डॉ. विवेक कोरडे
अपकारांची फेडही उपकारांनीच करण्याच्या हट्टाने महात्म्याने मानवतेचे यज्ञकुंड प्रज्वलित केले होते. महात्म्याने त्यात दिलेल्या प्राणाच्या आहुतीने ते यज्ञकुंड अधिक प्रज्वलित झाले.. गांधीजींच्या ७१ व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या वैचारिक वारशाचा हा एक शोध..
देशभक्त आणि धर्मरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्याच्या पिस्तुलातून निघालेल्या तीन गोळ्या महात्म्याने आपल्या उघडय़ा छातीवर झेलल्या आणि महात्मा मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी सर्वोच्च बलिदान करीत अजरामर झालेल्या सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्त यांच्या परंपरेत सामील झाला. अहिंसा हा महात्म्याचा धर्म होता. सत्य हाच महात्म्याचा ईश्वर होता आणि प्रेम हेच महात्म्याचे साधन होते. धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता या तीनही क्षेत्रांत अहिंसक परिवर्तन घडवून महात्मा केवळ मनुष्यमात्रांचेच नव्हे तर साऱ्या प्राणिमात्रांचे रामराज्य स्थापन करू पाहत होता. मनुष्याचे मनुष्याकडून आणि राष्ट्राचे राष्ट्राकडून होणारे शोषण थांबवून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि सर्वधर्मसमभावावर आधारित एक नवी मानवसंस्कृती निर्माण व्हावी यासाठी महात्मा जगला आणि त्यासाठी त्याने जाणीवपूर्वक बलिदानही दिले. गुलामीत सारीच मानवी मूल्ये पायदळी तुडविली जातात, म्हणून महात्म्याचा स्वातंत्र्यसंग्राम होता आणि या मूल्यांच्या रक्षणार्थच त्याचे जीवन होते. जगात जेव्हा असे विचार मांडले जातात तेव्हा त्या विचारांच्या परिणामांच्या कल्पनेने भयभीत झालेले प्रस्थापित, ते विचार मांडणाऱ्यांना संपवून विचार संपवू पाहतात. महात्मा तर केवळ विचार मांडून थांबत नव्हता तर त्यासाठीचा कार्यक्रम मांडून तो राबवू पाहत होता. अर्थातच त्याची परिणती हत्येहून वेगळी होऊच शकत नव्हती. महात्म्याच्या हत्येला त्याच्यावर आरोपित केलेला मुस्लीमधार्जिणेपणा वा ५५ कोटी नव्हे, तर प्रस्थापित व्यवस्थेच्या जागी नवी व्यवस्था निर्माण करण्याचा त्याचा अट्टहास हेच कारण होते.
मानवी इतिहासातील एक क्रूर आणि अमानुष घटना असेच या घटनेचे वर्णन करावे लागेल. जगातील सर्वाधिक युद्धे आणि हिंसा धर्माच्या नावे करण्यात आल्या आणि ज्या ज्या वेळी हिंसा घडवायची असते त्या त्या वेळी ती घडविणारे धर्माचा आश्रय घेऊन तसे करतात. याची जाणीव असूनही महात्मा सारे धर्म खरेच आहेत आणि ते अहिंसाच शिकवितात, म्हणून उपासनापद्धती भिन्न असल्या, धर्म भिन्न असले, तरी सारी मानवजात प्रेम आणि अहिंसेच्या तत्त्वांवर एक सुंदर जग निर्माण करू शकते, हा महात्म्याचा ध्यास होता, अट्टहास होता. आपल्यावर केलेल्या अपकारांची फेडही उपकारांनीच करण्याच्या हट्टाने महात्म्याने मानवतेचे यज्ञकुंड प्रज्वलित केले होते. महात्म्याने त्यात दिलेल्या प्राणाच्या आहुतीने ते यज्ञकुंड अधिक प्रज्वलित झाले आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्म्याच्या मारेकऱ्याने मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीला मारले. महात्मा मात्र मेला नाही. त्याला मारता आले नाही.
आज त्या घटनेला सात दशके उलटून गेली आहेत आणि जगातील १८० देश महाम्याचे १५० वे जन्म वर्ष साजरे करीत आहेत. जगभरातील सहाशेहून अधिक विद्यापीठांमध्ये ‘गांधी अध्ययन केंद्रे’ चालविली जातात. दुर्बलांवरच्या अन्यायाच्या निवारणार्थ जगभरात सुरू असलेल्या अहिंसक संघर्षांचे नेते कुणीही असोत, त्याची प्रेरणा महात्मा असते. याचे कारण हे की, महात्मा मरूनही उरला आहे.
महात्म्याचे जीवन हा एक अविरत संघर्ष होता. ‘माझ्या संघर्षांत कोणीही हरत नाही आणि कोणीही जिंकत नाही. कारण माझा संघर्ष हा माझ्याच विरोधात असतो.’ असे महात्मा म्हणतो आणि हेच त्याचे वेगळेपण आहे. अशा संघर्षांमध्ये हरणाऱ्याला आपण काही गमावले म्हणून दुख होत नसते आणि जिंकलेल्याला उन्मादही होत नसतो. अशा संघर्षांतून साध्य केलेल्या गोष्टींचा उपभोग शांतीने घेता येऊ शकतो. थोडक्यात, महात्म्याचा संघर्ष माणसांतील सद्भावनांना जागृत करणारा आणि त्या सद्भावनांतून एका न्याय्य समाजाच्या निर्मितीचा होता. ‘पापाचा द्वेष करा, पाप करणाऱ्याचा नव्हे’ ही ती शिकवण होती. तिच्या अंगीकाराचा मार्ग महात्म्याने दाखविला. अमलात आणला.
तत्त्वासाठी मरण्यातली निर्भयता
महात्म्याचे कार्य दक्षिण अफ्रिकेतील स्थलांतरित भारतीय आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यापुरते मर्यादित असले तरी त्याच्या विचारांचा आवाका एक देशाच्या आणि स्थलकालाच्या मर्यादेत मावणारा नव्हता आणि नाही. ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा डार्वनिचा उत्क्रांतीचा सिद्धांत जगमान्य आहे. परंतु ‘बळी तो कान पिळी’ या न्यायानेच जर जगाचा कारभार चालणार असेल, तर दुर्बळांना न्याय मिळणे ही गोष्टच अशक्य होऊन बसेल आणि अशा लढय़ांत एक पक्ष दुसऱ्यापेक्षा नेहमीच दुर्बल, नि:शस्त्र आणि निराधार असतो. अशा लढय़ांच्या वेळी महात्मा साऱ्या दीनदुबळ्या पददलितांना आधार होतो. या आधाराशिवाय असे दुर्बलांचे लढे उभेच राहू शकत नाहीत. मारण्याच्या सामर्थ्यांला महत्त्व असते, तसेच न्यायाच्या प्रस्थापनेसाठी मरण पत्करण्याचे सामर्थ्य महत्त्वाचे असते. अशा निर्भयतेने मारून घेण्याच्या सामर्थ्यांलाच महात्मा दुर्बलांच्या लढय़ाच्या शस्त्राचे स्वरूप प्राप्त करून देतो. हे सामर्थ्य म्हणजे मनुष्याच्या सदसद्विवेकाला केलेले आवाहन आहे. माणसाच्या चांगुलपणावरील श्रद्धा आहे आणि याच श्रद्धेतून महात्मा मरणोत्तरही शिल्लक राहिला आहे.
तत्त्वासाठी मरण पत्करण्याच्या काहींच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्यांला त्याची व्याप्ती वाढवून अधिक बळकटी आणणे आणि त्यायोगे दुर्बलांचे संघर्ष उभे करणे ही गोष्ट महात्मा करतो व त्यासाठीच त्याच्या एकादशव्रतात ‘सर्वत्र भयवर्जनम्’ असते. महात्म्याची ही निर्भयताही वैशिष्टय़पूर्ण आहे. ही निर्भयता दुसऱ्यापेक्षा अधिक बळ आहे म्हणून, म्हणजे एकाकडे पिस्तूल असेल तर दुसऱ्याकडे मशीनगन आहे, म्हणून आलेली निर्भयता नाही. तर ती निर्भयता भयाच्या अभावातून निर्माण झालेली आहे. येथेही महात्मा पुन्हा माणसाच्या चांगुलपणावरच विसंबून आहे. प्रत्येक मनुष्याची अन्य मनुष्यांच्या मनुष्यत्वावरची श्रद्धा बळकट करून महात्म्याला एक नवा अहिंसक आणि न्याय्य समाज घडवायचा आहे. आज जेव्हा शस्त्रस्पर्धा संपविण्याच्या दृष्टीने काही उपाय योजले जातात तेव्हा निभर्यतेची, भयाच्या अभावाची महात्म्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ते प्रयत्न असतात. ती माणसाची माणूसपणावरील श्रद्धा असते. महात्मा ही श्रद्धा बळकट करताना साथीला उभा असतो.
तत्त्वासाठी मरण पत्करण्याची ही शक्ती केवळ अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्यांनीच वापरली असे नाही, तर हिंसा त्याज्य नसलेल्या भगत सिंग आणि त्यांच्या साथींनीही त्या शक्तीचा वापर केला आहे. १९२९ मध्ये लाहोरच्या तुरुंगात जतीन्द्रनाथ दास यांनी ६३ दिवसांचे उपोषण करून प्राणत्याग केला होता. त्यानंतर अंदमानच्या काळकोठडीतील बंदी केलेल्या त्यांच्या क्रांतिकारक साथींनी सन्मानाच्या वागणुकीकरिता केलेल्या सामूहिक उपोषणात महावीर, मोहित आणि मोहन या साथींनीही तत्त्वासाठी मृत्यू जवळ केला आहे. या मरण्याच्या शक्तीचा वापर जगात जेव्हा जेव्हा होतो तेव्हा त्या शक्तीबरोबर महात्मा समोर येतो.
आज जागतिक तापमानवाढ आणि त्या अनुषंगाने पर्यावरणविषयक प्रश्नांनी साऱ्या मानवजातीच्या भवितव्याविषयीच चिंता निर्माण केली आहे. यावर अनेक पर्यायही काढले जात आहेत. परंतु महात्म्याने या बाबतीत सांगितलेले एक वाक्य सर्वच पर्यायांना मार्गदर्शक आहे. महात्मा म्हणतो, ‘‘अर्थ प्रोव्हाइडस् इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड, बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड.’’ आपल्याला आज अनेक व्यक्ती त्यांचे हव्यास बाजूला सारून, ऐपत असतानाही साधेपणाचा अंगीकार करताना दिसतात. त्या साधेपणात नकळत महात्मा सामावलेला दिसतो.
संपत्तीचे विकेंद्रीकरण, अस्पृश्यतामुक्ती
महात्म्याचा चरखा केवळ सूत काढण्यासाठी नव्हता. तर अगदी खेडय़ापाडय़ांत राहणाऱ्या सामान्य गृहिणीलाही सन्मानाचा रोजगार देऊन तिचे सक्षमीकरण करीत होता आणि त्याचबरोबर संपत्तीचे केंद्रीकरण आणि औद्योगिकीकरणातून होणारे शोषण थांबवायचे असेल तर उत्पादनाची साधने उपभोक्त्याच्या हाती असली पाहिजेत हे स्वयंपूर्णतेचे अर्थशास्त्रही सांगत होता.
महात्म्याचा झाडूही केवळ स्वच्छतेसाठी नव्हता आणि केवळ रस्ते झाडण्यासाठी तर अजिबात नव्हता. साऱ्या समाजाची घाण स्वच्छ करणाऱ्या समाजाला दिलेला अस्पृश्यतेचा अमानवी दर्जा घालवून त्यांना मानवी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी होता. जेव्हा अशा कुप्रथा नष्ट करण्यासाठी अशा कृतींचा अंगीकार केला जातो तेव्हा त्याला प्रेरणा महात्म्याची असते.
ज्या देशात आजही महिला मंदिरात आल्या की मंदिर ‘अपवित्र’ होते, त्या देशात महात्मा एक दलित महिला पंतप्रधान व्हावी अशा स्वराज्याची स्वप्ने पाहत होता. माणूसपणाच्या आड येणाऱ्या साऱ्याच रूढी महात्मा तोडायला निघाला होता. विषमता आणि अन्याय यांच्याविरुद्धचे युद्ध महात्मा सत्य आणि अहिंसा या शस्त्रांनी लढत होता. त्याने प्रज्वलित केलेली खऱ्या स्वातंत्र्याची ज्योत प्रस्थापितांना मानवणारी नव्हती. त्या ज्योतीचा प्रकाश ज्यांना मान्य नव्हता, त्यांनी महात्म्याची हत्या करून ती ज्योत विझवायचा प्रयत्न केला. पण महात्मा मरूनही ती ज्योत मात्र तेवतच आहे. कारण महात्मा मरूनही उरला आहे.
लेखक गांधीवादाचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.
ईमेल : drvivekkorde@gmail.com