तरुण पिढी म्हणजे भविष्यानेही आस लावून पाहावे, असे वर्तमान. ही पिढी काहीतरी सर्जनात्मक घडवते आहे. तिचे कर्तृत्व समाजासमोर आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात विविध क्षेत्रांतील हे १२ लखलखते हिरे हाती लागले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ

ग्रा मीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकारता यावे, यासाठी यजुर्वेद्र महाजन अहोरात्र झटत आहेत. तरुण पिढी हे आपल्या देशाचे भविष्य आहे. याच तरुणाईतून भविष्यातील प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे कार्य करणाऱ्या महाजन यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा असाच आहे.

महाजन यांनी खान्देशाच्या भूमीतून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरू केले. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या सोबतीने २००५ मध्ये ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ची स्थापना केली. डॉक्टर असलेले वडील केवळ एक रुपया घेऊन रुग्णांवर उपचार करत. मुख्याध्यापक असलेले आजोबा रविवारीही शाळेत जाऊन काम करत. समाजसेवेचा हा वारसा महाजनांनी जोपासला. सुरुवातीला या कार्यासाठी लागणारा पैसा वडिलोपार्जित शेतजमीन आणि घर विकून उभा केला. आज ‘दीपस्तंभ’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील १८ जिल्ह्य़ांत विविध उपक्रम सुरू आहेत. आज केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील विद्यार्थी प्रकल्पात शिक्षण घेत आहेत. उज्ज्वल भारत घडविण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामीण, आदिवासी भागातील अत्यंत गरीब व होतकरू युवक, युवती या प्रकल्पात नि:शुल्क निवासी प्रशिक्षण घेत आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाजन यांनी गरीब दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘गुरुकुल’ हे विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू केले. अनाथ मुलांना वयाच्या १८व्या वर्षी अनाथालयातून बाहेर पडावे लागते. अशा मुलांसाठी महाजन यांनी ‘संजीवन’ हे मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. दीपस्तंभ आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियानाची सुरुवात करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थी व २० हजार शिक्षकांमध्ये अवांतर पुस्तके वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी चळवळ सुरू केली. शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याला  ‘दीपस्तंभ’ने आकार दिला आहे.

यजुर्वेद्र महाजन हे दीपस्तंभ फाऊंडेशनमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्र चालवितात. हे केंद्र व्यावसायिक असले तरी या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. त्यातील प्रमुख म्हणजे मनोबल केंद्र. हे केंद्र केवळ दिव्यांग युवक-युवतींसाठी चालविले जाते. या केंद्रात या वर्षी १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.दीपस्तंभ संस्थेने ब्रेल लिपीतील ५० पुस्तके आणि एक हजार ध्वनिफिती तयार करून घेतल्या आहेत.

यजुर्वेद्र महाजन – संस्थापक, दीपस्तंभ फाऊंडेशन

अनाथांचा आधारवड

बालवयात सोसलेले चटके तरुणपणात एका प्रेरणेला जन्म देत असतात. या प्रेरणेने जिद्दीने वाटचाल केली तर काय सत्कार्य घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सागर रेड्डी. अनाथाश्रमातील वास्तव्यापासून ते अनाथ मुलांचा आधारवड बनण्यापर्यंत सागरचा प्रवास थक्क करणारा आहे.

बालवयात आई-वडील गमावलेल्या सागरला आजोबांनी लोणावळ्यातील एका अनाथाश्रमात दाखल केले. वयाच्या १८ वर्षांनंतर त्याला अनाथाश्रमातून बाहेर पडावे लागले. मात्र, आता करायचे काय, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. पण, सागर डगमगला नाही. बालपणापासून सोसलेल्या चटक्यांनी सागरला कणखर बनविले आहे. त्याने जिद्दीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीत नोकरी मिळवली. चांगली नोकरी, घर आणि दिमतीला गाडी असे सुख वाटय़ाला आले असतानाही अनाथांचे विश्व त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने आपल्या अनाथाश्रमाला भेट दिली आणि त्याचा भूतकाळ जागा झाला. अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काही तरी करावे, अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. त्याने तत्काळ नोकरीचा राजीनामा दिला आणि समाजसेवेचा वसा घेतला. वयाच्या १८ व्या वर्षांनंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलामुलींचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्याने २०१० मध्ये ‘एकता निराधार संघ’ ही संस्था सुरू केली. सुरुवातीला नवी मुंबईत भाडय़ाच्या खोलीतून सुरू केलेली ही संस्था राज्यभरात पसरत आहे. मुंबई, यवतमाळ, कामशेत (पुणे) येथे या संस्थेच्या शाखा आहेत. विविध आश्रमशाळांतून बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींना कौशल्य-शिक्षण देऊन या संस्थेमार्फत स्वत:च्या पायावर उभे केले जात आहे. या संस्थेमार्फत सागरने अनेक मुलांना शिक्षण, नोकरीसाठी आवश्यक आधारकार्ड, मतदान ओळखपत्र अशी आवश्यक कागदपत्रे मिळवून दिली आहेत. या संस्थेने आजवर ११२५ तरुणांचे पुनर्वसन केले आहे. ७०० हून अधिक तरुण-तरुणींना रोजगार मिळवून दिला आहे. ६० हून अधिक मुलींचे लग्न लावून दिले आहे.

वयाच्या १८ व्या वर्षांनंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने सागरने २०१० मध्ये ‘एकता निराधार संघ’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने आतापर्यंत एक हजारहून अधिक तरुण-तरुणींचे पुनर्वसन केले आहे. राज्यात नोंदणी झालेल्या या संस्थेचे कामकाज देशभर पोहोचविण्याचे सागरचे प्रयत्न आहेत.

सागर रेड्डी : संस्थापक, एकता निराधार संघ

फॅशनविश्वातील ‘चंदेरी’

मुलगी अठरा वर्षांची झाली की तिचे लग्न उरकायचे ही अद्यापही ग्रामीण भागात कर्तव्यपूर्ती मानली जाते. मुलीला तिच्या पसंतीचे शिक्षण घेऊ देण्याची मानसिकता ग्रामीण भागात आता कुठे पालकांमध्ये रूजत असली तरी मुलीचे ‘ओझे’ हलके करण्याची चिंता त्यांना लागलेली असतेच. त्यात त्या मुलीची घुसमट क्वचितच लक्षात घेतली जाते. अशाच कौटुंबिक स्थितीला सामोरी गेलेल्या वैशाली शडांगुळेला मात्र बाहेरचे जग खुणावत होते. मध्यप्रदेशातील विदिशामध्ये जन्मलेली वैशाली जग कवेत घेण्यासाठी वयाच्या अठराव्या वर्षी घराबाहेर पडली आणि दुर्दम्य आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी फॅशन डिझायनर बनली. हा प्रवास इतका सहज सोपा नव्हता. मुंबईकडे येताना वैशाली यांच्याकडे ना कौटुंबिक पाठबळ होते ना आर्थिक. त्या एकटय़ाच होत्या. त्यांनी सुरुवातीला काही लहानमोठय़ा नोकऱ्या केल्या. त्यानंतर स्वत:च शिकलेल्या फॅशन डिझायनिंगच्या अर्थात अंगभूत असलेल्या कल्पकतेच्या जोरावर अगदी छोटेसे दालन एका उपनगरात सुरू केले. हे करताना त्यांनी अनेक संघर्षांचा सामना केला. यात कधीही आत्मविश्वास ढळू दिला नाही.

फॅशन डिझायनिंगचे काम सुरू केल्यानंतर त्यांनी स्वत:च्या कल्पकतेचा वापर करण्यावर जास्तीत जास्त भर दिला. कोणतीही गोष्ट आतून यायला हवी, असे त्यांचे मत. त्यामुळे यातून त्या हळूहळू आपली ओळख बनवत गेल्या. वैशाली यांचा भर आपल्या सांस्कृतिक ठेवा जपण्यावर अधिक आहे. वैशाली यांचा फॅशनकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. फॅशन माणसाला आत्मविश्वास देत नाही, तर आत्मविश्वासातून फॅशन तयार होते. कपडय़ासोबत जगायला शिका, आपसूकच नवनवीन कल्पना सुचतील. सगळ्यांपेक्षा वेगळं घडवायचं असेल तर ते खरं पाहिजे. आतून आलं पाहिजे, तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना आवडेल, असे त्या सांगतात. याच आत्मविश्वासामुळे वैशाली आज हातमागाची कला जपण्यासाठी झटत आहेत.

आपल्या स्वप्नांचे जग कवेत घेण्यासाठी वैशाली शडांगुळे वयाच्या अठराव्या वर्षी घराबाहेर पडली आणि दुर्दम्य आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी फॅशन डिझायनर बनली. पाश्चिमात्य फॅशन डिझायनर काही तरी सांगतात म्हणून त्याचा अनुनय न करता आपल्या देशाच्या संस्कृतीचा विचार करून नवनवीन ट्रेण्ड आणल्यास त्याला मोठी मागणी असते, असे वैशाली सांगते.

वैशाली शडांगुळे – फॅशन डिझायनर

आरोग्यवर्धक तंत्रज्ञ

तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असला तरी त्याची उपयुक्तता कमी होत नाही. आरोग्य क्षेत्रातील संशोधन, नव्या तंत्रज्ञानामुळे मानवी आयुर्मान वाढले आहे. अर्थात तंत्रज्ञाच्या गैरवापराने ‘कोवळ्या कळ्या’ उमलण्याआधीच खुडल्या जातात हे खरे असले तरी तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने आरोग्य क्षेत्रात किती मोठे काम करता येऊ शकते, याचा वस्तुपाठ शंतनू पाठक याने घालून दिला आहे.

भारतात सुमारे ६० टक्के गर्भवती महिला आरोग्य सुविधांपासून वंचित राहत असल्याचे आकडेवारी सांगते. २०१० मध्ये जगभरात झालेल्या २,८७००० मातामृत्यूंपैकी १९ टक्के मातामृत्यू भारतात झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व आरोग्य सुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी वंचित घटकांतील गर्भवती महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अभियंता असलेल्या शंतनूने आधी ‘एस फॉर एस’ (सायन्स फॉर सोसायटी) या स्वयंसेवी संस्थेत काम केले होते. पुरेशा माहितीअभावी गर्भवतींच्या आरोग्याची कशी आबाळ होते, हे त्याने त्या वेळी अनुभवले होते. अतिजोखीम असलेल्या गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्याने घेतला आणि त्यातून ‘केअरएनएक्स’चा जन्म झाला. शंतनू पाठक आणि आदित्य कुलकर्णी यांनी २०१५ मध्ये ‘केअरएनएक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली. शंतनू हा या कंपनीचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. ‘केअरमदर’च्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकातील गर्भवतींना दर्जेदार वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्याचा ‘केअरएनएक्स’चा प्रयत्न आहे. ‘केअरएनएक्स’ने ‘मदरकेअर’ हे कीट तयार केले आहे. या कीटद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या आठ चाचण्या करता येतात. हे कीट मोबाईल अ‍ॅपशी जोडलेले असते. गर्भवती महिलांच्या घरी जाऊन या कीटद्वारे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. या प्रसूतिपूर्व चाचण्यांतून माता आणि बालकांची आरोग्यस्थिती कळते.

‘केअरएनएक्स’मुळे वैद्यकीय चाचणी केलेल्या सुमारे ५२ टक्के गर्भवती महिलांना अतिजोखमेपासून दूर ठेवण्यात यश आले. २०१७-१८ या वर्षांत १० हजारहून अधिक गर्भवती महिलांना वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात आला आहे.  ‘केआरएनएक्स’द्वारे महाराष्ट्रासह आठ राज्यांत कार्य. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यंत सुविधा देण्यात येतात. २०२० पर्यंत दीड लाख महिलांपर्यंत वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे शंतनूचे उद्दिष्ट आहे.

शंतनू पाठक सहसंस्थापक,  केअरएनएक्स

सावरपाडा एक्स्प्रेस

नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले सावरपाडा हे छोटे आदिवासी खेडे. दुर्गम असेच. शाळेसारख्या सुविधांपासून वंचित. या गावाला देशाने काय दिले ते शोधावे लागेल, पण सावरपाडय़ाने देशाला मात्र कविता राऊतच्या रूपाने अस्सल रत्न दिलेले आहे. शालेय शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेसाठीही जाऊन-येऊन २० किलोमीटर पायपीट करावी लागे, असे कविता राऊतने एका मुलाखतीत सांगितले. पायांना लहानपणापासूनच अशी सवय आणि सराव मिळाल्यामुळे कविता जागतिक दर्जाची दीर्घ पल्ल्याची धावपटू झाली, यात नवल नाही. तिला खरे तर खेळाची आवड होती. पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे धावणे हा सर्वाधिक स्वस्तातला पर्याय तिनं निवडला. बूट परवडत नव्हते, त्यामुळे सुरुवातीची बरीचशी वर्ष ती बुटांशिवायच धावायची. पण या तपश्चर्येतूनच तिची कारकीर्द घडत गेली.

१० हजार मीटर आणि ५ हजार मीटर या दोन्ही प्रकारांमध्ये कविताचा वावर आत्मविश्वासपूर्ण आहे. अवघ्या १६ व्या वर्षीच तिनं राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं, तेही अवघ्या १५ दिवसांच्या सरावानंतर. १० हजार मीटर प्रकारात ३४.३२ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. २००९मध्ये ग्वांगजो आशियाई स्पर्धेत कवितानं ५ हजार मीटर प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नवी दिल्लीत २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिनं इतिहास घडवला. या स्पर्धेत तिनं कांस्य पदक जिंकलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू ठरली. इतकंच नव्हे, तर तिच्याआधी ४४ वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याची कामगिरी साक्षात मिल्खासिंग यांनी करून दाखवली होती! ग्वांगजोमध्ये २०१०मध्ये झालेल्या एशियाडमध्ये तिने १० हजार मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकलं.

२०११मधील राष्ट्रीय स्पर्धेत तिने ५ हजार मीटर आणि १० हजार मीटर अशा दोन्ही स्पर्धा जिंकून दाखवल्या. अर्धमॅरेथॉन आणि मॅरेथॉन या प्रकारांमध्येही कविताने कौशल्य सिद्ध केलेले आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये १ तास १२ मिनिटे ५० सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे.

कविताने २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत १० हजार मीटरमध्ये कांस्य पदक, २०१० एशियाड स्पर्धेत १० हजार मीटरमध्ये रौप्यपदक, २००९ आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ५ हजार मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. १० हजार मीटर आणि अर्धमॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रमाची ती मानकरी ठरली असून, २०१२मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कविता राऊत धावपटू

माणदेशी एक्स्प्रेस

सा तारा जिल्ह्य़ातील माणसारख्या दुष्काळी तालुक्यात शेतकरी कुटुंबात जन्म. घरची परिस्थिती बेताचीच. शेतावर काम करून शाळेत वेळेवर जायचे म्हणजे कसरतच. ललिता शिवाजी बाबर हिला शिकण्याची आवड होतीच, पण झटपट शाळेत जाऊन परत येऊ शकेल यासाठी तिला सायकल घेऊन देण्याची घरची ऐपत नव्हती. मग ललिता धावतच शाळेत जायची आणि येतानाही अंधार होण्याच्या आधी धावतच परतायची. ते अंतर साधारण ३००० मीटरचे. ललिताच्या नकळत शालेय दिवसांतील त्या धावपळीतून तिच्यातील अ‍ॅथलीट घडत गेली. आज दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतींमध्ये भारताचे नाव महिला अ‍ॅथलेटिक्स जगतात आदराने घेतले जाते, याला कारणीभूत ठरलेली ललिता अशी परिस्थितीतून घडली. पूर्वी विशेषत: महिला धावपटूंच्या बाबतीत केरळ ही खाण समजली जायची. आज तो मान महाराष्ट्राला मिळू लागला आहे. त्याचे श्रेय ललितासारख्या गुणवान अ‍ॅथलीट्सना द्यावे लागेल. ३००० मीटर स्टीपलचेस या खडतर प्रकारात ललिता कर्तृत्व गाजवत आहे. स्टीपलचेस म्हणजे अडथळ्यांची शर्यत. शेतावरून शाळेकडे जाताना असे अनेक अडथळे ललिताने लीलया पार केले होते. तो अनुभव तिला व्यावसायिक कारकीर्दीत नक्कीच फायदेशीर ठरला असावा. अ‍ॅथलेटिक्सकडे तिचा ओढा होता, पण त्यात करियर करायचे जाहीर केल्यावर घरच्यांचा थोडा विरोध झालाच. ते स्वाभाविक होते. ग्रामीण भागातील मुलगी म्हणजे संसार किंवा शिक्षण असे दोन पर्याय. ललिताने थोडा वेगळा आणि धाडसी पर्याय निवडला. तो निर्णय योग्य असल्याची प्रचीती लवकरच आली. २००५ मध्ये तिने २० वर्षांखालील राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पुण्यात अजिंक्यपद मिळवले. मॅरेथॉन हा सुरुवातीला तिच्या विशेष आवडीचा प्रकार होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये तिने सलग तीन वर्षे अजिंक्यपद पटकावून हॅटट्रिक केली. २०१४ मध्ये तिसऱ्यांदा मुंबई मॅरेथॉन जिंकल्यावर तिने स्टीपलचेसकडे वळण्याचा अत्यंत महत्त्वाचा पण धाडसी निर्णय घेतला. तिला अर्जुन पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.

ललिताने तीन वेळा मुंबई मॅरेथॉन अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच तिने हुआन आशियाई अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक, इन्चेऑन एशियाडमध्ये ३००० स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक, रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये अंतिम फेरीत धडक, २०१६मध्ये अर्जुन पुरस्कार अशी कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात अंतिम फेरी गाठणारी ती दुसरी भारतीय धावपटू ठरली आहे.

ललिता बाबर धावपटू

निपुण कलावंत

मराठी चित्रसृष्टीचा आणि रंगभूमीचा आवाका आज बऱ्यापैकी पसरतोय, पण इथल्या वेगवान आणि सतत चकवा देणाऱ्या चमचमत्या जगात दर्शकांचे लक्ष वेधून घेणे सहजशक्य नाही. यशाचा कोणताही रूढ मूलमंत्र नसताना पारंपरिक रुळलेल्या वाटांना स्पर्श न करण्याचे ठरवून आपल्या नावाचा बोलबाला अवघ्या तरुणाईमध्ये पसरविणारा निपुण धर्माधिकारी आज प्रचंड तळपतोय. आत्मविकासाची स्वत:ची वाट ठरवून निपुणने आपले नाव खऱ्या अर्थाने कमावले आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आदी सर्वच क्षेत्रांत नावाला जागणाऱ्या या कलावंताने गेल्या दोनेक वर्षांमध्ये यूटय़ूबद्वारे अफाट प्रसिद्धी मिळविली आहे. यूटय़ूबवरील त्याच्या विविध बेधडक उपक्रमांना तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.

महाविद्यालयीन काळापासूनच निपुणने कला क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच या क्षेत्राकडे वळण्याचा त्याने निर्णय घेतला होता. मित्रांच्या बरोबर नाटक कंपनी या संस्थेची स्थापना केली. प्रायोगिक नाटकांच्या निर्मितीसाठी ही संस्था आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नव्या युगातील नव्या तंत्रज्ञानाला सामोरे जाताना त्यातील गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्यामध्ये सर्वात आधी ‘बोलकी पुस्तके’ या उपक्रमात त्याने सहभाग घेतला. संगीत नाटकांची महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्षांची परंपरा टिकून राहावी यासाठी तसेच नवी पिढी त्याकडे आकृष्ट व्हावी यासाठी निपुणने अनेक उपक्रम राबविले. या प्रदीर्घ नाटकांचे त्याने आणखी आखीव-रेखीव संपादन केले. त्यातील मूळ गाभा हरवू न देता ती नव्याने सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. संगीत संशयकल्लोळ, मानापमान आणि सौभद्र अशा तीन नाटकांचे संपादन आणि दिग्दर्शन त्याने केले. याशिवाय लुज कन्ट्रोल, नेव्हर माइंड आणि अमर फोटो स्टुडिओ या तीन व्यावसायिक नाटकांबरोबर एकांकिकाही केल्या. त्याने आतापर्यंत १५ नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

नाटक करीत असतानाच चित्रपट माध्यमातही काही नवे करण्याचा प्रयत्न निपुणने केला आहे. ‘बापजन्म’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट नावाजला गेला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने त्याने सिक्स्टिन बाय सिक्स्टिन नावाची संस्थाही उभारली आहे. ‘फोर्ब्स’च्या दोन पुरस्कारांसोबत अन्य चार नावाजलेल्या पुरस्कारांचा निपुण मानकरी आहे. विनोद दोशी शिष्यवृत्ती ही त्याच्या उत्कर्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरली.

निपुण धर्माधिकारी निर्माता, दिग्दर्शक

या पिढीची नायिका

दरएक पिढीचा नायक जसा त्या त्या पिढीच्या मनावर राज्य करीत असतो, तशी मुक्ता बर्वे ही या पिढीची नायिका आहे. पडदा छोटा असो किंवा मोठा, त्यात शिरल्यावर झालेला परकायाप्रवेश मुक्ता बर्वे नावाच्या अभिनयाची आतषबाजी दाखविणारा असतो. झी टीव्हीच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतून घराघरांत आदर्श सुनेची छबी मांडणारी राधा असो किंवा ‘मुंबई-पुणे- मुंबई’मधील मुंबईकरीण गौरी, ‘डबल सीट’मधील घरस्वप्नांकित मध्यमवर्गीय मंजिरी नाईक असो किंवा ‘जोगवा’मधील जोगतीण सुली, प्रत्येक भूमिका जिवंत जगलेल्या मुक्ता बर्वेचे दर्शन घडते.

आज मराठी नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी मालिकांतील अत्यंत संवेदनशील, यशस्वी अभिनेत्री आणि नाटय़निर्माती म्हणून मुक्ता बर्वे हे नाव सर्वाना परिचित आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील नाटय़शास्त्र विभागात शिकत असतानाच अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सादर केलेल्या नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘सखाराम बाईंडर’मध्ये चंपाची भूमिका गाजवून मुक्ता बर्वे हिने आपल्या भावी यशाचे समीकरण मांडले होते. चिंचवडमध्ये जन्मलेल्या मुक्ताने कला क्षेत्रात पूर्णवेळ काम करायच्या निर्धाराने मुंबई गाठली. कुल्र्याच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करून दिवसच्या दिवस अभिनयाचे आणि शहराचे धडे घेऊन स्वत:ला घडविले. दोन हजार सालात ‘आम्हाला वेगळे व्हायचेय’ या व्यावसायिक नाटकातून तिने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर रंगभूमीवर यशाचा एक एक पल्ला पार पाडत तिने आपली ओळख तयार केली. ‘देहभान’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘कबड्डी-कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘लव्हबर्डस’, ‘छापा-काटा’, ‘कोडमंत्र’ ही एकामागून एक नाटके येत होती आणि मुक्ता बर्वे या नावाचे वजन वाढवीत होती. अनेक नाटकांतील भूमिकांसाठी तिला राज्य शासनाच्या पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळत होते. मुक्ताच्या प्रत्येक सिनेमाचा जाणकार प्रेक्षकांपासून समीक्षकांनीही गौरव केला आहे.

मुक्ता बर्वेने स्वत:च्या रसिका प्रॉडक्शन संस्थेद्वारे उत्तम नाटकांची निर्मिती केली. २००४ साली तिने ‘चकवा’ या चित्रपटाद्वारे मोठय़ा पडद्यावर पदार्पण केले. नाटय़, चित्रपटांमध्ये उत्तम यश मिळत असताना आधुनिक शहरी ते ग्रामीण, खेडवळ स्त्रीच्या भूमिका समर्थपणे वठविल्या. संगीत नाटक अकादमीचा बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासह विविध पुरस्कार तिला मिळाले आहेत.

मुक्ता बर्वे ( अभिनेत्री, निर्माती)

प्रयोगशील  नाटय़निर्माता

नाटय़क्षेत्रात नवनवीन प्रयोग करताना सामाजिक भान जपणारे आघाडीचे नाटय़निर्माते म्हणजे राहुल भंडारे. आज नाटय़क्षेत्रात राहुल यांचे नाव आदराने घेतले जाते. निखळ मनोरंजन करतानाही आपण सामाजिक भान जपू शकतो याचा प्रत्यय राहुलचे नाटक पाहताना येतो.

रुपारेल महाविद्यालयात असताना राहुल यांना नाटकाची आवड निर्माण झाली. पदवी पूर्ण करताच त्यांनी नाटय़ क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे नट किंवा दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न न बाळगता नाटय़निर्मितीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उतरण्याचा निश्चय त्यांनी केला. मानवाधिकार कायद्यातील पदवी घेऊनही वकिली न करता रंगभूमीवर काहीतरी मूलभूत करून दाखवायचं, या वेडातून राहुल यांनी या व्यवसायात येण्याचे ठरविले. घरची परिस्थिती तशी बेताचीच. नाटय़निर्मितीसाठी पैशांचे भक्कम पाठबळ लागते. मित्रांच्या मदतीने त्यांनी या समस्येतून मार्ग काढला. नाटय़क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी ‘अद्वैत थिएटर्स’ची स्थापना करून सिद्धार्थ जाधव या तेव्हाच्या उदयोन्मुख नटाला प्रमुख भूमिकेत घेऊन ‘जागो मोहन प्यारे’ हे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आणले. त्यानंतर ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) हे वसतिगृहात राहणाऱ्या अविवाहित मुलींच्या प्रश्नावरील नाटक त्यांनी सादर केले. सर्व स्त्री-कलावंत असलेले हे नाटक त्यांनी जिद्दीने रंगमंचावर आणून ते यशस्वीही करून दाखविले. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहोल्ला’, ‘बॉम्बे १७’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ यांसारखी सामाजिक भान असलेली व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आणण्याचे धाडस राहुल यांनी केले.

‘करून गेलो गाव’सारख्या नाटकातून मिळालेल्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर राहुल यांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे शिवाजी महाराजांच्या ‘बहुजन हिताय’ राज्यकारभाराचे मूळ नेमके कशात होते आणि आज त्यांच्या नावाचा कसा बाजार मांडला गेला आहे, याचा परामर्श घेणारे प्रायोगिक धर्तीचे नाटक सादर केले. त्यासही उत्तम प्रतिसाद मिळाला.

रुपारेल महाविद्यालयात असताना राहुलला नाटकाची आवड निर्माण झाली. पदवी पूर्ण करताच त्यांनी नाटय़ क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहोल्ला’, ‘बॉम्बे १७’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ यांसारखी सामाजिक भान असलेली व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आणण्याचे धाडस राहुल यांनी केले.

राहुल भंडारे नाटय़निर्माता

अनोखी अन्नपूर्णा

समतोल आणि चौरस आहार हा उत्तम आरोग्याचा पाया आहे. त्यासाठी आहारातील पोषक जीवनसत्त्वांचा समतोल राखणे गरजेचे आहे. याच विषयावर संशोधन करणारी पुण्याची अम्रिता हाजरा ही ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या संस्थेत संशोधक आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. वनस्पती आणि सूक्ष्मजीव आहारातील जीवनसत्त्वांचे एकत्रीकरण आणि संश्लेषण करण्यास समर्थ असतात. पण आपल्याला बाह्य़स्रोतांद्वारे जीवनसत्त्वांची गरज पूर्ण करावी लागते. याच गोष्टीचा वापर जीवनसत्त्वांचे व्यापारी तत्त्वावर एकत्रीकरण करण्यासाठी होऊ शकतो, हा विचार अम्रिताच्या संशोधनाची प्रेरणा आहे.

याशिवाय या संशोधनाचा वापर अन्य अनेक उपयुक्त क्षेत्रांत होऊ शकतो. सूक्ष्मजीवांची जीवनसत्त्वे आणि प्रतिजैविके तयार करण्याची क्षमता वापरून अनेक नवी औषधे विकसित करता येतील. त्यातून जिवाणू आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्याचे नवे मार्ग सापडू शकतील. याचा आणखी एक उपयोग म्हणजे औद्योगिक तत्त्वावर जीवनसत्त्वांचे उत्पादन करता येऊ शकेल. त्यामुळे हे संशोधन अधिक समाजोपयोगी आणि समाजाभिमुख करता येईल. अम्रिताने २०१५ साली मिलेट प्रकल्पावर काम सुरू केले. त्यामागे विचार असा होता की भरड किंवा बाजरी वर्गाच्या धान्यांमध्ये बहुमूल्य जीवनसत्त्वे आणि पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे आपल्याला आवश्यक जीवनसत्त्वे या धान्यांद्वारे सहज उपलब्ध होऊ शकतात. पण आजकाल या धान्यांच्या लागवडीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. त्यामुळे या धान्यांच्या वाणांची पुनर्लागवड होणे आवश्यक आहे.

आपल्या आहारात हल्ली गहू, तांदूळ, मका अशा व्यावसायिक पिकांचा अंतर्भाव आहे. मात्र पोषक, समृद्ध अशा बाजरीवर्गीय धान्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. कमी पाण्यात तग धरणारी, जैवविविधता जपणारी ही रोपे आणि त्यांचे मानवी आहारातील महत्त्व यांचा सखोल अभ्यास अम्रिताने तिच्या संशोधनात केला आहे.

परदेशातून २०१६ साली भारतात परत आल्यावर अम्रिताने अनेक शाळा महाविद्यालयांत या धान्यांचे महत्त्व पटवून देऊन जनजागृतीचे कार्य हाती घेतले. अम्रिताने आजवर अनेक चर्चासत्रांत भाग घेऊन आपले संशोधन जगासमोर मांडले आहे. अम्रिता यांना आजवर अर्ली करिअर रिसर्च अवॉर्ड, बर्कले फूड इन्स्टिटय़ूट सीड ग्रँट अवॉर्ड, पोस्टर अवॉर्ड आदी पुरस्कार मिळाले आहेत.

अम्रिता हाजरा ( संशोधक)

पथदर्शी संशोधक

दुष्काळाचा प्रश्न फारच बिकट आहे. पण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदर्श मानणाऱ्या हैदराबादच्या जव्वाद पटेल या २२ वर्षीय अभियंत्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठे संशोधन केले आहे. आपण आपल्या सभोवताली असलेल्या हवेचे रूपांतर पाण्यात करू शकलो तर? याच कल्पनेला जव्वाद पटेलने मूर्त स्वरूप दिले आहे. जव्वादने थ्री-डी प्रिंटिंगच्या साहाय्याने तयार केलेले डय़ू ड्रॉप हे यंत्र तासाला १ पूर्णाक ८ लिटर पिण्यायोग्य पाणी तयार करू शकते. फक्त ९०० ग्रॅम वजनी हे यंत्र कुठेही नेणे अगदी सोपे आहे.

वाळवंटासारख्या प्रदेशात हे यंत्र ताशी सव्वा लिटर पाणी तयार करू शकते. सध्या जव्वाद या यंत्राच्या पुढील टप्प्यावर काम करत आहेत ज्यात सौर ऊर्जेच्या मदतीने गरम किंवा थंड पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र डय़ू ड्रॉप हा जव्वादने लावलेला एकमेव शोध नसून त्याने आजवर स्मार्ट लॉक, सोलर कार, क्वाडकॉप्टर, असे अनेक शोध लावले आहेत. यात सर्वात वैशिष्टय़पूर्ण शोध आहे तो म्हणजे स्मार्ट हेल्मेटचा. या हेल्मेटमध्ये जीपीएस यंत्रणा असून त्याद्वारे चोरी झालेल्या वाहनाचा शोध घेणे शक्य आहे. हे हेल्मेट वाहनाची गती जास्त असेल किंवा अधिक वजन असेल किंवा चालक धूम्रपान करत असल्यास, फोनवर बोलत असल्यास धोक्याचा इशारा देते. चालकाचा अपघात झाल्यास तातडीने जवळच्या आप्तजनांना संदेश पाठवते. असे अनेकविध शोध लावून जव्वादने जगभरात बहुमान मिळवला आहे.

विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ३९ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. जव्वाद यांना भारताच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा पुरस्कार, इंटरनॅशनल एक्झम्प्लरी रिसर्च अ‍ॅण्ड परफॉर्मन्स अवॉर्ड २०१८ इन मेडिकल रिसर्च, बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड आयएसआयई भोपाळ, स्टुडंट सायंटिस्ट अवॉर्ड आदी पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या वैज्ञानिक शोधांचा फायदा जनतेला आणि पर्यायाने देशाला व्हावा म्हणून हा तरुण संशोधक झटत आहे.

जव्वाद पटेलच्या डय़ू ड्रॉप आणि स्मार्ट हेल्मेट या उत्पादनांची पेटंट दाखल झाली आहेत. त्यांनी आजवर एकूण नऊ पायलट प्रॉडक्ट्स तयार केली आहेत. त्यात डय़ू ड्रॉप, स्मार्ट हेल्मेट, इपिडर्मस, अ‍ॅग्रि-टेक, थॉम्सन ड्रायव्हर, अँड्रॉईड एचएमआय, सोलर कार, गो कार्ट, ओम्नी एक्स (आयओटी) यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने ग्राहकोपयोगी आहेत.

जव्वाद पटेल (संशोधक)

पर्यायी ‘ऊर्जा’वंत

पेट्रोल, कोळसा, नैसर्गिक वायूंसारखे पारंपरिक ऊर्जास्रोतांचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे अक्षय ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या जैविक वनस्पतीजन्य पदार्थाचा वापर अनिवार्य ठरू लागला आहे. किफायतशीर दरात हा पर्याय उपलब्ध करू दिला आहे सौरभ पाटणकर या मूळच्या बदलापूरच्या तरुणाने. सौरभ सध्या कॅनडातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’मध्ये ‘अ‍ॅडव्हान्स रिन्युएबल मटेरिअल लॅबोरेटरी’मध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. सौरभने मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेतून पीएचडी पूर्ण केली आहे.

सौरभने जैविक वनस्पतीजन्य पदार्थापासून म्हणजेच ‘बायोमास’पासून अतिसूक्ष्म काष्ठतंतू तयार केले. हे अतिसूक्ष्म काष्ठतंतू पोलादासारखे मजबूत पण अत्यंत हलके असतात. त्यातून पर्यावरणस्नेही वैद्यकीय उपकरणे अत्यंत स्वस्तात बनवणे शक्य झाले आहे. पूर्वी १ ग्रॅम अतिसूक्ष्म काष्ठतंतूसाठी ८० रुपये खर्च येत असे. पण, आता सौरभच्या संशोधनामुळे हाच खर्च एका ग्रॅमसाठी केवळ ३ रुपये इतका येतो. अतिसूक्ष्म काष्ठतंतूचा उपयोग प्रामुख्याने वैद्यकीय साधने बनवण्यासाठी होतो मात्र आतापर्यंत हा पदार्थ बनवण्याची प्रक्रिया महाग असल्याने त्याचा उपयोग केला जात नसे. मात्र, सौरभच्या संशोधनातून निर्माण झालेले अतिसूक्ष्म काष्टतंतू अत्यंत स्वस्तात बनवता येऊ शकतात. या शोधाची दखल रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या ‘ग्रीन केमिस्ट्री’ या नियतकालिकाने दखल घेतली आहे.

जैविक घटक मूल्यवृद्धीची शाखा जैविक वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे झाडांचे बुंधे, काठय़ा, पाने, लाकडांचे ओंडके, शेतीतून तयार झालेला कचरा आदी पदार्थाचे स्वरूप वेगवेगळे असले तरी त्यांचे मूळ घटक सारखेच असतात. हे घटक म्हणजे सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिगनीन. जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या मिश्रणांनी बनलेले आहेत. शेतीमधून तयार झालेल्या वनस्पतीजन्य कचऱ्याचे रूपांतर आता जीवनोपयोगी घटकांमध्ये करणे शक्य झाले आहे. संशोधनाच्या या शाखेला ‘बायोमास वेलोरायसेशन’ म्हणजेच नैसर्गिक जैविक घटक मूल्यवृद्धीची शाखा म्हणतात.

भविष्यातील पारंपरिक इंधनाला पर्याय ठरणाऱ्या ‘गॅमा व्हॅलेरोलॅक्टोन’ या इंधनाच्या निर्मितीसाठी सध्या १५० डॉलर प्रति बॅरल खर्च येतो.गवत, लाकडी काटक्या आदींचा वापर करून पाण्यात अभिक्रिया करत या इंधनाची निर्मिती केली. त्यामुळे हे इंधन ५० डॉलर प्रति बॅरल इतक्या कमी किमतीत निर्माण करता येऊ शकते. पेट्रोल आणि डिझेलला ‘गॅमा व्हॅलेरोलॅक्टोन’ पर्यायी इंधन ठरू शकते. या संशोधनासाठी सौरभला पेटंटही मिळाले आहे.

सौरभ पाटणकर (संशोधक)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 famous personalities in various fields get tarun tejankit awards
First published on: 01-04-2018 at 05:15 IST