|| नितीन गडकरी

पक्षांतर्गत सहकाऱ्यांशी सुषमा स्वराज यांचा उत्तम संवाद होताच; पण विरोधकांशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. टीका करताना त्यांच्या भाषेचा संयम कधी सुटला नाही. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून मोठय़ा नेत्यांपर्यंत सर्वाना त्यांनी प्रेरणा दिली..

भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत सुषमा स्वराज यांनी मोठे योगदान दिले. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. सार्वजनिक जीवनात आरोग्यामुळे वावरण्यावर आलेली बंधने मान्य करून त्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. पक्षाचा-सरकारचा त्या मोठा आधार होत्या. लोकसभेत ‘कलम-३७०’ रद्द करणारे विधेयक मंजूर झाले आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सरकारच्या निर्णयाचा आनंद व समाधान त्यांच्या ठायी होते. देशासाठी त्या सदैव कार्यरत राहिल्या.

स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत सुषमाजींनी काम केले. माझ्यासारख्या दुसऱ्या पिढीतल्या नेत्यांशीही त्यांचे ऋणानुबंध होते. राजकारणात मतभेदांचे अनेक क्षण येतात. अनेक घटनांमध्ये त्यांचा कणखरपणा पाहता आला. एखादा निर्णय पटत नसला, तरी अत्यंत संयमी शब्दांत त्या आपली भावना व्यक्त करीत. मला सुषमाजींचा संयम हाच गुण सर्वात महत्त्वाचा वाटतो. स्वकर्तृत्वावर सुषमाजींचे नेतृत्व बहरले. महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे मी समर्थन करतो, पण आरक्षणाविना सुषमाजींनी राजकारणात स्वत:ला सिद्ध केले.

मला तर त्या आपले आई-वडील सांगतात, त्याप्रमाणे काही गोष्टी सांगत असत. २०१४ साली लोकसभा निवडणूक नागपूरमधून लढवण्याचा निर्णय मी घेतला. सुषमाजींना तो आवडला नाही. ‘‘तुझे राजकीय करिअर अडचणीत येईल,’’ असा काळजीचा सूर त्यांचा होता. मी मात्र निर्णयावर ठाम राहिलो. नागपूरमधून प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाल्यावर सुषमाजींनी अभिनंदन केले. ‘‘बोलतो ते करून दाखवतोस!’’ अशा शब्दांत त्यांनी माझे दिल्लीतल्या भेटीत कौतुक केले होते.

आणखी एक आठवण अशी की, दिल्लीत आल्यावर अधूनमधून माझ्या प्रकृतीची अडचण होत असे. सुषमाजींच्या ते लक्षात आल्यावर, त्या स्वत: डॉक्टर घेऊन घरी आल्या. मला डॉक्टरांकडे जायला सांगितले. मी गेलो. तपासणीची माहिती सुषमाजींनी घेतली. मी प्रकृतीकडे दुर्लक्ष करतो म्हणून पत्नी कांचनला फोन केला व माझी काळजीच्या सुरात तक्रार केली.

सुषमाजींच्या कन्येला माझ्या घरी बनणारे पराठे व दह्यची चटणी खूप आवडे. तिची तब्येत बरी नसताना मी अनेकदा हा मेन्यू पाठवत असे. जेव्हा जेव्हा सुषमाजींकडे मी जाई, तेव्हा मला आवडतात म्हणून त्या आवर्जून पोहे खाऊ  घालत.

मी महाराष्ट्रातून दिल्लीत आलो. पक्षाचा अध्यक्ष झालो. त्या काळात त्यांची मला खूप मदत झाली. त्या वेळोवेळी मार्गदर्शन करीत. अडचणीच्या प्रसंगांमध्ये सांभाळून घेत. आमच्या पक्षात त्यांचा सर्वाशी उत्तम संवाद होता. पक्षात एखादा कठीण प्रसंग आला, मतभेदांचे क्षण आले, तेव्हा त्या योग्य बाजू ठामपणे मांडत. समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धीरोदात्तपणे त्या सामोऱ्या गेल्या.

जी बाब पक्षांतर्गत सहकाऱ्यांबाबत, तीच विरोधकांबाबतही. विरोधकांशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. विरोधी पक्षांतल्या सर्व नेत्यांशी त्यांचा नियमित संवाद होता. नकारात्मक गोष्ट सांगण्याची त्यांची अशी एक शैली होती. टीका करताना त्यांच्या भाषेचा संयम कधी सुटला नाही. त्यांचे वक्तृत्व धारदार होते. त्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले.

निवडणूक प्रचारात मी जोखीम पत्करून जुने हेलिकॉप्टर घेऊन प्रचार करीत होतो. एकदा सुषमाजींचा प्रवास होता. हेलिकॉप्टर पाहून त्या रागावल्या. ‘‘रिस्क घेऊ नकोस,’’ म्हणाल्या. मला त्यांचे ऐकावेच लागले. ते हेलिकॉप्टर वापरणे मी बंद केले.

आता मंत्री झाल्यावर सुषमाजींना भेटलो. त्या राजकारणातून निवृत्त झाल्या म्हणून मलाच वाईट वाटत होते. पण त्या पूर्वीसारख्याच शांत व संयमी होत्या.

मृत्यू प्रत्येकाला येणार आहे. पण सुषमाजींसारख्या व्यक्तीच्या कार्यप्रवण स्मृती सदैव प्रेरणा देत राहतात. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून मोठय़ा नेत्यांपर्यंत सर्वाना सुषमाजींनी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले. आमच्या पक्षाचा इतिहास त्यांच्याशिवाय कधीही पूर्ण होणार नाही. सुषमाजींच्या मार्गावर पक्ष पुढे जात राहील.

माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचे माझे छायाचित्र ‘व्हायरल’ झाले होते. तो हृदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींना म्हणालो होतो, ‘‘तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात.’’ सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज जेव्हा या आठवणी दाटून येतात, तेव्हा अस्वस्थ व्हायला होते. अस्वस्थ क्षणांमध्ये रडण्याची एक जागा असते, एक घर असते. तसे सुषमाजींजवळ मन मोकळे करता यायचे. ती जागा आता कायमची रिती झाली आहे. सुषमाजी गेल्या तरी त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि कार्यशैलीचा ठसा कायम राहील.

(लेखक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आहेत.)