|| देवेंद्र गावंडे

अहिर विरोधी पक्षाचे  खासदार होते तोवर त्यांची लोकसभेतील कामगिरी उठून दिसायची. त्यांचे कौतुक करायला एकदा सोमनाथ चटर्जी चंद्रपुरात आले होते. मात्र सत्तेत आल्यावर स्वत:त जो बदल घडवावा लागतो त्यात अहिर कमी पडले. देशभर मोदींची हवा आहे. त्यात आपण तरून जाऊ ही मानसिकता या अनुभवी नेत्याला महागात पडली.

अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी यांचा सत्ताकाळ आधी खासदार व नंतर मंत्री म्हणून जवळून अनुभवणाऱ्या हंसराज अहिर यांच्या पराभवाला इतरांपेक्षा तेच जास्त जबाबदार आहेत. संपूर्ण देशभर असलेल्या मोदी लाटेत पक्षातील हवशे, नवशे, गवशेदेखील निवडून येत असताना अहिरांना एका नवख्या उमेदवाराकडून हार पत्करावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर भाषणांमधून प्रस्थापितांच्या बाजूने लाट आहे असे एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील या सहकाऱ्याच्या पराभवासाठी प्रस्थापितविरोधी लाट हेसुद्धा एक कारण ठरले. केंद्रात यूपीएचे सरकार असताना कोळसा घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे देशभर चर्चेत आलेले अहिर गेली चार वष्रे राज्यमंत्री होते. गृहसारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे होते. मात्र मंत्री म्हणून ते अजिबात छाप पाडू शकले नाही. नक्षली समस्येची जाणीव असूनसुद्धा त्यांना त्यात काही करता आले नाही. केंद्रात मंत्री असलेले नितीन गडकरी नागपुरात नवनवीन विकास प्रकल्पांची पायाभरणी करत असताना अहिर रेल्वेचे थांबे मिळवण्यात व्यग्र राहिले. राज्यातील सत्तेचा फायदा घेत सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरात अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. अहिरांना दोन्हीकडील सत्तेचा असा फायदा मात्र करून घेता आला नाही. गेली दोन दशके खासदार राहिलेल्या अहिरांना विरोधी पक्षात बराच काळ बसावे लागले. ते सत्तेत आल्यावर त्यांना साथ देणाऱ्या मतदारांच्या अपेक्षा वाढल्या, विकासाची भूक वाढली. त्याची पूर्तता अहिर करू शकले नाही. केंद्राशी संबंधित एकही मोठा प्रकल्प ते मतदारसंघात आणू शकले नाहीत. कोळसा खाणीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी भरपूर मोबदला मिळवून दिला हीच त्यांची एकमेव जमेची बाजू. शिवाय आठवडय़ातील तीन दिवस सतत दौरे करून जनतेशी संवाद साधणे हेच त्यांचे कर्तृत्व. पण केवळ या बळावर निवडून येऊ शकत नाही याची जाणीव त्यांना झालीच नाही. चंद्रपूरमध्ये आजवरच्या अहिरांच्या विजयात तिसऱ्या तुल्यबळ उमेदवाराचा अथवा काँग्रेसच्या नाराज गटाचा मोठा वाटा राहिला आहे. कधी बसप तर कधी काँग्रेसचा बंडखोर किंवा असंतुष्टांची आतून मिळणारी साथ व त्यातून होणारे मतविभाजन अहिरांना विजयाकडे नेत राहिले. या वेळी हे समीकरण अहिरांच्या विरोधात गेले.

वंचित बहुजन आघाडीने येथे राजेंद्र महाडोरे या माळी समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिली. या मतदारसंघात बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभेत मोठय़ा संख्येत असलेला हा समाज भाजपचा पारंपरिक मतदार आहे. तो या वेळी पूर्णपणे वंचितकडे वळला. वंचितच्या उमेदवाराने तब्बल एक लाख मते घेतली. केंद्रनिहाय झालेल्या मतदानात हे स्पष्टपणे दिसून आले. त्याचा मोठा फटका अहिरांना बसला. त्यातल्या त्यात काँग्रेसने सुरेश धानोरकरांच्या रूपाने प्रथमच धनोजे कुणबी उमेदवार दिला. त्यामुळे या मतांचे ध्रुवीकरण अहिरांच्या निसटत्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. अहिरांनी यवतमाळातील आर्णी व वणी भागात भरपूर मते घेतली, पण कुणबी व माळीबहुल असलेल्या चंद्रपुरातील चार विधानसभा मतदारसंघांत त्यांना मताधिक्य मिळाले नाही. या वेळीही काँग्रेसमधील एक असंतुष्ट गट निवडणुकीच्या काळात सक्रिय होता.

या गटाने वंचितला केलेली मदत अहिरांना तारून नेऊ शकली नाही. राज्याच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर, गडचिरोली भागात भाजप रुजवण्यात शोभा फडणवीस, अहिर व सुधीर मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काकू असलेल्या शोभाताई आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. अहिर व मुनगंटीवार सक्रिय असले तरी त्यांच्यात फारसा संवाद नसल्याची चर्चा पक्षवर्तुळात नेहमी होत राहते. या दोघांना एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणजे नितीन गडकरी. म्हणूनच हा मुद्दा कधीही चव्हाटय़ावर आला नाही.

अहिर विरोधी पक्षाचे खासदार होते तोवर त्यांची लोकसभेतील कामगिरी उठून दिसायची. त्यांचे कौतुक करायला एकदा सोमनाथ चटर्जी चंद्रपुरात आले होते. मात्र सत्तेत आल्यावर स्वत:त जो बदल घडवावा लागतो त्यात अहिर कमी पडले. देशभर मोदींची हवा आहे. त्यात आपण तरून जाऊ ही मानसिकता या अनुभवी नेत्याला महागात पडली. खरे तर अहिरांना विकासासाठी अतिशय चांगली संधी होती. काँग्रेसचे नेते शांताराम पोटदुखे यांच्यानंतर चंद्रपूरसारख्या टोकावरच्या जिल्ह्य़ाला केंद्रात मंत्रिपदाला मान मिळवून देणारे अहिर दुसरे नेते ठरले होते. ही संधी त्यांनी वाया घालवली. केवळ संपर्क व संवाद यावर विकासाच्या अपेक्षा ठेवून असणाऱ्या मतदारांची भूक भागत नाही. काळ बदलला आहे हे अहिरांच्या लक्षातच आले नाही.