‘कोविड- १९’ प्रसार: आकडय़ांच्या पलीकडे..

कोविड-१९ची लागण झालेले, त्यातून बरे झालेले व दगावलेले यांचे आकडे रोज छापून येतात, कानावर आदळतात.

संग्रहित छायाचित्र

डॉ. अनंत फडके

‘बाधितांच्या संख्येचा उच्चांक’ अशा तारस्वरात दिलेल्या बातम्या, देशात चाचण्यांतून ‘पॉझिटिव्ह’ ठरलेल्यांपेक्षा अधिक जणांना लागण असावी असे सांगणारा ‘आयसीएमआर’चा अप्रकाशित अहवाल.. यांतील आकडय़ांना न घाबरता आपल्या आरोग्य-व्यवस्थेची कमतरता काय आणि अधिक जोखीम कुणाला, हे ओळखून ‘कोविड-१९’चा प्रतिकार आपण करू शकतो..

कोविड-१९ची लागण झालेले, त्यातून बरे झालेले व दगावलेले यांचे आकडे रोज छापून येतात, कानावर आदळतात. त्यातून घबराट वाढण्याखेरीज काहीच साधत नाही. निरनिराळ्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की, कोविड-१९ हा विषाणू नवीन असल्यामुळे, त्याच्या विरोधात कोणामध्येच प्रतिकारशक्ती नसल्याने सुमारे ५० टक्के लोकांना लागण होईपर्यंत लागण पसरत जाणारच. लस उपलब्ध झाली तरच लागण होणाऱ्यांची एकूण संख्या कमी होईल. बाकीच्या उपायांनी लागण पसरण्याचे थांबणार नाही, वेग कमी होईल व त्यासाठीचे सर्व उपाय केलेच पाहिजे. पण त्याने साथ ओसरणार नाही. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे कोविड-१९ची लागण झालेल्या सर्वाच्यामध्ये त्याच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये भारतातील सुमारे ज्या ५० टक्के लोकांना (७० कोटी) लागण होईल त्या सर्वामध्ये म्हणजे सुमारे ७० कोटी लोकांमध्ये कोविड-१९ विरोधी प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या येईल. हे झाल्यावर भारतवासीयांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ (समूह-प्रतिकारशक्ती) येईल व ही साथ निसर्गत: ओसरू लागेल. लस आली तर हे लवकर होईल. अशा सर्व साथी ‘हर्ड इम्युनिटी’मुळे ओसरतात.

आज भारतात सुमारे चार लाख लोकांना लागण झाल्यावरही प्रकरण हाताबाहेर जात आहे असे अनेकांना वाटते! ‘कोविड-१९ची लागण म्हणजे मृत्यूशी गाठ!’ असाही गैरसमज निर्माण झाला आहे. अशीच काहीशी घबराट १० वर्षांपूर्वी ‘स्वाइन फ्लू’मुळे पसरली होती, पण प्रत्यक्षात तुलनेने फारच कमी मृत्यू होऊन ही साथ निसर्गत: ओसरली. सुरुवातीला वाटले होते की, दोन टक्के मृत्यूदर आहे. पण साथ ओसरल्यावर, सर्व माहिती मिळाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले की, मृत्यूदर फक्त ०.०२ टक्के होता! ‘कोविड-१९’ हा ‘स्वाइन फ्लू’पेक्षा घातक आहे. त्याचा सरासरी मृत्यूदर स्वाइन फ्लूच्या पाचपट, म्हणजे ०.१ टक्के असावा असे दिसते. म्हणजे ९९.९ टक्के लोक बचावणार आहेत!

‘मृत्यूदर २ ते ५ टक्के आहे’ असे बातम्यांमध्ये येते; कारण मृत्यूदर चुकीच्या आकडय़ांच्या आधारे काढला जात आहे. कोविड-मृत्यूंची संख्या भागिले कोविड-लागणीची संख्या म्हणजे कोविड-मृत्यू-दर (‘इंफेक्शन फॅटालिटी रेट’). पैकी कोविड-मृत्यूबाबतचे बातम्यांमधील आकडे आतापर्यंत तरी साधारण बरोबर आहेत. पण कोविड-लागणीबाबत हे खरे नाही. कारण भारतात अजूनही कोविड-चाचण्या मुळातच खूपच कमी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या नोंद झालेल्या कोविड-लागणीपेक्षा प्रत्यक्षात लागण झालेल्यांची संख्या अनेकपट आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (‘आयसीएमआर’ने) मे महिन्याच्या मध्यावर, ‘नमुना पाहणी’ या पद्धतीने केलेल्या देशव्यापी रक्त-तपासणीमुळे मात्र लागणीचे प्रमाण शास्त्रीय पद्धतीने ठरवले जाऊ लागले. प्रत्येक जिल्ह्यत १० ठिकाणी घरोघर जाऊन एकूण ४०० घरातील लोकांची रक्त-तपासणी, अशा प्रकारे ७०  जिल्ह्यंतील सुमारे २८,००० घरांतील लोकांची रक्त-तपासणी केल्यावर आढळले की, सरासरी ०.७३ टक्के लोकांना लागण झाली होती. म्हणजे सुमारे एक कोटी लोकांना लागण झाली आहे याकडे काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. पैकी सुमारे ८००० लोक दगावल्याने आतापर्यंतचा मृत्यूदर फक्त ०.०८ टक्के येतो.. तरी तो ‘स्वाइन फ्लू’च्या चौपटच आहे! पूर्ण अहवाल अजून प्रसिद्ध झालेला नाही आणि अधिक  जिल्ह्यंमध्ये पाहणी होणार आहे. पण हे नक्की की, नोंदलेल्या लागणीपेक्षा अनेकपटीने लागण झाली आहे. साध्या फ्लूपेक्षा स्वाइन फ्लूचा मृत्यूदर जास्त (०.०२ टक्के) होता. त्यापेक्षा कोविड-१९चा मृत्यूदर चौपट/ पाचपट दिसतो आहे. आज बातम्यांमध्ये येणारे ३ ते ५ टक्के असे मृत्यूदराचे आकडे चुकीचे गणित केल्याचा परिणाम आहे.

खाटांचा मुद्दा काळजीचा..

‘अरे बापरे, एक कोटी लोकांना लागण झाली!’ असे म्हणण्यापेक्षा, एक कोटी लोकांना प्रतिकारशक्ती आली व ‘हर्ड-इम्युनिटी’कडे प्रगती झाली असे म्हणायला हवे. केवळ वाढती लागणसंख्या हा खरा घाबरण्याचा मुद्दा नाहीच. त्यापैकी निम्म्या लोकांना तर कळतही नाही की त्यांना लागण होऊन गेली. ज्यांना आजार होईल त्यांच्यापैकी सुमारे फक्त ५ टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांच्यासाठीदेखील पुरेशा हॉस्पिटल खाटा व सुयोग्य उपचाराची सोय फारच अपुरी आहे; हा खरा काळजीचा, भीतीचा मुद्दा आहे.

कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचे वाढते आकडे प्रसिद्ध करणे निर्थक आहे, कारण कोविड-रुग्णांपैकी ९५ टक्क्यांहून जास्त रुग्ण १४ दिवसांत बरे होणार आहेतच. हॉस्पिटल्समध्ये दाखल झालेल्यांपैकी किती टक्के बरे झाले याला खरे महत्त्व आहे. केवळ लागणीचे हे वाढते आकडे हा एवढय़ा काळजीचा मुद्दा नाही. तर आजच मोठय़ा शहरांमध्ये गंभीर रुग्णांसाठी हॉस्पिटल्समध्ये जागा नसल्यामुळे पुढे काय होईल हा खरा काळजीचा मुद्दा आहे. स्वाइन फ्लूच्या मानाने जास्त मृत्यूदर आणि जास्त वेगाने प्रसार यामुळे कोविड-१९ची साथ गंभीर जरूर असली तरी ती जास्त गंभीर बनली असण्याचे कारण निराळे आहे. ते कारण असे की केरळ, बेंगळूरु, बारामती, वरळी, धारावी इत्यादी ठिकाणी साथ थोपवण्यासाठी उचललेली योग्य पावले सगळीकडे उचलली गेली नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या धिम्या गतीने न वाढता एकदम वाढली. खरे तर ती भारतभर अजून एवढी जास्त नाहीय. पण सरकारच्या गेल्या ४० वर्षांच्या खासगीकरण-धोरणाने सार्वजनिक आरोग्यसेवा अत्यंत अपुरी, कुपोषित राहिल्याने मुंबई, दिल्ली इ. ठिकाणी साथीने जोर धरल्यावर लगेच सरकारी हॉस्पिटलांमध्ये जागा नाही, तिथे काळजी घ्यायला पुरेसा स्टाफ नाही असे झाले आहे.

त्यावर उपाय म्हणून नुसत्या खाटांची संख्या वाढवून फारसे काही होणार नाही. प्रशिक्षित डॉक्टर, स्टाफ, पाइप्ड ऑक्सिजन, इतर सुविधा, हेही हवे. त्याच्या कमतरतेने अनावश्यक कोविड-मृत्यू होतील. शिवाय इतर गंभीर आजाऱ्यांसाठी हॉस्पिटल्समध्ये जागा नसल्याने त्यांचे अकारण मृत्यू होतील. खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण ठेवण्याची काहीच व्यवस्था इतकी वर्षे निर्माण न केल्याने त्यांच्या सेवा सरकारी पैशातून जनतेला देण्याची व्यवस्था नीट उभी राहात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूरपासून बीडपर्यंत सर्व  जिल्ह्यंत हॉस्पिटल-खाटांची मुंबई/ पुण्यापेक्षा किती तरी जास्त वानवा आहे. युद्धपातळीवर प्रयत्न केले नाहीत तर येत्या काही महिन्यांमध्ये अशा (वानवा असलेल्या) भागांत भयानक परिस्थिती ओढवू शकते. याचे कारण कोविड-विषाणू नाही तर आतापर्यंतचे खासगीकरणाचे धोरण हे असेल.

पुन्हा लॉकडाऊन?

कोविड-१९ची लागण वेगाने वाढतेच आहे म्हणून परत तमिळनाडूप्रमाणे लॉकडाऊन करणे चुकीचे होईल. कोविड-१९ साथीचा वेग कमी करायचा तर सरकारने खालील पंचसूत्री पाळली पाहिजे :

(१) विशेषत: हॉट-स्पॉटच्या भागात संशयित रुग्णांचा व त्यांच्या घनिष्ट संपर्कातील व्यक्तींचा मागोवा; (२) त्यांच्या घशातील स्रावाची तपासणी; पॉझिटिव्ह व्यक्तींचे योग्य पद्धतीने विलगीकरण; (३) त्यांच्यावर गरजेनुसार कमी-जास्त उपचार; (४) त्यांच्या घनिष्ट संपर्कात आलेल्यांची खाण्यापिण्याची इत्यादी सोय करून त्यांच्या घरातच किंवा राहण्याजोग्या, स्वच्छ, केंद्रांमध्ये त्यांचे अलगीकरण व (५) त्यांचा पाठपुरावा.

हे करण्यासाठी काही महिन्यांसाठी तरी आरोग्य खात्यात युद्धपातळीवर भरती केली पाहिजे. सध्याचे कर्मचारी फार अपुरे व थकलेले आहेत. नुसता गोडबोलेपणा न करता ‘आशा’ कार्यकर्तीना वा इतर कर्मचाऱ्यांना कबूल केलेले वाढीव वेतन द्यायला अधिक उशीर न करणे, सर्वाना वेळेवर वेतन देणे, इ. गोष्टीही केल्या पाहिजेत. काही ठिकाणी डॉक्टरांना दोन-तीन महिने वेतन नाही, ही अतिशय शरमेची बाब आहे. नागरिकांनीही ‘सहा फुटांचे अंतर, मास्क, हातांची स्वच्छता’ ही त्रिसूत्री पाळायला हवी. साथीचा वेग कमी करण्याचे हेच सर्वात चांगले मार्ग आहेत. हे सर्व नीट न करता सरकारने सर्वव्यापी, सर्वंकष ‘लॉकडाऊन’ व तो लांबवणे हा त्यांना सोयीचा पण लोकांसाठी छळवादी मार्ग वापरला. अजूनही वेळ गेलेली नाही. आजच्या तारखेपर्यंत पाच टक्केच लोकांना लागण झाली असावी. त्यांना हुडकून त्यांचे विलगीकरण, त्यांच्यावर उपचार, त्यांच्या घनिष्ट संपर्कातील लोकांचा पाठपुरावा हे युद्धपातळीवर केले पाहिजे.

‘जोखीम गटा’ला जपायचे..

सरकारने अंगीकारायच्या वर उल्लेखिलेल्या पंचसूत्रीच्या व नागरिकांसाठीच्या त्रिसूत्रीच्या आधारे साथीचा वेग कमी करत असताना त्यासोबत आरोग्यसेवेची क्षमता विशेषत: हॉस्पिटल-खाटांची संख्या वाढवायला हवी. म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या खूप वाढेल तेव्हा त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागाच नाही असे होणार नाही. दुसरे म्हणजे विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि त्याखालील वयाचे पण मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, श्वसनविकार इ. पैकी आजार असलेले यांना जपायला हवे, कारण अशी ‘खास जोखीम असलेल्यांमध्ये’ कोविड-१९ मुळे होणारी गुंतागुंत आणि त्यातून जिवाला धोका होणे याचे प्रमाण जास्त आहे. श्रेष्ठ साथरोगतज्ज्ञ डॉ. जयप्रकाश मुलीयिल यांनी मांडले आहे की, भारतात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण फक्त ८.५ टक्के असले तरी दगावणाऱ्यांमध्ये त्यांचे प्रमाण ५० टक्के असेल. साठ वर्षांखालील दगावणाऱ्यांपैकी बहुसंख्य लोक मधुमेह, उच्चरक्तदाब इ. आजार असणारे असतील. या उलट २५ वर्षांचा निरोगी तरुण कोविड-१९ने दगावण्याची शक्यता लाखात एक आहे.

हे अनावश्यक मृत्यू टाळण्यासाठी वर उल्लेखिलेली त्रिसूत्री या ‘खास जोखीम असलेल्यां’नी जास्त कटाक्षाने पाळली पाहिजे. तसेच आपला मधुमेह, उच्चरक्तदाब इ.वर नियंत्रणाखाली आहे ना याची खात्री केली पाहिजे. कोविडची लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरना दाखवले पाहिजे. निदान ज्येष्ठांनी शक्यतो घरीच थांबावे आणि घरातसुद्धा इतरांपासून सहा फुटांचे अंतर ठेवावे. लहान घरात फार अवघड असले तरी शक्यतो उपलब्धतेप्रमाणे किचन, बाहेरची खोली, व्हरांडा, बाल्कनी इ. इथे निरनिराळ्या कुटुंबीयांनी वावरावे, झोपावे. गरजेप्रमाणे घरातही मास्कचा वापर करावा. साठीच्या खालचे पण मधुमेह, उच्चरक्तदाब इ. असणारे यांचे प्रमाण भारतात जास्त म्हणजे सुमारे २० ते ३० टक्के आहे. भारतात ‘समूह संरक्षण’ ही अवस्था येऊन त्यामुळे ही साथ ओसरेपर्यंत येते काही महिने या ‘जोखीम गटा’मधील एकूण ३० ते ४० टक्के लोकांना लागणीपासून जपले आणि कोविड झाल्यास वेळेवर योग्य उपचार उपलब्ध होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम केली तर भारतात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या व मृत्यू बरेच घटवता येतील, असे मुलीयिल यांनी मांडले आहे. निर्थक आकडय़ांऐवजी यावर चर्चा करायला हवी.

लेखक सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. anant.phadke@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on covid 19 spread beyond the numbers abn

ताज्या बातम्या