गुजरातमध्ये १९६९ साली भाजपचा मागमूस नसताना, एका मुस्लीम तरुणाला काही अज्ञात इसमांनी ‘जय जगन्नाथ’ म्हणण्यास भाग पाडले म्हणून उसळलेल्या दंगलीने १००० बळी घेतले होते.. याउलट, २००२ ची दंगल ‘प्रतिक्रिया’ म्हणूनच उसळली, हे  मोदींनीही स्पष्ट केले आहे.. असे असताना काँग्रेसने गुजरातमधील दंगलींवरच प्रचारात भर देणे अयोग्य ठरते, अशी बाजू मांडणारे आणि सलोखा टिकवण्याचे कर्तव्य काँग्रेसचेच होते याची आठवण देणारे हे टिपण.
देशाच्या फाळणीमुळे १९४७ मध्ये झालेल्या जातीय दंगलींनंतर हिंदू आणि मुस्लीम या समाजांत परस्परांविषयी सद्भावना निर्माण करणे हे देशापुढील सर्वात महत्त्वाचे, नाजूक आणि कठीण आव्हान होते. दुर्दैवाने राजकीय पक्ष या आघाडीवर सपशेल अयशस्वी ठरले. उलट अल्पसंख्याकांच्या मतांसाठी हे वैमनस्य सतत खदखदत ठेवण्याचेच प्रयत्न झाले. नियमितपणे होत राहिलेल्या, तर कधी घडवून आणलेल्या, जातीय दंगलींमुळे जातीय सलोखा हे एक मृगजळच ठरले आहे. जातीय ताणतणाव भडकू न देण्याचे आद्यकर्तव्य बहुतेक पक्षांनी- मुख्यत: सत्ताधारी काँग्रेसने धुडकावून लावले. गुजरात दंगलींचे मतांसाठी भांडवल करण्याकरिता या पक्षाने गेल्या काही वर्षांत केलेले आटोकाट प्रयत्न हेच सिद्ध करतात.  
स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या जातीय िहसाचाराचा आढावा घेतल्यास दिसून येते की बहुतांश दंगली काँग्रेसशासित राज्यातच झाल्या. मुस्लीम समाजाचे आपणच एकुलते एक कैवारी आहोत हे त्यांच्या मनात ठसवण्याचा त्या पक्षाचा अहíनश प्रयत्नच होत आलेला आहे. १९६६ ते १९७२ या काळात (माझी गुजरातेत नेमणूक असताना) गुजरातेत भाजपचा मागमूसदेखील नव्हता, तरी सप्टेंबर १९६९ मध्ये अहमदाबादेत भडकलेले मुस्लीमविरोधी दंगे २००२ च्या िहसाचाराइतकेच भीषण, अमानुष व भयानक होते हे मी स्वत: पाहिले आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेव्हा तब्बल दोन आठवडे लागले. काँग्रेस पक्ष तेव्हा विभाजनाच्या उंबरठय़ावर होता. गुजरातेत इंदिराविरोधी मोरारजी गटाचे राज्य होते तर केंद्रात इंदिराजींचे. गुजरातेतील दंगलींचे इंदिरा गटाने भरपूर भांडवल केले.
हे इतिहासचर्वण यासाठी की, जातीय सलोखा वाढवण्याऐवजी त्यात विष कालवण्यावरच काँग्रेसने भर दिला, निवडणूक मोहिमेत तर या प्रक्रियेस ऊत येई, हे चित्र स्पष्ट व्हावे. हेच चित्र आजही दिसते. पण हाच डाव त्यांच्यावरपण उलटू शकतो हे मात्र काँग्रेस नेते साफविसरले. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींनी नेमके हेच दाखवले.
इंग्रजीत एक म्हण आहे – ‘इफ यू सो विंड, यू विल रीप व्हर्लविंड’.. ‘वारे पेरले तर झंझावाताचे पीक कापाल’. गुजरातच्या २००२ मधील दंगलीं्चा निवडणूक प्रचारात काँग्रेसने केलेला अतिरेक त्यांना आता चांगलाच भोवतो आहे. राहुल गांधींच्या, दूरचित्रवाणीवर नुकत्याच प्रसारित झालेल्या मुलाखतीनंतर शीख धर्मीयांत संतापाचे उठलेले उद्रेक काँग्रेसला महागात पडतील. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत पक्षाच्या काही लोकांचा सहभाग असल्याची राहुलजींनी कबुली तर दिली; पण त्याच वेळी १९८४ आणि २००२ च्या दंगलींची तुलना अयोग्य असल्याची सारवासारवदेखील केली, जी कोणालाच पटण्यासारखी नाही. एका अर्थी ते ‘तुलना अयोग्य’ म्हणाले हे बरोबरच होते; पण वेगळ्या अर्थाने. कसे ते पाहा :
दिल्लीसारख्या ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिखांविरुद्ध लोकांना कसे आणि किती भडकावले, दंगे किती भीषण, िहसक होते हे समस्त दिल्लीकरांना चांगले ठाऊक आहे, आठवतेही आहे. दंगलींबाबत माफी मागायला पक्षनेत्यांना बरीच वष्रे लागली (का तर ‘जख्म हरे हो जायेंगे’) आणि दंगली भडकवणाऱ्या नेत्यांविरुद्ध न्यायालयांद्वारे कायदेशीर कारवाई मात्र अजून होतेच आहे. दंगली आवरण्यात राजधानीसारख्या ठिकाणी झालेला विलंब तर केवळ अक्षम्य होता. इंदिरा हत्येनंतर दिवसभर दिल्ली शांत होती. िहसा सूर्यास्तानंतर भडकली, उत्स्फूर्त नव्हती पद्धतशीर व नियोजित होती याबद्दलदेखील बरेच पुरावे उपलब्ध आहेत हे विसरून चालणार नाही.
गुजरातच्या दंगली मात्र उत्स्फूर्त होत्या व गोध्रा हत्याकांडामुळेच भडकल्या हे उघड सत्य असून काँग्रेस ते मान्य करीत नाही. उलट मोदींच्या प्रतिक्रियेवर (अ‍ॅक्शन इज फॉलोड बाय रिअ‍ॅक्शन) मात्र तिखट टीका झाली. मोदींच्या वक्तव्याची इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेच पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या राजीव गांधींच्या, राष्ट्राला उद्देशून दूरदर्शनवरून केलेल्या वक्तव्याशी तुलना करा. ते म्हणाले होते, ‘महावृक्ष गिरनेपर जमीन हिलतीही है’. त्या वक्तव्याचा संदर्भ काय होता हे राजीव यांनाच माहीत.. परंतु शीखविरोधी िहसाचाराचे हे उघड समर्थन नव्हते का? राहुलजींची मुलाखत घेणाऱ्यांनी या वक्तव्याबाबत खुलासा मागावयास हवा होता. अर्थात, त्या अळणी मुलाखतीबद्दल आधीच माध्यमांमध्ये भरपूर चर्चा झाली असल्याने पुन्हा उजळणीची गरज नाही. राजीव गांधींच्या वरील वक्तव्याने शीख समुदायात उफाळलेला संताप मी स्वत: त्या वेळी पंजाबात असल्याने जवळून पाहिला आहे. १९८४ च्या हत्याकांडाचे ते भीषण स्वप्न शीख समुदाय विसरणे शक्य नाही. त्यांना न्याय हवा जो मिळत नाही याचा त्यांना सार्थ राग आहे. अशा पाश्र्वभूमीवर त्या आठवणींना उजाळा न मिळू देण्याची सावधगिरी काँग्रेस नेत्यांनी बाळगलेली नाही. विरोधकांना पलटवार करण्याची संधी मात्र दिली.  
गुजरात दंगलींना १२ वर्षे लोटली. या काळात त्या हिंसाचाराचा वारंवार उल्लेख करून मुस्लिमांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी सतत चालू ठेवला. या माकडचेष्टांमुळे पाकिस्तानच्या आयएसआयला मुस्लीम हस्तक मिळणे मात्र फावले. (हल्लीच्या मुझफ्फरनगर दंगलींनंतर उभारलेल्या शिबिरांतील रहिवाशांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या हस्तकांनी केला होता, हे राहुलजींचेच विधान बरे). आणि आता शीखविरोधी दंगलींनंतर तीन दशके लोटली असताना जुन्या जखमांवरील खपल्या राहुलजींच्या विधानांमुळे खरवडून निघाल्या आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हे अनिष्ट आहे. पण ऊठसूट गुजरात दंगलींचे भांडवल करताना काँग्रेसला ते भान कुठले राहणार. त्यांना तर येनकेनप्रकारेण मोदी हननाच्या भुताने पछाडले आहे. हा तर काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगडफेक करण्यासारखाच प्रकार आहे.
शेवटी दंगलींसारख्या दुर्दैवी घटनांनंतर मृतांच्या आकडेवारीची तुलना करणे मनाला पटत नसले तरी विश्लेषणाला पूर्णत्व आणण्यासाठी ते गरजेचे आहे. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये हौतात्म्य मिळालेल्या कडव्या सैनिकांची संख्या बांगलादेश युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांपेक्षा जास्त होती, अशी माझी माहिती आहे.  शीखविरोधी दंगलींमध्ये मारलेल्या निरपराध लोकांची संख्या पंजाबातील खलिस्तानी उग्रवादात जीव गमावलेल्यांपेक्षा कितीतरी जास्त होती, याचीही आकडेवारी माझ्याकडे आहे. दिल्लीत पोलीस गोळीबारात कमीच दंगेखोर मारले गेले. याउलट गुजरात दंगलीत दोन्ही धर्माचे अनेक लोक पोलीस गोळीबारात ठार झाले. या तथ्यांवरून कोणते प्रशासन अधिक दोषी होते याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यातदेखील दिल्लीत-राजधानीचे शहर असूनसुद्धा- विलंबच झाला.   
आणि पंजाबमधील उग्रवादाच्या मुळाशीदेखील िभद्रनवालेचा भस्मासुर निर्माण करून शिखांच्या भावनांशी खेळण्याचा काँग्रेसप्रणीत फसलेला डावच होता हे वेगळे सांगायला नको. देशाने त्याची मोठीच किंमत चुकवलेली आहे. पण इतिहासाचे धडे आपण कधी शिकलो नाही, हेच खरे.
लेखक ‘इंटेलिजन्स ब्युरो’तील निवृत्त संचालक आहेत. ईमेल :  vaidyavg@hotmail.com