08 March 2021

News Flash

निरोगी महाराष्ट्रासाठी..

संस्थेने आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

महाराष्ट्र आरोग्य मंडळ

महाराष्ट्र आरोग्य मंडळ या संस्थेची स्थापना साडेपाच दशकांपूर्वीची. महाराष्ट्राला निरोगी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झालेल्या या संस्थेचे कार्य शिक्षण, ग्रामविकास या क्षेत्रांपर्यंत विस्तारले आहे. आदिवासी पट्टय़ातील नागरिकांमध्ये रक्तातील आनुवंशिक घटकामुळे जनुकीय आजार (सिकल सेल अ‍ॅनिमिया) प्रामुख्याने आढळतो. या विकाराशी लढण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी गरज आहे ती या लढय़ाला बळ देण्याची..

आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास या त्रिसूत्रीच्या आधारे साडेपाच दशकांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र आरोग्य मंडळ या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर राहून आरोग्य सेवा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. साने गुरुजी यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक अशा डॉ. सि. तु. ऊर्फ दादा गुजर यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशातून दोन डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने साठीच्या दशकात महाराष्ट्र आरोग्य मंडळाची स्थापना केली. त्या काळात ओसाड माळरान आणि दुष्काळी भाग अशी ओळख असलेले हडपसर ही संस्थेची कर्मभूमी झाली. दादांच्या प्रेरणेने कामाची व्याप्ती वाढली. या परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेचा विस्तार वाढत गेला आणि शिक्षण क्षेत्रामध्येही संस्थेने पायाभूत स्वरूपाचे कार्य केले. दादा गुजर यांचे पुत्र अनिल गुजर हे आता संस्थेची धुरा समर्थपणे पेलत असून दादांचा वारसा पुढे नेत आहेत.

हडपसर येथे साने गुरुजी बालक मंदिर, साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, महंमदवाडी येथे प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, शिरीषकुमार बालक मंदिर आणि उच्च माध्यमिक विद्यालय या माध्यमातून संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्र आणि सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. दादा गुजर आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था, डिंभे येथील भीमाशंकर आदिवासी विकास प्रकल्प आणि ज्ञानदा हे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र, भीमाशंकर परिसरातील नारोडी येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह असा संस्थेच्या शाखांचा विस्तार झाला आहे. हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये अगदी अल्प दरामध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा देत उपचार केले जातात. आदिवासी पट्टय़ातील नागरिकांमध्ये रक्तातील आनुवंशिक घटकामुळे उद्भवणारा जनुकीय आजार (सिकल सेल अ‍ॅनिमिया) प्रामुख्याने आढळून येतो. या विकाराशी लढण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा सिकल सेल रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी संस्थेला अर्थसाह्य़ाची आवश्यकता आहे.

‘देशासाठी जगेन’ या साने गुरुजी यांच्या विचारांनी भारलेल्या डॉ. दादा गुजर, डॉ. मरतड पाटील आणि डॉ. गोपाळ शाह या आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण पूर्ण करून १९६० मध्ये या तिघांनी मंगळवार पेठेमध्ये रुग्णसेवा सुरू केली. खानदेशातील दोंडाईचे गावी जाऊन रुग्णसेवा करण्याचा विचार सुरू असतानाच हे तिघेही डॉ. बाबा आढाव यांच्या संपर्कात आले. बाबांचा हडपसर आणि नाना पेठ येथे दवाखाना होता. या तिघांनी बाबांसह हडपसर येथे कामास सुरुवात करण्याचे ठरविले. डॉ. सिंधू केतकर यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची इच्छा दर्शविली. रुग्णालयामध्ये स्त्री डॉक्टरची आवश्यकता होतीच. त्यामुळे केतकर या चौघांच्या कामामध्ये सहभागी झाल्या. त्या काळात आठ-दहा हजार वस्तीचे मोठे खेडे असलेल्या हडपसरमध्ये काही वेळा कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया कराव्या लागत. महापालिकेची कोणतीच आरोग्य सेवा या परिसरात नव्हती. या शिलेदारांनी रुग्णसेवेचे काम करण्याचे ठरविले त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी सारा महाराष्ट्र आंदोलन करीत होता. या महाराष्ट्राला निरोगी बनविण्याचे स्वप्न मनात बाळगूनच या सर्व डॉक्टरांनी सेवाभावी कार्यकर्ते आणि हितचिंतकांना सोबत घेतले. आपापल्या दवाखान्यातील साधनसामग्रीची किंमत म्हणून केवळ १२ हजार रुपयांचा विश्वस्त निधी स्थापन केला आणि महाराष्ट्र आरोग्य मंडळाची स्थापना केली. साने गुरुजी यांच्या दहाव्या स्मृतिदिनी म्हणजे ११ जून १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचे नेते एस. एम. जोशी यांच्या हस्ते साने गुरुजी रुग्णालयाचे उद्घाटन झाले. कालांतराने रुग्णालयाचा विस्तार होऊन साने गुरुजी आरोग्य केंद्र असे त्याचे स्वरूप विस्तारले.

ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा द्यायची तर त्यांना परवडेल इतकाच मोबदला घ्यायचा, त्याचबरोबरीने संस्था चालविण्याइतपत उत्पन्न मिळवायचे. पण हे करताना पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचारांविना परत जाऊ द्यायचा नाही, असे धोरण रुग्णालयाने पहिल्या दिवसापासून स्वीकारले. चार खाटा टाकून रुग्णालयाची सुरुवात झाली तेव्हा हडपसरमध्ये एकही निवासी डॉक्टर नव्हता. महिना ९० रुपये देऊन जागा घेतल्यानंतर खोल्यांना रंग लावण्याचे काम संस्थेच्या डॉक्टरांनी रात्री जागून केले. रुग्णालयासाठी लागणाऱ्या खाटा, खुच्र्या, टेबल हेही कमीत कमी किमतीत जुन्या बाजारातून आणले. आता या रुग्णालयामध्ये २०० खाटा असून २४ तास सेवा दिली जात आहे. अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक शल्यकर्म विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी कक्ष, आयुर्वेद चिकित्सा कर्म, शल्यकर्म, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कुटुंबकल्याण, दंत, नेत्र, कान-नाक-घसा, क्ष-किरण, हृदयरोग, क्षयरोग, एडस् अशा विभागांद्वारे अनेक सेवा दिल्या जातात. दर वर्षी १८ हजारांहून अधिक रुग्णांसह एक लाखाहून अधिक बाह्य़ रुग्णांवर उपचार केले जातात. तिरळेपणा दूर करण्यासाठी केलेल्या १३० मोफत शस्त्रक्रियांमुळे आरोग्य केंद्राचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदले गेले. २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला तेव्हा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णालयाने सात दिवसांत ३५ हजारहून अधिक लोकांना मोफत आयुर्वेदिक काढय़ाचे वाटप केले. तर २०१० मध्ये प्रतिबंधात्मक लस कमीत कमी किमतीत उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा १५ हजार लोकांनी घेतला.

हडपसर परिसराच्या विकासामध्ये योगदान देण्याच्या उद्देशातून रुग्णालयाने आवाबेन देशपांडे, डॉ. लीला भागवत, डॉ. सिंधू केतकर यांच्या नेतृत्वाखाली १९६३ मध्ये कुटुंब नियोजनाच्या कामाचे केंद्र सुरू केले. कुटुंब नियोजनाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल संस्थेला भारत सरकारचे प्रथम पारितोषिक मिळाले.

संस्थेने आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. १९७२ च्या दुष्काळात संस्थेने हडपसर परिसरात पाणी आणि माती अडवण्यासाठी चर खणले. १४ लहान धरणे बांधली. १७ विहिरींचे पुनरुज्जीवन केले. साडेचार हेक्टरवर झाडे लावली. सात शाळांच्या बांधकामासाठी मदत करून २६ किलोमीटरचे रस्ते बांधले. परिसरातील गावांमध्ये रोगराईला कारणीभूत असणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करण्याच्या पद्धती विकसित केल्या. दुष्काळानंतर संस्थेने २० वर्षे काम केले. या काळात ९० बंधारे, ७० विहिरींचे काम आणि दुरुस्ती, एक लाखाहून अधिक झाडे, १९ डेअरी, ११ बालवाडय़ा, १९५ विंधनविहिरी अशी शेतीविकासाची कामे केली. संस्थेने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांतील ५५० गावांमध्ये ७९५ कूपनलिका खणून पिण्याच्या पाण्याची सोय केली. १९९३ मध्ये लातूर येथील भूकंपात ९५ घरे बांधून दिली. १९९८ मध्ये गुजरातमधील दुष्काळात गुरांना शेकडो टन चारा पुरविला.

महाराष्ट्र आरोग्य मंडळाने १९८१ पासून खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील महादेव कोळी आदिवासी बांधवांचे राहणीमान उंचावण्यासाठी कार्य केले आहे. िडभे येथील भीमाशंकर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २०७ आदिवासी वाडय़ा-वस्त्यांमधील ३६ हजारांहून अधिक लोकांसाठी हे काम सुरू आहे. स्वयंपाकासाठी होणारा इंधनाचा खर्च आणि वृक्षतोड थांबविण्यासाठी संस्थेने अत्यल्प कचरा आणि शेणापासून तयार होणारा बायोगॅस प्लांट विकसित केला आहे. त्याचबरोबरीने निर्धूर चुली वापरात आहेत. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी विविध गावांमध्ये उपक्रम राबवून एक हजार हेक्टरहून अधिक पडीक जमीन लागवडीखाली आणली आहे. ७६ धान्य बँका आणि चार सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत.

संस्थेच्या कामामुळे गावकऱ्यांना रोजगार तर मिळालाच, पण स्थलांतरही रोखले गेले. आदिवासी मुलींना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी संस्थेने १९८८ मध्ये नारोडी (ता. आंबेगाव) येथे मुलींच्या मुक्तांगण वसतिगृहाची स्थापना केली. दुर्गम भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या आदिवासी मुली येथे राहतात. त्यांच्या शिक्षणाबरोबरच राहण्याचा आणि जेवण्याचा सर्व खर्च संस्था करते. या मुलींसाठी इंग्रजी, गणिताचे वर्ग घेण्याबरोबरच संगणकाचेही प्रशिक्षण दिले जाते. आधी आपले नाव सांगायलाही लाजणाऱ्या या मुली आता पोलीस, शिक्षिका, परिचारिका होऊन विविध क्षेत्रांत पाय रोवून उभ्या आहेत.

आयुर्वेद महाविद्यालय

राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे काम करीत असताना आपल्या संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय असावे हे स्वप्न दादा गुजर आणि वैद्य य. गो. जोशी यांनी पाहिले. त्यातूनच १९९० मध्ये सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली. दीड वर्षांतच तीन मजली सुसज्ज इमारत उभी राहिली. बीएएमएस आणि एम.डी. व एम.एस. आयुर्वेद हे पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे चालविले जातात. आयुर्वेदाचे शिक्षण आणि संशोधन हे ध्येय ठेवून महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. ८०० विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदीय औषधनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली होती. सामाजिक दृष्टिकोन, आयुर्वेदाचा गाढा अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या पद्धतींची जाण असलेले संशोधक-विद्यार्थी संस्थेतून घडावेत हे दादांचे स्वप्न साकारण्यासाठी संस्थेने २००६ मध्ये डॉ. दादा गुजर आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन केंद्राची स्थापना केली. येथे दहा विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असून चार विषयांत पीएच.डी. करण्याची सुविधा आहे. २००२ मध्ये परिचारिका विद्यालय स्थापन करण्यात आले आहे. गरीब आणि आदिवासी मुलींना येथे प्रवेश दिला जातो. साने गुरुजी आरोग्य केंद्राला लागणारी उत्तम दर्जाची आयुर्वेदीय औषधे रास्त दरात आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यासाठी संस्थेने स्वत:चे औषधी निर्माण केंद्र सुरू केले.येथे दोनशेहून अधिक औषधे तयार केली जात आहेत.

संस्थेपर्यंत कसे जाल?

महाराष्ट्र आरोग्य मंडळ

पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर गावातील उड्डाणपुलापासून डाव्या हाताला (स्वारगेटकडून हडपसरकडे जाताना) वळावे. त्यानंतर हमरस्त्यापासून छोटय़ा रस्त्याने गेल्यानंतर समोरच विठ्ठल तुपे संकुल आहे. तेथून उजवीकडे वळल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य मंडळ संस्थेच्या साने गुरुजी रुग्णालयाची इमारत आहे.

धनादेश -‘महाराष्ट्र आरोग्य मंडळ’

(maharashtra aarogya mandal)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा.

देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

यासाठी मदत हवी

संस्थेने ‘सिकल सेल’ रुग्णांवरील उपचार आणि संशोधनासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच आदिवासी मुलींसाठी नवी इमारत उभारण्याची आवश्यकता आहे.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

विद्याधर कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:59 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2017 maharashtra arogya mandal
Next Stories
1 दुख उधळायास आता, आसवांना वेळ नाही..
2 राजकारणातले ‘डेरे’दार
3 राज्यातील प्रभावशाली धर्मनेते . . . 
Just Now!
X