अतुल देऊळगावकर

‘अ‍ॅमेझॉन’! वनस्पती व प्राणीजगताच्या उक्रांतीचे चालतेबोलते संग्रहालय. जगाच्या कार्बनचक्राचा व जलचक्राचा आधार! पृथ्वीवरील जैवविविधतेचे अनमोल भांडार! हे जंगल पृथ्वीवरील एकंदरित ऑक्सिजनपकी २० टक्क्यांचा पुरवठा करते, तर २.२ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेते. हे सदाहरित जंगल नऊ देशांमध्ये पसरलेलं आहे. त्याचा सर्वाधिक ६० टक्के भाग हा ब्राझीलमध्ये येतो. परंतु आज विकासाच्या नावाखाली ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या जंगलात वणवे पेटवून ते नष्ट केलं जात आहे. पृथ्वीचं वातावरण नैसर्गिकरीत्या शुद्ध करणाऱ्या अ‍ॅमेझॉनच्या भवितव्यात काय लिहून ठेवलं आहे?

‘हव्यास आणि मूर्खपणा यामुळे पृथ्वीचा विनाश चालू आहे.’ – स्टिफन हॉकिंग

इसवी सन २०५५! महापुरामुळे लंडन शहराचा तीन-चतुर्थाश भाग पाण्याखाली गेला आहे. अ‍ॅमेझॉनच्या सदाहरित जंगलात आगीचे तांडव चालू आहे. सिडने शहर आगीच्या खाईत आहे. लासव्हेगास शहर वाळवंटाने व्यापून टाकलं आहे. आल्प्स पर्वतावरून बर्फ गायब झालं आहे. भारत व पाकिस्तानमध्ये अणुयुद्धानंतरची भयाण अवस्था आहे. थोडक्यात, ‘प्रलय’, ‘कयामत’, ‘डूम्स डे’ या सर्व मिथ्यकथांमध्ये व्यक्त झालेला अंतकाळ पृथ्वीतलावर अवतरला आहे.

केवळ दहा वर्षांपूर्वी आलेला ब्रिटनच्या फ्रॅनी आर्मस्ट्राँग यांचा ‘एज ऑफ स्टुपिड’ हा वृत्तपट एवढा भविष्यवेधी ठरेल असं त्यांनाही वाटलं नसेल. या अ‍ॅनिमेशनपटात २०५५ ‘असे’ दाखवले आहे. यात मानवी संस्कृतीच्या खुणा, कला व ज्ञान जतन करून ठेवण्याची जबाबदारी एका संग्राहकावर टाकली आहे. हा संग्राहक बर्फाच्छादन पूर्णपणे नष्ट झालेल्या उत्तर ध्रुवावर बसून चित्रफितीमधून भूतकाळातील मानवी वर्तन पाहत बसला आहे. तो वर्तमानकाळातील वृत्त आणि भविष्यातील भीषणता यांचे मिश्रण करून मानवी बेजबाबदारपणा अधोरेखित करीत सारखा म्हणतो, ‘आपल्याला पृथ्वी वाचवता आली असती की! संपूर्ण जगच मूर्खासारखे वागत होते.’  हे दिग्दर्शक वारंवार ठसवत राहतात. (दिग्दर्शकाचे बोट सध्याच्या काळाकडेच आहे.)

रामदासांनी मूर्खपणाची अनेक लक्षणे सांगून ठेवली आहेत. स्वत: फांदीच्या शेंडाकडे बसून बुडाकडील फांदी तोडणाऱ्या इसमास आपण ऐतिहासिक मूर्ख अशी ख्याती मिळवून दिली. तर संपूर्ण जंगलाचा वारंवार नायनाट करणाऱ्या समाजास काय म्हणावे? आणि अशा काळाचे नामकरण ‘मूर्खपणाचे पर्व’ असे केले तर ते असभ्यपणाचे कसे ठरेल? कोणे एकेकाळी त्या- त्या काळाला विवेकाचे पर्व, प्रबोधनाचे युग, अस्वस्थ दशक अशी नामाभिधाने धारण करता आली होती. आता वैज्ञानिकांना ‘सामूहिक मूढता हीच दृढ आहे,’ असे वाटत असेल तर.. त्याचा विचार करावा, की तुकारामांनी ‘मूढ सभेआंत, इच्छि पंडिताचा घात’ (मूर्ख लोकांच्या सभेत पंडितांचा नाश व्हावा, अशी इच्छा केली जाते.) म्हटल्याप्रमाणे विचार धरावा?

२०१९ च्या ऑगस्ट महिन्यात ‘पृथ्वीचं फुप्फुस’ अशी ख्याती असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या सदाहरित जंगलात लागलेल्या महाभयंकर वणव्यांमुळे समस्त मानवजातीची पळापळ सुरू झाली. ब्राझीलच्या अवकाश संशोधन केंद्राचा ‘२०१९ या एका वर्षांत ८०,००० वणवे पेटले’ असा अंदाज आहे. तर ‘नासा’ने अवकाशातून घेतलेल्या छायाचित्रात सध्याच्या वणव्यामुळे सुमारे ३००० कि. मी. अंतरापर्यंत धुराचे साम्राज्य दिसत होते. ब्राझीलमधील शाळा-महाविद्यालयांतील हजारो मुले रस्त्यावर उतरून ‘आम्हाला वाचवा’ (रडर- २ं५ी ४१ २४’ ) अशी मदतीची हाक देऊ लागले. ‘अ‍ॅमेझॉन गेले तर तुम्ही श्वास घेऊ शकणार नाही,’ असं जगाला ती बजावू लागली. जगभरातील शास्त्रज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ संतापून उठले. म्हणू लागले की, ‘हे संकट केवळ ब्राझीलपुरते मर्यादित नसून ती पृथ्वीवरील महाआपत्ती आहे.’ या वणव्यातून होणाऱ्या बेसुमार कर्ब वायू उत्सर्जनाकडे ते लक्ष वेधू लागले. तर युरोपीय युनियनमधील लक्षावधी विद्यार्थी ब्राझीलच्या मुलांना साथ देण्यासाठी निदर्शने करू लागले. त्यामुळे हा आगडोंब विझवण्यासाठी फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, जपान, इटली या राष्ट्रांच्या प्रमुखांनी (जी- ७) दोन कोटी डॉलरचा निधी देऊ केला. यात पुढाकार घेणारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अ‍ॅमेझॉनची आग हाताळण्यात दिरंगाई करणारे ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सॅनरो यांच्यावर टीका केली. यावर संतापलेल्या बोल्सॅनरो यांनी ती मदत धुडकावून लावताना, ‘आमची आग आम्ही विझवू’ अशी भूमिका घेतली आणि मॅक्रॉन व त्यांच्या पत्नी ब्रिगेट यांची असभ्य शब्दांत कुचेष्टा केली. तर ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अन्रेस्टो अरौजो म्हणाले, ‘‘अ‍ॅमेझॉनची आग ही काही आमच्यामुळे लागलेली नाही. इतर देश विनाकारण पराचा कावळा करून व काहीतरी निमित्त शोधून ब्राझीलच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करीत आहेत.’’

१० ऑगस्टला पेटलेला अग्निकल्लोळ ४० दिवस उलटून गेल्यावरही शांत होण्याची चिन्हे दिसत नव्हती. २४ ऑगस्ट २०१९ रोजी ब्राझीलमधील अनेक शहरांतून आणि लंडन, पॅरिस, मेक्सिको, जिनेव्हा या शहरांतून हजारो नागरिकांनी ब्राझील सरकारच्या नाकत्रेपणाचा निषेध केला. संपूर्ण जगातून ब्राझीलवर दबाव वाढत गेला. तेव्हाच ब्राझीलच्या प्रशासनाकडून ‘ही आग विझवण्याकरिता आपल्याकडे पुरेशी संसाधने नाहीत,’ असा अहवालही गेला. मग बोल्सॅनरो यांनी हा अग्निसंहार थांबवण्यासाठी चिलीकडून चार विमाने आणि ब्रिटन सरकारची १.२ कोटी डॉलरची मदत स्वीकारली आणि ब्राझीलचे ५०,००० सनिक तनात केले. बोल्सॅनरो यांनी अ‍ॅमेझॉनमध्ये आग लावण्यावर ६० दिवस बंदी घालण्याचे फर्मान काढून आगीची चौकशी करण्याचे जाहीर केले. अ‍ॅमेझॉन वाचविण्यासाठी दक्षिण अमेरिकी खंडातील सात राष्ट्रांची परिषद कोलंबियामध्ये आयोजित केली. तसेच अ‍ॅमेझॉनमधील काही भागांचे जतन आणि संवर्धन यासाठी जागतिक परिषद घेण्याचे आवाहन केले. तरीही जगाचा हा ऐतिहासिक निसर्गठेवा आगीतून सहजासहजी वाचत नव्हता.

‘अ‍ॅमेझॉन’ म्हटलं की २५ वर्षांपूर्वी चालू झालेली सर्व काही ऑनलाइन विकणारी कंपनीच डोळ्यासमोर यावी असा हा काळ आहे. (तसे ग्रीक देवदेवता आणि प्राचीन काळातील नामोल्लेख हे विक्रीसाठी अतिशय उपयोगी आहेतच. मागील काही वर्षांतील खूपविके ब्रँड हेच सांगतात. ‘नाइके’ ही ग्रीकांसाठी विजयाची देवता होती. या नावाची कंपनी पादत्राणे विकते. ‘ओरॅकल’ हा देवांचे संदेशवहन करणारा आणि या नावाची कंपनी सॉफ्टवेअर तयार करते. ‘ओरिऑन’ हा ग्रीक योद्धा होता व या नावाची कंपनी पट्टे तयार करते.) इ. स. १५०० साली स्पेनचा राजा व्हिथेंते िपथॉन हा आक्रमण करून गेला तेव्हा त्याला ब्राझील व पेरू या भागातील लढवय्या स्त्रियांशी लढावे लागले. अशा स्त्रियांना ‘अ‍ॅमेझॉन’ म्हणत. त्याने त्या भागातील विशाल नदी पाहिली आणि तिलाही ‘अ‍ॅमेझॉन’ हे नाव दिले. जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या ‘अ‍ॅमेझॉन’ नदीची लांबी ६३०० किलोमीटर असून ती ब्राझील, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया व व्हेनेझुएला या देशांतून प्रवास करत जाते. ही विशाल नदी आणि तिच्या अनेक उपनद्या यांना अ‍ॅमेझॉनच्या अरण्याने लपेटून टाकले आहे.

‘अ‍ॅमेझॉन!’ वय वष्रे सुमारे ५.५ कोटी!! पृथ्वीचा जन्म हा ४.५ अब्ज वर्षांपूर्वीचा, तर त्यावरील जीवोत्पत्ती ही ३.७ अब्ज वर्षांपूर्वीची मानण्यात येते. आपले पूर्वज होमो सेपियन हे तीन लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. म्हणजे अ‍ॅमेझॉन हे अरण्य ‘मानवप्राण्याची कहाणी’ सांगत आहे. (ऐकणार कोण?) म्हणूनच अ‍ॅमेझॉन हा जगासाठी अमूल्य ठेवा आहे. (जगासाठी आहे म्हणजे कोणासाठीही नाही किंवा मोजक्या जणांसाठीच आहे.) अफाट, अवाढव्य, विशाल ही विशेषणे थिटी पडतील असा अ‍ॅमेझॉन विस्तार हा तब्बल १७ अब्ज एकर किंवा ६० लक्ष चौरस कि. मी. क्षेत्रफळ (भारताचे क्षेत्रफळ ३२.८ लक्ष चौरस कि. मी. आहे.) एवढा आहे. हे सदाहरित जंगल नऊ देशांमध्ये पसरलेले आहे. त्याचा सर्वाधिक ६० टक्के भाग हा ब्राझीलमध्ये, १३ टक्के भाग पेरूमध्ये, १० टक्के भाग कोलंबियामध्ये येतो. उर्वरित भाग हा व्हेनेझुएला, बोलिविया, इक्वेडोर, सुरीनाम, गयाना व फ्रेंच गयाना यांत येतो.

अ‍ॅमेझॉन! वनस्पती व प्राणीजगताच्या उक्रांतीचे चालतेबोलते संग्रहालय. जगाच्या कार्बनचक्राचा व जलचक्राचा आधार! पृथ्वीवरील जैवविविधतेचे अनमोल भांडार! हे जंगल पृथ्वीवरील एकंदरित ऑक्सिजनपकी २० टक्क्यांचा पुरवठा करते, तर २.२ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेते. आजपर्यंत या जंगलातील ४०,००० वनस्पतींच्या प्रजाती, १२९४ प्रकारच्या पक्ष्यांच्या, ३७८ सरपटणारे प्राणी, ४२८ उभयचर, २२०० माशांच्या, तर ४४० सस्तन प्राण्यांच्या प्रजाती यांचे वर्गीकरण करता येऊ शकले आहे! याचे संपूर्ण जगासाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे जागतिक बँकेने ‘अ‍ॅमेझॉन सस्टेनेबल लँडस्केप्स प्रोग्रॅम’ हाती घेतला आहे. जैवविविधतेचे पितामह अशी ख्याती लाभलेले पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. थॉमस लव्हजॉय हे युनायटेड नेशन्स फाऊंडेशनसाठी कार्य करीत आहेत. ते गेली ५० वष्रे अ‍ॅमेझॉनमधील पर्यावरणासंबंधी संशोधनात ‘वनमग्न’ आहेत. लव्हजॉय म्हणतात, ‘‘इतकी वष्रे घालवल्यावर हेच सांगता येते की, पृथ्वीवरील एक-चतुर्थाश जैवविविधता असणाऱ्या अ‍ॅमेझॉनविषयीचे मानवाला असलेले ज्ञान केवळ हिमनगाच्या टोकाएवढेच आहे. मुंग्यांपासून देवमाशांपर्यंत आणि सरडय़ांपासून सिंहांपर्यंत कशाचाही अभ्यास करायचा असेल तर अ‍ॅमेझॉनला पर्याय नाही. अ‍ॅनाकोंडा, जग्वार, कौगर, विजेचा धक्का देऊ शकणारे जलचर, कीटक भक्षण करणाऱ्या वनस्पती अशा अद्भुत व चित्तथरारक अशा प्रजाती तसेच असंख्य दुर्मीळ आणि लुप्त होणाऱ्या प्रजाती येथे सुखेनव नांदत असतात.’’

अ‍ॅमेझॉन! येथे सोने, चांदी, हिरे यांसह लोखंड, तांबे, निकेल, बॉक्साइट, मँगनीज, शिवाय युरेनियम, रेडियम अशा अनेक खनिजांचा खजिना आहे. याखेरीजसुद्धा किती खनिजे असतील याचा अंदाज कोणालाही नाही. इथे असंख्य प्रकारची काष्ठसमृद्धता आहे. इमारती लाकूड, नक्षीकामाचे लाकूड, रबर, क्रीडासाहित्यासाठी लागणारे लाकूड इथे विपुल प्रमाणावर आहे. इथल्या प्राण्यांच्या कातडय़ांना प्रचंड मागणी आहे. अशी ऐश्वर्यसंपन्न निसर्गसंपदा हाच अ‍ॅमेझॉन व तिथले रहिवाशी यांच्यासाठी महाभयंकर शाप आहे. (१९९३ साली खनिजप्रधान देशांतील दारिद्रय़ाचे विश्लेषण करताना ब्रिटनचे अर्थतज्ज्ञ प्रो. रिचर्ड ऑटी यांनी ‘संपदेचा शाप’ (रिसोर्स कर्स)’ व ‘विपुलतेचा विरोधाभास’ (पॅराडॉक्स ऑफ प्लेन्टी ) ही संज्ञा तयार केली.) निसर्गाचा विनाश करून झटपट पसा मिळतो, हे कोणी नव्याने सांगायची गरज नाही. ब्राझीलने उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांत गेल्या ५० वर्षांत २० टक्के अ‍ॅमेझॉन जंगल साफ झाले असावे असे आढळून आले आहे. अ‍ॅमेझॉनने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले असताना याच वर्षी जगाच्या इतर भागांतील अरण्यांमधील अग्नितांडवांकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. आक्र्टिक्ट प्रदेशातील अलास्काच्या आगींमुळे १६ लक्ष हेक्टर जंगल, रशियाच्या सायबेरियातील १० लक्ष हेक्टर, इंडोनेशियामधील ११ लक्ष हेक्टर जंगलाची राखरांगोळी झाली, असे त्या- त्या ठिकाणी घेतलेल्या उपग्रहावरील छायाचित्रांतून दिसून आले आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘द वर्ल्ड अ‍ॅटलास ऑन डेझर्टिफिकेशन’ने सर्वेक्षण करून वाळवंटीकरणाचे नकाशे प्रकाशित केले आहेत. पृथ्वीवरील ७५ टक्के भूभागाची गुणवत्ता ही विलक्षण खालावली आहे. भारतातील ३० टक्के जमिनीची प्रत बिघडून गेली आहे. त्यामुळे उत्पन्नात घट, दारिद्रय़, स्थलांतर व युद्धं उसळून येत आहेत. मागील पाच वर्षांत जगात आणि भारतात विकास कामांसाठी जंगलं तोडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे (तात्पर्य- ‘खेळ मांडियेला वाळवंटीकरणासाठी’) असे आढळून आले आहे.

आपल्या सरकारी आकडेवारीनुसार, ‘भारतात दरवर्षी १.५ लक्ष हेक्टर जंगल नाहीसं होत असावं. मात्र, प्रत्यक्षात दरसाल याच्या सुमारे सातपट- म्हणजे दहा लक्ष हेक्टर जंगल नष्ट होत असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे. ‘जंगलातील नोकरशाही जबाबदार व विश्वासार्ह दोन्हीही नाही..’ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं हे भाष्य अर्थ-राजकारणाचं मार्मिक स्वरूप दाखवतं. २०११ साली भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाला ‘वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्स्पर्ट पॅनेल’ने सुपूर्द केलेल्या ३०० पानांच्या अहवालात पश्चिम घाटामधील अति संवेदनशील क्षेत्राविषयी विस्ताराने विवेचन केले होते. ‘‘जगभरातून नामशेष होत असलेल्या अनेक प्राण्यांच्या प्रजाती पश्चिम घाटात आढळतात. ५००० सपुष्प वनस्पती, ५०८ जातींचे पक्षी, १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती असे अमोल सृष्टीवैभव पश्चिम घाटात नांदते. या भागातील रहिवासी शतकानुशतके निसर्गाची जपणूक करीत आले आहेत. त्यांना विचारूनच त्या भागात विकास प्रकल्प आणावेत. या भागातील पवनचक्क्या, अतिक्रमण व बेकायदेशीर खाणकामामुळे पर्यावरणाचा विनाश होत आहे. या कारवायांवर बंदी घातली नाही तर पश्चिम घाट वाचवता येणार नाही..’’ असा स्पष्ट व रोखठोक सल्ला गाडगीळ यांनी दिला होता. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत, तर ईशान्य भारतातील मेघालय, आसाम, अरुणाचल, दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक व आंध्र, मध्य भारतात मध्य प्रदेश व महाराष्ट्र या सर्व राज्यांत जंगलांची स्थिती सारखीच आहे. चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक ११,५०० मि. मी. पाऊस पडणारे ठिकाण म्हटल्यावर डोळ्यासमोर हिरव्यागर्द डोंगरराजीतील गाव डोळ्यासमोर येतं. चेरापुंजीचं हे रूप आता इतिहासजमा होऊन चेरापुंजी उघडीबोडकी झाली आहे. तिथल्या डोंगर व टेकडय़ांवर मातीही शिल्लक नाही. कधीकाळी इथे जंगल होते याच्या खुणा दाखवणाऱ्या देवराया तेवढय़ा कुऱ्हाडींपासून वाचल्या आहेत. यंदा वयाची शताब्दी साजरी केलेले आणि हवामानबदलाचा वेध १९६५ साली घेणारे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. लव्हलॉक यांनी केव्हाच सांगून ठेवले आहे, ‘‘वाळवंटीकरण सोपे व वननिर्माण महाकठीण आहे. महामूर्ख मानवजातीला हवामानबदल रोखणं शक्य नाही.’’ उत्क्रांतीविषयक जीवशास्त्रज्ञ, भविष्यवेधी (फ्युचरिस्ट) व शाश्वत विकासातील तज्ज्ञ डॉ. एलिझाबेथ सॉटोरिस या अमेरिका, ब्राझील, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप व आफ्रिकेतील अनेक देशांच्या सल्लागार असल्यामुळे त्यांना सर्वत्र मुक्त प्रवेश आहे. अशा विदुषी डॉ. सॉटोरिस म्हणतात, ‘‘आपण अवकाशातून पृथ्वीचे हजार वष्रे निरीक्षण केले तर मानवाचे वर्णन ‘वाळवंट निर्माण करणारी प्रजाती’ असेच करावे लागेल.’’

ब्राझीलचे ३७ वे अध्यक्ष मिशेल तेमेर हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१८ साली गत्रेत आले होते. त्यांचा पक्ष ब्राझीलियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट अल्पमतात आला. ब्राझीलमध्ये नोंदणी झालेले सुमारे ३० राजकीय पक्ष आहेत. तेमेर यांना बॅनकॅडा रुरलिस्टा या शेती क्षेत्रातील कंपन्या, खनिज काढणाऱ्या कंपन्या व प्रचंड शेती असलेल्या जमीनदारांना धार्जिणा असणाऱ्या राजकीय पक्षाचा पािठबा मिळवायचा होता. त्यासाठी त्यांनी २०१८ च्या फेब्रुवारीमध्ये अ‍ॅमेझॉनमधील रेन्का अभयारण्याचे संरक्षण काढून घेण्याचे फर्मान काढले. आणि अ‍ॅम्पा व पॅरा राज्यातील ४६,००० चौरस कि. मी.चे जंगल नष्ट करून ती सपाट जागा खनिज कंपन्या व रस्ते तयार करणाऱ्या कंपन्यांना सोपविण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते रुडॉल्फ रॉड्रिग्ज यांनी ‘अ‍ॅमेझॉनवरील ५० वर्षांतील जबरदस्त दरोडा’ अशी घणाघाती टीका या निर्णयावर केली होती. २०१४ पासून ब्राझीलमधील चार माजी अध्यक्षांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगावा लागला आहे. तेमेर हे त्यापकी एक!

अमेरिकेने पेट्रोलियम पदार्थावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉलला प्रोत्साहन दिले. भरमसाट अनुदान देऊन मक्यापासून इथेनॉलनिर्मितीला चालना दिली. तेव्हा त्यांना सोयाबीनचा तुटवडा भासू लागला. सोयाबीनपासून तेल निघतेच; शिवाय तेल काढल्यावर तेलरहित पेंड हे जनावरांसाठी पौष्टिक खाद्य त्यातून मिळते. सोयाबीन लावण्यासाठी त्यांची नजर गेली ती अ‍ॅमेझॉनच्या जंगलावर! आजमितीला अ‍ॅमेझॉनच्या जंगलामधील अंदाजे २.५ कोटी हेक्टर जमिनीवर अमेरिकी कॉर्पोरेट कंपन्यांनी सोयाबीनचे पीक उभे केले आहे. आता ब्राझील हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश झाला आहे. याच रीतीने अर्जेटिनाचीही अवस्था झाली आहे. निसर्गसंपन्न असलेले हे देश आज प्रमुख कार्पोरेट कंपन्यांची वसाहत झाले आहेत. (हाच तो नववसाहतवाद!) २०१० पासून जगभरात दहा कोटी हेक्टर जमिनींचे असे सौदे झाले आहेत. अमेरिका, इंग्लंड, चीन, दक्षिण कोरिया, कुवेत, सौदी अरब, कतार, बहारिन या देशांनी सुदान, इथिओपिया, कांगो, मदागास्करमध्ये अन्नधान्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली आहे. कुणाला गहू, तांदूळ हवा आहे, तर कुणी मोगली एरंडाचे पीक घेणार आहे. काही देशांमधील खाजगी कंपन्या, तर काही देशांचे सरकारच अशा व्यवहारांमध्ये पुढाकार घेत आहेत. कुवेतचे पंतप्रधान भेटीला गेल्यावर शेतजमीन भाडय़ाने देण्याचा निर्णय कंबोडियाच्या पंतप्रधानांनी जाहीर केला. सुदान आणि कतार या देशांनी शेती सुधारण्यासाठी सहकार्य करार केला. तर शेतजमीन घेण्यासाठी सौदी अरबचे अधिकारी ब्राझील, इजिप्त, कझाकिस्तान, सुदान व तुर्कस्तानसारख्या देशांना भेटी देत आहेत. भारतातील कारुतुरी अ‍ॅग्रो, शिवा ग्रुप, रुची सोया, ओलम इंटरनॅशनल, आदित्य बिर्ला ग्रुप या कंपन्यांनी आफ्रिकी देशांत लाखो हेक्टरचे सौदे केले आहेत.

जमिनीचे भाव आणि जंगलातील आगी वाढण्याचे प्रमाण सम आहे. जेवढे अरण्य मोठे, तेवढय़ा आगी अधिक! इंडोनेशिया, म्यानमार, झांबिया, केनिया असे अनेक देश याच वाटेने जात आहेत. आगीने जंगलातील जागा मोकळी झाली की मग सौदे करायचे, की आधी सौदे करून आग लावायची, हा तपशील तसा गौण आहे. जागतिक बँकेने याला ‘भूग्रहणाची लाट’ म्हटले आहे. तर ‘द इकॉनॉमिस्ट’ हे नियतकालिक या प्रकाराला ‘कामे देशाबाहेर सोपवण्याची (आऊटसोìसग) तिसरी लाट’ म्हणते. (१९८० च्या दशकात उद्योगजगताने वस्तूंचे उत्पादन देशाबाहेर नेले. तर १९९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाने कामे बाहेर नेली. २००० नंतर अन्नधान्याचे उत्पादनही देशाबाहेर नेले गेले.)

कंपन्यांना जमीन पाहिजे म्हणजे पाहिजे! तिथे नकार चालतच नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात अस्सल बिल्डर बोम्मन इराणी जागेचे डील करताना टेबलवर पाकीट व पिस्तूल ठेवून कमालीच्या शांतपणे निवड करण्याचे स्वातंत्र्य देतो, ‘‘ये वॉलेट है और ये बुलेट है. जो चुनना है, वो चुन.’’ असे प्रसंग अगदी तसेच वास्तवात उतरत असतात. शेतकऱ्यांनी काही निवडले नाही तर कॉर्पोरेट कंपनी गोळीची निवड करते. २००२ पासून पर्यावरणरक्षण करू इच्छिणाऱ्या व वनहक्कांसाठी लढणाऱ्या ६५० कार्यकर्त्यांना अ‍ॅमेझॉनमध्येच जीव गमवावा लागला आहे. मागील ३० वर्षांपासून पर्यावरण व्यवस्थापन विभागाची ‘ब्राझीलियन इन्स्टिटय़ूट ऑफ द एन्व्हायर्नमेंट ऑफ नॅचरल रीसोस्रेस’ (आय. बी. ए. एम. ए.) ही संस्था डोळ्यात तेल घालून अ‍ॅमेझॉन वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यांनी असंख्य वेळा गुन्हेगारांचा पाठलाग करून, त्यांना पकडून लाकूडतोड व खाणकाम रोखले आहे. कोटय़वधींचे लाकूड जप्त केले आहे. आय. बी. ए. एम. ए च्या निरीक्षकांनी अरण्यलुटीचे अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत.

२०१९ च्या जानेवारीपासून अ‍ॅमेझॉनच्या रक्षणाची गरजच उरलेली नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही ते ते सारं देऊ शकणाऱ्या या अरण्यामधून ‘जो जे वांछिल’ ते ते मोकाटपणे कधीही, कसेही आणि कितीही घेऊ शकतो. सोशल लिबरल पार्टीचे जैर बोल्सॅनेरो हे ब्राझीलचे अध्यक्ष होताच त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या जंगलात विकासच विकास करायचे ठरवून टाकले. मग काय विचारता? बेकायदेशीर जंगलतोड रोखण्यासाठी टेहळणी करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यास निघालेल्या टँकरच्या चालकाला हुसकावून लावलं आणि तो टँकरच पेटवून दिला गेला. सर्व प्रकारच्या निरीक्षण मोहिमा तातडीने बंद करण्यात आल्या. (आपल्याकडे ठिकठिकाणी बेकायदा वाळू उपसून विकासकामे करणाऱ्यांनासुद्धा त्यांच्या या कामात आणलेला व्यत्यय अजिबात खपत नाही. त्यातून ट्रकसमोर कोणी आले तर त्यांचा नाइलाजच होतो. तसंच हेही!) बोल्सॅनेरो यांना विकासकार्यात विघ्न आणणाऱ्या आय. बी. ए. एम. ए.चे काम अजिबात पसंत नव्हते आणि नाही. ते उपग्रहाकडून आलेल्या छायाचित्रांच्या साहाय्याने जंगलातील आगीचे क्षेत्र व विनाश झालेल्या भागाची माहिती जाहीर करीत. त्यांनी ‘२०१९ या एकाच वर्षांत अ‍ॅमेझॉनमध्ये ८०,००० वणवे पेटले’ ही माहिती दिली. हे काही बोल्सॅनेरो यांना आवडले नाही. त्यांनी तत्काळ ‘ही माहिती साफ चुकीची आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनीच या आगी लावल्या आहेत आणि त्यांनीच हे बदनामीचे कारस्थान रचले आहे. या ब्राझीलविरोधी कटाचे नेतृत्व अवकाश संशोधन केंद्राचे संचालक रिकाडरे मॅग्नस ओसोरियो गॅल्वहो हे करीत होते. मी काही लाकूडचोरांना मदत करणारा नाही. उलट, मी कॅप्टन चेनसॉ (लाकडावर कोरीवकाम व नक्षी करणारा) आहे,’’ असे सांगत बोल्सॅनेरो यांनी अवकाश संशोधन केंद्राचे संचालक रिकाडरे मॅग्नस यांना त्यांच्या पदावरून निलंबित केलं. ‘ग्रीनपीस’, ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ यांसारख्या अनेक संस्थांनी याचा निषेध करीत पुरावे मागितले. मात्र, बोल्सॅनेरो यांनी त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा दिलेला नाही.

तरीही काही निरीक्षक गुन्हा नोंदवून शिक्षा करण्याचे धाडस दाखवीत होते. मग अशा (एकंदर २७ पकी) २१ अधीक्षकांना बोल्सॅनेरो यांनी थेट निलंबितच करून टाकलं. त्यामुळे तिकडे जंगलरक्षण करणारे पर्यावरणप्रेमी व वनहक्कांसाठी लढणारे कार्यकत्रे जीव मुठीत धरून भूमिगत झाले आहेत. रायन्ना क्रिस्टिन मॅक्सिमो फ्रँको ही आदिवासी महिलांच्या वनहक्कांसाठी तिथे लढा देत होती. मात्र, आता रायन्नालाही अ‍ॅमेझॉन व आदिवासींच्या रक्षणाची आपली मोहीम स्थगित करावी लागली आहे. या सगळ्यामुळे ब्राझीलची आज ‘पर्यावरणीय घातक कृत्यांचे भयानक राष्ट्र’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यामध्ये अरण्यातील वाळलेल्या पालापाचोळ्यावर वीज पडून आगी लागणे ही नसर्गिक गोष्ट आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये जुल महिन्यात लागलेल्या आगी ऑक्टोबपर्यंत धुमसत असतात. ब्राझीलमधील नॅशनल अवकाश संशोधन केंद्राने मागील दहा वर्षांत अ‍ॅमेझॉनला लागलेल्या आगींविषयी विस्ताराने निवेदन केले आहे. २००० सालापर्यंत दरवर्षी २५ ते ३० हजार आगी लागत. २०१० साली अ‍ॅमेझॉनमध्ये एक लक्ष आगी लागल्या होत्या. त्यानंतर दरवर्षी ६० हजार ते ७० हजार वणवे पेटतच राहिले. २०१८ साली ४८ हजार आगी लागल्या होत्या. यंदा १ जानेवारीपासून ३० ऑगस्टपर्यंत तब्बल ८७ हजार अग्निहोत्रांमध्ये अरण्ये स्वाहा होणे सुरूच आहे. परंतु या आगी नसर्गिक नसून, लावलेल्या आगी आहेत, हे अगदी उघड आहे. डॉ.लव्हजॉय म्हणतात, ‘‘अ‍ॅमेझॉन याच पद्धतीने सतत अग्निदिव्यांतून जात राहिल्यास त्याचा गवताळ प्रदेश होण्यास फार वेळ लागणार नाही.’’ याचा अर्थ पृथ्वीच्या फुप्फुसाचा झालेला क्षय दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यातून पृथ्वीची प्रकृती बहुअवयव निकामी होण्याकडे (मल्टी ऑर्गन फेल्युअर) जात आहे. स्वत:च आपल्या अरण्यांचे दहन करणारे ब्राझीलचे नेते म्हणजे आठवडाभर रोम जळत असताना फिडल वाजविणाऱ्या सम्राटाचे २१ व्या शतकातील उत्परिवर्तित (म्युटेशन झालेले) अवतार आहेत.

जंगले ऑक्सिजन देतात, तसेच कर्ब वायूही शोषून घेतात. जंगले नष्ट झाल्याने वातावरणातील कर्ब वायूंचे प्रमाण वाढते. ‘ग्लोबल फॉरेस्ट वॉच’ या संस्थेच्या निरीक्षणानुसार, २०१५ ते २०१७ या काळात जगातील जंगलविनाशामुळे वातावरणात दरवर्षी ४८० कोटी टन कर्ब वायूंची भर पडली होती. या वर्षीच्या आगीमध्ये २३० कोटी टन कर्ब वायू बाहेर पडला असावा असा अंदाज आहे. ‘नासा’ने अवकाशातून घेतलेल्या छायाचित्रात सध्याच्या वणव्यामुळे सुमारे ३००० कि. मी. अंतरापर्यंत धुराचे साम्राज्य दिसत होते. जागतिक हवामानशास्त्र संघटनेने ‘या आगीमुळे भयावह प्रदूषण होत आहे. त्यात कार्बन घनकण, कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रमाण प्रचंड आहे. कर्ब वायूंचे उत्सर्जन आणि कर्ब वायूंच्या सापळ्यात उष्णता साचून राहील अशी दुहेरी हानी होणार आहे. त्यामुळे वातावरणातील हवेच्या अभिसरणावर परिणाम होतील. नसर्गिक यंत्रणाही (नॅचरल सिस्टीम्स) वरचेवर अतिशय अस्थिर होत जाईल. त्यातून जगातील बर्फाच्छादन वितळण्याचे प्रमाण वाढेल. हवामान- बदलामुळे आपत्तींची साखळी तयार होऊ शकेल. अ‍ॅमेझॉनमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्यास शुष्क वातावरणात आगींच्या घटना वाढतील. एका भयावह दुष्टचक्राला सामोरे जावे लागेल,’ असे म्हटले आहे. ‘सध्या वातावरणातील कर्ब वायूंची संहती (कार्बन कॉन्सन्ट्रेशन) ही ४१५ पी. पी. एम. (पार्ट्स पर मिलियन) एवढी आहे. अ‍ॅमेझॉनच्या आगीमुळे त्यामध्ये ३८ पी. पी. एम.ची भर पडेल,’ असा डॉ. थॉमस लव्हजॉय यांचा अंदाज आहे.

जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या निरीक्षणानुसार, यंदा अलास्का व सैबेरिया भागात तेथील सरासरीपेक्षा दहा अंश सेल्सियसने तापमानवाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे तिथे आगीचे प्रमाणदेखील कमालीचे वाढले आहे. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर जाडीचा बर्फ असलेल्या ग्रीनलँडवरील २०० अब्ज टन बर्फाच्छादन वितळून गेले. या बर्फ वितळण्यातून मिथेन वायू बाहेर पडत असून त्यामुळे तापमानवाढीत भरच पडणार आहे. हिमनदीविषयक तज्ज्ञ व भूगर्भशास्त्रज्ञ प्रो. जेसॉन बॉक्स यांनी आजपर्यंत ग्रीनलँडवर वीस मोहिमा केल्या आहेत. ‘स्वयंभू हिममानव’ अशी ख्याती लाभलेले प्रो. बॉक्स यांच्याकडे कर्ब उत्सर्जनामुळे बर्फाचे तट कोसळत असल्याचे पक्के वैज्ञानिक पुरावे आहेत. हवामानबदलविरोधी आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यांच्या मते, ‘एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यापासून ग्रीनलँडवरील ९००० अब्ज टन बर्फ निघून गेला आहे. यामुळे समुद्राच्या पाण्यात २५ मि. मी.ने वाढ झाली आहे. (साधारणपणे ३६० अब्ज टन बर्फ वितळणे म्हणजे एका समुद्राच्या पाण्यात २५ मि. मी.ने वाढ होणे होय.) एकंदरित समग्र पर्यावरणीय यंत्रणेवर (इको सिस्टीम) होणारे भीषण परिणाम आणि त्यामुळे होत असलेले हवामान यंत्रणेमधील बदल पाहून या क्षेत्रातील वैज्ञानिक हादरून जात आहेत. २०१५ साली पॅरिसच्या जागतिक हवामान परिषदेत केलेला ‘जगाची तापमानवाढ दोन अंश सेल्सियसवर रोखणे व ते १.५ अंश सेल्सियसपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणे’ हा निर्धार फोल ठरण्याची भीती वाढली आहे. या शतकाअखेरीस पृथ्वीचे तापमानवाढ तीन अंश सेल्सियसच्या पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात कित्येक शतकांपासून राहणाऱ्या आदिवासींच्या जमिनींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी ब्राझील सरकारने १९८८ साली घटनात्मक तरतूद केली होती. त्यानुसार आदिवासींच्या जमिनींची वेगळी नोंद करण्याचे काम चालू केले होते. बोल्सॅनेरो यांनी ‘अशा नोंदी करत वेळ घालविण्याची गरजच नाही,’ असे जाहीरपणे सांगून टाकले होते. त्यामुळे ब्राझीलमधील आदिवासींचे प्रतिनिधी संतप्त झाले आहेत. ‘‘शासन व पोलीस यंत्रणा यांच्या पाठबळामुळे अ‍ॅमेझॉनमधील आगीचे प्रमाण व आदिवासींवरील हल्ले वाढत गेले. आज कायद्याचे रक्षण नसणाऱ्या सुमारे तीन लक्ष आदिवासींवर स्थलांतराची टांगती तलवार आहे. हा वंशविच्छेदाचाच एक प्रकार आहे,’ असा प्रहार त्यांनी केला आहे. तर अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या जागतिक संघटनेने, ‘अ‍ॅमेझॉन व तेथील आदिवासी यांच्या रक्षणासाठी जगाने ब्राझीलवर दबाव आणावा,’ असे आवाहन केले आहे. प्रसिद्ध अमेरिकी अभिनेते लिओनार्दो डी कॅप्रिओ हे पर्यावरण संवर्धनासाठी ख्यातनाम आहेत. त्यांनी या आदिवासी व स्थानिक जनतेला ५० लक्ष डॉलरची देणगी दिली. त्यापाठोपाठ अमेरिका व युरोपमधील अनेक दात्यांनी सढळ हाताने मदत देऊ केली.

मोजून एक वर्षांपूर्वी ‘आय.पी.सी.सी.’चा निर्वाणीचा इशारा देणारा विशेष अहवाल जाहीर झाला होता. या अहवालात ‘पृथ्वीच्या तापमानात औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा १त् सेल्सियसने वाढ झालेली आहेच. सध्याचे प्रयत्न पाहता २०३० ते २०५० या काळात जगाच्या तापमानात किमान १.५त् सेल्सियसने वाढ होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात अवर्षण, महापूर, चक्रीवादळे, उष्णतेची लाट, शीतलहर, अग्नीतांडव यांची तीव्रता व वारंवारिता वाढत जाणार असून आपत्तीग्रस्तांच्या संख्येतही अफाट वाढ होणार आहे’ असे निक्षून सांगितले होते. पण एका वर्षांतच या भाकितापेक्षाही भयंकर वास्तवाला आपण सामोरे गेलो आहोत आणि जात आहोत. येणारा प्रत्येक ऋतू हा अतिरेकाचे टोक गाठत आहे. या उत्पातामध्ये वरचेवर भर पडत जाणार आहे. कवी, चित्रकार व विश्लेषक संजीव खांडेकर यांनी ‘ऋतुसंहार’ या एका शब्दात हे मर्म सांगितले आहे.

एकंदरीत मागील एका वर्षांत हवामानाने कहर केला, तर दुसरीकडे त्याविषयीची जागरूकता आणि सक्रियतादेखील वाढत गेली. निसर्गाचा बेसुमार विध्वंस व त्याला जबाबदार असलेले राजकीय ‘उद्योग’ यांचे उघडेनागडे रूप दिसून आले. त्यामुळे समस्त जनता पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकवटू लागली. आणि या अभूतपूर्व पर्यावरणीय कृतिवादाला कारणीभूत आहेत- शाळकरी मुले! भवितव्याच्या धास्तीने हादरलेली ही शाळकरी मुले आणि तरुण लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. २० ऑगस्ट २०१८ रोजी स्वीडनमध्ये नवव्या इयत्तेत शिकणारी ग्रेटा थुनबर्ग त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली. एका कागदावर ‘हवामानबदल रोखण्यासाठी कर्ब उत्सर्जन कमी करा’ असे लिहून ती एकटीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी तिच्याभोवती मुले व मोठी माणसेही जमू लागली. या एका छोटय़ा मुलीच्या या छोटय़ा कृतीमुळे लक्षावधी मुलांना व तरुणांना स्फूर्ती मिळाली आणि या घटनेपासून तीन महिन्यांच्या आतच लाखो मुले ‘भविष्यासाठी शुक्रवार’ असे सांगून हवामानासाठी शाळा बंद आंदोलनात सहभागी होऊ लागली. त्यांना जगातील आघाडीचे शास्त्रज्ञ पािठबा देऊ लागले. ही मुले ‘आमचं नाही, पण विज्ञानाचं ऐका आणि कर्ब उत्सर्जन थांबवा व जगाला वाचवा,’ असं त्यांच्या नेत्यांना सांगू लागली.

१५ मार्च २०१९ चा ‘हवामानासाठी विद्यालय बंद’ हा या आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत १३० राष्ट्रांतील १५ लक्ष विद्यार्थ्यांनी हवामानबदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी हे बजावण्यासाठी शाळा बंद पाडल्या. जर्मनीत तीन लाख, इटालीमध्ये दोन लाख, कॅनडात दीड लाख मुलांनी शाळा बंद केली. स्टॉकहोममध्ये (स्वीडन) २० हजार, मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) ३० हजार, ब्रुसेल्स (बेल्जियम) ३० हजार विद्यार्थी जागतिक शाळा बंदमध्ये सामील झाले होते. शाळा नसलेला दक्षिण ध्रुव (अंटार्टिका) वगळता जगाच्या सर्व भागांतील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. जागतिक हवामानबदल आंदोलनाचा दुसरा टप्पा २४ मे २०१९ ला झाला. १२५ देशांतील १६०० शहरांत निदर्शने झाली आणि त्यात १५ लाख विद्यार्थी सहभागी झाले. आता ‘भविष्यासाठी शुक्रवार’ व हवामानासाठी शाळा बंद या आंदोलनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी टप्पा म्हणजे जागतिक बंद! मुलांनी २० सप्टेंबर २०१९ रोजी जगातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्धार केला.

याच काळात अमेरिकेतील सोफी किव्हलॅन आणि केल्से कॅस्कॅडिया रोज ज्युलियाना या दोघींनी त्यांच्यासोबत २१ मित्रमत्रिणींना घेऊन हवामानबदलासाठी त्यांच्याच सरकारच्या विरोधात दाखल केलेला खटला गाजू लागला होता. त्याची प्रेरणा घेऊन अनेक देशांतील मुलांनी त्यांच्या सरकारवर खटले दाखल केले. २०१६ च्या ऑक्टोबर महिन्यात दिल्लीच्या सुवर्ण पार्कमध्ये राहणारा १४ वर्षांचा हर्ष दहिया आणि त्याच्या पाच मित्रांनी दिल्लीतील गलिच्छ हवेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. अशा अनेक दाव्यांची दखल घेत २०१९ च्या एप्रिल महिन्यात राष्ट्रीय हरित लवादाने ‘महाराष्ट्र, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, नागालँड व आसाम या सहा राज्यांनी येत्या सहा महिन्यांत हवेचे प्रदूषण रोखून शुद्ध हवा निर्माण करण्यासाठीचा कृती आराखडा सादर करावा. आणि याची पूर्तता न झाल्यास प्रत्येकी एक कोटीचा दंड द्यावा लागेल,’ असे खडे बोल सुनावले. तिकडे कराचीमधील रबाब अली या सात वर्षांच्या मुलीने पाकिस्तान सरकारवर दावा ठोकला. ती म्हणते, ‘‘आम्ही मोठे होऊ तेव्हा आम्हाला सुरक्षित पर्यावरण हवे आहे, तरच पुढील पिढय़ांना आयुष्य व्यवस्थितपणे कंठता येईल.’’ तिचे वडील व प्रसिद्ध विधीज्ञ काझी अली अथर हे कन्येच्या वतीने खटला लढवीत आहेत. तर पाक सरकारने ‘अज्ञान बालिकेस खटला लढवता येत नाही’ असा आक्षेप त्यावर घेतला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आक्षेप फेटाळून लावताना ‘‘सर्वसामान्य जनतेच्या व्यापक हिताचे रक्षण करण्यासाठी अज्ञान बालकसुद्धा न्यायालयाचे दार ठोठावू शकते,’’ असे उलट सरकारलाच सुनावले.

थरच्या वाळवंटातील थारकपार जिल्ह्य़ात ९००० चौ. कि. मी. भागातून १७५ अब्ज टन कोळसा काढला जाणार आहे. त्यामुळे हजारो लोकांचे स्थलांतर होणार आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना हवा व पाण्याच्या प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. शिवाय कर्ब उत्सर्जनाच्या पातळीतही बेसुमार वाढ होणार असल्यामुळे सामान्यांचे जीवन धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प थांबविण्याकरिता छोटी रबाब न्यायालयात गेली आहे. जगभरातून कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू असताना पाकिस्तानने पर्यायी ऊर्जेचा विचार करावा, असा तिचा आग्रह आहे. २०१८ सालीच कोलंबियातील अ‍ॅमेझॉन वाचविण्यासाठी १८ वर्षांखालील २५ मुलांनी त्यांच्या सरकारला न्यायालयात खेचले. २०१९ च्या जूनमध्ये कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पर्यावरणरक्षणाचा एक नवा इतिहास घडवला. या निकालात म्हटले आहे की, ‘‘स्वच्छ व निरोगी पर्यावरण हा नागरिकांचा हक्क आहे. ते देण्यात व जतन करण्यात सरकार कमी पडत आहे. जगातील कर्ब वायू शोषून घेण्यासाठी अ‍ॅमेझॉन जंगल हे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. तेथील जंगलतोड ही यास्तव घातक आहे. इतकेच नाही तर त्यामुळे २०१५ च्या पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय कराराचा भंग होत आहे. अ‍ॅमेझॉनचे जंगल जपणे हे सरकार व नागरिक यांचे आद्य कर्तव्य आहे. जंगलतोड तातडीने थांबविण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक आहे.’’ अनेक देशांचे विधीज्ञ कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा उपयोग करून घेण्यासाठी पुढे येत आहेत.

जगातील मुलांचा त्यांच्या सरकारवर व नेत्यांवर अजिबात विश्वास नाही. त्यांच्या सर्व अपेक्षा व आशा या न्यायालयावरच टिकून आहेत आणि न्यायालये या काळाच्या कसोटीला न्याय देत आहेत. ५० राष्ट्रांतील न्यायालयांनी सामान्य लोकांचे नागरी हक्क जपण्यासाठी त्या- त्या सरकारांना फटकारले आहे. घटनेने दिलेल्या हक्कांसाठी न्यायालयांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. बेल्जियम, आर्यलड, कॅनडा या देशांतील मुलेही खटले दाखल करीत आहेत. आता १०० राष्ट्रांतील वकील मंडळी या खटल्यांच्या यशाचा अभ्यास करून त्यांच्या देशात याचा उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नांत आहेत. या खटल्यांपकी अनेक ठिकाणी त्यांचे सल्लागार डॉ. जेम्स हॅन्सेन आहेत. वॉिशग्टन येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल एन्व्हार्यनमेंटल लॉ’चे अध्यक्ष कॅरोल मुफेट म्हणतात, ‘‘शाळकरी मुलांच्या पुढाकारामुळे जगातील पर्यावरण सक्रियता विलक्षण वेगाने वाढत आहे. ती ठणकावून सांगत आहेत की, तुम्ही अपयशी ठरला आहात. आमचे हक्क न डावलता त्यांचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. यामुळे कायदा व घटना यांच्या आधारे लढा अधिक सशक्त होत आहे.’’

‘जगातील हवेत कर्ब वायूंची संहती ३५० पार्ट्स पर मिलियनपर्यंत आणून तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसपर्यंत रोखली तरच पृथ्वीला कडेलोटापासून वाचवता येऊ शकेल’ हे ब्रीद घेऊन 350.१ॠ ही जागतिक संघटना कार्यरत आहे. त्यांनी २०१२ पासून अमेरिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यापीठांचे दौरे करून ‘जीवाश्म इंधनमुक्त जग’ (फॉसिल-फ्री वर्ल्ड) ही मोहीम सर्वत्र पोहोचवली.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील २५ वर्षांची भाषा संशोधक ज्युलिया पेक यांनी या मोहिमेत पुढाकार घेतला. उत्तम परतावा मिळावा या हेतूने ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांचा ३.५ अब्ज पौंडांचा निधी (सुमारे ३५० अब्ज रुपये) जीवाश्म इंधन कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवला होता. पेक यांनी तो निधी काढून इतरत्र गुंतवण्यास भाग पाडले. पाठोपाठ केंब्रिज व इतर विद्यापीठांमधील विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांची गुंतवणूक काढण्यास प्रवृत्त केले. 350.१ॠ  संघटनेच्या विनंतीवरून जगातील आघाडीच्या  अर्थतज्ज्ञांनी ‘यापुढे जीवाश्म इंधनाचे उत्पादन वा त्यासाठीची पायाभूत रचना यातून निर्गुतवणूक करावी,’ असे आवाहन केले. ही संघटना हवामानाबाबत जागरूकता वाढविणाऱ्या मुलांच्या साथीला आली आणि मुलांनीही या संघटनेच्या कार्यात हातभार लावला. मुलांमुळे पालक व शिक्षकही सोबत आले. परिणामी जीवाश्म इंधन तयार करणाऱ्या कंपन्यांतील समभाग काढून घेण्याला वेग आला. केपटाऊनमध्ये १० सप्टेंबरला एका वैचित्र्यपूर्ण मेळाव्यात पर्यावरणरक्षण व हवामानबदलावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, धार्मिक गट (दोन िहदू, २२ ख्रिश्चन व १८० मुस्लीम), देणगीदार संस्था, गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, विकासासाठी वित्त-साहाय्यक (डेव्हलपमेंट बँकर), वित्त-सल्लागार एकत्र जमले होते. कधीही एकत्र येऊ न शकणारे हे गट हवामानबदल रोखण्यासाठी एकत्र आले. ‘‘आजपर्यंत ११०० संस्थांनी जीवाश्म इंधन कंपन्यांमधून तब्बल ११ लाख कोटी डॉलरची (११ ट्रिलियन) निर्गुतवणक केली,’’ अशी घोषणा ४४ देशांतील ३०० प्रतिनिधींच्या या संमेलनात केली गेली. त्यात द रॉकफेलर ब्रदर्स फंड, नॉर्वे सॉवरिन वेल्थ फंड, अ‍ॅमुंडी अ‍ॅसेट मॅनेजमेंट, द फ्रेंच पब्लिक फायनान्शियल इन्स्टिटय़ूशन, के. एफ. डब्ल्यू. (जर्मन डेव्हलपमेंट बँक), वर्ल्ड कौन्सिल ऑफ चच्रेस, ग्लोबल क्लायमेट कॅथॉलिक मूव्हमेंट, द इस्लामिक सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका, िहदू अमेरिका फाऊंडेशन, द आर्ट ऑफ लििव्हग फाऊंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वानी प्रदूषण वाढविणाऱ्या कंपन्यांना सहकार्य थांबवण्याचा निश्चय केला. ‘जीवाश्म इंधनमुक्त जग’ चळवळीला आलेले हे विराट यश पाहून जीवाश्म इंधन कंपन्या हादरून गेल्या. विस्तारीकरणाच्या तयारीत असलेल्या तेल व कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना हा जबरदस्त फटका आहे.

अगदी त्याच दिवशी ‘समायोजनासाठी जागतिक आयोगा’चा (ग्लोबल कमिशन ऑन अ‍ॅडाप्टेशन) अहवाल प्रसिद्ध झाला. हवामानबदलाचा सामना करण्यासाठी समायोजनाचा वेग वाढवणे आवश्यक आहे, याची निकड वाटल्याने जगातील उद्योग, आíथक व राजकीय क्षेत्रातील अनुभवी लोकांनी एकत्र येऊन हा आयोग स्थापन केला आहे. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव बान की मून, जागतिक बँकेच्या मुख्याधिकारी क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा व मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे सक्रिय आहेत. या अहवालात ‘जगाने २०२० ते २०३० या कालावधीत हवामानबदल समायोजनासाठी १.८ लाख कोटी डॉलरचा (१.८ ट्रिलियन) निधी उपलब्ध करून दिल्यास त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेस तिप्पट फायदे मिळतील,’ असे स्पष्ट केले आहे. हवामानबदलामुळे येणाऱ्या आपत्तींचे तडाखे हे गरीब देश आणि सामान्य जनता यांनाच बसत असतात. समायोजनासाठी जागतिक आयोगाने त्यांची जोखीम कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम सुचविला आहे. त्यानुसार, ‘आपत्तीबद्दल तत्काळ इशारा देणारी यंत्रणा, कोरडवाहू शेती सुधारणा, खारफुटी संरक्षण, हवामानसक्षम पायाभूत सुविधा आणि हवामानसक्षम पाणी व्यवस्थापन हे कार्यक्रम राबविल्यास भविष्यातील हानी कमी होईल, रोजगार वाढेल व पर्यावरणाचे रक्षण होईल,’ असे त्यात म्हटले आहे. जीवाश्म इंधन कंपन्यांतील निर्गुतवणूक होऊन तो निधी हवामानाच्या समायोजनासाठी मिळाला तर पुढील दशक सुसह्य होऊ शकेल.

संयुक्त राष्ट्रसंघाने हवामानबदलावर कृती आराखडा ठरविण्यासाठी न्यूयॉर्क येथे २० ते २३ सप्टेंबर या काळात जगातील नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली होती. त्याआधी अशाच धक्कादायक घटना घडत होत्या. या शिखर परिषदेवरील दबाव वाढविण्यासाठी २० सप्टेंबर २०१९ रोजी सात खंडांतील १६३ देशांत, ५००० ठिकाणी सुमारे ५० लाखांहून अधिक मुलांनी जागतिक बंद करून दाखवला. अजूनही त्यांची नेमकी संख्या मिळणे कठीण असले तरी अतिशय शांततेत पार पडलेली ही जागतिक निदर्शने संपूर्ण जगाला थक्क करून गेली. विलक्षण, अद्भुत, अभूतपूर्व अशा कुठल्याही विशेषणात न सामावणारी ही घटना आहे.

२० सप्टेंबर २०१९! या दिवशी न्यूयॉर्कच्या मॅनहटन (आर्थिक, सांस्कृतिक, माध्यम व मनोरंजन या क्षेत्रांची जागतिक राजधानी अशी ख्याती असलेले) भागात चार लाख लोकांचे वादळ उसळले होते. हातात कर्णा घेऊन १६ वर्षांची ग्रेटा थुनबर्ग बोलू लागली आणि क्षणार्धात शांतता पसरली. ‘‘आपल्या घराला आग लागलेली असून, ही आणीबाणीची परिस्थिती आहे. ही परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी आम्ही आम्हाला शक्य तेवढी पराकाष्ठा करू. काहीजणांच्या नफ्यासाठी आमचे भविष्यच हिरावून घेतले जात असताना आम्ही अभ्यास करून उपयोग तरी काय आहे? ही परिस्थिती जगभर जवळपास सारखीच आहे. सत्तेमधील लोकांचे गोड गोड शब्द सगळीकडे सारखेच आहेत. पोकळ आश्वासने व निष्क्रियता सारखीच आहे. हीच नामांकित मंडळी आम्हा मुलांसोबत सेल्फी घेण्यास धडपडत असतात. हेही सगळीकडे तसेच आहे. येत्या सोमवारी २३ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या हवामानाच्या कृतीसाठी शिखर परिषदेस जगातील सर्व नेते एकत्र जमणार आहेत. तेव्हा संपूर्ण जगाचे अब्जावधी डोळे तुमच्याकडे असतील.’’

आहार, प्रवास व एकंदरीत प्रत्येक बाबीत कर्ब उत्सर्जन कमीत कमी होईल याचा निक्षून प्रयत्न करणारी व इतरांनी तशी राहणी स्वीकारावी यासाठी आग्रही असणारी ग्रेटा थुनबर्ग बोलत होती. लक्षावधी लोक कानात जीव ओतून ऐकत होते. ती म्हणाली, ‘‘तुम्ही मुलांचे ऐकत आहात, तुम्ही विज्ञानाच्या पाठीशी उभे आहात हे दाखवून खरे नेतृत्व करण्याची एक संधी या नेत्यांना आहे.’’ हे ऐकताच ‘ग्रेटा! ग्रेटा!’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘‘आमच्याच भविष्यासाठी आम्हालाच झगडावे लागण्याची वेळ यावी, हे काही बरे नाही. आम्ही केवळ आमचे सुरक्षित भविष्य मागत आहोत. हे खरोखरीच अति मागणे आहे काय?’’ असा सवालही तिने केला.

त्याचवेळी लंडन शहर दोन लाख मुलांनी ‘हवामानकांड’ थांबवण्यासाठी दुमदुमून टाकले होते. ब्रिटनमधील ‘ट्रेड युनियन काँग्रेस’ने (कामगार संघटनांची परिषद) या लढय़ास पािठबा देण्याचे ठरवल्यामुळे बस व रेल्वे, सफाई कामगार व इतर सर्व कामगारही संपात सहभागी झाले. काही कामगार जेवणाच्या सुटीत बाहेर आले, तर काही कामावर नसताना आले. शिक्षक तसेच महाविद्यालयातील व विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संघटना संपात सहभागी झाल्या. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्वीडन, ब्राझील, पाकिस्तान, युगांडा, पेरू, टर्की, दक्षिण आफ्रिका या देशांत लाखो मुलांनी ‘स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पर्यावरण’ या मागण्यांसाठी निदर्शने केली. भारतात तुळजापूर तालुक्याच्या लोहाऱ्यापासून लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे व मुंबईत हजारो मुले पर्यावरणरक्षणासाठी रस्त्यावर उतरली.

या अभूतपूर्व आंदोलनात वैज्ञानिकांच्या संघटना, अर्थतज्ज्ञ, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना, चित्रकार, वास्तुशिल्पी, अभिनेते, संगीताचे बँड्स असे समाजातील सर्व स्तर मुलांच्या सोबत होते. खांद्यावरील बाळापासून काठी घेतलेल्या वृद्धांपर्यंत, बेटांपासून बर्फाळ प्रदेशांपर्यंत, नावेपासून सायकलपर्यंत मिळेल ते वाहन घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक यात सामील झाले होते. नाच, वादन, गाणी, चित्रं, व्यंगचित्रं, रांगोळी, फलक यांचे विविध आविष्कार या आंदोलनात दिसत होते. संपूर्ण जगात उत्साहाचे उधाण आल्याचे हे रमणीय दृश्य होते.

मुलांचा ‘भविष्यासाठी शुक्रवार’ निर्धार ऐकून जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड या देशांमधील वैज्ञानिकांनी ‘भविष्यासाठी वैज्ञानिक’ गट स्थापन केला. मुलांना पािठबा देण्यासाठी त्यांनी काढलेल्या पत्रकावर ४६,००० विद्वानांनी सह्या केल्या होत्या. जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’, ‘एक्स्टिंक्शन रिबेलियन’,  ‘350.१ॠ’, ‘हहा’ , ‘ग्रीन पीस’, ‘ऑक्स्फॅम’ या नामांकित संघटनांमुळे त्यांचे हजारो सभासद सोबतीला आले होते. एरवी जगातील सगळ्या कंपन्या ‘बिझिनेस अ‍ॅज युज्वल’ असाच व्यवहार करीत असतात. ब्रिटन व ऑस्ट्रेलियातील काही कंपन्यांनी ‘नॉट बिझिनेस अ‍ॅज युज्वल’ असे आशयगर्भ नामकरण करून आघाडी स्थापन केली. पर्यावरण संकटाचे गांभीर्य लक्षात आलेल्या या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना संपात सामील होण्यास प्रोत्साहन दिले.

जगात प्रदूषण करणाऱ्या कोळसा व तेल कंपन्यांचे उत्पादन भरघोस व्हावे याकरिता तंत्रज्ञान पुरविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, गुगल, अ‍ॅमेझॉन या कंपन्यांचे करार झाले आहेत. यावरून या कंपन्यांमधील कर्मचारी त्यांच्या व्यवस्थापनाच्या विरोधात उभ्या राहिल्या. परिणामी अ‍ॅमेझॉनचे मुख्याधिकारी जेफ बेझो यांनी जागतिक बंदच्या एक दिवस आधी ‘हवामानरक्षणासाठी वचनबद्ध’ असल्याचे जाहीर केले. त्यांनी वृक्षलागवड व संवर्धनासाठी दहा कोटी डॉलर देणगीची घोषणा केली. तरीही अ‍ॅमेझॉनचे १५०० कर्मचारी, गुगल व ट्विटरचे कर्मचारी मुलांच्या साथीसाठी बंदमध्ये सहभागी झाले होते.

जगातील ६० प्रसार माध्यमांनी या घटनांचे महत्त्व विशेषत्वाने दाखविण्याचा निर्णय घेतला. ‘द गार्डियन’ने  संपादकीयात ‘मानवजातीवरील संकटाचे वार्ताकन करताना आम्ही आमच्या जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे. आम्ही पुढच्या पिढीसोबत आहोत,’ असे सांगून स्पष्ट भूमिका घेण्याचे धर्य दाखवले. अजूनही दूरचित्रवाणी वाहिन्या हवामानबदलाच्या संकटाला प्राधान्याने दाखवत नाहीत. पर्यावरण विनाशाबाबत कुठे, काय, कसे, कधी हे दाखवून त्याचे परिणाम दाखविणाऱ्या बातम्या लिहिल्या वा दाखवल्या जात नाहीत. पर्यावरणीय घटनांचे विश्लेषण केले जात नाही. हे घडवून आणण्यासाठी ‘द नेशन’ , ‘कोलंबिया जर्नालिझम रीव्ह्यू’ आणि ‘द गार्डियन’ यांनी माध्यमांशी सहयोग केला. त्यामध्ये सीबीएस न्यूज, हिफग्टन पोस्ट, व्होक्स, द इंटरसेप्ट, स्लेट, द फिलाडेल्फिया एन्क्वायरर ही मुद्रण, नभोवाणी, दूरचित्रवाणी व डिजिटल माध्यमे सहभागी झाली होती. जगातील मुलांची व तरुणांची पर्यावरणविषयक जागरूकता व सक्रियता विलक्षण गतीने वाढत आहे. त्यांच्या सोबतीने मोठेही येत आहेत. पर्यावरण चळवळीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये वाढ होत आहे. पर्यावरणवादी पक्षांना मिळणाऱ्या मतांमध्ये वाढ होत आहे. हे पाहून सर्व प्रकारच्या माध्यमांतील अग्रगण्य असलेल्या बी.बी.सी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, लॉसएन्जलिस टाइम्स, नॅशनल जिओग्राफिक, नेचर या संस्था म्हणू लागल्या, ‘हा आहे ग्रेटा थुनबर्ग इफेक्ट!’

थोडक्यात, ‘पशासाठी आयुष्य’ हेच एकमेव ध्येय असणाऱ्या आजच्या काळात पसा सोडून निसर्ग वाचविण्यासाठी व्यक्ती व संस्था या दोन्हींच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होताना दिसू लागली आहे. मागील एका वर्षांत स्वत:ची जीवनशैली आणि सभोवताल या दोन्हींत बदल करण्यासाठी सज्ज होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वैयक्तिक पातळीवर कर्ब उत्सर्जन कमी करणे व सभोवतालच्या संस्थांना त्यासाठी भाग पाडणे ही महत्त्वाची कृती सर्वत्र दिसते आहे. या आठवडय़ात युरोप, अमेरिका व ब्रिटनमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात ‘हवामानबदल’ व ‘पर्यावरणरक्षण’ या विषयांना प्राधान्य देणाऱ्या मतदारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळले आहे. जगातील मुलांमुळेच पर्यावरण कृतीवादाचे (अ‍ॅक्टिव्हिझम) नवे युग अवतरले आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. जगावरील कार्बनच्या काळ्याकुट्ट ढगांना मुलांच्या कृतीवादामुळे चंदेरी किनार आली आहे. हे वातावरण असेच टिकणे व आणखी फोफावणे आवश्यक आहे. पुढील वर्षी निदर्शकांच्या संख्येत किमान दहापटीने वाढ झाली आणि मुलांसमवेत तरुणही वाढत्या संख्येने येत गेले तर जगावरील काळे ढग वेगाने बाजूला सरकून आकाश मोकळे होऊ शकेल.

१९७६ साली बर्कले विद्यापीठातील आर्थिक इतिहास विभागातील प्रो. कार्लो सिपोला यांनी मानवी मूर्खपणाचे सिद्धांत सांगून ठेवले आहेत. ‘मूर्ख लोक बहुसंख्येने आणि सर्वत्र संचारी असतात’ आणि ‘मूर्ख व्यक्ती या डाकूंपेक्षाही धोकादायक असतात.’ तसेच ‘मूर्ख व्यक्तींच्या ओझ्याखाली काही समाज रसातळाला जातात, तर काही शहाण्या व्यक्ती संपूर्ण समाजात स्थित्यंतर घडवतात..’ अशी ती प्रमेये आहेत. सध्याचा काळ हा मानवप्राण्याची अग्निपरीक्षाच आहे. जगातील अग्रगण्य नियतकालिक ‘द इकॉनॉमिस्ट’ंच्या मते, ‘‘सांप्रत केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांचे नेतृत्व हे खुज्यांच्या हाती आहे. उदार व दृष्टी असणाऱ्यांची वानवा आहे.’’ हा नेतृत्वातील दुष्काळ दूर होऊन काळाच्या हाका समजू शकणाऱ्या विवेकी व सुसंस्कृत व्यक्तींचा प्रभाव वाढावा, जगावर आलेली कार्बनची कभिन्न काजळी दूर होऊन स्वच्छ, सुंदर आणि रम्य उषकाल व्हावा, हीच आपल्या सर्वाची इच्छा आहे. सोफी, ज्युलियाना व ग्रेटा या छोटय़ांमुळे पर्यावरण व हवामानबदल हे विषय घराघरापर्यंत पोहोचले आहेत. जागरूक पालक व संवेदनशील लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पसा आणि केवळ पशाचाच ध्यास घेणारे असंख्य लोक व संस्था पशावर पाणी सोडून निसर्ग जपायला तयार झाल्या आहेत. या सर्वाचा लढा हा संपूर्ण जग व जागतिक संस्था ताब्यात असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांशी आहे. प्रदूषकांच्या विरोधात सुरू असलेल्या या ऐतिहासिक लढय़ात प्रदूषकशाहीचा वरवंटा वाढत गेल्यास सिव्हिलायझेशनच्या तसेच जीवसृष्टीच्या अंताकडे आपली वाटचाल होईल. आणि जनतेचा विजय झाला तर नव्या पहाटेची आशा करता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोटेच त्यांच्या वयापेक्षा मोठे होऊन चोख भूमिका बजावत आहेत. प्रश्न आहे तो वयाने मोठे असणाऱ्यांचा!