News Flash

‘वाघा’ची ‘बॉर्डर’!

ज्याला जनतेची नाडी अचूक ओळखता येते, तोच त्यांचा नेता बनतो.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचाल ही वादळी, आक्रमक आणि संघर्षमय होती.

पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना..

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनास आक्रमक विरोध करणाऱ्या शिवसेनेला अचानक अनाकलनीय माघार घ्यावी लागली आणि सेनेच्या ‘रिमोट कंट्रोल’ची ताकद कमी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. एके काळी मुंबई आणि महाराष्ट्रावर अघोषित वर्चस्व गाजविणारा हा पक्ष मवाळ होत चालला आहे. ही शिवसेनेची घुसमट आहे, की सत्तेच्या राजकारणातील अपरिहार्यता आहे, हे काळच ठरवणार आहे. सध्या मात्र, केंद्रात सत्तेत असून नसल्यासारखे स्थान, महाराष्ट्रातील सरकारमध्ये मिळणारी दुय्यम व अपमानास्पद वागणूक, महापालिकेपासून स्थानिक राजकारणापर्यंत सर्वत्र भाजपकडून सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण आणि वेळोवेळी आक्रमकतेला घालावी लागणारी मुरड यामुळे राजकारणातील या ‘वाघा’च्या ‘सीमारेषा’ मर्यादित झालेल्या दिसतात. त्या पाश्र्वभूमीवर सेनेचा इतिहास व वर्तमानाचा घेतलेला वेध..
ज्याला जनतेची नाडी अचूक ओळखता येते, तोच त्यांचा नेता बनतो. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाची घुसमट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ओळखली आणि १९ जून १९६६ या दिवशी शिवसेनेची स्थापना झाली. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणारी संघटना’ असा शिवसेनेचा चेहरा बाळासाहेबांनी निश्चित केला आणि महाराष्ट्रातील तरुणाईच्या फुरफुरणाऱ्या भुजांना बळ मिळाले. बाळासाहेबांनी केवळ बोट वर केले, की त्यांच्या इशाऱ्याची दिशा समजून रस्त्यावर उतरून जिवाची बाजी लावणारे तरुण शिवसेनेने गोळा केले आणि पळपुटेपणाची, अपराधीपणाची व स्वत:लाच कमी लेखण्याची मराठी माणसाची सवय संपली. मराठी अस्मिता जागी झाली. या अस्मितेच्या, लढाऊ बाण्याच्या जोरावरच शिवसेना वाढली, फोफावली, महाराष्ट्राच्या मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकला आणि लोकसभेच्या अध्यक्षपदावरही शिवसनिक विराजमान झाला. बाळासाहेब ठाकरे हे या साऱ्या चमत्कारांचे किमयागार होते.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचाल ही वादळी, आक्रमक आणि संघर्षमय होती. शिवसेनेच्या पाच दशकांच्या वाटचालीतील अलीकडच्या दशकात या आक्रमक संघटनेचा चेहरा काहीसा मवाळ झाला. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे रूपांतर राजकीय पक्षात होत गेले, तसतशी संघटनेची ‘ठोकशाही’ची भाषा ‘पक्षीय लोकशाही’कडे वळू लागली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला प्रस्थापित होण्यासाठी संघर्ष करण्याची गरजच नव्हती. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालीच हा पक्ष राजकारणात एवढा घट्टपणे पाय रोवून उभा राहिला, की राष्ट्रीय किंवा प्रादेशिक राजकारणातील बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरील नाराजीने भल्या भल्या नेत्यांना चिंताग्रस्त करू लागली. ‘मातोश्री’ हे महाराष्ट्रापासून देशाच्या राजकारणाचे केंद्र बनले. बाळासाहेबांची मर्जी खप्पा होऊ नये, यासाठी अनेक बडय़ा नेत्यांनी ‘मातोश्री’च्या चकरा मारल्या. ठाकरे यांचे ते निवासस्थान अलीकडच्या काळात काहीसे निवांत झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे, पण भाजपचे नेते मात्र ‘मातोश्री’कडे क्वचितच फिरकतात. राष्ट्रपतिपदाच्या एका निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा विरोध डावलून काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला व त्या विजयी झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांचे आभार मानले, तेव्हापासून भाजपची मातोश्रीवरील वर्दळ कमी झाली असे म्हणतात.
शिवसेनेचा भूतकाळ आक्रमक इतिहासाने भारलेला आहे. पण छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर या संघटनेला जणू गळती लागली. पुढे २००५ मध्ये नारायण राणे आणि खुद्द राज ठाकरे यांनी सेना सोडल्यानंतर सेनेचा आक्रमक चेहरा काहीसा आक्रसला. नारायण राणे काँग्रेसवासी झाल्यानंतर मुंबईत एक जोरदार राडा झाला. राणे यांच्या सभेत शिवसैनिकांनी आक्रमक धुमाकूळ घातला आणि अनेक सैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्या वेळी शिवसैनिकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसह पोलीस ठाण्याच्या पायरीवर ठिय्या आंदोलन केले. अंगावर लाठी झेलली नाही आणि उभ्या कारकीर्दीत पाचपन्नास दगडांचा यथेच्छ वर्षांव केला नाही, तो शिवसैनिकच नव्हे, असे मानले जाणाऱ्या या संघटनेला पुढे अनेकवार तडजोडी करत मवाळ वाटचाल करणे भाग पडले. आरंभी आक्रमक होऊन पुढे सरसावणाऱ्या शिवसैनिकांना अनाकलनीय माघार घेत शांत राहावे लागले. कदाचित सत्तेच्या राजकारणातील सबुरीच्या अपरिहार्यतेमुळे शिवसेनेला हा बदल पचवावाच लागला. शिवसेनेचा वर्तमानकाळ हा अशा तडजोडीच्या आणि प्रसंगी माघारीच्या राजकारणाने भरलेला आहे. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी होताना आणि भाजपसोबत सत्ता गाजविताना होणारी शिवसेनेची घुसमट राज्यातील जनतेलाही स्पष्ट दिसते आहे. सत्ता हेच राजकारणाचे अंतिम उद्दिष्ट असेल, तर घुसमट होऊनदेखील सत्तेच्या वर्तुळात वावरणारे नेते राजकारणात अनेक आहेत. शिवसेनेच्या वर्तमानकाळावर त्याचेच सावट दिसते आहे. म्हणूनच गेल्या दोन दशकांत शिवसेनेवर अनेकदा तडजोडीचे प्रसंग आले.
अगदी कालपरवा, पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनास विरोध करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या शिवसेनेला अचानक नमते घ्यावे लागल्याने, संघर्षांचा इतिहास असलेली ही संघटना राजकारणापोटी शरणागतीच्या वर्तमानात वावरू लागल्याचे मत आज अनेक जण व्यक्त करू लागले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात तीन महिने तुरुंगवास भोगला होता. २१ जुलै १९६७ या दिवशी मराठी माणसाच्या हक्कासाठी पहिला विराट मोर्चा काढणाऱ्या आणि तेव्हापासून मुंबईच्या गल्लीबोळावर राज्य करणाऱ्या शिवसेनेची मुंबईच्या रस्त्यावरची आक्रमक आंदोलने आता थंडावली आहेत. ‘लोकशाही मार्गाने शिवसेना चालवावी’ अशी मागणी केल्याबद्दल बळवंत मंत्री यांची एके काळी शिवसेनेच्या कडव्या सैनिकांनी धिंड काढली होती. त्याच शिवसेनेत आता लोकशाहीचे वारे वाहू लागले आहेत. सीमा आंदोलनापासून पुढे मुंबईच्या प्रत्येक प्रश्नावर मुंबई पेटविणाऱ्या आणि एका इशाऱ्यावर अवघ्या महानगरीची हालचाल ठप्प करणाऱ्या शिवसेनेच्या नाकावर टिच्चून त्यांचाच सहभाग असलेल्या भाजप सरकारने कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला. शिवसेनेची मुंबईवरील सद्दी संपविल्याचे संकेत देण्याचाच भाजपचा तो प्रयत्न स्पष्ट होता. यापुढेही भाजप आक्रमकपणे शिवसेनेला आव्हाने देत राहणार, हे स्पष्ट दिसू लागले आहे. एके काळी ज्या पक्षाचे नेते मातोश्रीवर चकरा मारून शिवसेनाप्रमुखांची मर्जी राखण्यासाठी धावाधाव करीत असत, त्याच पक्षातून आता मात्र शिवसेनेला आव्हान मिळू लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज होऊन राज-राणे व अन्य अनेकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. आजही शिवसेनेतील अनेक जण नाराज आहेत. मनोहर जोशी यांना पक्षात अनेकदा अपमानित व्हावे लागले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांची सावली म्हणून वावरणारा हा नेता अलीकडच्या काळात काहीसा अज्ञातवासात गेला आहे. एकीकडे अशा नाराजीचे पक्षात तग धरून राहिलेले कोंब आणि दुसरीकडे वाटचाल रोखण्यासाठी सहकारी पक्षाकडूनच निर्माण केले जाणारे अडथळे या दुहेरी कात्रीत सापडलेल्या या पक्षाची भवितव्याची वाट खडतरच असणार, असे दिसू लागले आहे. सत्तेतून बाहेर पडले तरी पंचाईत, भाजपसोबत राहिले तरी पंचाईत अशा द्विधा अवस्थेत शिवसेना सापडली आहे. ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ’ असे म्हटले जाते. राजकारणात बऱ्याचदा हे वास्तव असते. ते सिद्ध करण्यासाठी शिवसेना काय करणार, ते भावी काळावरच अवलंबून राहणार आहे.

शिवसेनेची आंदोलने : केलेली, फसलेली

शिवसेनेचा जन्म झाला तो संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढाईनंतरही महाराष्ट्रात त्यातही प्रामुख्याने मुंबईत होणाऱ्या मराठी माणसाच्या गळचेपीमधून. मराठी तरुणांना नोकऱ्यात डावलले जात असल्याची आकडेवारी ‘मार्मिक’मधून प्रसिद्ध होऊ लागली तशी संतापाची एक लाट निर्माण होऊ लागली. ‘मार्मिक’मधून नोकऱ्यांमधील परप्रांतीयांच्या याद्याच प्रसिद्ध होऊ लागल्या. ‘वाचा आणि थंड बसा’ या शीर्षकाखालील लिखाणामुळे मराठी माणसाला पेटविण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यश आले. या लाटेवर स्वार होत जन्माला आलेल्या शिवसेनेने सुरुवातीला बँका, विमानसेवा, पंचतारांकित हॉटेल्स, विमा कंपन्यांसह अनेक आस्थापनांमध्ये मराठी माणसाला ८० टक्के नोकऱ्या मिळण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभारले. या आंदोलनामुळे मराठी माणूस एकवटला. सुरुवातीला मोठय़ा प्रमाणात मराठी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्या. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनाखाली शिवसेनेने अनेक आंदोलने केली. पुण्यात हॉटेलमधील पदार्थाचे भाव वाढले तेव्हा ‘फुकट खा’ आंदोलनही शिवसेनेने केले होते.
शिवसेनेचे आंदोलन म्हटले की, क्षणात मुंबईतील वातावरण बदलायचे.. बाळासाहेबांचा आदेश येताच शिवसैनिक वारुळातून मुंग्या बाहेर पडतात तसे रस्त्यावर उतरत असत. पुढे उद्धव यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले आणि शिवसेनेची स्टाईल बदलली. ‘राडा संस्कृती’ म्हणून ओळखली जाणारी शिवसेना काहीशी मवाळही झाली. आंदोलने होतच होती. पण तो जुना जोश उरलाच नाही..
स्थानीय लोकाधिकार समिती
मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये योग्य स्थान मिळावे यासाठी १९७३ मध्ये सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करून त्या माध्यमातून एक चळवळ उभी केली. सुरुवातीला लोकाधिकार समितीने केलेल्या आंदोलनांमुळे अनेक मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले गेले. पुढे कामगार संघटनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय झाला आणि आंदोलने काहीशी थंडावल्याने, स्थानीय लोकाधिकार समितीचा जुना दबदबाही कमी होत गेला.
मद्रास निर्मित चित्रपटांना बंदी
हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असे शिवसेनेचे मत. त्यामुळे तामिळनाडूमध्ये हिंदी चित्रपटांच्या विरोधात आंदोलन करून बंद पाडण्याचा उद्योग सुरू झाला, तेव्हा मद्रासमध्ये तयार होणाऱ्या हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याचे ‘आदेश’ बाळासाहेबांनी दिले. तेव्हा मुंबईतील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांनी मद्रासचे हिंदी चित्रपट चार दिवस बंद केले. पुढे मद्रास निर्मित हिंदी चित्रपटविरोधातील लोण थेट कोल्हापूरपर्यंत पोहोचून तेथेही शिवसैनिकांनी ‘मद्रास मेड’ हिंदी चित्रपट बंद पाडले होते. पुढे मद्रासमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्यानंतर सेनेने आंदोलन मागे घेतले.
धारा तेल विक्री आंदोलन
सेनेच्या गाजलेल्या आंदोलनांपैकी महागाईविरोधातील धारा तेल विक्री आंदोलन हे विशेष गाजले होते. बाजारातून धारा तेल गायब होऊन काळ्या बाजारात जादा दराने विक्री होत होती. तेव्हाचे शिवसेनेचे विभागप्रमुख शिशिर शिंदे व शिवसैनिकांनी काही व्यापारी व वितरकांकडून धारा तेलाचे पाच हजार डबे जबरदस्तीने घेऊन ३२ रुपये लिटर दराने त्याची सामान्यांना विक्री केली आणि जमलेले पैसे त्या व्यापाऱ्यांना देऊन टाकले.
भुजबळांच्या घरावर हल्ला
१९९१ मध्ये छगन भुजबळ शिवसेनेतून फुटून निघाल्यानंतर मंत्री झालेल्या भुजबळांच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला करून आपली ताकद दाखवली होती.
आंदोलने फसलेली..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार झाले. या अंत्यसंस्काराच्या जागीच बाळासाहेबांचे स्मारक करण्याचे मनोहर जोशी यांनी जाहीर केले. मात्र नंतर शिवसैनिकांवरच अंत्यसंस्काराचा चबुतरा हटविण्याची वेळ आली. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कमी होणारा मराठी टक्का व भाजपची पावले लक्षात घेऊन ‘मी मुंबईकर’ मोहीम सुरू केली होती. तथापि यामध्ये मराठी माणूस डावलला जाईल अशी भीती पक्षातूनच मोठय़ा प्रमाणात व्यक्त होऊ लागल्यानंतर उद्धव यांना दोन पावले मागे जावे लागले. सेनेने ‘मी मुंबईकर’ मोहीम उद्धव यांच्या नेतृत्वाखाली घेतल्यानंतर मोठे ‘राज’कारण सुरू झाले. शाहरुख खान तसेच राहुल गांधी यांच्याविरुद्धची सेनेची आंदोलनेही फसली होती.
( विशेष प्रतिनिधी )

विद्यापीठ नामांतर
मराठवाडा विद्यापीठ नामांतरावरून मराठवाडय़ात मोठे आंदोलन पेटले. निजामाविरुद्ध लढलेल्या मराठवाडय़ातील लोकांसाठी मराठवाडा विद्यापीठ हा अस्मितेचा प्रश्न होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामकरण करण्याच्या मुद्दय़ावरून मराठवाडय़ात आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनाही उतरल्याने वातावरण पुरते पेटले. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण करण्याचे शिवसेनेने मान्य केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला.

अजूनही मुठी वळतात..
दिवाकर रावते, परिवहनमंत्री

अजूनही माझ्या मुठी आवळल्या जातात आणि त्वेष चढतो.. १९६९ चा काळ होता.. बेळगाव आणि कारवार मिळावे, अशी आपली मागणी होती आणि मोरारजी देसाई मुंबईत आले असताना त्यांना निवेदन द्यावे, असे शिवसेनेने ठरविले होते. पण त्यांनी नकार दिल्याने दादरला त्यांची गाडी अडवून निवेदन द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांच्या फळ्या तयार करण्यात आल्या. मी पहिल्या फळीत होतो. बाळासाहेब अँबेसिडर गाडीवर उभे राहून आम्हाला मार्गदर्शन करीत होते. मोरारजी देसाई यांच्याबरोबर गाडय़ा आल्या आणि गिरगावचा एक कार्यकर्ता विजू पेणकर हा देसाई यांच्या गाडीवर झेपावला. पण कोणालाही न जुमानता वेगाने गाडय़ा गेल्या आणि कार्यकर्ते जखमी झाले. पण बाळासाहेब हटले नाहीत. नायगाव येथील मैदानात सत्याग्रह करण्याची व सभा घेण्याची सूचना बाळासाहेबांनी दत्ताजी साळवी यांना केली. त्यावर पोलिसांनी बंदी घातली. सभेवरची ही पहिली बंदी. ती मोडल्याने साळवी व काही कार्यकर्त्यांना सायंकाळी अटक झाली. तर बाळासाहेब व मनोहर जोशी यांना पहाटे घरी अटक करून पुण्याला येरवडा कारागृहात नेण्यात आले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते चिडले आणि मुंबई बंद करण्यास सुरुवात झाली. तब्बल चार दिवस आम्ही रस्त्यावर होतो आणि मुंबई कडकडीत बंद होती. केवळ चार वर्षांच्या शिवसेनेच्या ताकदीने मुंबई बंद होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नंतर विनंती केली व वातावरण निवळले.
अंगावर अजूनही रोमांच उठतात, असे एक ना अनेक प्रसंग. शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारामध्ये आम्ही तयार होत होतो. पक्षकार्याची आखणी करताना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र ठेवण्याचे शिवसेनाप्रमुखांचे आदेश होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्ते धावत होते. रुग्णवाहिका, रक्तदान आदी माध्यमातून मदत करून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी उभे राहिल्याने शिवसेनेची जनतेशी नाळ जुळत गेली. शिवसेनाप्रमुखांचे नेतृत्व हे बेधडक होते. उद्धव ठाकरे हेही कोणताही निर्णय संपूर्ण विचारपूर्वक व खंबीरपणे घेतात. कणखर नेतृत्व देत पक्षबांधणी मजबूत करून त्यांनी शिवसेनेला पुढे नेले आहे. भाजपशी युती असल्याने शिवसेनेला एकहाती सत्तेचा प्रश्न नव्हता. अनेक प्रयत्न करूनही गेली २५ वर्षे असलेली युती तुटल्याने आता ‘करूनच दाखवीन’ या जिद्दीतून उद्धवजींनी निवडणुकीत नेतृत्व केले आणि ६३ आमदार निवडून आले. युती तुटल्यावरही ते डगमगले नाहीत. संघटनेला आणि नेत्यांनाही अनेक वर्षे झाल्याने विचारांमध्येही परिपक्वता आली आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेही मुकाबला करीत आहोत. पण ज्यांना ज्या पद्धतीने उत्तर देण्याची गरज असते, त्यांना तसे द्यावे लागते. एखाद्या महिलेची छेड काढताना किंवा तिला मारहाण करताना कधी पाहिले, तर आज मंत्री असतानाही मी पुढे होऊन महिलेला छळणाऱ्याच्या कानफटात मारेन. त्यामुळे आजही तितक्याच त्वेषाने मुठी वळतात.. तो त्वेष वयोमानानुसार कमी होत नसून वाढलाच आहे, त्यामुळे शिवसेनेचा आक्रमकपणाही कमी होणार नाही..
(शब्दांकन – उमाकांत देशपांडे)

पत्रकार पांडे ते इक्बाल शेख.. बेळगाव व्हाया पणजी

छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

सीमा प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याकरिता सर्वपक्षीय कृती समितीने बेळगावमध्येच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेच्या वतीने आंदोलनाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. ‘हटाव लुंगी’ या शिवसेनेच्या घोषणेमुळे कर्नाटकात आधीच शिवसेनेच्या विरोधात रोष होता. शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही केला होता. बेळगावमध्ये पोहोचणे आणि आंदोलन करणे हे कठीण होते. त्यावर मार्ग काढला. मी आणि बाळ तायडे दोघांनी विमानाने पणजीला पोहोचण्याचा निर्णय घेतला. निघण्यापूर्वी माझगावच्या घराजवळील सलूनमध्ये जाऊन मिशी छाटली. झब्बा, लेंगा आणि शबनम पिशवी घेतली. केसाची रचना बदलली, तोंडात पान आणि पत्रकार पांडे झालो. तशा वेशात विमानाने पणजी गाठले. पणजी विमानतळावर पत्रकार नारायण आठवले आणि किरण ठाकूर यांनी या वेशातही ओळखले. पणजीला मुक्काम केला. प्रमोद नलावडे या वेशभूषाकाराला बोलावून पूर्ण वेशभूषा बदलली. पणजीला जाताना पत्रकार पांडे होतो, बेळगावला जाण्याकरिता इक्बाल शेख झालो. सूट, बूट आणि चेहऱ्याला दाढी चिकटवली. तोंडात पाईप ठेवला. मुंबईतील पाईप कंपनीचा मालक झालो. गाडीत मी मागे बसलो होतो. पुढच्या आसनावर बेळगावमधील एकाला बसविले होते. कोणताही धोका नको म्हणून गाडीत पाईपचे नमुने ठेवले होते. पणजीतून जाताना कर्नाटकच्या सीमेवर गाडी अडविण्यात आली. तोंडात पाईप ठेवला होता. त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता. पोलिसांनी चौकशी केल्यावर पाईप कंपनीचे मालक आहेत, असे आमचा कार्यकर्ता कानडी भाषेत सांगत होता. अशा वेशात बेळगावमध्ये दोन दिवस आधीच पोहचलो. आंदोलन होते त्या दिवशी मुंबई, बेळगावच्या साऱ्या वृत्तपत्रांमध्ये भुजबळ बेळगावमध्ये पोहोचले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. सुटाबुटातील तसेच दाढी चिकटविलेला माझा फोटोही छापून आला. एका व्यापाऱ्याच्या निवासस्थानी मुक्काम केला. पोलिसांना संशय आला नाही. आंदोलनाच्या अर्धा तास आधी झब्बा, लेंगा या वेशात घोषणा देत व्यापाऱ्याच्या घरातून बाहेर पडलो. कर्नाटक सरकारच्या निषेधात घोषणा दिल्या. कर्नाटक पोलिसांनी आम्हाला झोडपून काढले. जबरदस्तीने बसमध्ये बसविले. बसमधून पोलीस स्थानकात नेले जात असताना काही शिवसैनिकांनी बसचालकाला बस थांबवून ढकलले आणि बसचा ताबा घेतला. बस कोल्हापूरच्या दिशेने हाकण्यास सुरुवात केली. शहराच्या बाहेर गाडय़ा मध्ये घालून रस्ता बंद करण्यात आला होता. बस थांबविण्यात आली आणि एकेकाला खाली उतरवून पोलिसांनी बेदम मारहाण केली. पुढे दोन महिने आम्ही तुरुंगात होतो. कर्नाटक पोलिसांनी सारी शक्ती पणाला लावूनही बेळगावमध्ये पोहोचून शिवाजी चौकात आंदोलन करण्यात यशस्वी झालो याचे समाधान आहे.

कुदळीचा दांडा तुटला तरी खेळपट्टी उखडली

शिशिर शिंदे,
माजी आमदार

१८ ऑक्टोबर १९९१.. शिवसेनेच्या मेळाव्यात पाकिस्तानच्या विरोधातील वानखेडे स्टेडियमवरील सामना होऊ देणार नाही, असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा इशारा. १९ ऑक्टोबर.. कोणत्याही परिस्थितीत सामना होणारच – तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे प्रत्युत्तर. २० ऑक्टोबर.. वानखेडे स्टेडियमच्या समोर शिवसेनेचा फलक झळकला. सामना होऊ देणार नाही हे त्यावर ठळकपणे लिहिलेले. पोलिसांची फौज तैनात करण्यात आली. सरकारने क्रिकेटचा सामना प्रतिष्ठेचा केल्याने काही तरी करायला पाहिजे, असा विचार डोक्यात घोंगावत होता. २१ ऑक्टोबर.. सकाळी कुदळी आणि वापरलेले इंजिन ऑईल गॅरेजमधून कॅनमध्ये भरून घेतले. मुलुंडमधील शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या पत्रकार परिषदेसाठी जायचे आहे, असे सांगितले. चार-पाच गाडय़ा भरून वानखेडे स्टेडियमजवळ दुपारी दीडच्या सुमारास पोहचलो. पोलीस बंदोबस्त चोख होता. गाडय़ा लांब उभ्या केल्या. एका गाडीतून मी, प्रभाकर शिंदे, राज केतकर, संजय घागरे, पालवे, गणेश म्हात्रे, चोरगे असे सात जण दरवाजापाशी पोहचलो. स्टेडियमध्ये वास्तुविशारद प्रभू यांच्या कार्यालयात जायचे आहे, असे सांगून गाडी पार्किंगमध्ये नेण्यात आम्ही यशस्वी झालो. पिशवीतून कुदळी आणि इंधनाचा कॅन काढला. स्टेडियममध्ये रंगरंगोटी व अन्य कामे सुरू होती. आम्ही कामासाठी आलो असू, असा पोलिसांचा समज झाला. प्रत्यक्ष मैदानात प्रवेश मिळाला आणि प्रभाकर धाव, असे सांगितले. आम्ही सातही धावत खेळपट्टीपाशी गेलो. मी, केतकर, शिंदे यांनी कुदळीने खेळपट्टी उखडण्यास सुरुवात केली. नेमके तेव्हाच कुदळीचे दांडे तुटले. तरीही खड्डे खणत राहिलो. वाहनांमधील वापरलेले इंजिन ऑइल आम्ही खेळपट्टीवर ओतले. खड्डय़ांमध्ये इंधन ओतल्याने मुरले. तोपर्यंत पोलीस आले आणि आम्हाला बाहेर खेचत नेले. इंधन ओतताना हात काळे पडले होते. पोलिसांना मी विनंती केली, हात धुऊन द्या, मगच घेऊन जा. मुद्दामहून गरवारेमधील उपाहारगृहात गेलो. तेथे घोषणा देण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला. ‘मातोश्री’वर दूरध्वनी केला तेव्हा जयदेवने फोन घेतला. त्याला झालेला प्रकार सांगितला, पण तोपर्यंत बाळासाहेब पत्रकार संघात जाण्याकरिता निघाले होते. जयदेवने पत्रकार संघात फोन करून बाळासाहेबांना ही माहिती दिली. वार्तालापात बाळासाहेबांनी खेळपट्टी उखडल्याचे जाहीर केले. माधव मंत्री, रमाकांत देसाई आदींनी खेळपट्टी खणली तरी सामना होणारच अशा मुलाखती दिल्या. आम्ही जे खड्डे केले आणि त्यात इंधन टाकल्याने खेळपट्टीची पार वाट लागली होती. तीन दिवसांत दुरुस्ती होणे कठीण होते. एकूणच साऱ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने सुरक्षेचे कारण पुढे करीत पाकिस्तानी संघाने भारताचा दौराच रद्द केला. शिवसेनाप्रमुखांनी आम्हा सातही शिवसैनिकांचे कौतुक केले. सामना होऊ न देण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केल्याचे समाधान मिळाले.
(शब्दांकन – संतोष प्रधान)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 3:17 am

Web Title: limits of tiger
Next Stories
1 साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया सदोष
2 मुक्तहस्ते सहकार्य..
3 मदतीचा वर्षांव
Just Now!
X