‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले विचार.

सांस्कृतिक बौद्धिकतेची नांदी आणि प्रगल्भ सांस्कृतिक विचारांचा वारसा लाभलेल्या भारतीय लोकांत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास मात्र अजूनही समाजमनात रुजलेला नाही. बुद्धिप्रामाण्यवाद, चिकित्सा ही प्रणाली भारतीय माणसांनी मोठय़ा प्रमाणात अंगीकारलेली नाही. निर्माण झालेल्या परंपरा, प्रथा, संकल्पना किंवा नसíगक परंपरावाद यातच भारतीय माणूस गुरफटलेला असून त्यांच्यात वैचारिक शैथिल्य वा सीमितपणा निर्माण झालेला दिसतो. त्यातूनच त्यांची पावले मात्र दुसऱ्याच्या मूळ संशोधनाकडे वळून त्याच्या संकल्पनेला वा कल्पनेला आपले नवनिर्मित मानण्याकडे वळते. कारण चांगल्या गोष्टीचा हेवा प्रत्येकच भारतीयाला असलेला दिसून येतो. मग ते मिळविण्यासाठी साधनात टोकाचे बदल करणे, हा येथील अधिकारच. कायद्यातील एक-एक शब्द आपल्या परीने तपासून पाहण्याची दैनंदिन सवयच. मग बौद्धिक संपदेचे त्यास वावगे कशाला, म्हणून आत्मासारख्या चिरकाल समजल्या जाणाऱ्या बौद्धिकतेपर्यंत चोरांनी हात पसरवायला सुरुवात केली. भारतीय लोकांनी त्यात विक्रम प्रस्थापित केला नाही तर नवलच, उलट क्षेत्रे कमी पडू लागली; परंतु ही संशोधक वृत्ती विकसित करण्याचे श्रेयही आपल्या व्यवस्थेलाच दिले पाहिजे. कारण आपण जे काही प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांना पाहिजे तशी उंची या व्यवस्थेत मिळत नाही. या व्यवस्थेत अशाच लोकांना उचलून धरले जाते, ज्यांच्याकडे परंपरेने वर्णीय सत्ता आलेली असेल वा वर्गीय.

निम्न स्तरातून येणारी जी माणसे आहेत, ती टपरीवर काम करणारी, गॅरेजमध्ये काम करणारी असेल वा हॉटेलमध्ये काम करणारी असेल ती खरोखरच या जुगाड तंत्राचा वापर न करता स्वतच्या कल्पनाशक्तीचा वापर करणारी आहेत. परंतु त्यांच्यापुढची खरी अडचण ही ओळख असते. ती कदाचित धर्माची असेल, जातीची असेल, माध्यमापर्यंत न पोहोचण्याची किंवा शिक्षणाची असेल. या संपूर्ण प्रणालीत ज्यांच्यामध्ये खरेखुरे ‘मेक इन इंडिया’ निर्माण करण्याचे सामथ्र्य आहे ती मागे पडतात तर वर्गीय आणि वर्णीय पणाची माणसेच वर जाताना दिसतात. त्यामुळे आपल्या व्यवस्थेत जुगाड संशोधनाला वाव मिळालेला दिसतो. तो खालच्या कष्टकरी पातळीवर कमी तर वरच्या वर्गीय व वर्णीय पातळीवर तेवढाच जास्त प्रमाणात दिसतो. म्हणून भारतात पाहिजे तसा वेग आणि सातत्यपूर्ण मूलभूत संशोधनात दिसून येत नाही.

भारतीय लोकांना चांगल्या गोष्टीचा हेवा जसा असतो तसा चांगल्या गोष्टी निष्कपट भावनेतून कोणतेही अधिराज्य न गाजवता दुसऱ्यांना देणे आणि शिकविणे हीसुद्धा भारतीयांचीच हेवा वाटणारी सवय. ती प्रत्येक गोष्टीत स्वार्थ लपवून बसणाऱ्या अमेरिकेपेक्षा निश्चितच चांगली! अधिराज्य गाजविण्याच्या वृत्तीला मिळालेले आव्हान या ना त्या भावनेने मोडीत काढणे हे प्रायोगिक तत्त्वच अमेरिकेने जोपासलेले आहे. मग दबाव तंत्राचा वापर साहजिकच. स्वत:ला पहिल्या क्रमांकावर ठेवलेल्या अमेरिकेने भारताची हळद, कडुिनब, योग इ. वापरून पेटंट मिळविलेच. भारतीय खाद्य पदार्थातील  ‘कडी’ यावर जपान आपला दावा ठोकून स्वामित्व हक्क (पेटंट) घेण्याचा प्रयत्न करतोच. म्हणजे ३८ देशांच्या यादीत आपला ३७ वा क्रमांक लागला तरी समाधानाची बाब! कारण पहिल्या क्रमांकावर बसलेले देश ‘शुद्ध साजूक तुपासारखे’ नसून कायद्याचा बुरखा ओढलेले ‘मक्तेदार चोरच’. म्हणून या यादीत अव्वल समजलेले नाही तर स्वतला अव्वल स्थानावर बसवून घेतलेल्या देशाचाच धोका कमी-अधिक प्रमाणात का होईना पण सर्व जगाला आणि बौद्धिक संपदेला आहे.

कारण मक्तेदारीतूनच कायद्याला झुकविण्याचा प्रयत्न होतो हे विदितच. भारताला स्वत:चे ‘मेक इन’ करून घायचे असेल तर त्यासाठी आखलेली धोरणे ही आत्मपूरक आणि सन्मानात्मक असायला हवीत. दुसऱ्याच्या मक्तेदारीच्या दबावापुढे कायदे करणे हे आपण स्पध्रेत ‘शेवटून अव्वल’ असल्याचा जाहीर निवाडाच होय. सरकारने आणलेल्या बौद्धिक धोरणाचे स्वागतच. पण मुळातच तो भारतीय सन्मानातून आणि गरजेतून आणणे हेच खरे ‘मेक इन’ आणि सन्मानदायी होते. प्रत्येक क्षेत्रातील सर्जनशीलतेला टिकविण्यासाठी या कायद्याची मदत जरी आपल्याला होत असली तरी ‘विवेकवाद आणि वैज्ञानिकता’ या दोन गोष्टी या प्रणालीत वाढीस लागल्या तर भारतीय जुगाड संस्कृतीचा अंत आपल्याला निश्चितच करता येईल.

(वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर)