|| विजय प्र. दिवाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य विनोबा भावे यांचा स्पष्ट कौल महाराष्ट्रवादी नेत्यांना हवा होता, पण त्यांना तसा तो मिळाला नाही. मग ‘जय जगत्’चा उद्घोष करणाऱ्या विनोबांची याबाबत नेमकी भूमिका काय होती?

भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून चर्चेत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरचा वादही त्यास अपवाद नाही. १३ मे १९४६ रोजी बेळगाव येथे कादंबरीकार-पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र परिषद’ स्थापन करण्याचा ठराव मांडण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या तीन ठरावांना आचार्य विनोबा भावे यांनीही पाठिंबा दिला. यासंदर्भात माडखोलकरांनी विनोबांना दोन पत्रेही पाठवली होती.

१ जुलै १९४६ रोजीच्या पत्रात विनोबांनी माडखोलकरांना लिहिले : ‘दरेक भाषेचा अलग प्रांत करण्यात; त्या त्या भाषांचा विकास, त्याद्वारे ग्रामीण आणि नागर जनतेची सहज सेवा आणि राज्यकारभाराची सुलभता अशी तिहेरी दृष्टी आहे. म्हणून एकीकरणाची मागणी सेवावृत्तीला अनुसरूनच आहे. हीच मागणी संकुचित अभिमानानेही केली जाणे शक्य आहे. हिंदुस्थानच्या सर्व भाषा बहिणी-बहिणी आहेत. सर्वांचा विकास साधावयाचा आहे. यासाठी एकीकरण उपयोगी आहे, अशी दृष्टी आहे… सर्व भाषांनी मिळून भारताची सेवा करावयाची आहे. म्हणून सरहद्दीच्या प्रश्नाबाबत कटुता उत्पन्न होण्याचे कारण नाही. थोडी गावे इकडे आणि थोडी गावे तिकडे हा काही मोठा प्रश्न नाही… त्या-त्या प्रांतात दुसऱ्या प्रांतातले लोक येऊन राहिले असता, त्यांचा धर्म प्रांतीय भाषेशी समरस होऊन जाणे हाच आहे. ’

१९५५ ला राज्य-पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रकाशित होताच देशभर सर्वत्र असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन, दोन राज्यांच्या सीमावर्ती गावांबाबत वाद सुरू झाले व द्वेषभावना पसरू लागली. विनोबा म्हणाले, ‘सीमावर्ती भागातील लोकांनी दोन्ही भाषा प्रेमपूर्वक शिकल्या पाहिजेत. जनतेच्या सोयीसाठी, भाषेच्या विकासासाठी आणि समन्वयासाठी भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. न की अभिमान व द्वेषासाठी.’

१६ जानेवारी १९५६ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित ठेवण्याचे घोषित केले. ६ मार्च १९५६ रोजी पंडित नेहरू विनोबांना भेटले व त्यांनी याबाबत विनोबांचे मत जाणून घेतले. २४ मार्च १९५६ रोजी विनोबा, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, दादा धर्माधिकारी, रावसाहेब पटवर्धन व स्वामी रामानंदतीर्थ यांची चर्चा झाली. तीन राज्यांच्या तोडग्यात धोके आहेत, परंतु द्वैभाषिक राज्य स्वीकारार्ह आहे, असे विनोबांचे मत पडले.

भूदान पदयात्रा सुरू झाल्यानंतर सात वर्षांनी- २३ मार्च १९५८ रोजी विनोबांनी महाराष्ट्रात प्रवेश केला, तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. १ नोव्हेंबर १९५६ रोजी महाराष्ट्र व गुजरात मिळून महाद्वैभाषिक राज्याची स्थापना झाली होती. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला विजय मिळाल्याने, लोकमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले होते. मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव केंद्र सरकार करीत असल्याने, त्याविरुद्ध मोर्चे निघत होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर असे वातावरण तापले असतानाच, २३ मार्च १९५८ रोजी खडकेवाडा (जि. कोल्हापूर) येथे विनोबांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!’ या घोषणांसहच विनोबांचे स्वागत झाले. स्वागताला संयुक्त महाराष्ट्राचे नेते एस. एम. जोशी, माधवराव बागल, आचार्य अत्रे आदी उपस्थित होते. आचार्य अत्रे यांनी, निपाणीला पोलिसांच्या गोळीला बळी पडलेल्या कमळाबाई मोहिते या महिलेची तीन वर्षांची अनाथ कन्या रंजनाला विनोबांसमोर उभे केले. अशा प्रकारच्या भावनिक आवाहनात व संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांच्या वातावरणात, संयुक्त महाराष्ट्रवादी नेत्यांशी विनोबांची दीड तास चर्चा झाली. विनोबा त्यांना म्हणाले, ‘मुंबई महाराष्ट्राला दिली तर काही तरी भयंकर गोष्ट होणार आहे, ही काँग्रेस श्रेष्ठींची समजूत चुकीची आहे, असे मी त्यांना त्याच वेळी सांगितले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला जनतेचा पाठिंबा आहे हे तुम्ही निवडणुकीत यश मिळवून सिद्ध केले आहे. म्हणून तुम्ही संसदेला तसे सांगितले पाहिजे. आणि ते सांगितल्यानंतर हा निर्णय आम्ही भाषिक अल्पसंख्याकांवर सर्वस्वी सोपवतो असे म्हटले पाहिजे. हा मार्ग माझ्या दृष्टीने श्रेष्ठ सत्याग्रहाचा आहे. तुमचा सत्याग्रह मला निर्वैर वाटत नाही. त्यामुळे कटुता वाढत चालली आहे. अशा तऱ्हेने कटुता वाढवून तुम्ही उद्या संयुक्त महाराष्ट्र मिळवला तर त्याचा काय उपयोग आहे!’

या चर्चेनंतर खडकेवाडा येथे विनोबांची प्रचंड सभा झाली. भाषणात विनोबांच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्यातील महाराष्ट्राविषयीचा जिव्हाळा व प्रेम ओथंबून वाहत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या विषयाला स्पर्श करीत ते म्हणाले, ‘संयुक्त हृदय झाल्याशिवाय जगात काही संयुक्त होऊ शकत नाही. तेव्हा संयुक्त हृदयाचे आंदोलन केल्याशिवाय अवांतर जे संयुक्त आपण काढू, ते वियुक्त करणारेच, चिरफाड करणारेच असणार.’

संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांना विनोबांचा स्पष्ट कौल महाराष्ट्राच्या बाजूने हवा होता. ‘जय जगत्’चा उद्घोष करणाऱ्या विनोबांकडून तो तसा त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे नेते विनोबांवर नाराज होते आणि जनता क्षुब्ध होती. १३ डिसेंबर १९५८ रोजी एस. एम. जोशी विनोबांना भेटले. मुलाखत साडेतीन तास चालली. विनोबांनी आपले पूर्वीचेच विचार मांडले. ही चर्चा निष्फळ झाल्याचे पाहिल्यानंतर आचार्य अत्रे यांचा भडका उडाला. अत्रेंनी लेख लिहून विनोबांना ‘काँग्रेसचे एजंट’, ‘नेहरूंचा मिंधा प्रचारक’, ‘विनोबा की वानरोबा’ अशी शेलकी विशेषणे बहाल केली! परंतु महाराष्ट्र विनोबांवर नाराज असला तरी त्यांना महाराष्ट्राने एक लाख एकरांहून अधिक जमीन भूदानात दिली होती!

विनोबांचे मत होते की, राष्ट्रभाषा व मातृभाषा हे देशाकडे पाहण्याचे दोन डोळे आहेत. उत्तरेच्या लोकांनी दक्षिणेची एक भाषा व दक्षिणेच्या लोकांनी उत्तरेची एक भाषा शिकली पाहिजे. भाषा ही जनतेच्या हृदय-संपर्कासाठी व प्रेमभावनेच्या विकासासाठी आहे, असे ते म्हणत. भाषा ही हृदय जोडण्यासाठी असल्याने, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न भलताच ताणून भाषेच्या नावावर हृदय तोडणे त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळे विनोबांना भाषिकवाद आणि भाषावार प्रांतरचना हे प्रश्न खूपच स्थूल वाटत होते.

(लेखक सर्वोदयचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.)

diwan.sarvodaya@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya vinoba bhave clear support to maharashtrawadi leaders in the struggle for a united maharashtra akp
First published on: 02-05-2021 at 00:18 IST