भूदानचळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची गीता प्रवचनेप्रसिद्ध आहेत. साध्या व सोप्या शब्दांत त्यांनी श्रीमद्भगवद्गीता उलगडून दाखविली. गीता प्रवचनांच्या आठव्या अध्यायातील काही भाग..

मनुष्याचे जीवन हे अनेक संस्कारांनी भरलेले असते. आपल्या हातून असंख्य क्रिया होत असतात. त्यांचा हिशेब करावयास बसू तर अंतही लागणार नाही. खाणे, पिणे, बसणे, झोपणे, चालणे, हिंडणे, काम करणे, लिहिणे, बोलणे, वाचणे, याशिवाय नाना प्रकारची स्वप्ने, रागद्वेष, मानापमान, सुखदु:ख असे अनंत प्रकार आपणास दिसून येतील. या सर्वाचे मनावर संस्कार होत असतात. म्हणून जीवन म्हणजे काय, असे जर कोणी विचारील तर जीवन म्हणजे संस्कारसंचय अशी मी व्याख्या करीन.

चांगले संस्कार तसे वाईट संस्कार. दोघांचा ही मनुष्याच्या जीवनावर परिणाम झालेला असतो. बाळपणीच्या क्रियांचे तर स्मरणच नाही. सारे लहनपण पाटीवरचे पुसावे त्याप्रमाणे होऊन जाते. पूर्वजन्मीचे संस्कार तर अगदीच साफ पुसल्यासारखे होतात. या जन्मीचे लहानपण आठवत नाही, तर पूर्वजन्मीची गोष्टच कशाला? पूर्वजन्म राहो. या जन्माचा विचार करु. आपल्या जेवढय़ा क्रिया लक्षात राहतात तेवढय़ाच घडल्या असे नाही. परंतु या क्रिया व ही ज्ञाने मरुन शेवटी काही संस्कार फक्त उरतात. रात्री निजावयाच्या वेळेस आपण दिवसातील सर्व क्रिया आठवू लागलो तरी आठवत नाहीत. कोणत्या आठवतात? ज्या कृती अधिक ठळक असतात त्याच डोळ्यासमोर येतात. फार भांडलो असलो तर तेच आठवते.

ठळक गोष्टींचे संस्कार मनावर जोराने उमटतात. अंकगणितात अपूर्णांकाचे उदाहरण असते. किती मोठमोठे आकडे. परंतु संक्षेप देता  देता शेवटी एक किंवा शून्य असे उत्तर येते. त्याच प्रमाणे जीवनात संस्कारांचे अनेक आकडे जाऊन शेवटी बलवान असा एक संस्कार साररुप उरतो. जीवनाच्या उदाहरणाचे ते उत्तर. अंत:काळीचे स्मरण हे सर्व जीवनाचे फलित होय. ज्याचा शेवट गोड ते सारे गोड. त्या शेवटच्या उत्तराकडे ध्यान ठेवून जीवनाचे गणित सोडवा. जीवनाचे उदाहरण सोडवताना जो विशिष्ट प्रश्न विचारला असेल तो डोळ्यासमोर ठेवून ते सोडवावे लागते. त्या प्रकारच्या रिती योजाव्या लागतात. मरणाच्य वेळेस जो संस्कार उमटावा अशी इच्छा असेल त्याला अनुसरुन सर्व जीवनाचा ओघ वळवा. तिकडे अहोरात्र कल असू द्या.

गीतेच्या आठव्या अध्यायात हा सिद्धांत मांडला आहे की जो विचार मरणकाळी स्पष्ट ठसठशीतपणे उमटला तोच विचार पुढच्या जन्मात बलवत्तर ठरतो. आजच्या दिवसाची कमाई घेऊन झोपेनंतर उद्याच्या दिवसास आपण प्रारंभ करतो. त्याचप्रमाणे या जन्माची शिदोरी घेऊन मरणाच्या मोठय़ा झोपेनंतर फिरुन आपली यात्रा सुरु होते. या जन्माचा अंत ती पुढील जन्माची सुरुवात म्हणून मरणाचे स्मरण सदैव राखून वागा.

मरणाचा वाघोबा सदैव समोर उभा असला म्हणजे पाप करावयास कसे सुचेल? पाप करावयास ही निश्चिंतता लागते.

मरणाचे स्मरण नेहमी ठेवणे हा पापापासून मुक्त होण्याचा उपाय आहे. मरण समोर दिसत असेल तर कोणत्या हिंमतीवर मनुष्य पाप करील? परंतु मनुष्य मरणाचे स्मरण टाळतो. पास्कल म्हणून एक फ्रेंच तत्वज्ञानी होऊन गेला. त्याने ‘पांसे’ या ग्रंथात निरनिराळे स्फूट विचार मांडले आहेत. तो म्हणतो मृत्यू सतत पाठीशी उभा आहे परंतु मृत्यूस विसरावे कसे याचा प्रयत्न माणसाने सतत चालवला आहे. मृत्यूस स्मरुन कसे वागावे हे नजरेसमोर तो राखीत नाही. माणसासं मरण हा शब्दही खपत नाही.पण इतके असून मरणाकडे सारखी पावले चाललीच आहेत..

(भाऊ पानसे, ग्रामसेवा मंडल, नालवाडी, गोपुरी वर्धा यांनी प्रकाशित केलेल्या विनोबा भावे यांच्या ‘गीता प्रवचने’ या पुस्तकावरुन साभार.)

आमचे जीवन निष्पाप का असते?

एकनाथांची एक गोष्ट आहे. एका गृहस्थाने नाथांस विचारले, महाराज आपले जीवन किती साधे, किती निष्पाप. आमचे असे का नाही? तुम्ही कधी रागावत नाही, कोणाशी भांडण नाही, तंटा नाही. किती शांत, पवित्र प्रेमळ तुम्ही. नाथ म्हणाले, माझी गोष्ट तूर्त राहू दे. तुझ्याविषययी मला एक गोष्ट कळली आहे. तुझे आजपासून सात दिवसांनी मरण आहे. नाथांनी सांगितलेली गोष्ट खोटी कोण मानणार? सात दिवसांनी मरण. फक्त १६८ च तास. बाकी. अरेरे, तो मनुष्य घाईने घरी गेला. त्याला काही सुचेना. निरवानीरवीच्या गोष्टी बोलत होता. करीत होता. तो आजारी झाला. अंथरुणावर होता. सहा दिवस गेले. सातव्या दिवशी नाथ त्याच्याजवळ आले. त्याने नमस्कार केला. नाथांनी विचारले, या सहा दिवसात किती पाप झाले? पापाचे किती विचार मनात आले? तो आसन्नमरण मनुष्य म्हणाला, नाथ पापाचा विचार करावयास वेळच झाला नाही. सारखे डोळ्यासमोर मरण होते. नाथ म्हणाले, आमचे जीवन निष्पाप का असते याचे उत्तर तुला आता मिळाले.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.