अस्पृश्यांचे मित्र नव्हते. इतिहासाचे अवलोकन केल्यावर दिसते की, गांधी आणि आंबेडकर या दोघांनी आंदोलने केली आणि त्यामुळे अस्पृश्यता इतिहासजमा झाली. या महान पराक्रमात दोघांची भूमिका परस्पराविरुद्ध नव्हती, ती पूरक होती. .. गांधींविरुद्ध आंबेडकर पुष्कळ कटू बोलले असे वरवर पाहता दिसेल. पण १९३२ मध्ये उपवासावर बसलेल्या गांधींचे प्राण त्यांनीच वाचवले व अलग मतदारसंघ सोडण्यास ते तयार झाले. अस्पृश्यता लवकर जात नाही हे पाहून ते हिंदू धर्माबाबत निराश झाले आणि त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. दुसऱ्या बाजूने जेव्हा स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची प्रस्तावित नामावली घेऊन नेहरू गांधींकडे सल्ल्यासाठी गेले त्या वेळी गांधींनी डॉ. आंबेडकरांचे नाव त्यात जोडले.
म्हणून आज काळाची अनिवार्यता आहे की, तात्कालिक परिस्थितीतून निघालेल्या शब्दांना पकडून न ठेवता, त्या काळची परिस्थिती व इतिहासातील प्रत्येकाची भूमिका लक्षात ठेवली पाहिजे. वैराने वैर मिटत नाही, ते मैत्रीने मिटेल, हा सनातनधर्म आहे. ते प्रसिद्ध बुद्धवचनही आहे. इतिहासाचे ओझे न ठेवता इतिहासास समजून घेऊन, त्याचे खरे विश्लेषण करून, सर्व शक्तींची वजाबाकी नाही, आपणांस बेरीज करावयाची आहे. तथ्यांच्या आधारावर व्यक्तींचे व संस्थांच्या धोरणाचे आकलन आपण केले पाहिजे.
( ‘गांधीविचार’ या पुस्तकातील पान २७ ते ३५ चा संपादित अंश)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:02 pm

Web Title: gandhi misunderstanding predate plane
टॅग : Mahatma Gandhi
Next Stories
1 दुर्गसाहित्याचे बुरूज
2 स्वप्नरंजन की भयस्वप्न
3 ‘दुर्मीळ’ बाळासाहेब
Just Now!
X