News Flash

शेतीपूरक मत्स्यउद्योगातील नवे तंत्रज्ञान

मत्स्योत्पादनात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘पयोद इंडस्ट्रिज’ने नवे मॉडेल विकसित करण्याचे काम केले आहे.

मत्स्यउद्योगही लाभदायी ठरू शकेल असे तंत्रज्ञान कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगावच्या ‘पयोद इंडस्ट्रिटज’ने विकसित केले

दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

बेभरवशाच्या शेतीसाठी पशुपालनाबरोबरच आता मत्स्यउद्योगही लाभदायी ठरू लागला आहे. यातीलच मत्स्योत्पादनात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘पयोद इंडस्ट्रिज’ने नवे मॉडेल विकसित करण्याचे काम केले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील या प्रयोगाविषयी..

लहरी निसर्गामुळे शेती व्यवसायासमोर दरवर्षी अनंत अडचणी उभ्या ठाकतात. निसर्ग अनुकूल असला तरी जादा उत्पादनामुळे बाजारपेठेतील गणित विस्कळीत होते, तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाला आलेले वाया जाते. देशातील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून असली तरी उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने शेतीवर आधारित समाजाचे जीवन बेभरवशाचे बनत चालले आहे. बेभरवशाच्या शेतीसाठी पशूपालनाबरोबरच आता मत्स्यउद्योगही लाभदायी ठरू शकेल असे तंत्रज्ञान कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगावच्या ‘पयोद इंडस्ट्रिटज’ने विकसित केले असून यासाठी प्रशिक्षण वर्गही सुरू करण्याचे प्रयोजन आहे.

‘पयोद इंडस्ट्रिज’ने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, तासगाव या तालुक्याच्या ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे काम हाती घेतले आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचे काम ही कंपनी करीत आहे. पाण्याचा अपव्यय न करता पसा मिळविण्याचे नवतंत्र विकसित केले आहे.

मत्स्योत्पादनासारख्या पूरक व्यवसायांसाठी संस्थेने निर्माण केलेले ‘आजादी अ‍ॅक्वाकल्चर’ हे मॉडेल कमीत कमी जागेत वापर करण्यासारखे असून या ‘मॉडेल’ला ‘सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी’ विभागाने नावाजलेले आहे. कमी शेतजमीन असलेले शेतकरी किंवा ज्याच्याकडे एखादा गुंठा क्षेत्र असल्यास मग शहरी असो किंवा ग्रामीण भाग असो, अशांना या मॉडेलचा वापर करता येऊ शकेल. यामध्ये त्यांना मासे, भाजीपाला, (देशी -विदेशी), लहान पशूंना चारा अशा गोष्टींचे उत्पादन घेता येणे शक्य आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड हैद्राबाद या संस्थेकडून जलजीविका संस्थेला काम करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यानुसार सांगली जिल्हयातील कवठेमहांकाळमध्ये काम सुरू झाले आहे. तालुक्यातील हिंगणगांव येथे ‘अ‍ॅक्वा उपजीविका कौशल्यविकास शाळा’ सुरू करण्याचेही संस्थेचे नियोजन आहे.

सागरातून मिळणारे मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याप्रमाणात मागणीमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणांत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे पुष्ठभागावर सुध्दा मत्स्यसंवर्धन करण्यास मोठय़ा प्रमाणात संधी असल्याने नीलक्रांती मिशन, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अशा योजनांमधून मोठय़ा प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी, मत्स्य उत्पादक सहकारी सोसायटी, मत्स्यउत्पादक कंपन्या मोठय़ा प्रमाणात आता मत्स्य शेतीकडे वळताना दिसत आहेत. शेततळे, तलाव, पाझर तलाव अशा उपलब्ध प्रत्येक पाण्याच्या संसाधनात पारंपरिक पध्दतीने मत्स्यउत्पादन यापूर्वीच केले जात आहे. मात्र पारंपिरक पद्धतीतून मिळणाऱ्या उत्पादनाला मर्यादा आहेत. यामध्ये अनेक अडचणी, अडथळेदेखील आहेत. उदा. लागणारी मोठी जागा -जास्त पाणी, पाण्याची कमी गुणवत्ता, यामुळे मासे मरण्याचे मोठे प्रमाण, दूषित पाण्यामुळे होणारे रोग, योग्य खाद्य-योग्य प्रकारे न दिल्यामुळे माशांची वाढ न होणे, नैसर्गिक शिकारी जसे की पाणकोंबडय़ा (१०० ग्रँम पेक्षा कमी वजनाचे मासे म्हणजे ह्यंचे आवडते खाद्य) आणि चोरी आदी अनेक प्रकारचे अडथळे आहेत. पारंपरिक पध्द्तीमुळे उत्पादन प्रतिघनमीटर २ किलो पेक्षा किमी मिळते, योग्य उत्पन्न मिळत नाही त्यामुळे मत्स्य व्यवसाय ही एक हौस राहते.

भारत हा जगातील दोन क्रमांकाचा मत्स्यउत्पादन करणारा देश असला तरी मोठय़ा प्रमाणात समुद्रामध्ये मासेमारी होत असल्यामुळे सागरी मासे कमी होत आहेत. प्रजननकाळामध्येही मासेमारी होत असल्यामुळे माशांचे प्रमाण कमी होत चालले आहे. दुसरीकडे भारतीय लोकांच्या जेवणामध्ये मासे आणि त्यापासून तयार केले जाणारे पदार्थ वाढत चालले आहे. मासे हे निरोगी अन्न असा होत असलेला समजही सकस खाद्य म्हणूनही मागणी वाढत आहे. जास्त प्रथिने, जीवनसत्त्वे, योग्य खनिजे आणि कमी फॅट म्हणून मासे खाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, पण बाजारात त्या प्रमाणात मासे उपलब्ध नाहीत. जे आहेत त्याच्या गुणवतेची खात्री नाही.

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढीची गरज निर्माण झाली आहे. ही गरज भागविण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. जमिनीवरती कमी जागेत जास्त घनतेमध्ये मत्स्यउत्पादन अगदी यांत्रिकी पध्दतीने करता आले पाहिजे. यासाठी ‘एस. एन. रास.’ आणि ‘सेंटर फॉर अ‍ॅक्वाटिक लाईव्हलीहुड-जलजीविका’ या पयोदच्या संलग्न कंपनीने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान निर्माण केले आहे. या तंत्रज्ञानाला ‘ब्लू बॉक्स’ या नावाने नामांकित केले असून या तंत्रज्ञानाचे स्वामित्वही मिळविले आहे.

या पद्धतीमुळे अगदी कमी पाण्यात आणि कमी जागेत (अगदी ४०० ते ५०० चौरस फूट जागेत) सुध्दा या पध्दतीने मत्स्य उत्पादन घेता येते. अगदी घराच्या छतावरही मत्स्य उत्पादन घेता येणे शक्य आहे. शहरी, निमशहरी भागात स्वयंपाक घराच्या बागेप्रमाणे हे उत्पादन घेणे शक्य आहे. या पद्धतीमध्ये अगदी मत्स्य वाढीसाठी हवे असलेले वातावरण तयार केले जाते. हे तंत्रज्ञान यांत्रिकी आणि जैविकी पद्धतीच्या फिल्टरचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या पध्दतीमध्ये पाण्याचे शुध्दीकरण करून पुन्हा, पुन्हा पाण्याचा वापर करता येतो. दूषित पदार्थ, माशांचा मला काढून टाकला जातो. १५० ते ३०० ग्रॅम वजनाच्या मत्स्य उत्पादनासाठी हे अत्यंत योग्य तंत्रज्ञान ठरले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जातीचे मत्स्य उत्पादन आपण घेऊ शकतो.

तसेच ज्या माशांच्या प्रजाती आकारांने मोठय़ा होतात त्या पारंपरिक पद्धतीत वाढविणेच चांगले असते, कारण त्यांचे जीवनचक्र हे जास्त दिवसांचे असते. पण त्या प्रजातींच्या बीज उत्पादनासाठी या पद्धतीचा जर अवलंब केल्यास आपणांस लागणारे बीज अगदी कमी वेळात आणि जास्त संख्येमध्ये निर्माण करता येऊ शकते.

या प्रकल्पासाठी पाण्याची गुणवत्ताही महत्त्वाची असते. जसे की, तापमान साधारणपणे २६-३० अंश सेल्सियस, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण ४ ते ६ पीपीएम, सामू (पीएच) ७ ते ८, क्षारता १२० ते ११५० पीपीएम, अमोनिया ०.०५ पेक्षा कमी, नायट्रेट ०.५ पेक्षा कमी, इत्यादी निकष पाळावे लागतात. हे निकष पाळले तर माशांची वाढ चांगल्या पध्दतीने होते. पाणी अगदी रोज ५-१० टक्के बदलत राहिले तरी माशांचा मला वाहून जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पुन्हा बाहेर काढलेल्या पाण्यामधून भाजीपाल्याचे उत्पादनसुद्धा घेता येऊ शकते. या पाण्यामध्ये ‘नायट्रोजन’चे प्रमाण जास्त असल्या करणामुळे भाजीपाल्याची वाढही चांगल्याप्रकारे होऊ शकते.

या तंत्रज्ञानाला हैद्राबाद येथे भरलेल्या ‘अ‍ॅक्वा- अ‍ॅक्वेरिया २०१९’ या देशपातळीवरील प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच जैव तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘बेस्ट स्टार्टअप’ (कृषी व कृषी संबंधीत) ह्य विषयामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय  कृषी अनुसंधान प्रबंध अकादमी (नार्म), कृषी व शेतीकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषि, सहकार व शेतकरी कल्याण, राष्ट्रीय कृषी विकास योजना विभाग यांनी ‘बेस्ट स्टार्टअप’, ‘सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी’ विभागांने नावाजलेले आहे.

 

ब्लू व्हिलेजचा मानस

कवठे महांकाळ तालुक्यातील िहगणगांव व परिसरामध्ये १ लाख लिटर क्षमतेचे सौरऊर्जेवर आधारित एकात्मिक पद्धतीने तयार केलेले हे ‘मॉडेल’ २० ठिकाणी ‘क्लस्टर’ स्वरूपात राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने चालवले जात आहे. हिंगणगांव हे नीलक्रांती मिशननुसार ‘ब्लू व्हिलेज’ करण्याचा मानस  संस्थेचे संचालक देवानंद लोंढे, निळकंठ मिश्रा व रूचिक मेढेकर यांनी व्यक्त केला.

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ातील कर्ज वितरण

जिल्ह्य़ाचे नावे    मंजूर कर्ज खातेदार संख्या       वितरित कर्ज

औरंगाबाद            ६७४१                                  ५५९.६६

बीड                    १७८६                                   ७६.९५

हिंगोली               ५९७३                                   १६.६७

लातूर                  ५७९६                                   १५७.४६

नांदेड                 २०९८                                   १२३.७७

उस्मानाबाद         १११४                                    ३१.१७

परभणी               १८९७१                                 १३३.२०

एकूण                  ४२४७९                                १०९८.८८

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:54 am

Web Title: new technologies in fisheries new fish farming tech innovative fisheries technology zws 70
Next Stories
1 इच्छा प्रामाणिक असेल तर युतीप्रमाणेच आघाडीही टिकेल
2 राज्यावलोकन : भाजपपुढे दुहेरी आव्हान…
3 कोषातली साहित्य-संस्कृती…
Just Now!
X