शिवसेनेशिवाय भाजप स्वतंत्रपणे महाराष्ट्रात तरू शकत नाही, हे वास्तव आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्येच सेना-भाजपच्या जागांमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात सेना १७१ जागा लढते, तर भाजप ११७ जागांवर लढतो. भाजपला आपल्या ताकदीचा आता नव्याने साक्षात्कार झाला असून निम्म्या जागा लढविण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
कमळाबाईला आता आपल्या ताकदीचा अंदाज आला आहे. किती काळ अन्याय सहन करायचा, यापुढे माझा आवाज दाबता येणार नाही.. निम्मा वाटा मलाही हवा. कारण, मोदी सरकार!. खरे तर भाजपला आपल्या ताकदीचा अंदाज यापूर्वीच आला होता. परंतु नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या मार्गात अडसर नको म्हणूनच लोकसभा निवडणुकीत भाजप गप्प राहिला.. नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामी लाटेचा फायदा होऊन शिवसेनेच्याही जागा महाराष्ट्रात वाढल्या. आता सेना-भाजपला महाराष्ट्रातील सत्तेचे वेध लागले. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार, तर मुख्यमंत्री कोणाचा, जागावाटपात आता बदल हवा, असा आग्रह.. हे सारे जाणार कोठे? मतभेद निर्माण झाले तर सुसंवाद निर्माण कोण करणार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाधान कसे होणार, हा लाखमोलाचा सवाल सध्या दोन्ही पक्षांना भेडसावत आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या वाटचालीत अनेकदा रुसवेफुगवे झाले. अगदी तुटेपर्यंत ताणले गेले. परंतु प्रमोद महाजन यांनी दोन्ही पक्षांमधील नाराजी अनेकदा सहजपणे दूर केली. दुरावा वाढणार नाही, याची काळजी घेतली. लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुखांचे जिव्हाळ्याचे संबंध यांनाही युतीमध्ये विशेष स्थान होते. हिंदुत्वाच्या पायावर युती उभी राहिली तो काळ भाजपच्या वाढीचा होता. शिवसेनेच्या साथीने भाजपने पद्धतशीरपणे महाराष्ट्रात हातपाय पसरले. महाराष्ट्रात शरद पवार यांना अंगावर घेण्याची हिम्मत गोपीनाथ मुंडे यांनीच प्रथम दाखवली. खरे तर १९९० मध्येच सत्तेने थोडक्यासाठी हुलकावणी दिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते असलेले गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे, मी जरी विरोधी पक्षनेता असलो तरी मुख्यमंत्र्याची खुर्ची माझी, म्हणजे ‘भाजप’ची आहे. १९९५ साली सत्ता आली; परंतु मुख्यमंत्रिपदाचे मुंडे यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. संख्याबळाच्या निकषावर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न मुंडे पाहत होते. या साऱ्या वाटचालीत सेना-भाजपमध्ये अनेकदा संघर्ष झाले. बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेतील झटकेही भाजप नेत्यांना खावे लागले. तथापि भाजप नेत्यांनी बाळासाहेबांचा शब्द युतीमध्ये अंतिम मानला.   
भाजपने शिवसेनेबरोबर साथसंगत करतानाही भाजप कसा वाढेल आणि शिवसेना कशी कमी होईल याची वेळोवेळी काळजी घेतली. यामुळेच, बाळासाहेबांनी कधी भाजपला कमळाबाई म्हणून हिणवले, तर कधी गोपीनाथ मुंडे यांना ‘मुंडा बिगडा जाय’ असा इशाराही दिला. आज प्रमोद महाजनही नाहीत आणि गोपीनाथ मुंडे यांनाही काळाने हिरावून नेले. मुंडे यांच्या निधनामुळे, एक चांगला मित्र गमावल्याचे दु:ख शिवसेनेलाही आहे. देशात भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे महायुतीच्या घटक पक्षांची दादागिरी आता खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात भाजपला आता सत्तेत मोठा वाटा पाहिजे असे इशारेही सुरू झाले आहेत. खरे तर गोपीनाथ मुंडे खासदार व कें द्रीय मंत्री बनले होते तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे शिवसेनेबरोबरचे संबंध जपण्यास मध्यस्थाची भूमिका कोण बजावणार, हा सेनेसाठीही एक मोठा प्रश्नच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्येच सेना-भाजपच्या जागांमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात सेना १७१ जागा लढते, तर भाजप ११७ जागांवर लढतो. भाजपला आपल्या ताकदीचा आता नव्याने साक्षात्कार झाला असून निम्म्या जागा लढविण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. अधिकृतपणे अद्यापि कोणी नेमक्या किती जागा व कोणत्या जागा लढवायच्या, याबाबत ठोसपणे बोलत नसले तरी भाजप नेत्यांनी अलीकडेच एका बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अभ्यास केला असून विधानसभा निवडणुकीत जास्त जागा भाजपला मिळाल्या पाहिजेत, अशा निष्कर्षांप्रत भाजपनेते आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणाला जाहीर करायचे.. देवेंद्र फडणवीस ही भाजपची छबी असेल तर स्वतंत्र विदर्भाचे काय करायचे? उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याचे सेनेच्या नेत्यांनी निश्चित केले असले तरी ते भाजपला मान्य होणार का, जागावाटपाचे काय होणार, भाजपला जास्त जागा मिळणार का, अशा अनेक मुद्दय़ांवरून सेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता असून भाजपतर्फे या वादात कोण मार्ग काढणार, हा सेनेपुढचा कळीचा मुद्दा आहे. भाजपमध्ये सामूहिक निर्णयप्रक्रिया कार्यरत होईल आणि फारशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा शिवसेनानेते मनोहर जोशी यांचा विश्वास आहे. हिंदुत्वाच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या युतीवर लोकांनी विश्वास ठेवून मतदान केले आहे. महायुतीचे हिंदुत्व आता घरोघरी पोहोचले असून लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अशा वेळी कोणीही करंटेपणा करणार नाही, असे मनोहर जोशी मानतात. बाळासाहेब व महाजनांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांचे चांगले सख्य निर्माण झाले. मुंडे यांनी शिवसेनेबाबत कधी दुजाभाव दाखवला नव्हता. आताही महायुतीत कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात शिवसेनाच ठरल्याप्रमाणे जागा लढेल तसेच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असेही जोशी यांचे म्हणणे आहे. त्यातही दोन्ही पक्षांमध्ये कोणत्या कारणावरून दुरावा निर्माण झाल्यास शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून हस्तक्षेप करण्याचीही मनोहर जोशी यांची तयारी आहे. अर्थात अशी अधिकृत जबाबदारी कोणी माझ्यावर सोपवली नाही, हेही सांगण्यास ते विसरत नाहीत. महाजनांच्या निधनानंतरही बाळासाहेबांनी गोपीनाथ मुंडे यांना बरोबर घेऊन वाटचाल केली. भाजपमध्ये मुंडे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले तेव्हा बाळासाहेबांनीच मुंडे यांना आधार दिल्याचे खासदार संजय राऊत आवर्जून सांगतात. उद्धव ठाकरे यांनीही मुंडे यांचा सन्मान राखला. आज मुंडे नाहीत तरीही युती कायम राहणार. सेना-भाजप या दोन्ही पक्षांसाठी अन्य कोणताही समविचारी पक्ष नाही. शिवाय लोकांनी ही युती स्वीकारली असून लोकांचा मानसिक दबाव दोन्ही पक्षांवर आहे, त्यामुळे महायुतीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्यास भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस तसेच विनोद तावडे हे तरुण नेते सक्षम आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांचे भाजपच्या हायकमांडशी थेट व उत्तम संबंध असल्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून ताकदीने लढण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा राऊत यांचा विश्वास आहे.  
सत्ता दोघांनाही हवी आहे. मुख्यमंत्रिपदाची आस शिवसेनेला जशी आहे तशीच भाजपलाही आहे. मोदी लाटेमुळे आपली ताकद वाढल्याचा साक्षात्कार भाजपला होत असला तरी शिवसेनेशिवाय भाजप स्वतंत्रपणे महाराष्ट्रात तरू शकत नाही, हेही वास्तव आहे. मनसेचा धाक अथवा त्यांच्याशी युती करण्याची बात आता भाजपला मारता येणार नाही, हेही वास्तव आहे. एकतर स्वबळावर सर्व जागा लढवणे अथवा महाराष्ट्रात शिवसेना देईल तेवढय़ा जागांमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणणे एवढाच पर्याय आजघडीला भाजपकडे आहे. शिवसेनेला याची पुरेपूर जाणीव आहे. सत्तेवाचून राहण्याची कोणाचीच तयारी नाही, त्यामुळे फारशी मतभिन्नता होण्याची शक्यता कमीच आहे. मतभेद झालेच तर ते मिटविण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, यावर सेनानेते ठाम आहेत.