|| प्रदीप आपटे

आजच्या महाराष्ट्रातील घारापुरी, बेडसा, पितळखोरे अशा अनेक लेण्यांचा अभ्यास जेम्स फग्र्युसन व जेम्स बर्गेस यांनी केला. या दोघांना लेणी पाहून अनेक प्रश्न पडत, त्यांची उत्तरे शोधण्याचे काम पं. भगवानलाल इंद्र यांच्यामुळे सुकर झाले…

पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्राचीन लेण्यांचे जेम्स फग्र्युसनला आणि जेम्स बर्गेसला अतोनात आकर्षण वाटले. पण ते निव्वळ वास्तुरचनेचा अद्भुत नमुना म्हणून नाही. फक्त या दोघांनाच नव्हे तर अनेक परकीयांना एक प्रश्न सतावत असे. फग्र्युसनच्या पुस्तकातील पहिल्याच प्रकरणामध्ये त्याने या प्रश्नाचा उल्लेख केला आहे. त्याचा सारांश असा – ‘इतक्या प्रदीर्घ काळापासून इतक्या विस्तृत भूभागावर नांदणाऱ्या या प्राचीन संस्कृतीमध्ये भूतकालीन नोंद ठेवणारा कालपट मात्र मिळत नाही! हा अभाव विचित्र वाटतो. चीन, इजिप्त या संस्कृतींमध्ये त्यांच्या राजवटी आणि राजांची अगदी निगुतीने निदान ‘बालनोंद’ केलेली मिळते. त्यांच्या लिपी प्रतीकात्मक किचकट आहेत, तरीदेखील या नोंदी आढळतात. पण जिथे ‘अक्षर’ आणि  सुव्याखित व्याकरण असलेल्या भाषेचा उदय इतक्या पूर्वी झाला तिथे अशा नोंदी अधिक सहजसुलभ असायला पाहिजे होत्या! अशा समाजसंस्कृतीला अशा नोंदी राखणे अगदी स्वाभाविक असायला हवे! पण तसे ते आढळत नाही. आणि याचे बुद्धिगम्य कारणच सापडत नाही!’’… ‘‘दुसरे कोडे म्हणजे या देशाची सीमा बव्हंशी नैसर्गिकरीत्या बंदिस्त आहे. त्यामध्ये इतक्या विभिन्न वंशाचे लोक इतका काळ एकत्र आहेत. परंतु त्यांचे एकसंध असे राष्ट्र असे कधी उभे राहिलेले नाही. अशोकाच्या काळी बराचसा भूभाग एका छत्राखाली आला. परंतु त्या साम्राज्याच्या नंतर फार काळ अशी राजवट नव्हती…’’

लिखित ऐतिहासिक सामग्रीचा, कालानुरूप नोंदींचा इतका अभाव कसा भरून काढायचा? दडून गेलेले किंवा दुर्लक्षिलेले शिलालेख किंवा अन्य पट त्याची कसर थोडीबहुत भरून काढू शकतात, हे लक्षात आले होते. शिलालेखांसारख्या साधनांची इतर परकीय नोंदींशी सांगड घालून काही ना काही हाती गवसू शकते या अनुभवाने आणि आशेने या दोघांची धडपड चालू होती. दोघांनी संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘दि केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ (१८५६). ही लेणी दृष्टीस पडल्यावर जे अनेक व्यावहारिक आणि तात्त्विक स्वरूपाचे प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे शोधण्याचा कसून प्रयत्न केलेला या पुस्तकात आढळतो. उदाहरणार्थ अशा प्रकारची पाषाणात कोरलेली लेणी या किंवा काही भागांतच अधिक का आढळतात? ती इतकी विषमपणे विखुरलेली का? आधी लाकडी कोरीव कामातच असणारा नक्षी आणि कोरण्याचा आढळ कालांतराने कसकसा बदलला? लाकडी कोरीव कामाची धाटणी पाषाण कोरीव कामात कशी रूपांतरित झाली? डोंगरातले सलग पाषाण हेरून त्यांत शिल्पवास्तू कोरण्याऐवजी उघड्या सपाटीवर कोरलेले दगडांचे शिल्प रचत आणि बांधत जाणे अधिक स्वस्त आणि सुलभ असू शकते का? या पुस्तकाला जोड असलेले ‘इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम दि केव्ह टेम्पल्स ऑफ वेस्टर्न इंडिया’ हे बर्गेसचे पुस्तक बघावे. विशेष म्हणजे या पुस्तकासाठी भगवानलाल इंद्रजी पंडित हे बर्गेसचे सहलेखक आहेत. हेच सोपारा येथील स्तूपाचे उत्खनन करणारे संशोधक. संस्कृत, प्राकृत आणि निरनिराळ्या लिपींचे वाचन यात त्यांना अप्रतिम गती होती. त्यांना इंग्रजी समजत असे, पण लिहिण्या-बोलण्यात कचरायचे. प्रथम भाऊ दाजी लाड यांनी त्यांना पाठबळ आणि खूप साह््य दिले. बर्गेस आणि नंतर ब्यूहलर या दोघांनी या देशी पंडिताला यथोचित श्रेय दिले (भगवानलालांची कर्तबगारी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.). कालांतराने म्हणजे १८९३ साली प्रा.आल्बर्ट ग्य्रून्वेडेल या जर्मन संशोधकाने ‘बुद्धिस्टिश् कुन्स्ट इन इंडिएन’ (बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया) नावाचा सचित्र ग्रंथ लिहिला. त्यातले संशोधन प्राचीन भारताबद्दल रस असणाऱ्या संशोधकांना इंग्रजीत उपलब्ध झालेच पाहिजे असे बर्गेसला वाटले. या तीव्र ध्यासाने बर्गेसने त्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे भाषांतर करवून घेतले आणि प्रकाशित केले.

पश्चिम महाराष्ट्रातील लेणी संख्येने विपुल आणि अनेक दृष्टीने विशेष आहेत. बुद्धधम्माच्या इतिहास दृष्टीने आणखी विशेष आहेत. बुद्धधर्माच्या इतिहासाचे साक्षीदार असलेली अनेक लेणी-केंद्रे याच भागात मिळतात. आज पालघर जिल्ह्यात असणारे सोपारा -म्हणजे पूर्वीचे शूर्पारक- हे अतिशय प्राचीन बंदर होते. व्यापाराने गजबजले होते. इथूनच अशोक पुत्र आणि कन्या धम्मप्रसारार्थ श्रीलंकेत गेले, असेही मानतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वत: गौतम बुद्ध आपल्या अनेक भिख्खूंसह येथे भेटून गेले होते. त्यांच्या निर्वाणाच्या स्मरणार्थ सम्राट अशोकाने येथे स्तूप स्थापला. बॉम्बे गॅझेटिअरचा संपादक जेम्स कॅम्पबेलने सोपाराजवळच्या गावात असलेल्या ‘बुरुड राजाच्या कोटा’चे (किल्ल्याचे) रेखाटन भगवानलाल यांना पाठविले. पंडित भगवानलाल यांना हा साधा ‘कोट किल्ला’ नसावा असे जाणवले. त्यांनी या स्थळाची छाननी आणि उत्खनन केले. तेथे एक मोठा स्तूप आढळला. त्याची ठेवण सांची स्तूपाशी मिळतीजुळती होती. इथे उत्खनन करताना जवळपास तेरा फूट खोलीवर एक पेटारा आढळला. त्यात काही बुद्धमूर्ती गवसल्या. त्यात एक होती मैत्रेय बोधिसत्वाची. भगवानलाल यामुळे आणखी उत्सुक झाले. या मूर्तींच्या रिंगणामधोमध एकात एक बसवून दडलेल्या करंड्या होत्या. त्या तांबे, चांदी, शिळा आणि स्फटिकाच्या होत्या. प्रत्येक करंड्यात सोन्याची फुलं होती. अखेरीस एक सोन्याचा करंडा होता. त्यातदेखील सोन्याची फुले होती. शिवाय येथेच, चिनीमातीच्या भांड्याचे तुकडे आणि राख मिळाली. या वस्तू खुद्द गौतम बुद्धाशी संबंधित आहेत असे समजले जाते. एक नाणेही मिळाले; त्यावर ‘गौतमीपुत्र यज्ञश्री सत्कर्णी’ असे नामाभिमान आहे. भगवानलाल यांनी या नावाबद्दल आणि नाण्याबद्दल तर्क लढविला. तोही टॉलेमीच्या इतिहासानुसार. त्यानुसार काठेवाडच्या रुद्रदमन राजाच्या समकालीनांमध्ये हे नाव आढळते, म्हणजे या स्तूपाचा काळ येतो सुमारे इसवी सन १६०. इथून जवळच्या गावांमध्ये अशोकाचा आठवा आणि नववा शिलालेख आढळला. हे लेख आता मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त बघायला मिळतात. अर्थातच ही बुद्धधम्म इतिहासातील अपार मोलाची जागा!

पश्चिम घाटामध्ये बुद्धधर्माच्या प्रारंभकालातील काही महत्त्वाची लेणी आहेत. त्यातली काही तुलनेने बरीच जवळजवळ आहेत. उदा. कार्ले-भाजे आणि बेडसे/ बेडसा. या कालखंडामधील लेण्यांमध्ये ढोबळपणे सांगायचे तर चैत्य आणि विहार अशा दोन प्रकाराच्या रचनांचा समावेश असतो. हीनयान कालखंडातील या लेण्यांमधील मूर्तीप्रकार, सजावट नंतरच्या लेण्यांपेक्षा निराळी आहे. निरनिराळ्या लेण्यांचे वेगळेपण आणि शैलीमधली स्थित्यंतरे बर्गेस-फग्र्युसनच्या पुस्तकात नोंदलेली आहेत.

मुंबईत आल्यावर बर्गेसचे लक्ष प्रथम वेधून घेणारी लेणी घारापुरीची! मुंबई बेटानजीकच्या एका बेटावर टेकड्या होत्या. लगतच्या सपाटीवर गाव वसले होते. तिथे बुद्ध स्तूप आणि शिव मंदिरे होती. प्रथम पोर्तुगीजांनी या बेटावरच्या गावात आपला सैनिकी तळ ठोकला. त्यामुळे मूळ वस्ती विरळली आणि उजाड झाली. तळावरच्या सैनिकांनी लेण्यांतील मूर्ती, कोरीव काम काही प्रमाणात विद्रूप केले! तेथे एका सलग पाषाणात कोरलेले धिप्पाड हत्ती होते. पोर्तुगीजांनी त्यावरून ओळखीची विशेष खूण म्हणून ‘एलेफान्टे’ नाव पाडले (ब्रिटिशांना येथील वस्तू उचलून लंडनच्या संग्रहालयात नेण्याची भुरटी खोड जडली होती. राज्यकर्ते झाल्यावर ती अधिकच बळावली. त्यातला एक हत्ती उचलून नेण्याचा त्यांचा मनसुबा होता. ते अवजड धूड पडून कोसळले आणि मोडकळले. म्हणून आता ते राणीच्या संग्रहालयाऐवजी, राणीच्या बागेत विराजले!). तिथे अगोदर बुद्धधर्मीयांची लेणी व स्तूप होते. नंतर तिथे शिवमंदिरांची लेणी कोरली गेली. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडातले धार्मिक चलनवलन आणि बदलत्या राजवटींचे पाठबळ यांनी घडलेले हे संमिश्र रूप!

सोपारा आणि मुंबई बेट यांच्यापासून सारख्याच अंतरावरील कान्हेरी लेण्यांमध्ये बुद्धधम्माचे मोठे विद्यापीठ म्हणावे असे केंद्र होते. अगदी सुरुवातीच्या काळातील लेणी निराळ्या शैली आणि ठेवणीची असतात. हा मोठा भिख्खूविहार होता. कालांतराने बुद्ध धर्मविचाराच्या भिन्न शाखा उद्भवल्या. त्यातल्या जपानमध्ये प्रभाव पसरलेल्या शाखेपर्यंतचे ठसे या एकाच ठिकाणी मिळतात. या मोठ्या लेण्यांखेरीज मुंबईमध्येच जोगेश्वरीजवळ महायानकालीन लेणी आहेत. याशिवाय बोरिवली स्थानकापासून मैलभर अंतरावर एक लेणे आहे. ते आठव्या शतकातले ब्राह्मणी परंपरेत गणले जाणारे (म्हणजे बुद्धेतर आणि जैनेतर) आहे. त्याचे सोळाव्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये रूपांतर केले गेले होते. त्याला मंडपेश्वर ऊर्फ मोन्टपेझिर म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून दूर, त्या वेळच्या निजामशाहीत असलेल्या पितळखोरा आणि आसपास लेणी आढळली. उदा. धाराशिव (आताचे उस्मानाबाद). तिथल्या लेण्यांपैकी काही बुद्धलेण्यांचे रूपांतर जैन लेण्यांत झालेले आढळते.

थोडक्यात पश्चिम भारतातील एकेकाळच्या प्रमुख व्यापारी मार्गावर वसलेली, बुद्धधम्माच्या अगदी आरंभकाळच्या लेण्यांपासून पुढच्या बाराशे वर्र्षंपर्यंतचे ठसे दर्शविणारी सुमारे बाराशे लेणी वा शिल्प केंद्रे फग्र्युसन, बर्गेस आणि त्यांचा ‘पंडित’ साथीदार भगवानलाल यांनी उजेडात आणली!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com