इंद्रधनू प्रकल्प हा खरं तर रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस, अनाथ मनोरुग्ण महिलांचा आहे. प्रत्यक्षात येथील प्रवेशासाठी येणारे बहुसंख्य दूरध्वनी अशा महिलेच्या नातेवाईकांचेच असतात. त्यातही कळस म्हणजे ज्यांना या प्रकल्पाची माहिती मिळते त्यांना तो बेवारस, अनाथ मनोरुग्ण महिलांसाठी आहे हेही कळलेले असते. मग ज्या महिलेला पाठवायचे आहे, त्या महिलेशी नाते नसल्याचे सांगून केवळ येथील प्रवेशासाठी तिला बेवारस, अनाथ भासवण्याचा प्रयत्न केला जातो, प्रसंगी या महिलेला जाणीवपूर्वक बेवारस केले जाते.
मानसिक आजार बळावल्यानंतर मनोरुग्ण पर्यायाने नकोशा झालेल्या महिलेला तिच्या भावानेच नगरला आणले. गर्दीच्या ठिकाणी तिला एका बाजूला बसवून चहा घेऊन येतो, असे सांगून गेलेला भाऊराया पुन्हा आलाच नाही.. या घटनेला काही वर्षे होऊन गेली. भावाची वाट पाहत रस्त्यावर फिरणाऱ्या, साठीकडे झुकलेल्या या महिलेची स्थिती दिवसागणिक अधिकच विदारक होत गेली. एव्हाना सुचेता आणि राजेंद्र धामणे या डॉक्टर दाम्पत्याचा मनोरुग्ण महिलांसाठीच सुरू केलेला इंद्रधनू प्रकल्प कार्यान्वित झाला होता. त्यांच्या संपर्कात ही महिला आली, प्रकल्पात दाखलही झाली. येथील वातावरणात आता मानसिक आजारही बऱ्याच अंशी निवळला, चारचौघींमध्ये ती मिसळू लागली.. मात्र भाऊ चहा घेऊन येईल ही आशा काही अजून सुटत नाही. खेदाची बाब म्हणजे संस्थेने तिच्या भावाचा पत्ता शोधून त्याला कळवलेसुद्धा, की तुझी बहीण आता मनोरुग्ण नाही, ती पूर्ण बरी झाली आहे.. ना या पत्राचे उत्तर आले, ना कोणी चहा घेऊन आले, ना कोणी तिला घ्यायला आले.. हे वानगीदाखल एक उदाहरण आहे. अशा अनेक महिला कोणीतरी घ्यायला येईल या आशेवर येथे मात्र सुखेनैव आहेत.
मानसिक आजार जडलेल्या रुग्णांचा त्यातही महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पुनर्वसनाचा. या आजारामुळेच कुटुंबापासून दुरावलेल्या महिलांची संख्या तशी लक्षणीय आहे. हा आजार बरा झाला तरी नातेवाईकच त्यावर विश्वास ठेवत नाहीत, किंवा दुर्लक्षच करतात.. कारण तोपर्यंत ती व्यक्ती घरातच नकोशी झालेली असते.. मुलगी, बायको, आई, बहीण जी कोणी असेल ती बरी झाली, आता पुन्हा सांभाळणे आले.. नकोच ते! मनोरुग्ण झाल्यानंतर काही वर्षे घराबाहेर काढलेल्या महिलेला स्वीकारण्याची नातेवाईकांची मानसिकता नसते. आजारातून बरी झाल्यानंतरही तिच्याकडे माणूस म्हणून पाहण्याची तयारी नसते. पुरुषाच्या बाबतीत असे होत नाही. म्हणूनच तुलनेने मनोरुग्ण महिलांची स्थिती अधिक विदारक आहे.     
ही विदारकता डॉ. धामणे स्पष्ट करीत होते. ते म्हणाले, नातेवाईकांना ही ‘ब्याद’ नको असते. समाज दोन हात लांबच राहतो. एकदा जडलेल्या मानसिक आजारातून ही व्यक्ती बाहेर येऊच नये अशीच व्यवस्था तयार झालेली असते. त्यामुळेच या महिलांचे पुनर्वसन ही अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे. समाजानेच नाकारलेल्या या महिलांसाठी पुनर्वसन प्रकल्प चालवताना आणखी एक गोष्ट प्रकर्षांने पुढे आली, ती म्हणजे अशा महिलांना होणारी अपत्ये. बेवारस स्थितीत फिरणाऱ्या अशा बहुसंख्य महिला अत्याचारांच्या बळी ठरतात, त्यातून गर्भधारणा, मग बाळंतपण.. एवढे सगळे करून अशा महिला आपल्याच मुलांना ओळखू शकत नाहीत. अशा मुलांचे प्रश्न आणखी वेगळे. त्यांच्यासाठीही आता संस्थेतच वेगळा प्रकल्प सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने धामणे दाम्पत्य कार्यरत आहे.
डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता हे दोघेही होमिओपॅथीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले एक अत्यंत संवेदनशील दाम्पत्य. राजेंद्र यांनी स्वत: मानसशास्त्रातच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. बेवारस स्थितीत रस्त्यावर सैरभैर फिरणाऱ्या मनोरुग्णांची कणव आली म्हणून सहा, सात वर्षांपूर्वी अशा लोकांना घरून जेवणाचा डबा देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. दोन-तीन वषार्ंच्या सातत्यानंतर लक्षात आले की, या लोकांचे खरे प्रश्न वेगळेच आहेत. त्यातही महिलांची स्थिती भयानक असल्याची जाणीव झाली. नातेवाईकांसह समाजानेच नाकारलेल्या या महिलांसाठी काही तरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच जन्म झाला, माऊली सेवा प्रतिष्ठानचा; मग त्यातून वाय. एस. साने इंद्रधनू प्रकल्प.
हे सारे करताना अडचणी अनंत होत्या, मात्र धामणे दाम्पत्याच्या जिद्दीसमोर त्या थिटय़ा ठरल्या. धामणे यांची नगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर शिंगवे नाईक गावात थोडीफार वडिलोपार्जित जमीन आहे. येथेच हा प्रकल्प उभा करण्याचे ठरले. आर्थिक पाठबळ नव्हतेच, शिवाय ज्या लोकांसाठी हा प्रकल्प उभा करायचा त्यांची अवस्था पाहता मदतीलाही अन्य कोणी पुढे येत नाही. वडिलांना राजी करून धामणे यांनी घरची सात गुंठे जमीन प्रकल्पासाठी मिळवली. येथेच सुरुवातीला छोटेखानी बांधकाम करून बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलांचा सांभाळ सुरू झाला. रस्त्यावर फिरणाऱ्या अशा तीन महिला येथे आणून सेवेचा श्रीगणेशा झाला. सन २०१०मध्ये ही सुरुवात झाली. अडीच-तीन वर्षांतच अशा ११५ महिलांचा सांभाळ त्यांनी केला. शुश्रूषा वैद्यकीय उपचार, जिव्हाळा यामुळे मानसिक आजारातून पूर्णपणे बाहेर आलेल्या ७५ महिलांना त्यांनी पुन्हा त्यांच्या घरी पाठवले. सध्या संस्थेत ३८ महिला आहेत. नुकतेच ७५ बेडचे नवे बांधकाम येथेच करण्यात आले आहे.
धामणे दाम्पत्याच्या या कामाची माहिती मिळालेले पुण्यातील सुहृद वाय. एस. साने यांनी संस्थेला भेट दिली. येथील सेवाभाव लक्षात घेऊन त्यांनी सुरुवातीच्या काळात संस्थेला ६ लाख रुपयांची मदत दिली. त्यातूनच पहिले बांधकाम करण्यात आले. संस्थेच्या उभारणीत हीच मदत मोलाची ठरल्याने धामणे दाम्पत्याने मग संस्थेला साने यांचेच नाव दिले. निव्वळ लोकांच्याच मदतीवर संस्था सुरू आहे. संस्थेसाठी धामणे दाम्पत्याने पूर्ण झोकून दिले आहे. निवासी प्रकल्प सुरू झाल्यानंतर डॉ. सुचेता यांनी त्यांची कायम नोकरीही सोडली. त्या पूर्ण वेळ प्रकल्पातच काम करतात. डॉ. राजेंद्र चरितार्थापुरता व्यवसाय करून उर्वरित वेळ प्रकल्पासाठी कार्यरत आहेत. आर्थिक ओढाताण तर आहेच. मात्र या मनोरुग्ण महिलांची शुश्रूषा, त्यांच्यावर उपचार, त्यांचा सांभाळ अशा सर्व गोष्टी हे दाम्पत्यच करते. प्रत्यक्ष मदतीला तिसरा माणूस नाही! या एका महिलेसाठी (जेवण, शुश्रूषा, औषधोपचार) महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. लोकांकडून यथाशक्ती मदत मिळते. बऱ्याचदा धामणे दाम्पत्यालाच आर्थिक भारही उचलावा लागतो. संस्थेतील स्वीपरपासून स्वयंपाकी, केअरटेकर, रुग्णवाहिकेचा चालक सर्व कामे धामणे हेच करतात.
रस्त्यावरून आणलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेचे सर्वच प्रश्न गंभीर असतात. बऱ्याचदा त्या अत्याचारांच्या शिकार तर झालेल्या असतातच, मात्र अन्यही बरेच आजार, व्याधी त्यांना जडलेल्या असतात. शुश्रूषा, स्वच्छता दूर राहिली. संस्थेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या जवळही येऊ देत नाहीत. मुळातच सैरभैर आयुष्य जगणाऱ्या या महिलांना कशाचेच भान नसते. त्यांच्यामध्ये आधी आपलेपणाचा विश्वास निर्माण करावा लागतो. हेच काम अत्यंत कौशल्य व जिकिरीचे आहे. त्याचा मोठा वाटा डॉ. सुचेता उचलतात. न कंटाळता, चिकाटी व जिव्हाळ्याने या महिलांना आपलेसे करण्याचे कसब आता त्यांना प्राप्त झाले आहे. आजारातून कमी-अधिक बऱ्या झालेल्या महिलाही त्यांना या कामात मदत करतात.
संस्थेत दाखल झालेल्या महिलांची या आजारांची कारणे भिन्न आहेत. कोणाला नवऱ्याने सोडून दिले, पुढे समाजाने भोगच घेतल्याचा धक्का, कोणाला वैधव्यामुळे जडलेले आजारपण, कोणाला भावांनी सोडून दिले, आणखी असंख्य कारणे. नगर जिल्ह्य़ातच पुणतांबे (तालुका राहाता) येथे महिनाभरापूर्वी ९३ वर्षांच्या जख्ख वृद्धेवर अत्याचार झाला. या धक्क्य़ाने मनोरुग्ण झालेली ही महिला सध्या संस्थेत दाखल झाली आहे. प्रश्न असा आहे की, या वयात या महिलेच्या वार्धक्याची काळजी घ्यायची की नव्याने जडलेल्या मानसिक आजाराची, की अत्याचारामुळे झालेल्या इजांची? संस्थेत आतापर्यंत तीन मनोरुग्ण महिलांची बाळंतपणे झाली आहेत. ही मुले कोणाची आहेत माहिती नाहीत! सध्याही एक महिला गरोदर असून लवकरच तिचेही बाळंतपण होईल. म्हणजे या तान्हुल्याचाही सांभाळ. काही महिला परप्रांतीय आहेत. त्यांच्याशी जवळीक साधताना भाषेची म्हणजे संवादाचीच अडचण असते. या समस्या केवळ ऐकल्या तरी अंगावर शहारा येतो. धामणे दाम्पत्याचा सध्या तरी एकाकी संघर्ष सुरू आहे. मनोरुग्णाला सांभाळणे ही साधी गोष्ट नाही. मात्र या दाम्पत्याने तन-मन-धनाने या कार्यात वाहून घेतले आहे. समाजाची अजिबात साथ नाही असे नाही. जी काही मदत मिळते त्याबद्दल हे दाम्पत्य समाधानी आणि आशादायी आहे. मात्र कामाचा विस्तार लक्षात घेता ही मदत पुरेशी नाही. घरातील एखाद्या नातेवाईकाला कुटुंबीय स्वीकारत नाहीत, तिथे अशा अनेकांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम हे दाम्पत्य मनोभावे करते आहे. मानसिक आजारातून बरी झाल्यानंतर नातेवाईकही स्वीकारत नाहीत. म्हणूनच संस्थेत ‘इन कमिंग’चे प्रमाण मोठे आहे. तुलनेने ‘आऊट गोईंग’ कमी आहे. खरं तर ही गोष्ट वाईट आहे, मात्र ती वस्तुस्थिती आहे. ही गरज लक्षात घेऊन धामणे दाम्पत्याचे भविष्यात ५०० बेडच्या प्रकल्पाचे नियोजन आहे. त्यात पुरुष मनोरुग्णांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न आहे असे धामणे यांनी सांगितले. त्यासाठी किमान पाच एकर जागेची गरज आहे. अन्य बऱ्याच गोष्टी आहेत. या गोष्टी होतील तेव्हा होतील, मात्र सध्याच संस्थेला मोठय़ा हातभाराची गरज आहे. या दाम्पत्याने संस्थेसाठी सर्वस्व दिले; आता समाजाला पुढे येण्याची गरज आहे..
संस्थेपर्यंत कसे जाल?

नगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर, नगर-मनमाड राज्यमार्गावर नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या गावात संस्था आहे. नगरहून शिर्डीकडे जाताना राज्यमार्गाला खेटूनच डाव्या हाताला प्रकल्प आहे. बसने या ठिकाणी जाता येते.
माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित वाय. एस. साने इंद्रधनू प्रकल्प, नगर
बेवारस व अनाथ महिलांना आधार देऊन त्यांच्यावर केवळ उपचारच नव्हे, तर तंदुरुस्त करून पुन्हा ताठ मानेने उभे करण्याचा संकल्प ‘इंद्रधनू प्रकल्पा’ने सोडला आहे.  त्याला समाजाचा हातभार गरजेचा आहे.
रस्त्यावरून आणलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेचे सर्वच प्रश्न गंभीर असतात. बऱ्याचदा त्या अत्याचारांच्या शिकार तर झालेल्या असतातच, मात्र अन्यही बरेच आजार, व्याधी त्यांना जडलेल्या असतात. शुश्रूषा, स्वच्छता दूर राहिली. संस्थेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या जवळही येऊ देत नाहीत. मुळातच सैरभैर आयुष्य जगणाऱ्या या महिलांना कशाचेच भान नसते.
सर्वस्व गमावलेल्या महिलांसाठी सर्वस्व
मुळातच मनोरुग्ण म्हटलं की, सगळेच फटकून वागतात. त्यातही अशा महिलांच्या वाटय़ाला येणारे जिणे अधिकच जीवघेणे. दुर्दैवाने नातेवाईकच जबाबदारी झटकतात, तेव्हा असाहाय्यतेला अंत तर नाहीच, शिवाय मानसिक आजारामुळे या कुठल्याच गोष्टीची, स्त्रीत्वाची जाणीवही नाही..अशा मनोरुग्ण महिलेला हक्काचे घरकुल मिळाले, तर मात्र मानसिक आजारातून बाहेर येणे शक्य होते आणि कुटुंबाने स्वीकारले तर पुन्हा घरही जवळ करता येते.. नव्याने आयुष्याला सुरुवात होऊ शकते!
धनादेश या नावाने काढावेत
माऊली सेवा प्रतिष्ठान
Mauli Seva Pratishthan
देणगीदारांना ८० जी अन्वये आयकर सवलत

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय       
संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर -४४०००९.  ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय        
संपादकीय विभाग, मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद.  ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय          
संपादकीय विभाग, आशिष, सथ्थ्या कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय          
संपादकीय विभाग,  एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.