दयानंद लिपारे

ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेली ‘नवशिक्षण प्रसारक मंडळा’च्या शाळेची इमारत यंदाच्या पावसात जमीनदोस्त झाली. सध्या दोन वेगवेगळ्या इमारतींमध्ये भाडय़ाच्या जागेत शाळेचे वर्ग भरत आहेत. पण या संकटाने संस्था डगमगलेली नाही. शाळेची नवी इमारत उभी करण्याचा संस्थेचा निर्धार भक्कम आहे..

तशिवार चिंब भिजवणाऱ्या, सर्जनाचा अनोखा आविष्कार घडविणाऱ्या श्रावणसरी आल्हादायकच; पण यंदा श्रावणधारा बेफामपणे कोसळल्या आणि सांगली, कोल्हापुरात हाहाकार उडाला. काहींचे प्राण गेले आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अगदी शाळाही त्यास अपवाद ठरल्या नाहीत. अशाच एका शाळेची आधीच मोडकळीस आलेली इमारत पावसाच्या माऱ्यात पूर्णत: जमीनदोस्त झाली. जमीनदोस्त झालेली प्रशाला डोईवर किमान छत असावे या आशेने पाहत आहे. ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘नवशिक्षण प्रसारक मंडळा’च्या शाळेची ही दुरवस्था. तिशीकडे वाटचाल करणारी ही संस्था मोठय़ा हिमतीने आव्हानांचा सामना करत आहे.

नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा या संस्थेची स्थापना १९९१ सालची.पंचक्रोशीतील मुलींची पायपीट थांबावी आणि त्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी १९९२ मध्ये पन्हाळा गडाच्या पायथ्याशी हाकेच्या अंतरावर असलेल्या बुधवार पेठ ग्रामपंचायत येथे ‘कन्या हायस्कूल’ या नावाने मुलींची शाळा सुरू झाली. त्याआधी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक वाडय़ा-वस्तींतील मुलींना सातवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी पन्हाळा गडावरील एकमेव शाळेशिवाय पर्याय नव्हता. डोंगरकपारीतून वाटा तुडवीत गडावर जाऊन शिक्षण घेणे लहान मुलींना शक्य नव्हते. त्यामुळे बहुतांश मुली सातवीनंतर शाळा सोडायच्या. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने कन्या हायस्कूल सुरू केले आणि पायथ्याशी असणाऱ्या सोमवारपेठ, आपटी, इब्राहिमपूरपेठ, गुरुवारपेठ, रामापूरपेठ, नेबापूर, बुधवारपेठ, जगदाळवाडी, बांबरवाडी, आंबवडे, मिठारवाडी, जाफळे, दाणेवाडी तसेच पन्हाळागडाचा पूर्व भाग पावनगड इत्यादी गावांतून मुली आठवी ते दहावीचे शिक्षण घेण्यास कन्या हायस्कूलमध्ये येऊ लागल्या.

शाळेचे संचालक मंडळ तसे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांतील. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या या मंडळींनी गावात मुलींची शाळा सुरू व्हावी, या हेतूने शाळेची पायाभरणी केली. संस्थेचे अध्यक्ष सदाशिव मोरे राज्याच्या तंत्र शिक्षण विभागात अधीक्षक, उपाध्यक्ष असफअली मुजावर हे वन विभागात लेखापाल, संस्थापक हंबीरराव कुऱ्हाडे हे प्राध्यापक, तर प्रकाश गवंडी हे शिक्षक होते. त्यांनी स्वत:चे पैसे खर्च करून शाळा चालवण्याचे काम नेटाने केले.

शाळा स्थापनेपासून ते १९९६ अखेर शाळा विनाअनुदानित तत्त्वावर होती. त्यामुळे संस्थेने स्वखर्चातून शाळा चालवली. इमारत भाडे, कर्मचारी पगार इत्यादी खर्चाबरोबर शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचे कार्य केले. १९९६ हे वर्ष शाळेच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरणारे होते. शाळेला १०० टक्के अनुदान प्राप्त झाले. त्यामुळे शैक्षणिक कार्याला चालना मिळाली. शाळेचा लौकिक वाढला. शाळाबाह्य़ मुली इथेच दहावीपर्यंत शिकू लागल्या. दहावीनंतर शाळेतून बाहेर पडलेल्या मुली पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊ लागल्या. सन २०१४ अखेर या शाळेत ७९४ मुलींनी शिक्षण घेतले.

आपल्याकडची गिरिशिखरे ही जशी पर्यटकांना आकर्षित करू लागली तशी तेथे श्रीमंती थाटाच्या शाळा, महाविद्यालयांच्या भव्य वास्तूही आकाराला येत असल्याचे अलीकडे सर्रासपणे पाहायला मिळते. इतिहास आणि निसर्गसौंदर्य यांचा मेळ असणारे पन्हाळा तरी त्याला अपवाद कसे ठरावे? परिसरात आकर्षक पायाभूत सुविधांनी युक्त नव्या शाळा सुरू होऊ लागल्या. त्याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर होऊ लागला. घरापासून जवळ असलेल्या शाळांना मुली पसंती देऊ लागल्या. त्यामुळे शाळेचे अस्तित्व टिकविण्यासाठी संस्थेने शैक्षणिक मूलाधार विस्तारण्याचे ठरवले. त्यातून सह-शालेय शिक्षण (मुला-मुलींची एकत्रित शाळा) सुरू केले आणि २०१४  पासून कन्या हायस्कूलचे ‘न्यू हायस्कूल’ असे नामकरण झाले. पटस्पर्धा असूनही त्या वेळी शाळेचा पट ९८ इतका होता. सह-शालेय शिक्षण असलेल्या प्रशालेत आतापर्यंत ९८८ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. शाळेमध्ये पाच शिक्षक व चार शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

१९९९ अखेर शाळेचे कामकाज भाडय़ाच्या इमारतीत सुरू होते. ही इमारत गैरसोयीची होत असल्याने शाळेतील तीन शिक्षकांनी २००० साली  पाच खोल्यांची इमारत लोकसहभागातून बांधली. शाळेला स्वत:ची ऊब देणारे छत लाभले. याच वास्तूत शैक्षणिक कार्यास गती आली. अनेक वर्षे दहावीचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक राहिला आहे. २०१२ पासून बहुतांश वर्षे दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. दोन विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला आहे. हल्ली विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने, खासगी अभ्यासवर्ग याची सहजच उपलब्धता असते; पण या प्रशालेमधील कोणत्याही विद्यार्थ्यांला या सुविधा मिळत नाहीत. शिक्षकांचे मार्गदर्शनच विद्यार्थ्यांना यश मिळवून देते.

या शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात. अनाथालयातील विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन, सीमेवरील जवानांसाठी स्वत: राख्या बनवून पाठवणे, आकाशकंदील, पणत्या रंगवणे, शालेय ग्रीन मंचच्या माध्यमातून पर्यावरणरक्षण असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. कोणतेही पाठबळ नसताना शिक्षण संस्था चालवणे हे खरे आव्हानात्मक असते. मात्र, त्यावर मात करत ही संस्था वाटचाल करत असताना निसर्गाने मोठे आव्हान उभे केले. गेल्या वर्षी पावसामुळे इमारतीच्या दोन खोल्या कोसळल्या. शाळा पुन्हा भाडय़ाच्या इमारतीत भरवावी लागली. त्यातच यंदा  पावसाने हाहाकार माजवला. त्यात शाळेच्या उरलेल्या तिन्ही खोल्या कोसळल्या. आता शाळेचे वर्ग दोन ठिकाणच्या इमारतींत भाडय़ाच्या जागेत भरवले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. पन्हाळगडात जमिनीचे भाव वाढले आहेत. जमिनीचे भाव वाढल्याने जागा विकत घेऊन इमारत बांधणे हे मोठे आव्हान आहे. तरीही शाळेची छोटेखानी, सर्वसोयींनी युक्त इमारत उभी करण्याचे संस्थेचे स्वप्न आहे. त्यासाठी दानशूरांचे मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. संचालक, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी कार्यकर्ते निधी संकलनासाठी प्रयत्न करीत आहेत. पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्यासारख्या अनेक सहृदयींना शाळेविषयी आस्था आहे. त्यांच्यासह शाळेचे अध्यक्ष हंबीरराव खराडे, शिक्षक आदींनी शाळेच्या इमारतीची पाहाणी केली आहे.

शाळा बंद पडलीच तर कर्मचाऱ्यांचे इतरत्र समायोजन केले जाईल. मात्र, परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय असेल, असा प्रश्न सतावू लागला आहे. शाळेला सावरण्यासाठी  दानशूर व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याशी जमीनदोस्त झालेली शाळेची ही इमारत पुन्हा उभी राहण्यासाठी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

स्पर्धा, उपक्रमांत ठसा

विविध स्पर्धा आणि उपक्रमांत शाळेतील विद्यार्थ्यांनी ठसा उमटवला आहे. जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित हिंदी वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वर्षे शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण राज्यस्तरीय नाटय़स्पर्धेतही शाळेने जेतेपदावर नाव कोरले. जिल्हास्तरीय निबंध, हस्ताक्षर स्पर्धेत यश, विज्ञान स्पर्धेत पुरस्कार, उत्कृष्ट नृत्य पारितोषिक अशी बक्षिसे शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत. अनाथालयातील विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन, सीमेवरील जवानांसाठी स्वत: राख्या बनवून पाठवणे, आकाशकंदील, पणत्या रंगवणे, शालेय ‘ग्रीन मंच’च्या माध्यमातून पर्यावरण- रक्षण असे अनेक उपक्रमही शाळेत राबविण्यात येतात.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

‘न्यू हायस्कूल’ कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे जाताना नेबापूर रस्त्यावरील वीर शिवा काशीद समाधीच्या स्वागत कमानीजवळ.

नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा

(Navshikshan  Prasarak Mandal, Panhala)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट

नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग,

एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट

नं. १२०५/२/६, शिरोळे

रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग,

प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००