|| सुमित्रा महाजन

सुषमा स्वराज मुळातच तडफदार नेतृत्वाचा वसा घेऊनच राजकीय जीवनात आल्या. त्यामुळे भाजपमध्ये आल्या आल्या एकदम शीर्ष नेतृत्वाच्या रांगेत त्या सामील झाल्या. कर्तृत्वाने, वक्तृत्वाने, प्रेमळ मातृभावाने आणि निर्णायक क्षणी ठाम भूमिका घेण्याच्या कुशलतेने पक्षात सर्वोच्च शिखरापर्यंत त्यांचा प्रवास झाला..

सुषमा स्वराज.. एक आकर्षक हसतं-बोलतं व्यक्तिमत्त्व, समोरच्याला लगेच आपलंसं करणारं. विश्वासच बसत नाही, की सुषमाजी आता या जगात नाहीत. आता आता तर त्यांना दिल्लीला भेटून आले.. छान गप्पा झाल्या होत्या तेव्हा. म्हणत होत्या, ‘‘सुमित्राजी, आजकल मैं बहुत नियम से खाना खा रही हूँ। अपने आप को व्यवस्थित रख रही हूँ। काम काम में हम लोग खुद की तरफ कम ध्यान देते हैं। अब आप भी थोडा खुद का ध्यान रखना..’’ खूप प्रेमाने ‘परत भेटू या’ असे म्हणत एकमेकींचा निरोप घेतला; पण सुषमाजी तर खूपच नको अशा.. शांत, निवांत झाल्या.

राजकारणाच्या पलीकडचं माझं नातं होतं त्यांच्याशी. खरं म्हणजे, संघटनेच्या दृष्टीने त्या पक्षात नंतर सामील झाल्या. माझी लहानपणापासून संघ-राष्ट्रसेविका समिती-जनसंघ अशी वाटचाल. लग्न झाल्यावर थोडी चाल मंदावली, पण समितीमध्ये काम सुरू केले होते. अर्थात, सुषमाजी आणि माझ्यात मुळातच एक फरक होता. तो असा की, मी कार्यकर्ता- मग फार तर वरिष्ठ कार्यकर्ता झाले; पण सुषमाजी मुळातच तडफदार नेतृत्वाचा जणू वसा घेऊनच कार्यात आल्या. त्यामुळे पक्षात आल्या आल्या एकदम शीर्ष नेतृत्वाच्या रांगेत सामील झाल्या. त्यांच्यातील तडफ, राजकारणाची जाण.. सगळंच नेत्रदीपक होतं. राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला गेलं, की त्या मला वरिष्ठाचा मान द्यायच्या. एकदा असेच दिल्लीला असताना गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होता. त्यांना कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला. कार्यक्रम सुरू झाल्यावर माझ्या मागच्या खुर्चीत येऊन बसल्या आणि मला हळूच म्हणाल्या, ‘‘मला थोडा उशीर झाला आहे. जर कोणी काही म्हणालं, तर तू सांभाळून घे. तुझं सगळे जण ऐकतात!’’ पक्षाचा कार्यक्रम, राजकारणात वयाने लहान असूनही मी त्यांना वरिष्ठ नेता मानून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, जे वास्तव होतं. बाकी वेळेस आम्ही दोघी मैत्रिणी होतो. खरं म्हणजे त्यांची सर्वाशीच उत्तम मैत्री होती.

सुषमाजी महिला मोर्चाच्या पदाधिकारी वा मोर्चामध्ये कधीच नव्हत्या. कारण वर सांगितल्याप्रमाणे भाजपमध्ये सामील झाल्या झाल्या त्या शीर्ष नेतृत्वाच्या रांगेत होत्या. आम्ही महिला मोर्चा, नगर अध्यक्ष, नंतर प्रदेश, त्यानंतर राष्ट्रीय पदाधिकारी आणि मग प्रमुख संघटनामध्ये पदाधिकारी, अगदी महामंत्रीही झालो. त्यामुळे महिला मोर्चाचे प्रशिक्षण वर्ग, कार्यकारिणी बैठका हे आमचं काम असायचं; परंतु मला आठवतंय, पक्षाच्या वरिष्ठ नेता म्हणून आम्ही सुषमाजींना कार्यक्रमांत बोलवायचो. एखाद्या विषयावर दृष्ट लागलेसं त्यांचं भाषण व्हायचं; पण कार्यक्रम झाल्यानंतर त्या रात्री वर्गावर थांबायच्या, नेत्यासारखे निघून जायच्या नाहीत.. आणि मग त्या ‘आमची सुषमा स्वराज’ असायच्या! रात्री गप्पा रंगायच्या. सर्वामध्ये बसून गाणी, नकला, चुटकुले सांगणे यांत त्या अग्रणी असायच्या. मग हरयाणातील त्यांच्या गावच्या गमतीजमती, तिथल्या भाषेतील विनोद, कुणाकुणाची नक्कल, की आम्ही हसून हसून लोटपोट व्हायचो.

एकदा आम्ही काही महिला खासदार आणि मला वाटतं, मृदुला सिन्हाजी वगैरे महिला मोर्चाच्या दोन-तीन वरिष्ठ कुणाच्या तरी (कदाचित मायासिंग वा शीला गौतम) घरी एकत्र बसलो होतो. अगदी सहज जेवणाचा कार्यक्रम. मग गप्पा करता करता महिलांचा आवडता साडी हा विषय सुरू झाला. मी म्हटलं, ‘‘आपण साडी ठीकठाक राहावी म्हणून पिनअप करतो, करायलाही हवं; पण कधी कधी साडीचा पदर जर भरजरी किंवा जरा लफ्फेदार असेल, तर त्याचं सौंदर्य दिसत नाही, हो नं.. बरं काम करताना पदर एकेरी स्टाइलमध्ये हातावर घेणंही शक्य नाही वगैरे वगैरे..’’ कुणी म्हणालं, ‘‘हो नं.. आणि त्यात पर्स सांभाळायची!’’ बोलता बोलता सुषमाजींनी कसा पदर घ्यावा, कसं चालायचं याचाही अभिनय करून दाखवला. खूप मजेदार बोलायच्या.. आमचेच आम्ही असलो की! मधेच एकदम काही सुचले व म्हणाल्या, ‘‘हो, आपण असं करून बघू या का.. त्या पदराचं जॅकेट बनवायचं! म्हणजे सर्व भरतकाम डिझाइन व्यवस्थित दिसेल..’’ पण त्यामुळे पदर छोटा होईल, मग तो जॅकेटच्या आत पिनअप करून लपवायचा कसा वगैरे चर्चा प्रात्यक्षिकासह सुरू होती. करता करता शेवटी असं ठरलं की, ‘‘सुषमाजी, आप एक जॅकेट बनवाना, प्रयोग करना, फिर देखते है।’’ त्यावर म्हटल्या, ‘‘ठीक, मैं ही करती हूँ। फिर जैकेट के जेब में पेन-चश्मा भी रखना आयेगा।’’.. आणि खरंच काही दिवसांत त्यांनी तसा एक प्रयोग करूनही दाखवला! पुढे सुषमाजींनी जॅकेटची ती पद्धतच सुरू केली, जी त्यांचा ‘ट्रेडमार्क’च झाला!

सुषमाजी सवरेत्कृष्ट वक्ता, जाणत्या राजकारणी, सामान्य कार्यकर्त्यांची बूज राखणाऱ्या नेत्या होत्या. आमच्या इंदूरला माझी खूप जवळची, तशी सर्वाचीच आवडती एक कार्यकर्ता, कधी पदाची इच्छा न धरता कामाला सतत हजर असणारी आमची शकुंतला बापटताई.. तर, या आमच्या बापटताई ८० वर्षांच्या झाल्या आणि माझ्या मनात एक विचार आला की, मोठय़ा नेत्यांचे वाढदिवस खूप साजरे होतात, पण बापटताईसारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे काय? मग मी ठरवले की, बापटताईचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम, सन्मान सोहळा सर्व काही करायचं. थोडेसे त्यांचे नातलग आणि आमचे काही प्रमुख कार्यकर्ते असा छोटासाच ३००-३५० लोकांचा कार्यक्रम ठरवला. माझा पूर्ण परिवार कामाला लागला. तारीख ठरली ५ जून २०१३. त्या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून कोणाला बोलवावं, हे ठरलं नव्हतं. बापटताईंना ओळखणारे पक्षातही खूप होते; पण एकदम सुषमाजींचं नाव समोर आलं. खरं म्हणजे, त्या वेळी सुषमाजी खूप मोठय़ा पदावर होत्या; पण म्हटलं, विचारून तर बघू.. आणि एका क्षणात सुषमाजींनी होकार दिला. मला म्हणाल्या, ‘‘का नाही येणार, जरूर येईन. सर्व कामं बाजूला ठेवून येईन.’’ आणि खरंच सुषमाजी कार्यक्रमाला आल्या. त्यांच्या शैलीत सुंदर भाषणही केलं. कार्यक्रमाला चार चाँद लागले आणि आमच्या बापटताईसुद्धा खूप खूप आनंदी झाल्या. सुषमाजींचं कौतुक काय सांगू, त्यांनी मलाच मोठेपणा दिला आणि म्हणाल्या की, ‘‘एका सामान्य कार्यकर्त्यांचे कौतुक करण्याची ही गोष्ट मनात येणं हाच सुमित्राचा खूप मोठेपणा आहे आणि मला या कार्यक्रमाला बोलावून त्यांनी मलासुद्धा शिकवण दिली की, नेत्यानं कार्यकर्त्यांचे कौतुक, सन्मान कसा करायचा! हा सुमित्राजींचा मोठेपणा!’’ आम्हा दोघींचं असंच होतं.. त्या नेहमी माझी प्रशंसा करायच्या आणि मी म्हणायची, ‘‘सुषमाजी, तुम्ही समोरच्या पक्षाला मुद्देसूद बोलून नामोहरम करता. खरंच सारखीच तुमची दृष्ट काढावीशी वाटते!’’

आपल्या मराठीत म्हण आहे ना, ‘कानामागून आली अन् तिखट झाली.’ परंतु सुषमाजींनी आपल्या आचरणानं ही म्हणच जणू बदलून टाकली. त्या पक्षात आल्या तेव्हा त्यांच्यापेक्षा अनेक वरिष्ठ, जनसंघापासून काम करणारे नेते होते; पण आपल्या कर्तृत्वाने, वक्तृत्वाने, प्रेमळ मातृभावाने, भगिनीभावाने, उत्तम राजकीय जाण व निर्णायक क्षणी ठाम भूमिका घेण्याच्या कुशलतेने पक्षात सर्वोच्च शिखरापर्यंत त्यांचा प्रवास झाला; पण हे सारं सगळ्यांचं प्रेम मिळवतच. म्हणून म्हणावंसं वाटतं, ‘कानामागून आल्या, पण आपल्या गुणांमुळे सर्वाच्या गळ्यातील ताईत बनल्या!’

(लेखिका माजी लोकसभा अध्यक्ष आहेत.)