साधेपणाचा दर्प असणाऱ्या राजकारण्यांपैकी ‘आरआर आबा’ नक्कीच नव्हते.. त्यांचा साधेपणा सच्चा आणि स्वतपासूनचा होता. याचे प्रतिबिंब त्यांच्या कामातही दिसे; मग त्या पोलिसांच्या बदल्या-बढत्या असोत की डान्सबार बंदी, त्याहीआधी तंटामुक्ती असो की गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारण हे सामान्य माणसासाठी नसते असे मानले जाण्याच्या काळात रावसाहेब रामराव पाटील हे जवळपास तीन दशके महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य माणसाचा चेहरा बनून राहिले होते. इतके की त्यांच्या नावातील रावसाहेबपणाने ते उपमुख्यमंत्री झाले तरी कधीही डोके वर काढले नाही. जनतेसाठी, सामान्य नागरिकासाठी ते कायमच ‘आरआर आबा’ राहिले. सामान्य माणसाशी जुळलेली नाळ राजकारणातील अपात्रता दर्शवते. पण आबांनी त्याची फिकीर केली नाही. राजकारणात इतकी वष्रे राहूनही आणि त्यात पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील असूनही आरआर यांचा एकही साखर कारखाना नाही की एखादी बँक त्यांच्या हाती नाही. आबांचा सख्खा लहान भाऊ पोलीस खात्यात कनिष्ठ पदावर आहे. गृहमंत्री झाल्यावरही त्याच्या पदात आणि स्थानात बढती आणि बदली करण्याचा मोह आबांना झाला नाही. उपमुख्यमंत्री असतानाही आबांची मुले सरकारी शाळांतच- आणि तीही मराठी माध्यमाच्या- शिकली. राजकारणात साधे असणाऱ्यांकडून बऱ्याचदा हे साधेपण मिरवण्यासाठी वापरले जाते. या साधेपणाचा दर्प अशा व्यक्ती आसपास जरी आल्या तरी वातावरणात पसरतो. आबांचा साधेपणा असा नव्हता. तो खराखुरा होता आणि आपण साधे आहोत याचा त्यांना काडीचाही कमीपणा नव्हता. वास्तविक आबा ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करीत त्या पक्षात कंत्राटदारांची ऊठबस चांगलीच लक्षणीय. पण आबा या कंत्राटदारांच्या गराडय़ात कधी दिसायचे नाहीत. सामान्य माणसाविषयी असलेली त्यांची कणव ही अत्यंत प्रामाणिक होती. आबांच्या आधी महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद छगन भुजबळ यांनी भूषवले होते. राज्यातील पोलीस दलाविषयी बरे बोलावे असे त्या काळात फारसे काही घडले नाही. किंबहुना पोलिसांच्या बढत्या आणि बदल्या हा साधनसंपत्ती निर्मितीचा मोठाच मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला होताो. हे असले प्रमाद आबांच्या काळात झाले नाहीत. त्यामुळे राजकारणातील टगेपणा आबांच्या वाटय़ाला कधीही शिवला नाही. वास्तविक आबा हे स्वपक्षीयातच आणि प्रचलित राजकारणातही या साधेपणामुळे टिंगलटवाळीचा विषय होत. पण तिकडे त्यांनी दुर्लक्षच केले. परंतु आबांच्या या प्रतिमेचे मोल पक्षाध्यक्ष शरद पवार जाणून होते. एका बाजूला एकापेक्षा एक तगडे नेते असताना त्यांनी पक्षाचा चेहरा म्हणून आबाच कसे पुढे राहतील याची सतत काळजी घेतली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छता मोहीम प्रसिद्धीच्या झोतात आहे. पंचतारांकित आयुष्य जगणारे छायाचित्रासाठी का असेना आज रस्त्यावर झाडू घेऊन उतरताना दिसतात. परंतु स्वच्छतेची ही निकड जेव्हा इतकी फॅशनेबल नव्हती, त्या काळी आबांनी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हाती घेतले. आजची स्वच्छता मोहीम ही बऱ्याच अंशी माध्यमकेंद्री शहरांपुरतीच मर्यादित आहे. परंतु आबांना माध्यमझोतात नसलेल्या खेडय़ांची काळजी होती. त्यामुळे त्यांचे अभियान हे ग्रामस्वच्छता अभियान होते. महाराष्ट्रात खेडय़ांतील दारिद्रय़ ओसंडून वाहत असते. परंतु तरीही प्रश्न तत्त्वाचा आहे म्हणत हे खेडूत आपापसांत संघर्षांत आणि पुढे कज्जेदलालीत आपला वेळ आणि साधनसंपत्ती खर्च करतात. हे कमी व्हावे याच उद्देशाने आबांनी महाराष्ट्रात तंटामुक्त गाव अभियानदेखील यशस्वीपणे राबवले.

आबांचे बालपण प्रचंड हलाखीचे. गरिबी इतकी की आपल्या स्वर्गवासी झालेल्या वडिलांचे कपडे त्यांना घालावे लागले. त्यांच्या आई-वडिलांच्या संसाराची वाताहत होती. तीस काही कारणे जबाबदार आहेत हे आबांच्या मनात कायम होते. त्याचमुळे गृहमंत्रिपदी आल्यावर आबांनी मुंबईतले बदनाम डान्स बार बंद करण्याचा निर्णय घेतला. तो वादग्रस्त ठरला. पण आबांनी हजारो महिलांचा दुवा या निर्णयाद्वारे घेतला. या निर्णयाचे शहाणपण आणि अंमलबजावणी यावर आमचे आबांशी मतभेद होते. त्यामुळे त्या वेळी त्यांच्यावर टीका करावी लागली. पण आबांचा मोकळेपणा हा की तरीही आपली बाजू किती योग्य आहे, हे सांगण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. मनाचा हा मोकळेपणा हे आबांचे आणखी एक वैशिष्टय़. सर्वसाधारण अनुभव असा की सत्ताधीश राजकारणी आपणास सर्वच काही कळते असा आव आणीत असतात. आबा कधीच त्यातले नव्हते. आपल्या खात्याशी असंबंधित तरीही माहिती करून घ्यावयास हवे अशा अनेक विषयांचे त्यांना कुतूहल होते. तेलाचे भाव कोण ठरवते येथपासून ते डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ठरते तरी कशी असे अनेक मुद्दे जाणून घेण्यात आबांना रस असे आणि त्यासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी पदाच्या मोठेपणाची त्यांना कधीच आडकाठी होत नसे. मात्र २६/११ घडल्यानंतर त्यांच्या एका विधानाचा विपर्यास प्रसिद्धी माध्यमांनी केला आणि आबांना त्यामुळे पदत्याग करावा लागला. याचे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. दुधाने तोंड पोळल्यावर एखाद्याने ताकही फुंकून प्यावे तसे आबा त्यानंतर सरसकटपणे प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्याबाबत साशंकच राहिले. आबांचे आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांनी आपण पक्षापेक्षा मोठे आहोत असे कधी खासगीतदेखील मानले नाही. पक्षाच्या जिवावर मोठे व्हायचे, अमाप पसा करायचा, त्या आधारे स्वप्रतिमा निर्मिती हेच उद्दिष्ट ठेवायचे आणि स्वहित साधण्यात जरा काही आडकाठी आली की प्रसंगी पक्षाला लाथ मारून दुसरा घरोबा करायचा हे असले क्षुद्र उद्योग आबांनी कधीही केले नाहीत. ते जगले असते तरीही त्यांनी ते केले नसते.
वास्तविक स्वहितापेक्षा पक्षास प्राधान्य देण्याच्या त्यांच्या स्वभावानेच त्यांचा आजार बळावला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आपल्या कर्करोगाचा बभ्रा झाल्यास पक्षाच्या यशापयशावर त्याचा परिणाम होईल म्हणून आबांनी आपले आजारपण अंगावर काढले. त्यामुळे उपचार सुरू होईपर्यंत आबांचा कर्करोग बळावलेला होता. आपण जे काही करीत आहोत याची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि जेव्हा कर्करोग बराच पुढे गेल्याचे त्यांना जाणवले तेव्हा त्यांची जीवनेच्छाच संपली. आपण आता जगणार नाही असेच त्यांच्या मनाने घेतले. तेव्हापासून आबांवरची मरणछाया कधीच दूर झाली नाही. त्यांचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कुटुंबीयांनी जातीने शक्य तितके प्रयत्न करूनदेखील आबा मनाने उभे राहिले नाहीत आणि आज त्यांचे शरीरही पडले. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने अनेक कर्तृत्ववान राजकारणी अकाली गमावले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता आरआर आबा. देशपातळीवर काही करून दाखवू शकले असते असेच हे सर्व. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. आम आदमी पक्षास राजकारणात महत्त्व येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील हा आद्य आम आदमी काळाच्या पडद्याआड जावा हा योगायोग चटका लावून जाणारा. राजकारणात इतका काळ काढूनही आपले आम आदमीपण राखू शकलेल्या या आमच्या मित्रास लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles about rr patil
First published on: 17-02-2015 at 12:13 IST