त्या दिवशी लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मूडमध्ये होते. एका सदस्याने पंजाबातील कुठल्याशा रस्त्याची माहिती मागितली होती. त्याला उपप्रश्न येत गेले. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही दिलखुलासपणा दाखवत ते विचारू दिले. मूळ प्रश्न होता पंजाबमधला. मग एकेका सदस्यानं आपापल्या राज्यातल्या रस्त्यांविषयी विचारायला सुरुवात केली. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर.. कित्येक राज्यांच्या रस्त्यांवरून फिरून झालं. बिर्ला म्हणाले, ‘‘प्रश्नोत्तराच्या या तासाला अख्ख्या भारताचं दर्शन होतं..’’ तारांकित प्रश्न होता आणि वेगवेगळी माहिती विचारलेली होती. त्याचं टिपण गडकरींकडे नव्हतं, पण त्यांनी सदस्यांचं शंकानिरसन केलं. बसपचे खासदार दानिश अली यांनी उत्तर प्रदेशमधल्या शहरांतून जाणाऱ्या टोलनाक्यांबद्दल विचारलं होतं. गडकरी म्हणाले, ‘‘सगळी माहिती घेऊन या परिवहन भवनात चहा प्यायला. चहा पिता पिता तुमच्या शंकेचं निरसन करू या..’’ दानिश अलींनी गडकरींना कुर्निसात केला. ‘‘आप बुलाए और हम न आए..’’ असं म्हणत अलींनी चहाचं निमंत्रण स्वीकारलं. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारींनीही असाच प्रश्न विचारला होता. ‘‘पंजाबचे मुख्यमंत्री अमिरदर सिंग आणि मी तुमच्याकडं आलो होतो. त्या रस्त्याचा शुभारंभही तुम्ही केला होतात, पण पुढं काही झालंच नाही,’’ असं तिवारी सांगत होते. गडकरींनी तिवारींनाही- ‘‘चहा प्यायला या, तुमचा प्रश्न सोडवू या,’’ असं आश्वासन देऊन टाकलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड-सातारा रस्त्याबद्दल विचारलं होतं, त्याचा आढावा गडकरींनी आधीच घेतलेला होता. गडकरींच्या मंत्रालयानं एका दिवसात ४० किमीची रस्ताबांधणी करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यापैकी ३७ किमीची रस्तेबांधणी होऊ शकली. ठरवलेलं लक्ष्य थोडक्यात चुकल्याची हुरहुर त्यांना लागून राहिली आहे.

हल्लेखोर

दिल्लीत सध्या असंख्य हल्लेखोर बिनदिक्कत फिरताहेत, त्यांना अडवणारं कुणी नाही. ते मोटा भाई, छोटा भाई, दाढीवाले स्वामी अशा कोणावरही हल्ला करतात. हल्लेखोर असल्यानं त्यांना कोणाबद्दल आदर नाही. त्यामुळे सध्या दिल्लीत सावधपणे वावरावं लागत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चहाच्या पेल्यातलं वादळ निर्माण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांना बोलावून घेतलं होतं. दोन तास बैठक रंगली. त्यानंतर जयंतरावांनी नेहमीच्या शांतचित्ताने प्रसारमाध्यमांना उत्तरं दिली. त्यांच्याबरोबर अजितदादाही होते, पण ते गाडीत बसून होते, सारखे हातवारे करत होते. ते प्रचंड वैतागलेले दिसत होते. हे वैतागणं अनिल देशमुखांमुळे असावं, हा तर्क कोणालाही करता येईल. पण ते अधिक हैराण झाले होते ते दिल्लीत सध्या अवतरलेल्या हल्लेखोरांच्या झुंडीमुळे. हे हल्लेखोर म्हणजे डास. झुंडीच्या झुंडीनं ते अजितदादांच्या कारमध्ये घुसत होते. त्यांना हटकण्यासाठी दादांचे हातवारे सुरू होते. दादांचंच कशाला, तमाम दिल्लीकर सध्या दिवसाच्या कोणत्याही वेळेला, कुठंही हातवारे करताना दिसतील. दिल्लीत मोदी-शहा वा केजरीवाल यांचं नाही, तर डासांचं राज्य आहे, यावर तमाम दिल्लीकरांचं एकमत असेल. दिल्लीत मार्च-एप्रिलच्या सुमारास हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो तेव्हा आणि ऑक्टोबरच्या सुमारास गरमी संपून हिवाळा सुरू होतो तेव्हा हवामान बदलत असतं. तेव्हा इथे डास उच्छाद मांडतात. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेहमी होणारी फवारणी या वर्षी करोनामुळे थांबलेली आहे. या फवारणीमुळे श्वसनाचे आजार बळावतात, करोना रुग्णांना त्रास होतो, म्हणून पालिकेकडून फवारणी झालेली नाही; त्यामुळे डासांचं चांगलंच फावलंय. दिल्लीत डास असतातच, पण यंदा डासांचा मुकाबला करणं कठीण होऊन बसलं आहे. करोना आहेच, पण मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू असे कुठले कुठले आजारही सध्या होऊ शकतात! त्यामुळे ठरवा सध्याच्या काळात दिल्लीत यायचं की नाही ते..

नेतेपद

सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांनी पोटनिवडणूक लढवली असती तर ते कदाचित लोकसभेत काँग्रेसचे गटनेता झाले असते. इंग्रजी-हिंदीवर प्रभुत्व, पंतप्रधान कार्यालयातील कामकाजाचा अनुभव, राज्य प्रशासनाचा अनुभव, परराष्ट्रनीतीची जाण, असं चव्हाण यांचं चौफेर व्यक्तिमत्त्व केंद्रातील राजकारणासाठी अधिक सयुक्तिक होतं. त्याचा मोठा फायदा काँग्रेसला लोकसभेत करून घेता आला असता. गेल्या लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे गटनेते होते. पण त्यांचा पराभव झाला आणि आता ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनले आहेत. गांधी-निष्ठावान राहिल्याचे फळ बेहरामपूरचे ‘रॉबिनहूड’ अधीररंजन चौधरींच्या पदरात पडलं. ते लोकसभेत गटनेता झाले. पण त्यांच्या नेतेपदामुळे सभागृहात वाद निर्माण होत असतो. गेल्या वर्षी त्यांनी इंदिरा गांधींना गंगा नदी आणि मोदींना नाल्याची उपमा दिली होती. मग माफी मागण्याचीही तयारी दाखवली. त्यांची शेरेबाजी कामकाजातून काढून टाकली गेली. चौधरी अशी अनपेक्षित टिप्पणी नेहमी करतात. ते सध्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत व्यग्र असल्यामुळे लोकसभेत काँग्रेसचा किल्ला लढवण्याची जबाबदारी मनीष तिवारी आणि रवनीतसिंग बिट्टू यांच्यावर येऊन पडली. दोघे त्वेषाने लढत होते. शशी थरूरही अधूनमधून होते. त्यांनी शिक्षणमंत्र्यांना सैनिक शाळांसंदर्भात प्रश्न विचारला होता. पण त्यांना सांगण्यात आलं की, हा प्रश्न संरक्षण मंत्रालयाला विचारायला हवा होता, कारण सैनिक शाळा शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येत नाहीत. रवनीतसिंग यांनी कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाचा प्रश्न विचारला होता. ते ‘सीएसआर’ हा शब्द सातत्याने ‘सीआरएस’ असा उच्चारत होते. अखेर अर्थराज्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, निदान शब्द तरी नीट वाचून या. रवनीतसिंग यांच्याकडे गटनेतेपदाची तात्पुरती जबाबदारी दिली होती. ‘जी-२३’ गटातील मनीष तिवारी लोकसभेत नियमित उपस्थित असतात. ते आक्रमक बोलतात, पण त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेसकडे कोणीच नव्हतं.

गेले माधव कुणीकडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्या ‘अपत्या’ला परत बोलवावं लागलंय. केंद्रात मोदी-शहांची सत्ता आल्यापासून संघालादेखील सबुरीनंच घ्यावं लागतंय, त्याला राम माधव तरी काय करणार? ते संघाच्या मार्गदर्शक मंडळात गेले आहेत. आता नवे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या नव्या चमूत त्यांना काम करावं लागेल. होसबळे हे पक्के मोदी समर्थक मानले जातात. म्हणून तर त्यांच्या नियुक्तीबाबत अखेपर्यंत कोणालाही शाश्वती नव्हती. होसबाळेंना आता मोदी-शहांना नकोसे झालेल्या राम माधव यांना सांभाळावं लागणार असं दिसतंय. खरं तर राम माधव ‘ल्युटन्स दिल्ली’मध्ये फिट बसले होते. खान मार्केटचा परिसरही त्यांना परिचयाचा होता. एके काळी राम माधव यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला न कळवताच जम्मू-काश्मीरच्या आघाडी सरकारमधून भाजप बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. राम माधव यांनी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात येऊन हा धक्का दिला, त्या वेळी राजनाथ सिंह गृहमंत्री होते. पंतप्रधान झाल्यावर मोदींच्या पहिल्या अमेरिकावारीत राम माधव यांचा सहभाग मोठा होता, पण ‘हाऊडी, मोदी!’वारीत मात्र ते लांब राहिले. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डांनीही त्यांना आपल्या चमूत घेतलं नाही. महासचिवपदी नवे चेहरे आले. राम माधव यांना राज्यसभेचंही सदस्यत्व मिळालं नाही. त्यांच्या हातून जम्मू-काश्मीर गेलं. ईशान्येकडील राज्ये गेली. आता ते सगळा वेळ परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करू शकतील. मोदी-शहांना त्यांच्या चमूत त्यांच्यापेक्षा जास्त बोलणारे लोक पसंत नाहीत, ही मूलभूत बाब राम माधव यांना कळली नसावी. आता ‘गेले माधव कुणीकडे’ असं विचारावं लागतंय. ते पुन्हा शाळेत गेलेत, संघाच्या चिंतन शिबिरात सापडतील. भाजपला त्यांनी तूर्तास राम राम ठोकलाय.