12 December 2017

News Flash

वाढते तापमान शेतकऱ्यांच्या गळ्याशी!

ज्यावेळी तापमानाची पातळी वाढते, त्यावेळी पिके करपून नुकसान होते.

टॅमा कार्लटन | Updated: August 13, 2017 2:05 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ज्यावेळी तापमानाची पातळी वाढते, त्यावेळी पिके करपून नुकसान होते. या कारणाने शेतकरी आत्महत्या करतात. एखाद्या ठिकाणी मुसळधार झालेल्या पावसाच्या तुलनेत तापमानाची पातळी वाढल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे सर्वसाधारणपणे जगात सर्वत्र आढळून येते. शेतीच्या उत्पादनावर पावसाच्या तुलनेत तापमानाचा जास्त परिणाम होतो हे सर्वत्र आढळून आले आहे. हवामान बदलामुळे काही घटकांवर कसा परिणाम होतो यांचे निरीक्षण आणि मोजमाप करणे सोपे आहे. जसे की, पीक उत्पादन किंवा राष्ट्रीय जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न). मात्र मानवी हितासाठी आवश्यक असणाऱ्या इतर संकेतकांचे मोजमाप करणे कठीण आहे. असे जरी असले तरी त्यासाठी आपण हवामान बदलानुसार भविष्याच्या दृष्टिकोनातून योजना आणि धोरणे आखणे आवश्यक आहे.

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये हवामान बदलाची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येते. ज्यावेळी तापमान वाढते, त्यावेळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. परिणामी आत्महत्या वाढतात. मी भारतातील शेतकरी आत्यहत्येसाठी हवामान बदल कसे कारणीभूत हे तपासण्यासाठी सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला. यामध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी वेगवेगळा अनुभव येतो. उन्हाची पातळी वाढल्याने पिके खराब होतात. तर काही ठिकाणी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान उपलब्ध नसते. ते अतिशय थंड असते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम घडून येतो. आपण वर्षांच्या थंड आणि उष्ण या दोन्ही हंगामांमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची तुलना करू शकतो.आत्महत्येचे प्रमाण जास्त असलेल्या भागात पावसाच्या तुलनेत तापमान अधिक असल्याचे दिसते. हे जगातील इतर भागांशी सुसंगत आहे, ज्या ठिकाणी शेती उत्पादनावर प्रजन्यमानाच्या तुलनेत तापामानाचा अधिक परिणाम होतो. मी भारतामध्ये तापमान आणि पाऊस या दोन्ही घटकांचा शेतीच्या उत्पादनाला प्रभावित करणारा परिणाम अभ्यासला. मला वाटते की तापमान आणि पाऊस हे दोन्ही घटक आत्महत्येचे प्रमाण वाढवण्यास जरी कारणीभूत ठरत असले तरी, त्या तुलनेत तापमान हा त्यामध्ये सर्वात प्रभावी घटक आहे.

या प्रकरणाचा अधिक अभ्यास करताना मी एक पर्यायी संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करते. त्यानुसार, वातावरणाचा दीर्घकालीन नेमका काय परिणाम होतो हे समजण्यास मदत होते. या मध्ये एका वर्षी एका ठिकाणी पडणारा पाऊस आणि पुढील वर्षी त्याच ठिकाणी होणारा पाऊस याची तुलना करण्यात येत नाही. या पर्यायामुळे पावसामुळे आत्महत्या होतात याबाबत नकारात्मक परिणाम दिसून येतात. हे संख्याशास्त्रीयदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. यातून जर पाऊस एक सेंटिमीटरने वाढला तर आत्महत्येचा दर सरासरी ७ टक्क्य़ांनी कमी होतो, असे दिसून आले आहे.

अधिक आर्थिक संसाधने असलेली कुटुंबे उष्णतारोधक बियाणे, सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञान किंवा पीकविमा घेण्यासाठी पैशांची आवश्यक त्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. पिकांचे सरासरी उत्पादन वाढल्याने कुटुंबे अधिक बचत करून तापमान आणि आत्महत्या यांच्यातील अंतर कमी करू शकत होते. तथापि, मला या प्रकारचे अनुकूलन आढळून आले नाही. कारण गेल्या ४० वर्षांत तापमानवाढीमुळे आत्महत्या होत  होत्या. त्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत अक्षरश: एकसारखे आहे. अनुकूलन करण्याबाबत बरेच संभाव्य अडथळे आहेत. त्या तापमानाशी जुळवून घेतल्यास तापमानाचा तितकासा प्रभाव जाणवून येत नाही. भारतामध्ये तापमानवाढ आणि आत्महत्या यांच्यातील संबंध वेगवेगळय़ा भागामध्ये समान आहेत. आधुनिक तंत्रज्ञानासाठी पुरेशी गुंतवणूक न केल्याने आणि बदलत्या स्थितीत समोरे न गेल्याने भारतातील लोक या तापमानाचा सामना करण्यास पुरेसे सक्षम नाहीत. त्यामुळे भारतामध्ये हवामान बदलामुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या प्रमाणात येणाऱ्या वर्षांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येईल.

तापमानवाढीमुळे कृषी उत्पादनाच्या झालेल्या नुकसानीचा सर्व क्षेत्रांवर परिणाम घडून येतो. कारण त्यामुळे अन्नधान्यांचे भाव वाढू शकतात आणि त्यामुळे शेतमजुरांची मागणी कमी होईल. या हवामानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान सध्या गैर दस्तावेज आहे. या आर्थिक नुकसानीची तीव्रता मोजण्यासाठी भविष्यात अधिक संशोधनाची आशा आहे.

टॅमा कार्लटन

(लेख ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील मुलाखतीवरून)

अनुवाद – चंद्रकांत दडस

 

 

First Published on August 13, 2017 2:05 am

Web Title: marathi articles on drought in maharashtra part 6