सर्वसाधारणपणे हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तींशी मैत्री केली जाते. मैत्री चॅरिटेबल ट्रस्टने मात्र केवळ समाजालाच नव्हे तर रक्ताच्या नात्यांनाही नकोशा झालेल्यांना मदतीचा हात दिला. कोणतेही सरकारी अनुदान अथवा मदत नसतानाही डोंबिवलीत संस्थेचे कामकाज सुरू आहे. आयुष्याच्या संध्याकाळी आवश्यक असणारी सोबत, शुश्रूषा आणि दिलासा देऊन अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर ‘मैत्री..’ने हास्य फुलविले आहे. गेल्या आठ वर्षांत ‘मैत्री’चा हा प्रपंच सांभाळण्यासाठी डॉ. मालिनी केरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुणाकडेही मदत मागावी लागली नाही. मात्र, आता संस्थेच्या वाढत्या कार्यामुळे संस्थेला मदतीची गरज आहे..
डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. मालिनी केरकर यांचे तिथे उपचारांसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी खूप छान सूर जुळले होते. ‘ताई, आम्हाला औषध नको. तुम्ही आलात, विचारपूस केलीत तरी आम्हाला बरे वाटते,’ हे त्यांचे उद्गार त्यांच्या मनात कायम घर करून राहिले. त्या नोकरी करीत असलेले रुग्णालय, इमारतीच्या तळमजल्यावर असल्याने तिथे प्रामुख्याने वयोवृद्ध रुग्णांचा भरणा अधिक होता. उमेदीच्या काळात आयुष्यातील अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना समर्थपणे तोंड देत संसाराचा गाडा हाकलेली ही माणसं उतारवयात जडणाऱ्या विविध व्याधींमुळे हतबल होतात, हे त्यांनी तिथे पाहिले होते. सामुदायिकपणे केलेले सामाजिक कार्य डोंबिवलीजवळील अमेय पालक संघटनेच्या ‘घरकुल’ प्रकल्पात त्या पाहत होत्या. आपणही अशा प्रकारचे कार्य करावे, असे त्यांना मनोमन वाटत होते. त्यातूनच ‘घरकुला’तील दोन अत्यवस्थ मुलांची त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शुश्रूषा केली. स्वत:ला झालेल्या कॅन्सरमुळे व्याधी काय असते, याचा अनुभवही त्यांना मिळाला होता. त्यामुळे नोकरी सोडून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध कारणांनी समाजाला नकोशा झालेल्या या व्यक्तींच्या देखभालीचे व्रत त्यांनी पत्करले. सर्वसाधारणपणे हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तींशी मैत्री केली जाते. डॉ. मालिनी यांनी केवळ समाजालाच नव्हे तर रक्ताच्या नात्यांनाही नकोशा झालेल्यांना मदतीचा हात दिला. कोणतेही सरकारी अनुदान अथवा मदत नसतानाही डोंबिवलीत संस्थेचे कामकाज सुरू आहे. आयुष्याच्या संध्याकाळी आवश्यक असणारी सोबत, शुश्रूषा आणि दिलासा देऊन अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर ‘मैत्री..’ने हास्य फुलविले आहे.     
९ एप्रिल २००५ रोजी डोंबिवलीत गोपाळनगरमधील लक्ष्मीकिरण इमारतीच्या तळमजल्यावरील भाडेतत्त्वाच्या जागेत डॉ. मालिनी यांनी ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. येथे प्रामुख्याने वृद्धांची अहोरात्र शुश्रूषा आणि देखभाल होत असली तरी रूढ अर्थाने हा वृद्धाश्रम नाही. कारण या वृद्ध सेवा केंद्रात अनाथ महिलांनाही आश्रय देण्यात आला आहे. घरी असणाऱ्या वृद्धांनाही त्यांच्या आजारपणात शुश्रूषेसाठी परिचारिका अथवा आया पुरविण्याचे कामही मैत्री फाऊंडेशनच्या वतीने केले जाते. वृद्ध सेवा केंद्र स्थापन करण्याआधीपासून रस्त्यांवर बेवारस अवस्थेत आढळणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या कामात मैत्री फाऊंडेशन पोलिसांना मदत करीत आहे. त्यासाठी संस्था पोलिसांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देते. डोंबिवली शहरात स्मृतिभ्रंश होऊन निराधारपणे भटकणाऱ्या अनेक वृद्ध-स्त्री पुरुषांच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत ‘मैत्री..’ने त्यांच्या आश्रमात आपुलकीने आश्रय दिला आहे. ख्रिस्ती बंधुभगिनींसाठी शवपेटी, अस्थिव्यंग झालेल्या नागरिकांना कमोड चेअर, व्हील चेअर, वॉकर, एअर बेड, वॉटर बेड, अ‍ॅडजेस्टेबल बेड, सक्शन पंप इ. साहित्य फाऊंडेशनच्या वतीने भाडय़ाने उपलब्ध करून दिले जाते.
स्थापनेनंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे २६ जुलै २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या आपत्तीने ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ची सत्त्वपरीक्षा पाहिली. अचानकपणे उद्भवलेल्या या संकटप्रसंगी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र आरोग्य सुविधा पुरवली. त्या वेळी दत्तनगर, आयरे गाव तसेच राजाजी पथ परिसरात डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे घेतली. डोंबिवलीतील अनेक वैद्यकीय व्यावसायिक ‘मैत्री..’ परिवाराशी जोडलेले आहेत.
मैत्री फाऊंडेशनचे वृद्ध सेवा केंद्र म्हणजे अकराशे चौरस फुटांचा आशियाना आहे. इथे सध्या १४ वृद्ध राहतात. त्यापैकी काही अंथरुणाला खिळून आहेत. त्यातील काही जण सशुल्क राहतात. उर्वरितांचा खर्च देणग्यांमधून भागविला जातो. इथे पूर्णवेळ सेवेत असणारे चौघेही अनाथ आहेत. संस्थेने त्यांना येथे आश्रय दिला. प्रशिक्षण दिले आणि रोजगारही दिला. गेल्या वर्षी सातवीत शिकणारी एक मुलगी दत्तक घेतली असून तिच्या शिक्षणाचा सर्व खर्चही ‘मैत्री..’ करणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या जगदीश नाडकर्णी यांची आई ‘मैत्री..’च्या सेवा केंद्रात काही काळ राहत होती. तिला अल्झायमरचा त्रास होता. तिच्या निधनानंतर ते संस्थेत विश्वस्त या नात्याने कार्यरत आहेत. डॉ. मालिनी केरकर यांचा मुलगा अजिंक्यही लहानपणापासून संस्थेत आजी-आजोबांची शुश्रूषा करतो. सध्या तो बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षांला आहे. रुचिरा रोडे अगदी सुरुवातीपासूनच संस्थेशी निगडित आहेत. सुजाता गावकर या मूळच्या कोकणातील तरुणीने संस्थेत राहून मुंबई विद्यापीठातून बाहेरून एम.ए.ची परीक्षा दिली. शबनम पटेल या मुलीने सहा वर्षांच्या खंडानंतर दहावीची परीक्षा देऊन नंतर परिचर्या पदविका घेतली. चित्रा व्यापारी या मुलीेने बारावीची परीक्षा दिली. अशा रीतीने एकमेकांच्या आधाराने ‘मैत्री..’ची वाटचाल सुरू आहे.   
गेल्या आठ वर्षांत ‘मैत्री’चा हा प्रपंच सांभाळण्यासाठी डॉ. मालिनी केरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुणाकडेही मदत मागावी लागली नाही. परिचितांनी एकमेकांकडे केलेल्या शिफारशींमुळे संवेदनशील माणसे स्वत:हून संस्थेत येतात. आजी-आजोबांना भेटतात आणि यथाशक्ती मदत करतात. काही जण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ‘मैत्री..’सोबत शेअर करतात. कुणी आपले, आपल्या लग्नाचे अथवा मुलांचे वाढदिवस येथे साजरे करतात. मात्र ‘मैत्री..’चा वाढता पसारा पाहता सध्याची जागा अत्यंत अपुरी आहे. त्यात हे सेवा केंद्र भाडय़ाच्या जागेत असून मालकाने आता जागा रिकामी करण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे ‘मैत्री..’ परिवार सध्या हक्काच्या जागेच्या शोधात आहे. गेली काही वर्षे जागा मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका, एमआयडीसी तसेच अगदी थेट मंत्रालयापर्यंत ‘मैत्री..’ने पत्रव्यवहार केला. मात्र जागेसंदर्भात अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच समाजातील दानशूर व्यक्तींनी वृद्ध सेवा केंद्रासाठी जागा दान करावी, असे आवाहन ‘मैत्री..’ने केले आहे. वृद्ध सेवा केंद्रात सरसकट सर्व वृद्धांना एकत्र ठेवणे गैरसोयीचे आहे. अल्झायमर, पार्किसन्स अथवा डिम्नेशिया झालेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. कर्णोपकर्णी संस्थेची माहिती मिळाल्याने ‘मैत्री..’च्या परिवारात सहभागी होण्यास अनेक जण इच्छुक आहेत. सध्या जागा नसल्याने अनेक जण प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यामुळे किमान ५० जणांना सामावून घेता येईल, इतके वृद्धसेवा केंद्र उभारणे हे मैत्री फाऊंडेशनचे ध्येय आहे. त्यापैकी निम्म्या जागा सशुल्क असतील आणि उर्वरित गरजू आणि अनाथ वृद्धांना विनामूल्य तत्त्वावर सामावून घेतले जाणार आहे. आजारी व्यक्तींची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.  
म्हातारपणाला दुसरे बालपण का म्हणतात हे ‘मैत्री..’च्या विश्वात डोकावल्यावर कळते. आयुष्याच्या या संध्याकाळी माणसं दुर्बल आणि मनाने हळवी होतात. त्यामुळे लहानपणी जशी संगोपनाची गरज असते, तशीच या उतारवयात सोबतीची आणि शुश्रूषेची आवश्यकता असते. मात्र अनेक कुटुंबांमध्ये सध्या विविध कारणांनी ज्येष्ठांना तसा आधार मिळणे शक्य नसते. या परिस्थितीला सर्वथा मुलेच जबाबदार असतात, असे अजिबात नाही. याबाबतीत प्रत्येक घराची स्वत:ची एक वेगळी कथा असते. नोकरी व्यवसायानिमित्त मुले परगावी अथवा परदेशी असतात, पण त्यांचा जीव इथे आई-वडिलांमध्ये अडकलेला असतो. घरी त्यांना एकटे ठेवणे धोक्याचे असते. काहींना निवृत्तीनंतर आपण नव्याने आयुष्य जगावे असे वाटत असते. ‘मुलांच्या संसारात आपली लुडबूड नको’ किंवा ‘त्यांनी आता आपली जबाबदारी स्वतच घ्यावी’, अशीही भावना त्यामागे असते. त्यामुळे आयुष्याच्या या वळणावर अनेकांना स्वेच्छेने समवयस्कांसमवेत राहावे असे वाटते. म्हणूनच सध्या समाजात ‘मैत्री..’सारख्या पर्यायांना खूप मागणी आहे. ‘मैत्री..’चे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे घरकुल डोंबिवली शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे ज्येष्ठांना आपण समाजापासून दूर कुठेतरी येऊन पडलोय असे वाटत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही अनेकांमध्ये काम करण्याची क्षमता असते. उमेदीची सारी वर्षे अर्थार्जनासाठी घालविल्यानंतर उर्वरित काळ समाजासाठी यथाशक्ती काहीतरी करावे असे त्यांना वाटत असते. ‘मैत्री..’सारख्या संस्थांना त्यांची मदत होत असते. ‘आपण स्वत: स्वतंत्रपणे काही करू शकत नाही, निदान दुसरे कुणीतरी करतेय, तर यथाशक्ती मदत करावी’,अशी भावना त्यामागे असते. ‘हम दो हमारा एक’ अथवा ‘मुलगा-मुलगी एक समान’ या विचारांचे अनुसरण करीत एक अथवा दोन मुलीच असणाऱ्या दाम्पत्यांनी मुलींची लग्ने झाल्यावर कुठे राहायचे, मुलीच्या सासरी तशी वैचारिक आणि आर्थिक स्थिती नसेल तर काय करणार, पुन्हा परंपरेने जावयाकडे राहणे योग्य समजले जात नाही, मग आमच्यासारख्यांना वृद्ध सेवा केंद्रांशिवाय दुसरा कोणता पर्याय उरतो, असा निरूत्तर करणारा प्रश्न एका ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित केला. आता वृद्ध असणारी पिढी किमान संघटित अथवा सुरक्षित ठिकाणी नोकरी करीत होती. त्यामुळे बहुतेकांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी अथवा निवृत्ती वेतन तरी आहे. अर्थात पैशाने साऱ्या गोष्टी विकत मिळत नसल्या तरी हक्काच्या मिळकतीचा एक भक्कम आधार तरी असतो. भविष्यात साऱ्याच नोकऱ्या कंत्राटी स्वरूपाच्या. त्यामुळे महिन्याच्या वेतनाव्यतिरिक्त काहीही मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांच्या संगोपनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होणार असून त्यामुळे ‘मैत्री..’सारख्या संस्थांची गरज वाढणार आहे.
 मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली
आयुष्याच्या संध्याकाळी अनेक व्याधींनी शरीर त्रस्त होते. त्यातच आप्तस्वकीयांनी साथ नाही दिली तर मन उद्ध्वस्त होते. अशा लोकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी ‘मैत्री’ ही संस्था झटत आहे. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्याला आता मदतीची गरज आहे.
‘मैत्री..’ परिवार सध्या हक्काच्या जागेच्या शोधात आहे. गेली काही वर्षे जागा मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका, एमआयडीसी तसेच अगदी थेट मंत्रालयापर्यंत ‘मैत्री..’ने पत्रव्यवहार केला. मात्र जागेसंदर्भात अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच समाजातील दानशूर व्यक्तींनी वृद्ध सेवा केंद्रासाठी जागा दान करावी, असे आवाहन ‘मैत्री..’ने केले आहे.
‘मैत्री’ची आरोग्यसेवा
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरातील डोंगरदऱ्यातील आदिवासी पाडय़ांमधील कुपोषित माता व बालकांना सकस आहार पुरवून संस्थेने औषधोपचार केले. विशेष म्हणजे त्यांची प्रकृती पूर्ववत होईपर्यंत वर्षभर सातत्याने ‘मैत्री..’ने हा उपक्रम राबविला. याशिवाय गणेशपुरी येथील बालयोगी सदानंद बाबा आश्रमाच्या वतीने संचालित कुपोषित माता व बालकांच्या आरोग्य शिबिरात औषधे व वैद्यकीय सेवा दिली. इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम, इंडियन डेंटल असोसिएशन, श्री युवक मित्र मंडळ आदी संस्थांच्या सहकार्याने वेळोवेळी डोंबिवलीत आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये संस्थेचा सहभाग असतो.
संस्थेपर्यंत कसे जाल?
डोंबिवली स्थानकात उतरले की पूर्वेच्या दिशेने बाहेर पडायचे. स्थानकाबाहेरच रिक्षा स्टँड आहे. रिक्षेने साधारण दहा ते पंधरा मिनिटांत संस्थेत पोहोचता येते. गोपाळनगरातील मंजुनाथ शाळेजवळ असलेल्या दोन क्रमांकच्या गल्लीत लक्ष्मीनारायण इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरच संस्था आहे.
धनादेश या नावाने काढावेत
मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली
(देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत)
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय       
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट
नागरोड, उंटखाना,
नागपूर -४४०००९.  ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय        
संपादकीय विभाग,
मालपाणी- ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद.  ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय          
संपादकीय विभाग,
आशिष, सथ्थ्या
कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय          
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.