शेतकरी संघटनेत येण्यापूर्वी अनेक प्रकारच्या विसंगती दिसायच्या. जे लोक सकाळी शेतीमालाच्या भावासाठी मोर्चा काढत, तेच दुपारी शेतमजुरांना स्वस्त किमतीत धान्य उपलब्ध झाले पाहिजे, असेही मोच्रे काढत. पण आयुष्यात शरद जोशी आले आणि ही विसंगती दूर झाली. स्वतंत्रपणे विचार करायचा आणि व्यक्तिस्वातंत्र्य जपत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची, असा प्रवास संघटनेत सुरू झाला. संघटनेत प्रवेश करण्यापूर्वी शरद जोशी यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी आधीच्या सामाजिक कार्यक्रम, चळवळीतील अनुभवाबद्दल विचारले. आधीचे सामाजिक उपक्रम त्यांना सांगितले. नंतर शेतकरी संघटनेत दाखल झालो तेव्हा ही चळवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारी आहे, हे तर पटलेच; पण व्यक्ती म्हणून आपल्याला स्वतंत्र आकाश खुले करून देणारी आहे याचीही खात्री पटली.
महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना होती, तेव्हा हा कापूस सरकारलाच विकण्याची शेतकऱ्यांवर सक्ती होती. महाराष्ट्रात सरकारी कापूस खरेदीचा भाव ८०० ते ९०० रुपये क्विंटल होता. आंध्र प्रदेशात हाच भाव १५०० ते १६०० रुपये होता. महाराष्ट्रातली बंदी मोडून आम्ही कापूस आंध्र प्रदेशात नेऊन विकला. त्या वेळी संघर्षही झाला, पण ही लढाई शेतकऱ्यांच्या प्रश्नांची होती. संघटनेत दाखल झालो, तेव्हा संघटनेच्या धगधगत्या पाश्र्वभूमीवर मी टिकून राहील की नाही, अशीही शंका उपस्थित व्हायची. खुद्द साहेबच गमतीने ‘हा कुठल्या तरी जंक्शनवर सुटणारा डबा आहे’ असे एकदा म्हणाल्याचे आठवते. पण तशी वेळच आली नाही. शेतकरी संघटनेत हजारो लोक दाखल झाले. संघटनेच्या लाखोंच्या सभाही झाल्या. साहेबांनी सांगितले तेच तत्त्वज्ञान पुढे सगळ्यांनी स्वीकारले. त्यांना विरोध करणारे, त्यांच्या चळवळीतून फुटून बाहेर पडणारे असे सर्वच साहेबांची भाषा बोलतात. आज शेतीमालाच्या भावाबद्दल बोलताना सर्वानाच कंठ फुटतो. पण ही मांडणी सर्वात आधी शरद जोशींनी केली. आता त्यांच्या नावाचा उच्चार न करताही अनेक जण अशा मागण्या पुढे रेटतात.
साहेबांचे विचार काळाच्याही पुढचे आहेत. त्यांनी ‘डब्ल्यूटीओ’चे स्वागत केले आणि पुढे साऱ्या देशाला याच मार्गावर यावे लागले. डंकेल प्रस्तावाचे अर्थशास्त्र साहेबांनी खेडय़ा-पाडय़ांतल्या सर्वसामान्य शेतकऱ्यालाही अशा पद्धतीने समजून सांगितले की, विद्यापीठातले विद्वानही डंकेलच्या चच्रेत आमच्या शेतकरी चळवळीतल्या साध्यासुध्या कार्यकर्त्यांशी बरोबरी करू शकत नसत. हे यश साहेबांच्या विचारांचे आहे. आमच्यासाठी साहेब एक विद्यापीठच होते. त्यांच्या चळवळीत काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद निश्चितपणे आहे. स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारा हा प्रवास केवळ साहेबांमुळेच घडू शकला.
निखळ अर्थशास्त्रावर आधारित या चळवळीने शेतकऱ्यांच्या दारिद्रय़ाचे नेमके निदान केले आणि यातून सुटका कशी होणार, याचा मार्गही दाखवला. समूह तयार होतात तेव्हा त्याच्या आधारे व्यक्तीला लुटण्याचे कार्यक्रम होतात. साहेबांनी दिलेला विचार व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. शेतकऱ्यांची गरिबी दूर करण्यासाठी कोणतेही कल्याण करण्याच्या आणाभाका घेऊ नका. आधी शेतकऱ्यांच्या छातीवरून उठा, असे साहेबांनी सांगितले. खुल्या व्यवहारातच व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावतात, हेच त्यांचे सूत्र होते. समूह गोळा करून काहीच साध्य होत नाही. टोळ्यांनी फक्त हल्ले होऊ शकतात. शेतकऱ्याचे जगणे सुखी-समाधानी होण्यासाठी साहेबांनी एक विचार दिला. सुखाने, सन्मानाने कसे जगता येईल हे उलगडून सांगितले. त्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे आमच्याही विचारांच्या कक्षा रुंदावल्या. झापडबंद किंवा चाकोरीबद्ध विचार करण्यापेक्षा स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रज्ञा या चळवळीनेच आमच्यात विकसित केली. शरद जोशी नसते, तर आज ज्या पद्धतीने तर्कबुद्धीच्या आधारे आम्ही विचार करतो तसा केलाही नसता. आमच्या आयुष्यातले त्यांचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की, त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. निखळ स्वातंत्र्याचा विचार त्यांच्यामुळेच कळला.
(लेखक शेतकरी संघटनेच्याकेंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)

आज शेतकऱ्यांना दुसऱ्यााची जीभ लावूनच बोलता येते. आम्ही बोललेले जगात ऐकले जाईल, अशी साधने आमच्याकडे नसतील. शेती लुटून औद्योगिकीकरण करणारी व्यवस्था संपेपर्यंत ती साधने आमच्याकडे येणारही नाहीत, पण तोपर्यंत आमची जीभ तोंडात सलामत ठेवली पाहिजे..

तुम्ही संमेलने घालाल, डेरे घालाल, ग्रामीण, दलित आणि आता आणखी काही साहित्य निघालीत, त्यांची संमेलने घालाल, निधी जमवाल, पण तुम्हाला असे वाटत असेल की, यातून मराठी भाषा जगणार आहे, तर तो तुमचा भ्रम आहे. त्याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा-मातृभाषा मोठी असूच शकत नाही, एवढेच मला सांगायचे आहे.

अध्यक्षीय भाषण, पहिले अ. भा. शेतकरी
साहित्य संमेलन, वर्धा, ६ मार्च २०१५

मी आजही जागतिकीकरणाचा खंदा पुरस्कर्ता आहे. स्वातंत्र्य हे सर्वात मोठं मूल्य आहे. आणि या स्वातंत्र्याचा विचार इथल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी झालो असं मला वाटतं. पण आता परिस्थिती जास्त गुंतागुंतीची झाली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंचा समाजवाद आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तथाकथित विकासवाद यामध्ये मला खूपच साम्य दिसतं. तसंच दोघांचीही भूमिका शेतकरीविरोधी आहे असं स्पष्टपणे जाणवतं. कारखानदारी म्हणजे विकास अशी मोदींची ठाम धारणा दिसते. कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत करणाऱ्या अशा या ‘विकासवादी’ सरकारला कसं तोंड द्यायचं, हा आज इथल्या शेतकऱ्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. लबाड सत्ताधारी आणि घसरत्या दर्जाचं संघटनात्मक नेतृत्व अशा कात्रीत हा शेतकरी सापडला आहे.

– ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने ‘लोकसत्ता
लोकरंग’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत. ३० ऑगस्ट २०१५

शेतकरी राजकीयदृष्टय़ा संवेदनशील होऊ शकला नाही, कारण जितक्या प्रमाणामध्ये दलितांमध्ये डॉ. आंबेडकरांना राजकीय ध्रुवीकरण करता आलं, त्या प्रमाणात मी करू शकलो नाही, जातिव्यवस्था लक्षात न घेतल्यामुळे आपल्याला ‘टाऊन अ‍ॅन्ड कंट्री’ हा वाद िहदुस्थानात कुठेही सोडवता आला नाही. ग्राहक आणि शेतकरी ही रेषा अधिकाधिक खोल होत गेली.

शरद जोशी, ‘लोकसत्ता
आयडिया एक्स्चेंज’मध्ये..