जगातील वैविध्य स्वीकारण्यात, आपल्यापेक्षा वेगळ्या आकलनक्षमता असणाऱ्या व्यक्तींना समजून घेण्यात समाज अनेकदा कमी पडतो. प्रलंबित विकास प्रवर्गातील व्यक्तींची त्यामुळे हेळसांड होते. त्यांचे परावलंबित्व कमी व्हावे, त्यांना त्यांच्या कलाने शिकता यावे, त्यांच्या वाटणीचा आनंद त्यांना मिळावा म्हणून सुरू असलेले सोलापूर येथील ‘आधार मागासवर्गीय महिला संस्थे’चे कार्य वाखाणण्याजोगे आहे…
आकलनाचा, भोवतालाच्या विश्लेषणाचा, व्यक्त होण्याचा, कौशल्य संपादनाचा प्रत्येकाचा वेग, प्रत्येकाची पद्धत समान असू शकत नाही. काहीजण बहुसंख्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विकसित आणि व्यक्त होतात. अशा प्रलंबित विकास वर्गात (मतिमंद, सेरेबल पाल्सी आणि बहुविकलांग) मोडणाऱ्या मुलांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या पाल्याचे खडतर आयुष्य पाहणे अनेकदा पालकांसाठीही वेदनादायी ठरते. सृष्टीतील हे वैविध्य सकारात्मकतेने स्वीकारून या मुलांना स्वावलंबनाचे धडे देण्याचे, त्यांच्या गतीने पुढे जाऊ देण्याचे प्रयत्न सोलापूर येथील कुंभारी परिसरातील ‘आधार मागासवर्गीय महिला संस्थे’चे ‘मतिमंद निवासी विद्यालय’ करत आहे.
प्रलंबित विकास वर्गात मोडणाऱ्या अनेक मुलांमध्ये प्रामुख्याने स्मृतिभ्रंशाची लक्षणे आढळतात. जेवताना आपले पोट भरले आहे की नाही, याचा अंदाज त्यांना येत नाही. काय करावे आणि काय करू नये, यावषयीची त्यांची समज बहुसंख्यांपेक्षा वेगळी असते. त्यांना सांभाळताना बहुतेकदा पालक हतबल होतात. त्यांची त्रेधातिरपट उडते. या गोंधळून गेलेल्या पालकांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या आणि त्यांच्या पाल्यांचे खडतर जीवन सुखकर करण्याच्या उद्देशाने ‘आधार मतिमंद निवासी विद्यालय’ ही सेवाभावी संस्था स्थापन करण्यात आली.
जगदीश कलकेरी हे संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांना घोंगडे झोपडपट्टी भागात एक मतिमंद मुलगा उकिरड्यावर शौचास बसलेला दिसला. त्याची आई तिथेच विड्या वळत बसली होती. त्यांनी तिला विचारले, ‘तुम्ही त्या मुलाला स्वच्छ का करत नाही?’ त्यावर ती माऊली म्हणाली ‘तो मतिमंद आहे. दिवसातून दहा-बारा वेळा शौच करतो. मला आणखी दोन मुले आहेत. विड्या वळल्याशिवाय मजुरी मिळत नाही. याला स्वच्छ करत बसले तर माझी चूल पेटणार नाही. आम्हाला उपाशी राहावं लागेल.’ तिची हतबलता पाहून कलकेरी यांना अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटू लागले. त्यांनी तीन-चार मुलांना घेऊन एका खोलीत वर्ग सुरू केला. त्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षण दिले जाऊ लागले. त्याविषयी कळल्यावर ‘आधार मागासवर्गीय महिला संस्थे’च्या अध्यक्ष शुभांगीताईंनी या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डिप्लोमा इन एज्युकेशन (मेंटल रिटार्डेशन) हा अभ्यास पूर्ण केला. मुलांचे संगोपन करणे, त्यांना त्यांच्या कलाने शिकवणे, त्यांच्यात कौशल्ये विकसित करणे आणि स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न या निवासी विद्यालयात केला जातो. सध्या येथे ५० मुलांची काळजी घेतली जाते. यात ५ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
प्रलंबित विकास वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार निरनिराळे प्रकल्प दिले जातात. त्यांच्या आकलनशक्तीला विविध पद्धतीने आव्हान दिले जाते. शिक्षण, निवास, भोजन, वैद्याकीय सेवा, व्यावसायिक शिक्षण देण्याचा आणि जीवन कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजात आपण कसे वावरावे याचे भान विद्यार्थ्यांना यावे, यासाठी विविध उपाय योजले जातात. केवळ संगोपन करणे वा सांभाळणे इतका माफक उद्देश ठेवण्याऐवजी त्यांच्यामधील सुप्त सामर्थ्य ओळखून ते विकसित करणे, त्यांना समाजात समान संधी मिळावी, सहभाग घेता यावा व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या हेतूने ही संस्था मार्गक्रमण करीत आहे.
आधार मागासवर्गीय महिला संस्था, सोलापूर ही संस्था गेली १७ वर्षे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य करत आहे. मुलांचे पोषण, विद्यालयाचे व्यवस्थापन, औषधोपचार, प्रयोग, कार्यशाळा, मानधन, वेतन हा सारा डोलारा पेलण्यासाठी ‘आधार’ला मदतीचा हात हवा आहे. देणगी, अन्नधान्य, कपडे, औषधे, सेवा-शुश्रूषा, रुग्णवाहिका, क्रीडा साहित्य, निधी संकलन, गुणवत्तावाढ प्रयोग, श्रमदान अशा विविध माध्यमांतून समाजातील दानशूर व्यक्ती संस्थेच्या कार्याला हातभार लावतात. या मुलांसाठी सुरक्षित आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था दात्यांकडून विविध प्रकारे मदत मिळवते.
शाळा गेल्या १५ वर्षांपासून भाडेतत्वाच्या जागेत सुरू आहे. परंतु आता मालकांनी जागा रिकामी करण्यास सांगितल्यामुळे संस्था अन्यत्र इमारतीचे बांधकाम करत आहे. सध्या संस्थेला त्यासाठी विटा, सिमेंट, छताचे साहित्य, रंग, दरवाजे, खिडक्या, विद्याुत उपकरणे इत्यादींची आवश्यकता आहे.
कोणतेही शासकीय अनुदान, फी आकारणी वा अन्य आर्थिक स्राोताशिवाय स्वखर्चाने जगदीश कलकेरी यांनी हे सेवाव्रत अंगीकारले. माणसे झाडांना, पाळीव प्राण्यांनाही जीव लावतात, ही तर आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांच्याविषयी भेदभाव का, असा प्रश्न ते करतात. मात्र या सेवाव्रताचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक अग्निदिव्यांतून जावे लागते. त्याकरिता आवश्यक ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे. शांतीनगर येथील स्वत:ची जमीन, बोरामणीची शेतजमीन, कार, सोने विकून त्यांनी ती मोजली आहे.
प्रलंबित विकास गटातील मुले बहुसंख्यांप्रमाणे काम करू शकत नाहीत. पण त्यांना जमेल असे काम दिले, त्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला तर ती स्वावलंबी होऊ शकतात. आधार संस्थेत मुलांना पणत्या, राख्या, मेणबत्त्या, मंदिरातील निर्माल्यापासून अगरबत्ती, धूप, होळीसाठी पर्यावरणस्नेही रंग, पत्रावळी, पेपर बॅग तयार करणे इत्यादी कामे शिकवली जातात. त्यातून अर्थार्जनाची संधी मिळवून दिली जाते.
संस्थेतील २५ मतिमंद मुले स्वावलंबी झाली आहेत. बेकरीत, किराणा दुकानात, शिवणकाम करून, चायनीज गाडीवर, झेरॉक्स दुकानात, केळी विकून, बांधकाम मजुरी करून ती अर्थार्जन करतात. मात्र साधारण १० टक्केच मतिमंद मुले अर्थार्जनाएवढी सक्षम होऊ शकतात, असा संस्थेचा अनुभव आहे.
यापैकी बहुतेक मुलांना आई-वडिलांवर काही अंशी तरी अवलंबून राहावे लागते. पण आई-वडील आयुष्यभर सोबत राहतील, याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळेच मतिमंद मुलगा आपल्याकडे आला की शेवटपर्यंत त्याची संपूर्ण जबाबदारी आपणच घ्यावी, असा संस्थेचा प्रयत्न आहे. प्रलंबित विकास गटातील वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याच्या प्रयत्नात संस्था आहे. देणगी मिळाल्यास हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल?
सोलापूर-अक्कलकोट रोडवर कुंभारी या गावी शारदा स्पिनिंग अॅड विव्हिंग मिलजवळ, गट नंबर ३०, १, २ येथे ‘आधार मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ आहे.
आधार मागासवर्गीय महिला संस्था, सोलापूर
Aadhar Magaswargiya Mahila Sanstha, Solapur
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा सोलापूर
● चालू खाते क्रमांक : ०८४१००१०७७५७
● आयएफएससी : सीओएसबी०००००८४
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
धनादेश येथे पाठवा…
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
- एजाज हुसेन मुजावर