News Flash

सेकंड इनिंग औषधांची!

विरत नसतील आणि मुरत असतील तर या रेंगाळणाऱ्या औषधी अंशांचे नेमके काय, कोणा कोणावर, कुठवर परिणाम होतात?

|| मंजिरी घरत

औषध घेतले, ते शरीरात पोहोचले, नंतर ते यथावकाश मलमूत्रमार्गे शरीराबाहेर टाकले जाते, तसेच मुदतबाह्य़ किंवा नको असलेली औषधे आपण टाकून देतो. या औषधांचे पुढे नेमके काय होते? ती विरत जातात की आणखी कुठे मुरत जातात? विरत नसतील आणि मुरत असतील तर या रेंगाळणाऱ्या औषधी अंशांचे नेमके काय, कोणा कोणावर, कुठवर परिणाम होतात?

साधारण २००० सालची गोष्ट. अमेरिकेतील मिशिगन तलावातील पाण्यामध्ये रिबेका क्लॅपर नावाच्या ताज्या पाण्याचा (फ्रेशवॉटर) अभ्यास करणाऱ्या संशोधिकेला काही विचित्र बाबी आढलल्या. या गोड पाण्याच्या तलावात काही औषधी द्रव्ये सापडतात का, हे तपासताना तिला ‘मेटफोर्मिन’ या मधुमेहावर वापरल्या जाणाऱ्या औषधाचे प्रमाण लक्षणीयरीत्या आढळले. खरे तर हे औषध तिच्या रडारवर अजिबात नव्हते, कारण ते नागरी वस्तीपासून भरपूर दूर असणाऱ्या या तलावात सापडणे तिला अगदी अनपेक्षित होते. मग तिने प्रयोगशाळेत मेटफोर्मिनचा माशांवर काय परिणाम होऊ  शकतो, याचा अभ्यास केला. मधुमेहासाठीचे औषध म्हणजे चयापचय क्रियेवर काही परिणाम होईल, असा अंदाज बांधलेल्या रिबेकाला धक्क बसला, तो मेटफोर्मिनमुळे पुरुष माशांचे स्त्रीकरण (फेमिनायझेशन) होताना पाहून. हा हार्मोनल बदल आणि त्यामुळे पुढे थांबू शकणारे त्यांचे प्रजनन हा विचार धक्कादायक होता. सर्वात काळजीची बाब होती, ती म्हणजे मिशिगन तलाव नागरी वस्तीपासून, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपासून बऱ्यापैकी दूर होता आणि तलाव प्रचंड मोठ्ठा; म्हणजे खरे तर पाण्यातील औषधांचे प्रमाण खूप सौम्य (विरल) होत जायला हवे होते, पण तरीही ते लक्षणीय होते. अशाच दुसऱ्या एका पाहणीत तलावातील माशांची संख्या झपाटय़ाने कमी होत चाललेली दिसली. अधिक अभ्यास करता ‘ईस्ट्राडिओल’ नावाच्या स्त्री-हार्मोनचे (जे संतती प्रतिबंधक गोळ्यांमध्ये असते) लक्षणीय प्रमाण पाण्यात आढळले. माशांच्या वागणुकीत आक्रमकता दिसणे, गोगलगायीच्या हालचालीवर परिणाम असे काही बदलही दिसले आणि त्याचा संबंध ‘फ्लुओक्सएटीन’ नावाच्या नैराश्यावरील औषधाशी होता, असे संशोधकांना आढळले. असे औषधांचे जीवसृष्टीवर अनेक परिणाम आढळले. औषधांच्या पर्यावरणावरील दुष्परिणामांचा सर्वात सुस्पष्ट पुरावा म्हणजे, मेलेल्या जनावरांचे ‘डिक्लोफेनॅक’युक्त मांस खाल्ल्याने झपाटय़ाने कमी झालेली पांढऱ्या गिधाडांची संख्या. कोणत्याही अँटिबायोटिक्सना दाद न देणारे बंडखोर जिवाणू निर्माण होण्यामागील एक कारण आपल्या शरीरात अन्नसाखळीतून नकळत जाणारी अँटिबायोटिक्स आहेत. अँटिबायोटिक्स पर्यावरणातील अनेकविध उपयुक्त जिवाणूंना मारून तर टाकतातच; शिवाय काही उपद्रवी जिवाणूंना अँटिबायोटिक्सची ओळख झाल्याने बंडखोर ‘जीन्स’ बनवायला त्यांना सोपे जाते. असे बंडखोर जिवाणू जैविक साखळीतून आपल्या शरीरात पोहोचतात.

युरोप, कॅनडा, अमेरिका यातील भूगर्भशास्त्रज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ साधारण गेल्या दोन दशकांपासून उत्सुकतेने आणि जागरूकतेने या विषयात अभ्यास करत आहेत. जर्मनीत पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने २००४ मध्ये पाच खंडांतील ७१ देशांतील भूगर्भ जल, माती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, खत यांचे नमुने अभ्यासले गेले. साधारण ७३० औषधांच्या टेस्टिंगच्या पद्धती विकसित करून ती औषधे सापडतात का, यासाठी नमुन्यांचे पृथक्करण केले गेले. तब्बल ६५० औषधांचे अंश सर्व प्रकारच्या नमुन्यांत आढळले, अगदी पिण्याच्या पाण्यातही. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची औषधे, वेदनाशामके, अँटिबायोटिक्स, हार्मोन्स, अँटिकॅन्सर, स्टीरॉइड्स अशी अनेकविध प्रकारची औषधे यात सापडली. कधी नगण्य प्रमाणात, तर कधी लक्षणीय प्रमाणात. अमेरिकेतल्या मेन राज्यातही मोठय़ा प्रमाणावर अशी पाहणी केली असता, पॅरासिटामोल, आइबुप्रोफेन अशी वेदनाशामके, ईस्ट्रोजेन हे स्त्री-संप्रेरक मोठय़ा प्रमाणात मिळाले.

निसर्गात ही औषधे कोठून पोचतात? या औषध प्रदूषणाची तीन प्रमुख कारणे : (१) मुदतबाह्य, निरुपयोगी झालेली कचऱ्यात किंवा इतरत्र टाकलेली औषधे; (२) मानवी आणि जनावरांच्या मलमूत्रातून बाहेर पडलेली औषधे किंवा त्यांचे परिवर्तित घटकरूप; (३) औषध कारखान्यांनी, इस्पितळांनी मुदतबाह्य किंवा नकोशी झालेली औषधे नियमानुसार प्रक्रिया करून वा नियमबाह्यपणे नदी, पाणी, तलाव वगैरेंमध्ये किंवा त्या आसपास टाकलेली औषधे.

आधुनिक औषधे जालीम रसायने आहेत. कचऱ्यात टाकलेली वा सिंकमध्ये टाकलेली औषधे या ना त्या प्रकारे निसर्गात पोहोचतात. खाल्लेली व शरीराने उत्सर्जित केलेली औषधे सांडपाण्यात पोहोचल्यावर औषधांचे किंवा त्यांच्या परिवर्तित घटकांचे पूर्ण विघटन होऊन ती पूर्ण निरुपद्रवी होण्याची प्रक्रिया सांडपाणी केंद्रात होतेच असे नाही. काही औषधांवर प्रक्रिया करणेही सोपे नसते किंवा त्यासाठी पद्धती विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रक्रिया करून बाहेर पडलेल्या पाण्यातही मूळ औषधे, सक्रिय औषधी द्रव्ये यांचा अंश राहतो. औषध कारखान्यांनी औषधी द्रव्यांवर पूर्ण प्रक्रिया करून मग ते निसर्गात सोडायचे असते. पण काही कंपन्या हे उत्तमपणे करतात, तरी सर्व प्रक्रिया करूनही औषधी द्रव्ये काही प्रमाणात निसर्गात पोहोचण्याची शक्यता राहतेच.  त्यात भारतातील सर्वच छोटे-मोठे उद्योजक सर्व नियम पाळतात असे नाही. परत आलेली, ‘एक्स्पायर’ झालेली औषधे नष्ट करण्याचे नियमही तंतोतंत पाळले जातात असे नाही. अशी औषधे इथे तिथे टाकलेलीही बघायला मिळतात. ही औषधे मग भूगर्भात, पाण्यात मिसळत जातात.

या औषधांनी निसर्गातील जलचर, वनस्पती यांवर तर घातक परिणाम होत आहेतच; पण औषधांचे अंश पाण्याचे स्रोत, माती, खत असे सर्वत्र पोहोचत असल्याने अन्नसाखळीत प्रवेश करतात. आपल्या नकळत अशा प्रकारे औषधांचे कॉकटेल शरीरात जाण्याची शक्यता असते किंवा जातही असावे. पण नेमके हे किती प्रमाणात आहे, कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या औषधांचे प्रमाण जास्त, त्यामुळे किती आणि काय विपरीत होतेय, याबाबत सध्या आपली समज आणि अभ्यास तोकडा आहे. अंत:स्रावी ग्रंथींचे काम ‘डिस्टर्ब’ करणे, प्रजनन समस्या, कॅन्सर, हृदयरोग, त्वचाविकार, मनोविकार असे काहीही किंवा यापेक्षा काही चित्रविचित्र होऊ  शकते, होतही असेल. आपला अभ्यास कमी आहे, त्यामुळे आपण अज्ञानात आनंद अशा स्थितीत आहोत. औषधाच्या पूर्ण जीवनचक्राचा (लाइफ सायकल) सखोल आणि सर्वागीण अभ्यास होणे आवश्यक आहे.

दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका पाहणीत हैदराबादजवळील ‘फार्म हब’ असलेल्या काही गावांत विहिरीत व तलावात २०-२५ वेगवेगळी औषधे लक्षणीय प्रमाणात मिळाली. नॅनो आणि मिलिग्रॅम प्रमाणात. काय नव्हते यात? उच्च रक्तदाब, मधुमेह, अँटिबायोटिक्स, अ‍ॅसिडिटीची औषधे, वेदनाशामके, स्टीरॉइड्स.. सर्व काही, जणू औषधांचे झक्क सूपच! युरोपमधील काही संशोधकांनी हा अभ्यास केला आणि त्यांना खरे तर धक्काच बसला. शिवाय ‘सिप्रोफ्लोक्सासिन’ या अँटिबायोटिकचे प्रमाण इतके होते, की रोज साधारण एक लाख लोकांना डोस पुरेल. त्यांचा विश्वासच नाही बसला या अहवालावर; म्हणून त्यांनी पाण्याचे नमुने दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवून खातरजमा करून घेतली. पिण्याच्या पाण्यातील सिप्रोफ्लोक्सासिन आणि अ‍ॅलर्जीसाठीचे ‘सिट्रिझीन’चे प्रमाण- ही औषधे अमेरिकेत वापरली असती तर जेवढा अंश पाण्यात मिळाला असता, त्यापेक्षा तब्बल १५० पट जास्त होते. अलीकडे मुंबई आयआयटीने मुंबईतील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा अभ्यास केला. त्यात अनेक अँटिबायोटिक, पॅरासिटामोल हे वेदनाशामक लक्षणीय प्रमाणात सापडले.

औषधे, पर्यावरण आणि आपले आरोग्य असा एकत्रित विचार आपल्या धोरणांमध्ये फारसा दिसत नाही. वरील उल्लेख केल्याप्रमाणे परदेशात याबाबत जागरूकता काही वर्षांपासून आहे आणि औषध प्रदूषण कमीत कमी व्हावे यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सांडपाणी प्रक्रिया परिणामकारक करून औषधांचे कमीत कमी अंश निसर्गात पोहोचतील यासाठी प्रयत्न केले जातात. ग्राहकांनी औषधांची कशी विल्हेवाट लावावी यासाठी औषध प्रशासन आणि अन्य संबंधित संकेतस्थळांवर सूचना, माहिती असते. यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ती ग्राहकांकडून पाळली जातात. शिवाय औषधांसाठी ‘टेक बॅक’ उपक्रम- म्हणजे नको असलेली औषधे शासनकृत केंद्रांमध्ये आणि बहुतेक ठिकाणी फार्मसीच्या दुकानांत परत करणे अनेक देशांत गेले १५-२० वर्षे चालू आहे. यात  कचऱ्यात औषधे टाकली जाऊ  नयेत, त्याचा पुनर्वापर होऊ  नये हा विचारही असतोच. ही टाकाऊ  औषधे ठरावीक शासनमान्य पद्धतीने, म्हणजे सहसा जाळून नष्ट केली जातात आणि अशा प्रकारे पर्यावरणात पोहोचून हानी करणाऱ्या औषधांचे प्रमाण थोडे तरी कमी होते. ज्याने जन्म दिला, त्यानेच अंतिम प्रवासाची जबाबदारी घ्यावी, असा आग्रह करत फार्मा उत्पादकांवर बरीच जबाबदारी टाकली जाते. फार्मासिस्ट अशा उपक्रमांत सातत्याने सहभागी होतात. फार्मा कंपन्यांसाठी अतिशय कडक नियम आहेत व औषध प्रदूषण टाळण्यासाठीच्या साऱ्या प्रक्रिया त्यांना कराव्या लागतात, हे सर्व नियम पाळावेच लागतात. यापुढची आणि कौतुकास्पद वाटावी अशी प्रगती स्वीडनने केली आहे. स्वीडन हा पर्यावरणाबाबत सर्वात संवेदनशील नि जागरूक देश. स्वीडनमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने औषधांचे वर्गीकरण केले आहे आणि जेथे जेथे पर्याय उपलब्ध असेल तेथे पर्यावरणस्नेही औषध वापरले जावे असे धोरण आहे. वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही याबाबत जागरूकता आहे. सर्व युरोपीय देशांत हे वर्गीकरण आता स्वीकारले जाणार आहे. या सर्वच देशांमध्ये काही वर्षांपासून नवीन औषधांच्या निर्मितीमध्ये ‘एन्व्हॉयरन्मेंटल रिस्क अ‍ॅसेसमेंट’ म्हणजे औषध पर्यावरणाच्या दृष्टीने किती सुरक्षित याचा अभ्यास करणे बंधनकारक आहे. ‘इको-फार्माकोव्हिजिलन्स’ म्हणजे औषधांचा पर्यावरणीय दुष्परिणाम अभ्यासणारी शाखा विकसित होत आहे.

भारताला जगाची फार्मसी म्हटले जाते. औषधे बनवण्याच्या उद्योगात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. २०० देशांना आपण औषधे निर्यात करतो. कमीत कमी दहा हजार छोटय़ा-मोठय़ा फार्मा कंपन्या आहेत देशात. मात्र, या उद्योग क्षेत्राचा आपल्या समाजावर, पर्यावरणावर काही अन्याय तर होत नाही ना, हे बघणे नितांत जरुरीचे आहे. जितकी औषधनिर्मिती अधिक तितकीच टाकाऊ, वापरलेल्या औषधांचे प्रमाण पर्यायाने वाढतेच राहणार. ग्राहक/रुग्ण पातळीवरही औषधांचा प्रचंड वापर गरजेने किंवा स्वमनाने होत असतो. औषधांची सहज उपलब्धता यात भरच घालते. भारतातील दाट लोकवस्ती, इतकी इस्पितळे, रुग्णांची व वृद्धांची वाढती संख्या आणि एकंदर औषधविषयक संवेदनशीलतेचा सार्वत्रिक अभाव या साऱ्याचा विचार केला, तर किती टनावारी आपल्याकडे औषधे वापरली जात असतील व फेकलीही जात असतील, याची कल्पना करवत नाही. म्हणूनच याबाबत अधिक संवेदनशील होणे, कडक कायदे, त्यांची अंमलबजावणी आणि संशोधन होणे आवश्यक. इतक्या छोटय़ा-मोठय़ा औषध कंपन्या, इतके ब्रॅण्ड्स ही सर्व बजबजपुरी खरेच गरजेची आहे का, याचाही यानिमित्ताने विचार व्हायला हवा. बायोमेडिकल (रुग्णांसाठी वापरले जाणारे सुया, कापूस आदी) कचरा व्यवस्थापनासाठी कायदे, नियम आहेत; पण औषध प्रदूषणाचा अधिक अभ्यास व त्यानुसार धोरणे आणि कृती आवश्यक आहे. पर्यावरण अभ्यासक, विविध संघटना आणि अर्थात फार्मा व वैद्यकीय तज्ज्ञ असे सारे एकत्र येणे गरजेचे आहे. जे आपण वापरतोय, त्याची किंमत पर्यावरणाला चुकवावी लागतीये, लागणार आहे याचे भान धोरणकर्त्यांपासून फार्मा कंपन्या व ग्राहकांपर्यंत सर्वानाच असणे गरजेचे आहे. टाकलेली औषधे पुन:पुन्हा या ना त्या रूपात आपला पाठलाग करत राहतातच, हे कटू सत्य भयावह आहे.

symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 3:06 am

Web Title: what is medicine mpg 94
Next Stories
1 कानामागून आल्या, पण..
2 न्यायालयात गर्दी
3 संयमी आणि प्रेरक
Just Now!
X